‘कविवर्य ग्रेस ’ ....कॅमेऱ्याच्या अंधारजाळीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:04 AM2019-03-24T06:04:00+5:302019-03-24T06:05:07+5:30

हृदयनाथ मंगेशकरांमुळे माझी आणि ग्रेस यांची पहिली भेट घडून आली. शेवटच्या काळात ते मंगेशकर हॉस्पिटलमध्येच राहायला आले होते. त्याचदरम्यान मी पं. भीमसेन जोशी यांच्यावर कॉफी-टेबल बुक करीत होतो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावरचा अभिप्राय त्यांनी लिहून दिला. हेच कदाचित त्यांचे शेवटचे लिखाण असावे..

Memories of great poet Grace.. Manik Godghate | ‘कविवर्य ग्रेस ’ ....कॅमेऱ्याच्या अंधारजाळीतून

‘कविवर्य ग्रेस ’ ....कॅमेऱ्याच्या अंधारजाळीतून

googlenewsNext
ठळक मुद्देमाझ्यात अन ग्रेस यांच्यात वयाचे, गुणवत्तेचे, प्रसिद्धीचे कोणतेही साम्य नसताना माझे मैत्र जुळले ते महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या साहित्यिकाशी. अर्थात याचं सारं श्रेय द्यायला पाहिजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांना.

- सतीश पाकणीकर

असं म्हटलं जातं की नातेसंबंध आपण निवडू शकत नाही पण मित्र निवडीचे स्वातंत्र्य मात्र आपल्याला नेहमीच असते. असे असले तरी कधीकधी आपल्याला असा अनुभव येतो की मैत्रीही काहीवेळा नकळत घडलेली असते. त्याला कोणतेही कारण नसते. धर्माची, वयाची, अनुभवाची, आर्थिक स्तराची अशी बंधनं नसतात. असते निखळ मैत्र! योग मात्र तसा जुळून यायला हवा.
१६ जून २००७ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘मित्र फाउंडेशन’ ने पं. हृदयनाथ मंगेशकर व कवी ग्रेस यांचा एकत्रित असा अनोखा कार्यक्रम सादर केला. पुण्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत होता. बहुतांश रसिकांना ग्रेस यांची ओळख हृदयनाथांच्या संगीताच्या माध्यमातूनच झाली होती. या दोन प्रतिभावान कलावंतांचे  एकत्रित दर्शन, बरोबरच साक्षात कवीकडून शब्द व संगीतकाराकडून त्याची सांगीतिक अभिव्यक्ती असा दुहेरी योग जुळून आला होता. नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं. 
मी फोटो काढण्याच्या इराद्यानेच गेलो होतो. ग्रीनरूममध्ये डोकावलो. पंडितजींनी आत बोलावले. बसलो. इतक्यात कविवर्य ग्रेस आत आले. समोरच्या दाराशेजारील सोफ्यावर बसले. मी त्यांना प्रथमच पाहत होतो. पंडितजी त्यांना म्हणाले – “ कविवर्य, इथे माझ्या शेजारी बसा. पाकणीकर कॅमेरा घेऊन आलेत. आज जर त्यांनी फोटो काढला तर आपल्याला कॅलेंडर मध्ये संधी मिळेल”. मी जागीच थिजून गेलो. पण मग हसतच पंडितजींनी माझी ग्रेस यांच्याशी सविस्तर ओळख करून दिली. पंडितजी व ग्रेस यांच्या असंख्य भावमुद्रा मी त्या कार्यक्रमात टिपू शकलो ही झाली एक गोष्ट पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे माझ्यात अन त्यांच्यात वयाचे, गुणवत्तेचे, प्रसिद्धीचे कोणतेही साम्य नसताना माझे मैत्र जुळले ते महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या साहित्यिकाशी. अर्थात याचं सारं श्रेय द्यायला पाहिजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांना.                           
पुढे कविवर्यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले. त्यांच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या फेऱ्या होऊ लागल्या. साधारण २००९ सालची आठवण आहे ही. प्रकाशचित्रणाच्या काही कामासाठी मला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जायला लागले. मला सौ. भारती मंगेशकर यांना भेटायचे होते. तळमजल्यावर रिसेप्शन काउंटरच्या मागे त्यांची खोली होती. खोलीचे दार वाजवून मी हळूच ढकलले. आत समोरच्या सोफ्यावर एक दाम्पत्य बसलेले होते. मी दरवाजा परत लावणार एवढ्यात दाराच्या छोट्याशा फटीतून मला पाहिल्यावर सौ. भारतीमामींनी मला हाक  मारली. मी आत आलो. बाजूच्या सोफ्यावर बसलो. मामींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते होते महाराष्ट्र केसरी श्रीपती खंचनाळे व त्यांच्या पत्नी सौ. खंचनाळे. खंचनाळेंच्या गूढघ्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आनंदी दिसत होते. हॉस्पिटलच्या वास्तव्यात त्यांनी येथे पाहिलेल्या पेशंटविषयी तसेच आजकालच्या परिस्थितीवर त्यांचे चाललेले भाष्य मी उत्सुकतेने ऐकत होतो. माणसाच्या दारूच्या व्यसनाधीनतेबद्दलही ते तिडकीने बोलले. इतक्यात परत एकदा दार उघडले गेले. यावेळी सदा उत्साही असे हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री. सचिन व्यवहारे यांच्याबरोबर करड्या रंगाची दाढी व केस वाढवलेले व खांद्याला शबनम बॅग लटकवलेले कविवर्य ग्रेस आत आले. “आईसाहेब, नमस्कार करतो.”  असे म्हणत त्यांनी थेट भारतीमामींच्या पायाला हात लावून नमस्कार केला. भारतीमामींनी खंचनाळे यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. कविता, ललित लेखन आणि हजारो श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या अमोघ वक्तृत्वाची दैवी कृपा लाभलेले असे कविवर्य ग्रेस अन महाराष्ट्र केसरी श्रीपती खंचनाळे अशा दोन भिन्न क्षेत्रातील दिग्गजांची ती भेट. ग्रेस आणि मामींचे काही बोलणे झाल्यावर श्रीपती खंचनाळे ग्रेस यांना म्हणाले की – “कविवर्य, आपण इतके उच्च शिकलेले आहात. आमचं तर शिक्षण काहीच नाही. पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का?”  कविवर्यांनी उजव्या हाताच्या मधल्या बोटाने चष्मा वर सरकवत त्यांचे खोल वेध घेणारे डोळे खंचनाळे यांच्यावर रोखले. “ हं, विचारा की.” खंचनाळेंनी कोल्हापुरी भाषेत प्रश्न केला की- “ माणूस जात इतकी हुशार, शिकलेली आहे, विचार करण्याची शक्ती देवानं त्याला दिलीय पण हे सगळं घालवून विषासमान दारूच्या आहारी कशापायी जातीय हो?” आता ग्रेसांच्या तोंडून काय ऐकायला मिळणार याची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर पसरली. उजव्या हाताची मध्यमा व अनामिका ही बोटे दुमडत अंगठ्याने धरलेली, तर्जनी व करंगळी मात्र छताकडे अशी हाताची मुद्रा करीत डोळे मिटून ग्रेस यांनी दिलेल्या अनोख्या उत्तराचे आम्ही सर्व साक्षीदार होतो...“ असे पहा की, आपणच म्हटला आहात की दारू विषासमान आहे. पण कधी कधी विषही औषधासारखे कार्य करते. त्याची मात्रा मात्र कळायला हवी. त्यावर ताबा ठेवला नाही की तिथे माणूस गोंधळ करतो. मग शिविगाळी करतो. स्वतःची धूळधाण करून घेतो. दुसरं असं की, ते विष कोण घेतंय यालाही महत्व आहे ना? योग्यता काय यालाही महत्व आहे ना? उद्या समजा जर तुम्ही ज्ञानदेवांना दारू पाजली तर त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होणार? त्यांच्या तोंडून शिवी नाही येणार तर ओवीच येणार.” त्यांच्या या उत्तरावर मात्र एकदम शांतता पसरली. एका वेगळ्याच विचारातून आलेलं उत्तर ग्रेस यांच्यासारखा कवीराजच देऊ शकतो. 
शेवटच्या काळात तर ते मंगेशकर हॉस्पिटलमध्येच राहायला आले होते. सातव्या मजल्यावरील सन्माननीय कक्षातील उजवीकडील पहिलीच खोली. खोलीभर सगळीकडे त्यांचे फोटो व इतरही काही गोष्टी ‘डिस्प्ले’ केलेल्या.  मधून मधून मी त्यांना भेटायला जात असे. “ तुमच्याशी गप्पा मारून बरं वाटतं ” असं ते नेहमी म्हणत. अर्थात मी एक चांगला श्रोता आहे ही माझी जमेची बाजुच मला तेथे उपयोगी पडे. एकदा तर माझ्या डाव्या हाताला झालेल्या अपघातामुळे मीही सातव्या मजल्यावर अॅडमिट होतो. मग काय सकाळ संध्याकाळ त्यांच्या रूमवर श्रवणभक्ती. नवीन काय करताय? हा त्यांचा नेहमीचा प्रश्न. 
त्यावेळी मी पं. भीमसेन जोशी यांच्यावर ‘स्वराधिराज’ नावाचे एक कॉफी-टेबल बुक करण्याच्या तयारीत होतो. त्याची कल्पना त्यांना सांगितल्यावर त्यांच्या तोंडून शब्द निघाला “जिनिअस.”  कॉफी-टेबल बुक प्रसिद्ध व्हायच्या अगोदरच मिळालेली एव्हडी मोठी दाद. डिसेंबर २०११ मध्ये स्वराधिराज प्रसिद्ध झाल्यावर मी त्यांना ते भेट दिले. त्याबरोबरच त्याच विषयावर आधारित माझ्या प्रदर्शनाचे निमंत्रणही. प्रदर्शन होते सवाई गंधर्व स्मारक येथे. २४ जानेवारी(भीमसेनजींचा मृत्युदिन) ते ४ फेब्रुवारी (भीमसेनजींचा जन्मदिन) २०१२ या काळात.
२ फेब्रुवारी २०१२ रोजी संध्याकाळी मला ग्रेस सरांचा फोन आला. १ व २ तारखांना त्यांनी ‘स्वराधिराज’ पूर्ण पाहिले होते. फोनवरच त्यांनी पुस्तकाविषयी रसग्रहण करायला सुरुवात केली. पहिल्या पाचच मिनिटात माझ्या लक्षात आले की सर जे बोलत आहेत, जे कौतुक करीत आहेत ते माझ्यासाठी किती महत्वाचे आहे. मी त्यांची वाक्-गंगा मध्येच थोपवत म्हणालो- “ सर, आत्ता तुम्ही जे बोलताय ते माझ्यासाठी अनमोल आहे. हे शब्द असेच हवेत विरून जातील. माझ्या लक्षातही राहणार नाहीत.”  यावर ते लगेच मला म्हणाले “ तुमचे प्रदर्शन मला बघायचे आहे. उद्या जाऊ बघायला. तेव्हा मी ‘डिक्टेट’ करीन. मग घ्या लिहून तुम्ही.”  मी मागायला गेलो एक आणि मला मिळाले दोन अशी माझी अवस्था. 
दुसऱ्या दिवशी मी व माझा (व त्यांचाही) मित्र कुमार गोखले हॉस्पिटलमधून त्यांना घेऊन प्रदर्शनाच्या ठिकाणी  गेलो. कुमार हा उत्तम फोटोग्राफर तर आहेच पण भाषातज्ञ व कॅलिग्राफरही. सरांनी ‘डिक्टेट’ करताना त्यात एकही चूक क्षम्य नाही म्हणून कुमार बरोबर हवाच. त्यांच्या बोलण्याच्या धबधब्यात आनंद घेण्याचे भाग्य त्यादिवशीही आम्हाला मिळाले. अत्यंत मनस्वी कलावंत कसा असतो याचे ते एक उत्तम प्रतिक होते. कविवर्यांनी निवांतपणे प्रदर्शन पाहिले. अन म्हणाले – “घ्या कागद लिहायला.” आम्ही तयारीत होतोच. हळूहळू पण ठाम उच्चारणात त्यांनी जवळजवळ एक तास डिक्टेशन दिले. अभिप्राय लिहून झाल्यावर ते मला म्हणाले – “ पाकणीकर, आज तुम्ही मला एका ऋणातून मुक्त केले आहे”.  भीमसेनजींवर लिहावे हे तर ते ऋण नसेल?
पुस्तकावरचा त्यांचा अभिप्राय हे त्यांचे कदाचित शेवटचे लेखन असावे. कारण नंतर बरोबर पावणेदोन महिन्यांनी २६ मार्च २०१२ रोजी ग्रेस सर हे जग सोडून निघून गेले. आज मागे पाहताना माझ्या असे लक्षात येते की, माझ्यासाठी किती मोठा अभिप्राय ते देऊन गेले. जणू एखादे मोठे चिरंतन बक्षीसच! स्वराधिराज पुस्तकाविषयी ग्रेस सर लिहितात – 

“ प्रसिद्ध फ्रेंच कवी पॉल व्हेलेरी यांचे कलेच्या संदर्भात एक अतिशय गाजलेले वाक्य ह्यावेळी मला आठवतेय. तो म्हणतो- It is not the thing said; but the way of saying it!  पॉल व्हेलेरी ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा दरारा इतका काही विलक्षण आहे, की ह्या वाक्याला कोणीही आत्मपरीक्षणाच्या, सहाणेवर तपासून पाहण्याचे धैर्यच केलेले नाही. 
थोडे खोलवर जर डोकावले, ह्या वाक्याच्या डोहात, तर तिथे कलावंताचेच, एकमेवाद्वितीय प्रतिबिंब हलताना दिसते...मग आपण तत्काळ व्हेलेरी सरांच्या दुर्बिणीतूनच पाहता पाहता, उद्गारू लागतो – It is a thing to be said and not the way of saying it.
व्हेलेरी यांचा अवमान करण्याचा मुळीच उद्देश नाही.  खरे तर, श्रेष्ठ प्रतिभावंत सततच स्वतःभोवती प्रदक्षिणाच घालीत असतो; ह्यात एखादी प्रदक्षिणेची वेगवान लय, त्याचे शरीर घुसळून त्याच्या मेंदूचा स्फोट करून बाहेर पडत असते. व्हेलेरीचे वाक्य हे कुंडलिनी-मार्गाच्या कुळातील आहे.
व्हेलेरीने उत्स्फुर्ततेच्या ह्या आवेगात Instrumental कला, शरीराधिष्ठित कला आणि प्रातिभिक कला ह्यांच्या आंतर्स्वरूपाचा विचार केलेला नाही. Photography is a magical unit of vision and visionary elements, which is clicked by the hand who handles the camera. In fact, camera can be handled rigorously by anybody who works on it, पण गंगेची काळी-पांढरी प्रहरा प्रहराची अवस्था रघुवीर यांनी ज्या प्रातिभिक कौशल्याने कॅमेऱ्यात खिळवून ठेवलेले आहे, त्यालाच प्रतिभेचा चमत्कार म्हणतात!
श्री. सतीशजी ह्यांनी मला ज्यावेळी कै. भीमसेन जोशी ह्यांच्या स्वरमालिकांतील, भिन्नभिन्न शारीरिक आविर्भावांचे प्रातिभिक दर्शन घडवलेले आहे, त्याने मी अक्षरशः थक्क झालेलो आहे. मला असे वाटते की, ज्याने शरीराचा सापळाच आत्मसात केलेला आहे, तोच शरीरावर असे वारूळ उभे करू शकतो. शरीरावर वारूळ उभारणीची क्रिया ह्याला मी कलेतील सर्वश्रेष्ठ चमत्कार समजतो. हिमालयातल्या बर्फावर, ज्यावेळी सूर्याची पहिली किरणे पसरतात, to that visionary aspect is the only and only subject of the visionary photographer!  श्री ज्ञानेश्वरांनी ह्या किमयेला, ‘हिमवंतीची सरोवरे’ या प्रतिमेने आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यात बंदिस्त केले आहे. ह्या वरदानाचे काही मोलाचे संकेत श्री. सतीशजी ह्यांना निश्चितपणे लाभले आहेत; म्हणून भीमसेनजींच्या शारीरिक आवाजांचे स्वरबिंब, हिमवंतीच्या सरोवरांप्रमाणेच लीलया ‘क्लिक’ केलेल्या कॅमेऱ्याच्या अंधारजाळीत पकडलेले आहे. 
पॉल व्हेलेरी, श्रीज्ञानेश्वर, रघुवीर, सतीश पाकणीकर ही सर्व मंडळी कसल्या कौशल्याचे किमयागार आहेत?मला असे वाटते की श्रेष्ठ कलावंताला अंतर्गत दृष्टीचे एक कैवल्यभान असतेच! आजूबाजूला डोळे असतात, त्यांच्या अगदी मधोमध ललाटाच्या खाली तिसरा डोळा असतो. तिसरा डोळा उघडून शंकराने जगाला भस्मसात केलेले नाही, तर त्याच्या तेजाने जगातील हिणकस जाळून टाकले. फोटोग्राफर हा ह्या विचारसरणीचा सुवर्णमध्य आहे. जोपर्यंत समोरच्या दृश्यातून सौंदर्याची हाक येत नाही, तोपर्यंत फोटोग्राफर तिसऱ्या डोळ्याला स्पर्शही करीत नाही. 
मग आता, आपण सर्वांनी कै. भीमसेन जोशी ह्यांच्या स्वरांगणात, आपल्या कॅमेऱ्याने उभारिलेली, हिमवंतीची सरोवरे विनम्र, शालीन डोळ्यांनी स्वीकारू या.”

डिक्टेशन करून झाल्यावर कविवर्य म्हणाले –  “वर माझा पत्ता लिहा- दीनानाथ मंगेशकर रुग्णालय,पुणे” त्यांनी खाली सही केली “ मी... ग्रेस, ३ फेब्रुवारी २०१२” 
आज त्यांची सही व हस्ताक्षर पाहताना मनात त्यांच्याबद्दल विचार दाटून येतात... त्यांना सांगावेसे वाटते की 

“ सर .... 
तुम्ही असाल उगवतीच्या गर्भरेशमी किरणांत, 
मावळतीच्या हुरहुरणाऱ्या संधिकाळात 
तुम्ही असाल पानापानांत, झाडाझाडांत,  
खळाळणाऱ्या अवखळ पाण्यात  
राहाल आमच्या मनामनांत ... 
एक कविता बनून ... 

(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

sapaknikar@gmail.com

Web Title: Memories of great poet Grace.. Manik Godghate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.