‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 09:19 AM2019-01-06T09:19:00+5:302019-01-06T09:20:02+5:30

समाजमन : धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करीत बसलेला असतो. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्यामुळे बऱ्याचदा मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन कोणी करावे हा एक प्रश्नच आहे.

'Mom, I want to play, let me go, please' | ‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’

‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’

googlenewsNext

- प्रा.सुदर्शन धस 

सध्या मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातील गीत ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ दे न - वं’ हे  प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्याचं कारण त्यातील सहजसुलभ, अस्सल, ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा गीतामध्ये चपखल वापर, उत्कृष्ट संगीत व ताल, सूर व लयीचा योग्य वापर आहे. त्यामुळे हे गीत आपल्या सगळ्यांच्याच अंत:करणाला साद घालते. या गीतामधील छोटा, गोंडस मुलगा आईकडे खेळायला जाण्यासाठी परवानगी मागतो.

पण वास्तवात आणि त्यातही विशेषत: शहरी जीवनात आपल्याला लहान मुलांचे भावविश्व कसे दिसते ? ती मुले सतत शाळा व क्लासच्या मागे पळत असतात. एखादा आवडता खेळ देहभान विसरुन खेळता येऊ शकतो. त्यातून मनमुराद, निखळ, निर्भेळ आनंद मिळू शकतो, हे त्यांच्या गावीही नसते. पालकही मुलांच्या तथाकथित गुणवत्तेच्या व त्यामुळे मिळणाऱ्या कथित प्रतिष्ठेपायी जिवाचा आटापिटा करीत नुसते धावत असतात.  

साहजिकच धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करत बसलेला असतो. काही जण तर अभ्यासाच्या फंदात न पडता, निव्वळ मोबाईलच्या आहारी जातात. अर्थात याला काही प्रमाणात अपवाद आहेतच. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्यामुळे बऱ्याचदा मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन कोणी करावे हा एक प्रश्नच आहे. खरे तर इथे अगोदर पालकांचेच प्रबोधन होणे जरुरीचे आहे. ज्यामुळे, ते स्वत: आपले जीवन आरोग्यपूर्ण जगू शकतील व इतरांसमोर आदर्श ठेवतील.

या बाबतीत मला प्रसिद्ध उद्योगपती अजिम प्रेमजी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आठवतो. ते म्हणतात, बाहेर पाऊस पडत असेल आणि तुम्हाला त्या पावसात भिजण्याची, नाचण्याची किंवा गाण्याची इच्छा झाली तर, अगदी मनमुरादपणे पावसात जाऊन तो आनंद घ्या. मुलांचे बालपण, त्यांचा आनंद हिरावून घेऊ नका, असे ते पालकांना आवाहन करतात. आज शालेय खेळ, विविध क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. शासन क्रीडा क्षेत्राला भरपूर प्रोत्साहन देत आहे. यामुळे भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश आहे. विविध क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना पुढे अनेक उज्ज्वल संधी मिळतात. आज विविध शहरांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा घेऊन, धावण्याचे महत्त्व स्पष्ट केले जाते. कबड्डी, खो - खो, कुस्ती, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, जलतरण, शरीरसौष्ठव यांसारख्या स्पर्धा होतात. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे होतात. गिर्यारोहण, ट्रेकिंग वगैरेंसारखे धाडसी उपक्रम होतात. आपली शारीरिक, मानसिक कुवत, प्रकृती, आवड व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची जिद्द , कष्ट व परिश्रम करण्याची तीव्र इच्छाशक्ती यामुळे आवडीच्या क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. यातील एखाद्या खेळाचे रुपांतर, नंतरच्या काळात छंदातही होऊ शकते. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहू शकते. इतरांसमोर एक आदर्शही निर्माण होईल.

‘आई मला खेळायला जाऊ दे न - वं’ असे म्हणण्याऐवजी आजची मुले म्हणतात, ‘आई मला सायबर कॅफेत जाऊ दे न - वं ’ हे चित्र बदलायला हवे. संगणक व संगणकाच्या सहाय्याने होणारा अभ्यासही महत्वाचा आहे. पण त्याचा वापर योग्य प्रमाणातच झाला पाहिजे . आपली आजची जीवनशैली खरोखर आरोग्यदायी आहे का ? हा खरा प्रश्न आहे.
पालकांनी स्वत: व्यायाम, योगासने, सकाळ - संध्याकाळ शक्य असेल तेव्हा पायी चालणे, दूरदर्शन व मोबाईलचा मर्यादित वापर व विविध खेळांप्रती आस्था ठेवून, मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेले व खेळ-व्यायामाचे महत्त्व स्वत: कृतीतून दाखवून दिले तर नवीन पिढी नक्कीच शारीरिक , मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनेल. आवडत्या क्षेत्रातील अभ्यासाबरोबरच मग ही छोटी -छोटी  मुले पुन्हा गुणगुणायला लागतील व आईला म्हणतील, ‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’     

(लेखक साहित्यिक व रयत शिक्षण संस्थेत अध्यापक आहेत.)

Web Title: 'Mom, I want to play, let me go, please'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.