वन्दना अत्रे
 
किशोरीताई, तुम्ही खरेच मैफलीतून उठून गेला आहात? कधीही परत न येण्यासाठी? की हा तुमचा खास स्वभावदत्त रुसवा? कोण्या आगंतुक चाहत्याने भलत्या वेळी ग्रीनरूममध्ये येऊन तुमच्या मनात जुळत असलेल्या जौनपुरीची तलम घडी विस्कटली म्हणून आलेला? की भर मैफलीत, बसल्या जागेवरून दूर उभ्या शिपायाला विडा आणायचा हुकूम करण्याची जुर्रत करणाऱ्या कोणा मठ्ठ बाईपुढे हतबद्ध होऊन ताडकन निघालात तुम्ही? 
बोलता-बोलता झटकन उठून, अंगावरच्या साध्याशा मऊ साडीचा पदर ठीकठाक करून, केसावरून जरासा हात फिरवून आणि कपाळावरची ठसठशीत टिकली बोटाने दाबून घट्ट करीत शेजारच्या घरात डोकवायला जावे तश्शा उठून निघून गेलात... एरवी, चार दिवस कोणाच्या घरी राहायला गेलो तरी निघताना पावले घुटमळतात, खोल कुठेतरी आवंढा येतो आणि काहीतरी निरर्थक बोलत दारापर्यंत येत निरोप घेतो आपण. आणि तुम्ही मात्र कोणाच्याही हातात निरोपाचे चार स्वरसुद्धा न ठेवता तरातरा एकट्याच पुढे गेलात... केवढा मोठा प्रवास आणि तेवढाच मोठा गोतावळा सहज मागे टाकून. निस्संगपणे. 
इथे नुसता नि:शब्द कल्लोळ उडाला आहे ऊरात. तुमचे गाणे ऐकताना उडायचा तसा, अगदी तस्सा. ताई, तुम्हाला आजवर कोणी सांगितले की नाही हे मला माहिती नाही; पण तुमचे गाणे ऐकणे हे जेवढे सुख होते, तेवढाच त्रासही होता. काही-काही वेदनासुद्धा सुख, अगदी अपार सुख देणाऱ्या असतात ना तसे. 
...एकतर, आधी त्या गाण्याची खूप वाट बघावी लागायची. समोर स्वरमंचावर सगळे सज्ज. तुमच्या उजव्या बाजूला तबलजी मोठ्या अदबीने आणि थोड्या धास्तीने बसलेला. डावीकडे हार्मोनियम आणि मागे छान सुरात जुळलेली जवारीदार जोडी. पण तुमचे डोळे मिटलेले आणि हातातील स्वरमंडळ शांतपणे झंकारते आहे.. समोर ओथंबून भरलेले आणि तरी विलक्षण शांत असलेले सभागृह. ही शांतता तुमच्या धाकाचा परिणाम की काय? नक्कीच. 
...पण तुम्ही मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडे. फार दूर. त्या मैफलीसाठी मनात योजलेला तुमचा असा राग घेऊन. 
...कधी बहादुरी तोडीसारखा खास ठेवणीतला सुगंधी चाफा, तर कधी यमन किंवा जौनपुरी. पण राग कोणताही असूदे, जे द्यायचे, गायचे ते चोख. फुलातील मधाच्या मधुर अस्सल थेंबापर्यंत पोचण्याचा एखाद्या मधमाशीचा जो हट्ट तसा प्रत्येक रागाच्या भावापर्यंत पोचण्याचा आणि तो भाव स्वरातून तेवढाच उत्कटपणे मांडण्याचा तुमचा आग्रह. त्या वाटेत कोणी येऊ नये, मनात सुरू असलेला हा राग श्रोत्यांपर्यंत जाईपर्यंत कोणी भेटू नये, बोलू नये आणि मनातील रागाला जराही धक्का लागू नये म्हणून तुम्ही सगळ्या जगाकडे जणू पाठ फिरवल्यागत डोळे मिटून आपल्या स्वरांच्या बेटावर एकाकी बसलेल्या...
अव्यक्तातील तो स्वर समोर दिसेपर्यंत, गळ्यातून निघेपर्यंत ह्या एकाकीपणाच्या बेटावरून उतरून प्रवाहात उतरण्यास तुमचा ठाम नकार असायचा... 
अगदी अभिजात, जातिवंत ते देण्याचा हा तुमचा कमालीचा आग्रह आणि त्यासाठी चालू असलेले हे सर्वतोपरी प्रयत्न किती रसिकांना दिसत होते, समजत होते, खरेच, नाही सांगता येणार. पण ज्यांना दिसत आणि जाणवत होते त्या प्रत्येकाच्या मनात तुम्ही तुमचे एक वेगळे स्थान निर्माण करीत होतात... 
ह्या स्थानावर असलेली ही गायिका संगीताकडे मनोरंजनाचे साधन म्हणून अजिबात बघत नव्हती. त्यामुळे भली महागडी तिकिटे काढून, अंगावर पश्मीना शाली घेऊन ‘यू नो किशोरी...’ असे म्हणत गाण्याच्या "कॉन्सर्ट"ला येणाऱ्या रसिकांना (!) गाण्यात तबल्यासोबत "जुगलबंदी" ह्या नावाने चालणारी अपेक्षित दंगल तिला साफ नामंजूर होती. संगीत म्हणजे चमत्कृती, अचाट वेगाने अंगावर कोसळणाऱ्या ताना-तिहाया, मनाला गुंगवून टाकणारी सरगम, दमसास दाखवण्याचा अट्टाहास करण्याइतका लांबवलेला तार सप्तकातील स्वर असे मानून मैफलींना गर्दी करणाऱ्या आणि गाण्याच्या मैफलीत तबल्याच्या लग्गी ऐकायला सोकावलेल्या श्रोत्यांना हे सांगणे सोपे नव्हते. आयुष्यात भोवती इतका कोलाहल असताना संगीत तुमच्या आयुष्यात शांतता, सुकून आणते असे ठणकावून सांगण्याचा हा अधिकार कसा मिळवला तुम्ही? - असा, उत्तर माहिती असलेला प्रश्न कितीदा तरी पडायचा. गाण्याच्या प्रांतात स्त्री-पुरुष असा भेदभाव तुम्ही कदाचित केला नसेल, पण एका, एरवी साध्याशा दिसणाऱ्या स्त्रीने हा अधिकार मिळवला ह्याचा आनंद, हा भेदभाव बघणाऱ्या, अनुभवणाऱ्या अनेकींना झाला असेलही.. आणि तुम्हाला झाला नसेलच असे नाही...
हा प्रवास तुमच्यासाठी सोपा कधीच नव्हता. ह्यासाठी खूप काही सोसावे लागले आहे तुम्हाला. हे एका स्त्रीचे सोसणे होते की एका कलाकाराचे? ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याइतके कोणाला ठाऊक असणार? एरवीही समाजाने रूढी म्हणून जो पोकळ बागुलबुवा उभा करून ठेवलेला असतो तो झुगारून देणे सोपे नसतेच. इथे तर घराण्याचा कर्मठ वारसा आपल्या आईकडून मिळालेली एक स्त्रीच त्या घराण्याच्या चौकटी वाकवू-वळवू बघत होती. ‘कला अमर्याद आहे, तिला फक्त व्याकरणाच्या जोखडाला जुंपू नका’ असे सांगत त्यातील भावाचे सौंदर्य दाखवू बघत होती. हा दुहेरी अपराध होता. 
- एक, आपल्या प्राचीन वगैरे परंपरेला जाब विचारण्याचा आणि दुसरा, एका स्त्रीने परंपरा धुडकावून लावण्याची बंडखोरी करण्याचा!
हे करताना गाण्यातील कर्मठ आपल्याला बहिष्कृत करणार आणि त्यांच्या धाकाने इतरेजन गप्प बसणार हे तुम्हाला ठाऊक असणारच. पण ही किंमत मोजून आपल्याला जे सांगायचे ते सांगितले पाहिजे आणि गाणे जसे दिसते आहे तसे मांडले पाहिजे एवढे ते तुमच्यासाठी अनिवार्य होते. 
व्याकरण ओलांडून भावाच्या एका विराट अशा प्रांतात प्रवेश करणारे आणि त्याच्या नित्य-नव्या असंख्य तरल छटांचा शोध घेणारे हे गाणे असे तळहातावर अलगद आले नव्हते मुळी. जाणत्या वयापासून व्यवहाराच्या कितीतरी झळा त्याने सहन केल्या होत्या. 
पुरुष कलाकारांचे पावसात भिजलेले जोडे तव्यावर शेकून, सुकवून देणाऱ्या ह्या समाजाने एकटीने मुलांचा सांभाळ करणाऱ्या तुमच्या आईला मैफलींची आमंत्रणे दिली पण कलाकार म्हणून सन्मानाने वागवले कधीच नाही. ते दु:ख सहज विसरून जाण्याइतके किरकोळ नव्हते. 
- मग गाता गळा एकदम स्तब्ध झाल्याची वेदना. ह्या अस्वस्थ काळात तुमचा गळा भले गात नसेल पण आतील विचारांची वाट उजळत होती. निव्वळ तुमच्या घराण्याचे नाही तर समग्र गाणे, त्यातील स्वरांचे स्थान, स्वरांना ज्या भावाचा शोध आहे त्या भावाचे गाण्यातील स्थान अशी कितीतरी कोडी सुटत गेली. व्याकरणाच्या आणि घराण्याच्या शिस्तीच्या पलीकडे उभे असलेले आणि जगण्याच्या निखळ आनंदाशी जोडले गेलेले हे नित्यनवे गाणे मांडणे हा मग तुमचा जणू धर्मच झाला. - हे असे गाणे होते ज्याला श्रोत्यांचे रागलोभ, गाण्यातील कर्मठ पोथीनिष्ठांचा धर्म बुडाल्याचा गलबला ह्यापैकी कशाचीच फारशी फिकीर नव्हती. 
आता तुम्ही अशा एका उंचीवर गेला होतात जिथून संगीताचा दिसणारा तळ आणि त्याची नितळ सुंदरता फक्त तुम्हालाच दिसत होती. अपवाद, कुमारजी नावाच्या अवलियाचा आणि भीमसेन नावाच्या पराक्रमी पुरुषाचा... 
गाण्याचा संबंध जगण्याशी आहे, त्यातील गुंतागुंतीशी, त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींशी, निसर्गाशी, ह्या निसर्गातील अनेकानेक विभ्रमांशी आणि विराटतेशी आणि ह्या सगळ्या व्यवहारामागे उभ्या त्या निराकार चैतन्याशी आहे असे म्हणत तुम्ही ते नवे, ताजे गाणे आग्रहाने मांडत गेलात. 
आता असे वाटत आहे, ते क्षण गोठवून ठेवता आले असते तर...? पण असे गोठवलेले, थिजलेले सांभाळून ठेवणे तुम्हाला तरी कुठे आवडले असते?
एखादे कुमार गंधर्व, भीमसेनजी किंवा किशोरीताई मैफलीतून उठून असे निघून जातात तेव्हा गाणे संपत नसते, थांबत नसते हे एखाद्या खुळ्या पोरालाही ठाऊक आहे.
प्रश्न आहे तो वेगळाच! आणि तो हा, की जग सुसाट वेगाने धावत असतांना, त्या धावण्याच्या नियमांच्या क्रूर चक्रात आपल्याबरोबर संगीत-नृत्य-नाटकासारख्या कलांना फरफटत नेत असताना ठामपणे पाय रोवून त्याला नकार देणारे आणि "गाणे म्हणजे एका आत्म्याची दुसऱ्या आत्म्याशी भेट" असे सांगत त्याला त्याचा असा संदर्भ देणारी माणसे मैफलीतून उठून जातात, तेव्हा काय करावे?
आता सांगा किशोरीताई, निरोपाचे काहीच न बोलता तुमचे हे असे जाणे कसे सोसावे?
 
(लेखिका मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत)