निवडणुकीतले अखेरचे पदयात्री....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:00 AM2019-04-21T06:00:00+5:302019-04-21T06:00:13+5:30

मंगळवारी पुण्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे, त्या निमित्ताने !...

The last pedestrian in the election .... | निवडणुकीतले अखेरचे पदयात्री....

निवडणुकीतले अखेरचे पदयात्री....

Next

अंकुश काकडे 
पुणे शहरातील लोकसभा निवडणुकीतील प्रचारतंत्र, काळाबरोबर बदलत गेलं. पूर्वपरंपरागत भिंती रंगविणं, पोस्टर, पताका ह्या सर्व गोष्टी आता कालबाह्य झाल्या. आता त्याची जागा घेतली सोशल मीडियानं! अवघ्या काही मिनिटांत दूरवर पोहोचविणारा प्रचार हा आता सुलभ, जलद झालाय.
१९७१ पासून मी पुण्यातील निवडणुका पाहत आलो आहे. १९७१ ची निवडणूक होती काँग्रेसतर्फे मोहन धारिया आणि जनसंघाचे उमेदवार रामभाऊ म्हाळगी ह्या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये. त्या वेळी प्रचार करताना शक्यतो उमेदवार प्रत्येक वॉर्डात जाऊन मतदारांना मतांचे आवाहन करीत असत, पण त्या वेळचं वैशिष्ट्य असे, ते म्हणजे उमेदवार गल्ली-बोळातून, वाड्या-वाड्यांतून पायी जात, वयस्कर मतदारांच्या खाली वाकून पाया पडत, अगदी १९७७ मध्येदेखील मोहन धारिया विरुद्ध वसंत थोरात अशी लढत झाली. त्या वेळीदेखील हे दोन्ही उमेदवार पदयात्रा करीत. पण १९८० च्या नंतर मात्र या पदयात्रा करण्यापेक्षा उमेदवारांनी जीप या वाहनास पसंती दिली. कदाचित मतदारसंघ मोठा झाला. तसेच प्रचाराला मिळणारा अपुरा कालावधी यामुळे तसं झालं असेल. पुण्यातून लढलेले अण्णा जोशी, विठ्ठलराव तुपे, सुरेश कलमाडी, प्रदीप रावत, गिरीश बापट, अनिल शिरोळे, विश्वजित कदम हे सर्व जण मतदारांना भेटण्यासाठी ‘जीपयात्रेचा’ उपयोग करत. पण बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे एकमेव उमेदवार होते, त्यांनी कधीही जीपयात्रेचा उपयोग केला नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते प्रचारासाठी पदयात्रेत स्वत:ही पायी चालत. अनेक वेळा त्यांची चप्पल तुटली तरी त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी कधीही पदयात्रा सोडली नाही. पदयात्रा सुरुवातीपासून पदयात्रेचा जेथे शेवट असेल तेथे ते पायी जात. अगदी साधी राहणी, खादीचा साधा बुशशर्ट, पँट हाच त्यांचा नेहमी संपूर्ण दिवसाचा पेहराव असे. आता मात्र उमेदवार सकाळी, दुपारी वेगवेगळ्या पेहरावात पाहायला मिळतात. भल्या पहाटे टेकडीवर फिरायला जाणाºया मतदारांना भेटताना ते ट्रॅकसूट घातलेले दिसतात. तर कॉलेजमधील तरुण मतदारांना भेटताना त्यांच्या अंगवार टी-शर्ट पाहायला मिळतो. काळानुरूप हे सर्व बदलत आले. सर्वांनी त्याचा स्वीकार केला; पण गाडगीळ-तुपे हे मात्र त्याला अपवाद ठरले हे तेवढंच खरं! पूर्वी निवडणुकीची कार्यालये ही त्या त्या उमेदवारांची पक्षाची कार्यालये होती, पण आता मात्र त्यातही बदल होत गेला. पक्षाचं कार्यालय असेल पण उमेवारांच घर. आणि आता तर भर पडलीय ती एखादं आलिशान हॉटेल किंवा भव्य मंगल कार्यालयाची. कलमाडी उमेदवार येण्यापूर्वी काँग्रेस हाऊसला मोठं महत्त्व होतं. भेळ-भत्ता, चहा एवढंच सर्व मर्यादित, पण कलमाडींच्या आगमनानंतर कलमाडी हाऊसचं महत्त्व वाढत गेलं. तेथील थाटमाट-नाष्टा, जेवणाची रेलचेल ही वाढत गेली. पूर्वी भाजप कार्यालयात कार्यकर्ते घरून पोळी-भाजी घेऊन येत असत, पण तेथील चित्रही आता संपूर्ण बदललंय, तेदेखील आता पंचतारांकित होऊन गेलेत.
१९९१ ची लोकसभा निवडणूक अगदी रंगात आली होती. मला वाटतं मतदानाची तारीख होती २८ मे, त्यापूर्वी २० मे रोजी रात्री ८ वाजता राजीव गांधींची प्रचंड सभा स.प. महाविद्यालय मैदानावर झाली आणि तेथूनच ते दुसºया दिवशी तमिळनाडूतील पेरांबदूर येथील सभेसाठी गेले. दुर्दैवाने त्या सभेतच राजीव गांधींचा दुर्दैवी अंत झाला. देशातील दुसºया टप्प्यातील सर्व निवडणुका २१ दिवस पुढे गेल्या. राजीव गांधींच्या निधनामुळे देशातील निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली हा इतिहास आपल्याला माहीतच आहे. राजीव गांधींच्या अस्थी संपूर्ण देशात नेण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला. विशेषत: ज्या मतदारसंघांत निवडणुका होणार होत्या तेथे हा अस्थिकलश प्रचाराचा मुद्दा ठरला, अगदी पुणे शहरातदेखील. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ नवी दिल्लीवरून हा अस्थिकलश घेऊन आले. पुण्यात लोहगाव विमानतळावर ५ वाजता त्यांचं आगमन होणार होतं. त्यानंतर तेथूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवरून साधारणत: ८ वाजता तो अस्थिकलश खेड मतदारसंघाकडे जाणार होता.
सायंकाळी ६ वाजता लोहगाव येथून ह्या अस्थिकलशाची मिरवणूक निघाली. ती पुण्यातील प्रमुख रस्त्यावरून जात असताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो पुणेकर त्या अस्थिकलशाचं दर्शन घेताना प्रचंड गर्दी करीत होते. अगदी आपटे रोड, लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड अशा बंगले असलेल्या रस्त्यांवरदेखील तेथील नागरिक ह्या अस्थिकलशाचं दर्शन घेत असताना त्यांचे डोळे पाणावलेले होते. यात विशेषत: महिलांचा सहभाग मोठा होता. रात्री ८ वाजता त्या वेळचे खेड मतदारसंघाचे उमेदवार विदुरा नवले यांच्याकडे हा अस्थिकलश ८ वाजता सुपूर्त करायचा होता, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे तो त्यांच्याकडे रात्री ११ वाजता सुपूर्त करण्यात आला.
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: The last pedestrian in the election ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.