स्वभावाला औषध आहे, ही घ्या स्वभाव बदलण्याची गोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:00 AM2018-07-01T03:00:00+5:302018-07-01T03:00:00+5:30

स्वभावाला औषध नाही ही म्हण खरी असली, कोणतेही औषध घेऊन रागीट, चिंतातुर स्वभाव बदलत नसला तरी सजगतेच्या नियमित अभ्यासाने तो बदलू शकतो.

mindfulness can change your life | स्वभावाला औषध आहे, ही घ्या स्वभाव बदलण्याची गोळी!

स्वभावाला औषध आहे, ही घ्या स्वभाव बदलण्याची गोळी!

googlenewsNext
ठळक मुद्देसजगता हा मेंदूचा व्यायाम आहे. नियमित व्यायामाने स्नायू बळकट होतात तसेच सजगतेने मेंदूतील भावनिक संतुलन आणि स्मरणशक्तीशी संबंधित केंद्रे विकसित होतात.

यश वेलणकर

‘धर्म अफूची गोळी आहे’, असे कार्ल मार्क्‍स म्हणाले होते. त्यावेळी ते शब्दश: खरे असेल असे त्यांनाही वाटले नसेल. पण काही तथाकथित धार्मिक उपायांनी, प्राणायामाने, ध्यानाने मेंदूत अफूसदृश रसायने पाझरतात हे आधुनिक संशोधनात आढळून येते आहे. मॉर्फिन हे अफूमधील एक रसायन आहे. कृती करताना पाझरणारे एनडॉर्फिन हे रसायन मॉर्फिनसदृश असते. मॉर्फिन जसे वेदनाशामक आहे तसेच हे एनडॉर्फिन म्हणजे शरीरातील नैसर्गिक मॉर्फिनदेखील वेदना जाणवू देत नाही. माणसाला ध्यान, प्राणायाम किंवा भजन केल्यानंतर बरे वाटते, शांत वाटते ते मेंदूतील एनडॉर्फिनचा परिणाम असतो, त्यामुळे मार्क्‍स म्हणाले होते ते शब्दश: खरे आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, ती परिस्थितीचा विसर पाडते आणि खोटा आनंद देते. ध्यान हा एक धार्मिक प्रकार असल्याने तेही अफूच्या गोळीसारखेच काम करतो, असा एक आक्षेप ध्यानाबद्दल घेतला जातो.
हा आक्षेप योग्य नाही हे रिचर्ड डेव्हिडसन आणि गोलमन यांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. सजगता ध्यानाचा परिणाम हा मेंदूतील रसायनांवर होतोच; पण नियमितपणे सजगतेचा सराव केला तर मेंदूत रचनात्मक बदलदेखील घडून येतात असे त्यांनी दाखवून दिले आहे. माइण्डफुलनेसचा सराव रोज किमान वीस मिनिटे असा दोन महिने केला तर भावनिक मेंदूतील एक भाग असलेल्या अमायग्डलाचा वाढलेला आकार कमी होतो आणि प्रीफ्रण्टल कोर्टेक्समध्ये नवीन पेशींची निर्मिती होते, मेंदूतील ग्रे मॅटरचा थर वाढतो असे त्यांना दिसून आले. अमायग्डलाचा आकार वाढलेला असेल तर त्या माणसाच्या राग, चिंता या भावना अधिक तीव्र असतात. हा आकार सजगतेच्या सरावाने कमी होतो म्हणजेच सजगतेचा परिणाम मानसिक स्थितीवर होतोच; पण मनोवृत्तीवर, माणसाच्या स्वभावावरदेखील होतो.
स्वभावाला औषध नाही ही म्हण खरी असली, कोणतेही औषध घेऊन रागीट, चिंतातुर स्वभाव बदलत नसला तरी तो सजगतेच्या नियमित अभ्यासाने तो बदलू शकतो. अफू खाऊन स्वभाव बदलत नाही; पण सजगतेच्या सरावाने बदलतो. म्हणजेच सजगता ही केवळ अफूची गोळी नाही. सजगता हा मेंदूचा व्यायाम आहे. नियमित व्यायामाने स्नायू बळकट होतात तसेच सजगतेने मेंदूतील भावनिक संतुलन आणि स्मरणशक्तीशी संबंधित केंद्रे विकसित होतात.
सजगतेने मेंदूत रचनात्मक बदल होतात; पण मेंदूतील रसायनेदेखील बदलतात. मेंदूतील कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोहचविण्यासाठी दोन पेशींच्या मध्ये रसायने पाझरतात. त्यांनाच न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. मराठीत त्यांना संदेशवाहक म्हणता येईल. अशी जवळपास शंभर रसायने शास्त्नज्ञांनी शोधली आहेत. ही रसायने वेगवेगळ्या भावनांशी संबंधित आहेत. आनंद किंवा सुख या भावनेशी निगडित मुख्यतर्‍ चार रसायने आहेत. डोपामिन, सेरेटोनिन, एनडॉर्फिन आणि ओक्झिटोसीन ही त्या रसायनांची नावे आहेत. यातील डोपामिन हे उत्सुकतेशी, प्रेरणेशी निगडित आहे. ते कमी होते त्यावेळी कंटाळा येतो, उत्साह वाटत नाही. सेरेटोनिन आणि एनडॉर्फिन ही रसायने कृती करताना मिळणार्‍या आनंदाला कारणीभूत आहेत. आणि ओक्झिटोसीन हे रसायन जीवलगांच्या सहवासाच्या प्रसंगात पाझरते. सहवासाचा आनंद या रसायनामुळे मिळतो.
वेदना जाणवू न देणारे एनडॉर्फिन आपल्या उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचे होते. आपले पूर्वज जंगलात राहत असताना या रसायनामुळेच वाचू शकले. हिंस्र श्वापदे पाठीमागे लागली असताना काटय़ाकुटय़ातून अनवाणी धावताना त्यांना झालेल्या जखमा दुखू लागल्या असत्या तर ते पळू शकले नसते. त्याकाळात आपल्या पूर्वजांचा जीव वाचवायला उपयुक्त ठरलेले हे रसायन आजदेखील आपला जीव वाचवायला मदत करीत आहे. शारीरिक व्यायाम करताना हे रसायन पाझरते त्यामुळे योग्य प्रमाणात व्यायाम केल्यानंतर बरे वाटते, आनंद होतो आणि पुन्हा व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. धावताना मिळणारा आनंद या रसायनामुळेच असतो. आपले शरीर हलत राहिले तर निरोगी राहते. ते हालते ठेवायला हे रसायन प्रेरणा देते. मैदानी खेळ खेळताना, कसरत करताना आणि डोंगर चढताना मिळणारा आनंद मेंदूतील या रसायनामुळे मिळतो.
 शारीरिक कृती करताना जसे हे रसायन पाझरते तसेच काही पदार्थ खाल्यानंतरही पाझरते. अर्थात हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात असे नाही; पण ते खाल्ल्याने बरे वाटते कारण त्यावेळी हे रसायन पाझरते. तिखट खाल्ल्यानंतर त्यातील रसायनांमुळे आपल्या तोंडाची आग होते. बहुदा हा क्षोभ कमी करण्यासाठी एनडॉर्फिन पाझरते. मेंदूत ते पाझरले की बरे वाटते, आनंद होतो. त्यामुळे पोटाला त्नास होत असला तरी मसालेदार तिखट पदार्थ खावेसे वाटतात. हा अर्थातच एनडॉर्फिनचा वाईट परिणाम आहे. दारू प्रकृतीला हानिकारक आहे हे माहीत असूनदेखील ती घेतल्यानंतर शांत वाटते, बरे वाटते म्हणून माणसे दारूच्या आहारी जातात. तसेच तिखट खाण्याचे होते.
काही माणसांच्या मेंदूत एनडॉर्फिन कमी प्रमाणात तयार होते. अनुवंशिकता हे त्याचे एक कारण असले तरी सततचा मानसिक तणाव, शारीरिक किंवा मानसिक आघात आणि आहारात प्रथिनांची कमतरता ही त्याची अन्य कारणे आहेत. मेंदूत एनडॉर्फिन कमी असलेली माणसे अधिक हळवी असतात. त्यांची सहनशक्ती कमी असते. त्यांना वेदना सहन होत नाहीत, बोलता बोलता अचानकच भावनावेग अनावर होऊन ती रडू लागतात. ही माणसे फार व्यायाम करू शकत नाहीत, कारण त्यामुळे होणारी स्नायूदुखी त्यांना असह्य होते. या रसायनांच्या कमतरतेमुळे काहीजणांना फायब्रोमायाल्जिया नावाचा आजार होतो. या आजारात सतत सर्व अंग दुखत राहते, थकवा जाणवतो. शारीरिक व्यायाम या आजारात शक्य नसतो.
- अशा वेळी सजगतेच्या म्हणजे माइण्डफुलनेसच्या अभ्यासाने शारीरिक वेदनांची तीव्रता, त्यांचे दुर्‍ख कमी होते हा अनुभव डॉ. जोन काबाट झीन्न यांनी घेतला. त्यानंतर अशा वेदना असणार्‍या रुग्णांसाठी त्यांनी एकोणीसशे बहात्तर साली अमेरिकेतील बोस्टन हॉस्पिटलमध्ये सजगतेचे वर्ग सुरू केले. तीच ‘माइण्डफुलनेस मुव्हमेंट’ची सुरुवात होती. आता अमेरिका आणि युरोपमध्ये हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, व्यावसायिक कंपन्या, सैन्य दले, विधानभवन अशा अनेक ठिकाणी सजगतेचे वर्ग घेतले जातात.
या सजगतेचा शोध भारतात गौतम बुद्ध आणि पतंजली यांनी लावला. पण आपण त्याचा संबंध केवळ आध्यात्मिकता आणि मोक्ष यांच्यापुरता मर्यादित ठेवला. परदेशात मात्न ऐहिक अंगाने त्यावर संशोधन होत आहे. त्याचा उपयोग आरोग्य, शिक्षण, गुणवत्तावाढ यासाठी करून घेतला जात आहे. या सर्वाची सुरुवात एनडॉर्फिनच्या कमतरतेमुळे होणार्‍या शारीरिक व्याधीचा उपचार म्हणून झाली. 
.आता अशी माइण्डफुलनेस मुव्हमेण्ट भारतातदेखील सुरू व्हायला हवी. शाळा-कॉलेजमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, औद्योगिक कंपन्यांत सजगता शिकवली जायला हवी.
ती केवळ अफूची गोळी नाही, मेंदूचा व्यायाम आहे हे समजून घेऊन अधिकाधिक माणसांनी या चळवळीत सहभागी व्हायला हवे.

आनंद आणि सुखाची
चार रसायने


 1. सजगतेने मेंदूत रचनात्मक बदल होतात; पण मेंदूतील रसायनेदेखील बदलतात.
2. मेंदूतील कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोचण्यासाठी दोन पेशींच्या मध्ये रसायने पाझरतात. त्यांनाच न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. मराठीत त्यांना संदेशवाहक म्हणता येईल. 
3. अशी जवळपास शंभर रसायने शास्त्नज्ञांनी शोधली आहेत. ही रसायने वेगवेगळ्या भावनांशी संबंधित आहेत. 
4. आनंद किंवा सुख या भावनेशी निगडित मुख्यतर्‍ चार रसायने आहेत. डोपामिन, सेरेटोनिन, एनडॉर्फिन आणि ओक्झिटोसीन ही त्या रसायनांची नावे आहेत.  डोपामिन हे उत्सुकतेशी, प्रेरणेशी निगडित आहे. ते कमी होते त्यावेळी कंटाळा येतो, उत्साह वाटत नाही. 
सेरेटोनिन आणि एनडॉर्फिन  ही रसायने कृती करताना मिळणार्‍या आनंदाला कारणीभूत आहेत. 
ओक्झिटोसीन  हे रसायन जीवलगांच्या सहवासाच्या प्रसंगात पाझरते. सहवासाचा आनंद या रसायनामुळे मिळतो.

Web Title: mindfulness can change your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.