अपर्णा वाईकर
 
2009 मध्ये जेव्हा आम्ही चीनला आलो त्याचवेळी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली होती, ती म्हणजे इथली स्वच्छता. जर्मनीहून चायनाला येताना असं वाटलं होतं की साधारणपणे आशिया खंडातल्या काही इतर देशांप्रमाणे चीनसुद्धा बकाल असेल. त्यांची लोकसंख्या इतकी जास्त आहे तेव्हा फार काही अपेक्षा मला नव्हती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथले रस्ते आणि युरोप, अमेरिकेतले रस्ते यात काहीच फरक नाही. अगदी चकचकीत रस्ते आणि वस्त्या इथे दिसतात. 
भाजीबाजारांमध्ये खूप स्वच्छता आणि टापटीप असते. रस्त्यांवरच्या खाण्याच्या स्टॉल्सच्या आजूबाजूला कुणी कचरा टाकताना मला कधी दिसलं नाही. सगळीकडे मोठमोठ्या कचऱ्याच्या पेट्या ठेवलेल्या असतात. लोक त्यातच कचरा टाकतात. मी ऐकलंय की सिंगापूरमध्ये जर कुणी रस्त्यावर कचरा टाकला तर त्यांना दंड भरावा लागतो. इथे असा कुठलाही नियम नाही. पण लोक जागरूक आहेत. पान-तंबाखू खात नसल्यामुळे रंगलेल्या भिंतीसुद्धा नसतात. नाही म्हणायला एखाद्या बारक्या गल्लीत क्वचित कुठेतरी सिगारेटची थोटकं किंवा कागदाचे बोळे पडलेले दिसतात. पण हे चित्र फारच क्वचित. रोज दिवसातून एकदा प्रत्येक रस्त्यावरून रस्ते धुणारी गाडी फिरते. या गाडीच्या खाली एक मोठ्ठा झाडू आणि पाण्याचा फवारा लावलेला असतो. त्यामुळे रस्त्यावर किंवा आजूबाजूला धूळ अजिबात दिसत नाही.
वाखाणण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे इथे कायद्याची खूप भीती आहे. एखादी गाडी भरधाव जाताना दिसली की तिचा फोटो निघालाच म्हणून समजा. लगेच दुसऱ्या दिवशी त्या गाडीवाल्याचा घरी दंडाची पावती येते. अशा पाच पावत्या जर झाल्या तर तुमचे लायसेन्स काही दिवसांसाठी जप्त होते. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना तर अगदी ताबडतोब शिक्षा होते. त्यात काहीही बोलाचाली किंवा पोलिसांना पैसे चारून ‘मामला खतम’ असे प्रकार नाहीत.
दारू पिऊन गाडी चालवणे हा अक्षम्य गुन्हा आहे. मग तुम्ही ‘एकच प्याला’ प्यायला असेल तरीही शिक्षा होणारच. अशा गुन्हेगाराला त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तुरुंगात नेतात. त्याला त्याच्या मोबाइलवरून केवळ एक फोन करायची परवानगी देतात. मग हा फोन, त्याचं पैशाचं पाकीट सगळं सामान लॉकरमध्ये ठेवलं जातं आणि १४ दिवस त्याला या तुरुंगात राहावं लागतं. लायसन्स जप्त होतं. यामुळे जी नाचक्की होते ती वेगळीच. चीनमध्ये बऱ्याच संख्येने भारतीय आहेत. अर्थात, या संख्येची तुलना इंग्लंड, अमेरिकेतल्या लोकांच्या संख्येशी होऊ शकत नाही. बरेच भारतीय हॉटेल/रेस्टॉरंटच्या व्यवसायात आहेत. काही कापड व्यवसायात, तर काही ट्रेडिंगच्या व्यवसायात आहेत. आमच्यासारखे काही नोकरीनिमित्ताने आलेले आहेत. असे नोकरीपेशातले लोक इथे २-३ वर्षांच्या कालावधीसाठीच येतात. त्यामुळे आम्ही शांघायला गमतीने ‘ट्रांझिट कॅम्प’ असं नाव दिलंय. या कारणामुळे असेल कदाचित; पण शांघायमधले भारतीय खूप आपुलकीने सगळ्या नवीन येणाऱ्यांचं स्वागत करतात. 
इथे शांघाय इंडियन असोसिएशन (आयए) ही मोठी संस्था आहे. या संस्थेतर्फे होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना भारतीय दूतावासांचा पाठिंबा असतो. या आयएचा अध्यक्ष दर २ किंवा ४ वर्षांनी निवडला जातो. हा अध्यक्ष आणि त्याची टीम मिळून दिवाळी, दांडिया, बालदिवस यांसारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करतात. आमच्या शांघायमधल्या वास्तव्यात २०१२ ते २०१६ या काळात माझे पती अमित ‘आयए’चे अध्यक्ष होते. यावेळी अजून एक कार्यक्रम आम्ही सुरू केला तो म्हणजे ‘रक्तदान शिबिर’. दरवर्षी दोनवेळा रक्तदान शिबिर आयएतर्फे घेण्यात येतं. यात खूप संख्येने भारतीय रक्तदान करतात. या देशात येऊन एवढ्या संख्येने परदेशी लोकांनी रक्तदान करण्याच्या या अभिनव उपक्रमाला चीनच्या सरकारनेही शाबासकी दिली. ‘गिव्ह द गिफ्ट आॅफ लव्ह’ या घोषवाक्याला अनुसरून अनेक भारतीय रक्तदान करतात. आम्ही ज्या देशात राहतो, ज्यांचं अन्न खातो, पाणी पितो त्या लोकांना आमच्याकडूनही काही द्यायला हवं आणि रक्तदानासारखं दुसरं कुठलंही दान श्रेष्ठ नाही, ही भावना यामागे असते.
अमित आयएचे अध्यक्ष असताना अनुभवलेला परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट. मोदीजी चीनला भेट देणार होते आणि त्यांचं भाषण शांघायमध्ये आयोजित करण्याचं काम आयकडे आलं. तारीख होती १६ मे २०१५. त्याआधीचे दोन महिने तयारी चालली होती. पंतप्रधानांच्या स्वागतात कुठेही कमतरता यायला नको याची खास काळजी घेतली जात होती. शांघायच्या आजूबाजूच्या गावातून असलेले जवळपास ५००० भारतीय लोक त्या दिवशी भाषणाला हजर राहणार होते. मोदीजी आले त्यावेळी त्यांना भाषणाच्या जागेवर नेण्याची जबाबदारी अमितची होती. प्रचंड कडक बंदोबस्त त्यादिवशी होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चीनसारख्या देशात भारतीयांना गोळा केल्याबद्दल मोदीजींनी अमितची आणि आयएची पाठ थोपटली. मोदीजींच्या नंतर नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, प्रकाशसिंह बादल अशा अनेक मंत्र्यांची भाषणं आयएने आयोजित केली. परंतु मोदींच्या कार्यक्रमाचा अनुभव खूप वेगळा आणि समृध्द होता. गंमत म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शांघायमध्ये आलेल्या अनेक पत्रकारांनी, टीव्ही चॅनेलवाल्यांनी आमचेदेखील इंटरव्ह्यू घेतले. त्यामुळे त्या दोन महिन्यांच्या काळात आम्हाला आम्हीच सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं!
‘आयए’शिवाय शांघाय मराठी, शांघाय अड्डा (बंगाली), केरळी या संस्थादेखील शांघायमध्ये आहेत. दरवर्षी शांघाय मराठीतर्फे खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव, गुढीपाडवा, संक्रांत असे अनेक कार्यक्रम सादर केले जातात. इथे सार्वजनिक गणपती १० दिवस वगैरे बसवता येत नाही. त्यामुळे गणपतीची केवळ आरती केली जाते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना करत नाहीत. गुढीपाडव्याला बहुतेक वेळा मराठी नाट्य अथवा संगीत क्षेत्रातील मान्यवरांना बोलावलं जातं. त्यामुळे आम्हाला इथे राहूनसुद्धा दिलीप प्रभावळकर, अशोक पत्की, सलील कुलकर्णी, शरद पोंक्षे, सुधीर गाडगीळ यांसारख्या दिग्गजांचे कार्यक्रम अनुभवायला मिळतात. शांघाय मराठीच्या महिला मंडळातर्फे संक्रांतीचं हळदीकुंकूदेखील केलं जातं. नव्यानंच लग्न झालेल्या मुलींचा संक्रांत सण आवर्जून साजरा केला जातो, तसंच छोट्या बाळांची लूट (बोरन्हाण)सुद्धा करतात.
शांघायला आलो तेव्हा कधीच असं वाटलं नव्हतं की हा तथाकथित ‘शत्रूचा’ देश आम्हाला एवढा आपलासा वाटेल, इथल्या वास्तव्यात इतक्या प्रकारचे अनुभव मिळतील, सुदेश भोसले, अलका याज्ञिक, विभावरी आपटे, हृषिकेश रानडे, सुनिधी चौहान यांसारख्या कलाकारांचे कार्यक्रम आम्ही शांघायमध्ये आयोजित करू शकू.. हे सगळं त्यावेळी कुणी सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. इथे येऊन राहिल्यामुळे आम्हाला नुसत्या चीनचेच नाही, तर भारतातल्या इतर प्रांतांचेही सणवार समजले. यावर्षी नाट्यरसिकांसाठी आम्ही ‘शांघाय रंगमंच’ ही संस्था स्थापन केली आहे. याद्वारे शांघायमधील पहिलावहिला हिंदी नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला. आजवर अनेक लहानमोठी मराठी नाटकं केली होती, पण तीन अंकी नाटक आणि तेही प्राकृत हिंदी भाषेतलं, कालिदासाच्या जीवनावरचं हा एक अफलातून अनुभव होता. असे अजून किती अनुभव आम्हाला या देशात घेता येतील कुणास ठाऊक. पण ह्या सगळ्या अनुभवांनी आम्हाला बौद्धिक, मानसिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध केलंय.
आज मागे वळून पाहताना आम्हाला दोघांना खूप बरं वाटतं की आम्ही आमचं नागपुरातलं सुरक्षा कवच सोडून बाहेर पडलो. कारण त्यानंतरच आम्हाला आमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची हिंमत मिळाली. स्वप्नातदेखील ज्यांचा विचार केला नव्हता असे अनुभव मिळाले. भारतात, जर्मनीत आणि चीनमध्ये जमवलेला आणि आता सगळ्या जगभरात पसरलेला मोठा मित्रपरिवार मिळाला. 
नागपुरातून निघालो तेव्हा आम्ही एकटे होतो. पण आज आमच्याबरोबर साठवलेल्या या सगळ्या आठवणी आणि भेटत गेलेले हे सगळे लोक आहेत, ज्यांच्यामुळे आम्ही समृद्ध झालो आहोत. 
मै अकेलाही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गये, कारवाँ बनता गया!..हे जे म्हणतात त्याची अनुभूती आहे आमचं सहजीवन!!
 
(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)