काळजाची भाषा बोलणारी सांकेतिक भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 06:10 AM2018-09-23T06:10:12+5:302018-09-23T06:10:12+5:30

जगभरातल्या 37 देशांनी सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे. जगभरात 350 सांकेतिक भाषा आहेत. त्यापैकी फक्त 26 भाषांचं शास्त्र लोकांना माहिती आहे.

A language which speak by heart.. strength of sign languages . | काळजाची भाषा बोलणारी सांकेतिक भाषा

काळजाची भाषा बोलणारी सांकेतिक भाषा

Next

दूरदर्शनवर कर्णबधीरांसाठीची विशेष वार्तापत्रं तुम्ही कधी पाहिली असतील, तर श्रवणसुखाला मुकलेल्यांसाठी हातांच्या विशिष्ट खुणांनी  ‘बोलणारी’ ही भाषा किती महत्वपूर्ण आहे, हे तुम्हाला कळलं असेल.

बोललेला शब्द ज्यांना ऐकता येत नाही, अशा अनेकांसाठी या खुणा हाच जगाशी जोडून घेणारा अतीव महत्वपूर्ण  ‘संवाद’ असतो. जगभरात सर्वत्र या  ‘भाषे’मध्ये एकसूत्रता असावी असाही प्रयत्न झाला आणि त्याला पुष्कळ प्रमाणात यश लाभलं आहे. कर्णबधीरांसाठी त्यांच्या शारिरीक न्यूनत्वावर मात करण्याचं एक मोठं साधन असलेली ही  ‘साइन लॅँग्वेज’ आता संवादाच्या मुख्य प्रवाहात येऊ घातली आहे. भाषेच्या जगात शब्दांपलीकडचं पाऊल टाकत आज जगभरातल्या देशांनी आता‘साइन लॅँग्वेज’ दिन साजरा करायचं ठरवलं आहे. यंदा पहिल्यांदाच 23 सप्टेंबर हा दिवस साइन लॅँग्वेज दिन म्हणून साजरा होत असून, त्याला संयुक्त राष्ट्रसंघानं मान्यता दिली आहे. जगभरातल्या कर्णबधिर समुदायासाठी ही एक मोठी विलक्षण गोष्ट आहे. कारण त्यांच्या भाषेला जगानं अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्याच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. 

 

जगभरात भाषिक संघर्ष तीव्र होत असताना आणि भाषांना अस्मितांचे भाले फुटत असताना ही केवळ खुणांनी बोलणारी, संवाद करणारी ही सांकेतिक भाषा मात्र एक नवीन सूत्र घेऊन पुढे येतेय.
आजच्या दिवसाचं घोषवाक्य आहे :‘विथ साइन लॅँग्वेज, 
इव्हरीवन इज इनक्ल्यूडेड!’

ही भाषा सगळ्यांची असू शकते आणि सार्‍यांना सामावूनही घेऊ शकते. कारण ती भाषा शब्दांची नाही, तर काळजाची आहे. सर्वांना सामावून घेऊ शकणारी  ‘एक भाषा’ हे अगणित अंतर्गत संघर्षांनी विभागलेल्या शब्दांच्या बोलघेवड्या जगात तरी शक्य नाही. पण शब्दांविना चालणारा हा संवाद मात्र देशोदेशीच्या सीमारेषा आणि भाषिक अस्मितांच्या रक्तरेखा ओलांडून  ‘सर्वांना सामावून घेण्या’चं स्वप्नं पाहू शकतो आहे. यावर्षीपासून आणखी एक महत्वाचा बदल होतो आहे. आता जागतिक समुदायाने  हे मान्य केलं आहे की, सांकेतिक भाषाही अन्य सर्व भाषांसारखी एक ‘प्रत्यक्ष’ भाषा आहे, निव्वळ खुणांची जंत्री नव्हे! आजवर नसलेला हा  ‘स्वतंत्र भाषे’चा दर्जा मिळाल्याने यासंदर्भातल्या अनेक गोष्टी आता सुकर होतील असं या क्षेत्रातल्या तज्ञांचं म्हणणं आहे. शारीरिक न्यूनत्व ही र्मयादा न ठरता अशा व्यक्तींना शक्यतो सर्वच सार्वजनिक सुविधांचा वापर करता यावा, त्यासाठी आवश्यक त्या अधिकच्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी असाव्यात, हे आता बहुतांशी जगभरात मान्य झालं आहे. तशा सुविधा प्रत्यक्षात आणण्यात प्रगत जगाने पुढाकार घेतलाच, पण प्रगतीशील देशांनीही आपल्यापरीने हातभार लावला. सुविधा देऊ न शकलेल्या ठिकाणीही  ‘या सुविधांची गरज’ सर्वमान्य झाली, हाही एक महत्वाचा बदलच!
तेच आता  ‘संवादा’च्या बाबतीतही व्हावं, अशी कर्णबधीरांसाठी काम करत असलेल्या संस्थांची तळमळ आहे. याच संदर्भातल्या जनजागृतीसाठी या दिनाला जोडूनच आता कर्णबधिर सप्ताहही दरवर्षी जगभर साजरा होणार आहे.  कर्णबधिर समुदाय, ज्यांच्या जगात शब्दच नाहीत किंवा शब्दांपलीकडच्या भाषेनं जे जगाशी बोलतात त्यांच्यासाठी अनेक वर्षांची लढाई आणि जनजागृतीनंतर हा दिवस उजाडला आहे.

Web Title: A language which speak by heart.. strength of sign languages .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.