भारतीय उद्योगमहर्षी '' लकाकि '' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:00 AM2019-06-23T07:00:00+5:302019-06-23T07:00:13+5:30

भारताच्या उद्योगाला लकाकी आली ती लक्ष्मणराव काशिनाथराव किर्लोस्करांमुळेच.

laxmanrao kirloskar is royal Indian businessman | भारतीय उद्योगमहर्षी '' लकाकि '' 

भारतीय उद्योगमहर्षी '' लकाकि '' 

Next

- भालचंद्र चौकुळकर 

भारताच्या उद्योगाला लकाकी आली ती लक्ष्मणराव काशिनाथराव किर्लोस्करांमुळेच. त्यांच्या कर्तृत्वाविषयी मी काय सांगणार! आम्ही सर्व त्यांना पप्पा म्हणत असू. ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे ते नशीबवान होत. मला त्यांना जवळून बघण्याची, त्यांची कार्यपद्धती व माणसाची पारख करण्याची पद्धत न्याहाळण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कष्ट करायची जिद्द, उत्तम गुणवत्तेचे काम करायचे व नवीन काहीतरी करायचे, हे शिक्षण त्यांच्या वागणुकीतून मिळाले ते कोणत्याही पुस्तकातून मिळणार नाही की शाळेतून मिळणार नाही. १९४०च्या सुमारास चार-पाच वर्षांचा त्यांचा सहवास आम्हाला आयुष्यभर चांगली शिकवण देऊन गेला. माझे वडील त्यांचे सेक्रेटरी होते. त्यामुळे मला त्यांना आणखी जवळून पाहता आले.
पप्पा दुसºयावर अतोनात प्रेम करत असत. त्यातून त्यांनी दुसºयांना प्रेम करण्यास शिकवले. माणसाची आवड ते जाणायचे व त्याप्रमाणे काम देत असत. तोपण जिद्द करून संधीचे सोने करत असे. त्यामुळेच माझे वडील चौकुळकर दहावी उत्तीर्ण झालेले त्यांचे हिशेब व टॅक्स रिटर्न्स भरत असत. मंगेशराव रेगे न शिकलेले, पण कॅल्क्युलेटर नसताना कंपनीचा हिशेब लिहीत असत. लकाकिंची कार्यपद्धती अतिशय निराळी होती. नवीन करायची जिद्द होती. त्यामुळेच लोखंडी नांगर, उसाच्या रसाचे मशीन, पंप, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, कॉम्प्रेसरसारखे भारताचे पहिले प्रॉडक्ट त्यांनी निर्माण केले आणि तेसुद्धा त्या काळी जेव्हा कास्टिंग फक्त मुंबईत होत असे. पप्पा स्वत: भेटून प्रत्येकाला आपल्या घरातल्याप्रमाणे वागवीत असत. त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या मम्मा गावातल्या बाईचं बाळंतपण करत असत व आजारी माणसाची काळजी घेऊन खाण्यापिण्यास देत असत. माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण जन्मास आला तेव्हा पप्पा म्हणाले, ‘हा माझा सहकारी असणार.’ वडिलांना आपुलकी मिळाली व पुढली चिंता दूर  झाली. त्यांच्या नावे विमा पॉलिसी घेऊन दिली. त्यांनी आपल्या प्रत्येक मुलास त्या काळी परदेशात शिक्षण दिले. शंतनुराव शिक्षण घेऊन येऊन कारखाना पाहू लागले. नंतर त्यांचे यमुनाबाईंशी लग्न झाले. मम्मा तेव्हा रेल्वेच्या सेकंड क्लासने प्रवास करत असत. मम्मांनी सांगितले, ‘यमुनाताईला फर्स्ट क्लास लागतो.’ पप्पांना यमूताईंचे कौतुक होते. त्यांनी मम्माला सांगीतले, ‘तूपण फर्स्ट क्लासने जात जा.’
पप्पा अतिशय प्रामाणिक होते. महाराष्ट्रात कारखानदार म्हणून ओळखू लागल्यावर मुलांना चांगल्या मुलींची स्थळे येत होती. प्रभाकरपंतांना बेळगावच्या लोकूरांचे स्थळ आले होते. पप्पांनी वडिलांना सांगितले, ‘चौकुळकर लोकूरांना सांगा, प्रभाकर कारखाना बघतो व गाई-म्हशीपण बघतो. मान्य असेल तर या.’ मी पप्पांना कधी सिनेमाला गेलेले, टूरवर गेलेले पाहिले नाही. ते सतत काम करत होते. त्यांना कधी पत्ते खेळताना पाहिले नाही. ते म्हणत असत, ‘मैदानी खेळ खेळा. घाम यायला पाहिजे व शरीर आणि मन उल्हसित असले पाहिजे.’ त्यांचा विरंगुळा म्हणजे शेतात, गोठ्यात काम करायचे. त्यांनी कोंबड्याही पाळल्या होत्या. त्या वेळी त्यांनी बांधलेले कोंबड्यांचे घर आतासुद्धा पाहण्यास मिळत नाही. ‘पहिल्यांदा कारखाना व नंतर घर’ असे त्यांचे धोरण होते. कारखान्याला काही कमी पडले, तर घरातून घालण्यास मागेपुढे बघत नसत. त्या वेळी घरी पितळेची भांडी व ताट-वाट्या होत्या. कारखान्यात ब्रासचा तुटवडा होता. पप्पांनी मम्माला सांगितले, ‘घरातली भांडी, ताटल्या कारखान्यात नेतो व वितळवून वापरतो. नंतर घरासाठी चांदीच्या ताट-वाट्या आणू.’ त्यांनी तसे केले व सेक्रेटरीच्या नात्याने वडिलांनी सांगलीहून चांदीच्या ताट-वाट्या नंतर आणल्या. त्या काळात त्यांनी लोखंडी नांगर केला. त्या नांगरालासुद्धा लवकर धार जाऊ नये म्हणून त्यांनी व्हाईट मेटलचे पाणी दिले. कल्पना करता येत नाही, की त्या काळात ‘गुगल’शिवाय, पुस्तके व मासिकांशिवाय पप्पांनी हे कसे केले असेल? त्यांनी लोखंडी फर्निचर बनवले. त्यांनी बनविलेले बाक, कॉट, खुर्ची, कपाट मी अजूनही वापरतो. म्हणजे, ८०-८५ वर्षे अजून तसेच आहे. मी बाकाची लाकडी फळीपण बदललेली नाही. त्या वेळच्यासारखी खुर्ची आता कॉपी करूनही करता येत नाही. पप्पांनी किर्लोस्कर कारखाना व त्यालगतची किर्लोस्करवाडी दोन्ही अगदी सर्वगुणसंपन्न बनवलीे. त्या वेळी कारखान्यांतला कामगार व वाडीतले रहिवासी स्वत:ला अगदी भाग्यवान समजत असत. पप्पांच्या स्वत:च्या निर्व्यसनी वागणूक, जिद्द, प्रेम करण्याच्या पद्धतीमुळे ते सर्वांपुढे एक आदर्श असत. यामुळेच वडीतील प्रत्येक रहिवासी वागणुकीस चांगला होता व ते आयुष्यभर चांगले राहिले. पप्पा वा शंतनुराव आगदी गावाबरोबर राहिले. त्यांच्यात मिळूनमिसळून राहिले. पप्पा गेल्यानंतर त्यांचा दशक्रिया विधी की तेरावा किर्लोस्करवाडीस झाला. वाडीच्या रहिवाशांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे दिवस केला. मालतीबार्ई किर्लोस्कर कावळा शिवण्याच्या प्रसंगी हजर होत्या. कावळा लवकर शिवेना. कामगारांनी ‘कारखान्याची काळजी घेतो’ म्हणून वचन दिल्यावर कावळा शिवला. मालतीबाईही आश्चर्यचकित झाल्या होत्या. पप्पांचा कारखान्यावर असा होता जीव.(लेखक ज्येष्ठ उद्योजक आहेत.)
 

Web Title: laxmanrao kirloskar is royal Indian businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.