- विश्वास पाटील

रांगडेपण आणि दिलदारपणामुळे प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर
नाजूक सौंदर्यालाही तशीच दाद देतं. रिक्षाही त्याला अपवाद नाहीत.
इथला रिक्षावाला आपल्या हक्कासाठी एकवेळ प्रवाशाशी हुज्जत घालेल, 
पण त्याच्या सेवेसाठी वाट्टेल ते करेल.
इथल्या मनभावन रिक्षांमध्ये काय नाही? प्रवाशांच्या मनोरंजनासाठी स्क्रीन,
वाचण्यासाठी वृत्तपत्रं, व्होल्वोपेक्षाही आरामदायी कुशन्स, पिण्याचं पाणी,
रेल्वे वेळापत्रक, मोबाइल चार्जर, इतकंच काय वायफायदेखील..
रिक्षाच्या किमतीपेक्षाही जास्त खर्च त्यांच्या सजावटीवर!
केव्हाही पाहा, ती कायम नव्या नवरीसारखी नटलेली!

कोल्हापूरची माती आणि या मातीतलं अस्सल रांगडेपण इथल्या माणसांच्या रक्तामांसात, स्वभावातही उतरलं आहे. 
त्यांच्याशी बोलताना त्याचं प्रत्यंतर येतंच. स्वत:च्या शहराविषयी आणि स्वप्रतिमेवर तो कायमच खूश असलेला आपल्याला दिसतो. 
कोल्हापुरी माणसाला जर विचारलं, ‘काय आहे तुझ्या कोल्हापूरचं वैशिष्ट्य?’ - तर काय काय काय उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात?..
‘अरे भावा... अशी हाक इथल्या पोरीसुद्धा सहज मारतात ते आहे माझं कोल्हापूर...
आयुष्यातलं सगळं टेन्शन ज्या रंकाळ्याच्या काठावर बसून माणूस विसरतो ते आहे माझं कोल्हापूर...
‘रिण काढून सण करील’ असं माझं कोल्हापूर...
जातीसाठी माती खाईल ते आहे कोल्हापूर...
झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा म्हणजे माझं कोल्हापूर...
नुसता पत्ता विचारला तरी घरापर्यंत सोडायला धावणारा माणूस म्हणजे कोल्हापूर...
मोडेन पण वाकणार नाही, असं आहे कोल्हापूर...
मनानं ताठ आणि राजेशाही थाट याला म्हणतात कोल्हापूर....
कोल्हापूरच्या रांगडेपणाचं असं बरंच वर्णन करता येईल. कोल्हापूरचा ‘रिक्षावाला’ही याच मातीचा घटक असल्यानं तोदेखील तितकाच रांगडा आहे. आपली रिक्षा नव्या नवरीसारखी सजवायचं अमाप वेड त्याला आहे.
रिक्षा हा व्यवसायच आहे, परंतु तो रडत-खडत करण्यापेक्षा त्यातही कसा आनंद शोधता येईल अशी धडपड ‘कोल्हापूरचा रिक्षावाला’ करत आला आहे. तो कमालीचा हौशी आहे. माझी रिक्षा रस्त्यावरून निघाली तर जगाने तिच्याकडं बघत राहिलं पाहिजे, असं वेडेपण मनात बाळगणारा तो आहे. 
म्हणून रिक्षा सजवताना त्यावर किती पैसे खर्च झाले याचा हिशेब तो बाळगत बसत नाही. कोल्हापुरात अशा अनेक रिक्षा आहेत, की त्याची किंमत सध्या दीड लाखांपर्यंत असली तर तेवढीच रक्कम त्याने रिक्षाच्या सजावटीवर खर्च केली आहे.
या मनभावन रिक्षांमध्ये काय नाही?..
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी स्क्रीन आहे. रिक्षाला रिव्हर्स कॅमेरे आहेत. आत घड्याळ आहे. वाचण्यासाठी वृत्तपत्रे आहेत. व्होल्वो गाडीसारखे किंबहुना त्याहून चांगल्या प्रतीचे कुशन्स आहेत. कॅलेंडर आहे. 
पिण्याच्या पाण्याची सोय, वायफाय, रेल्वेचे वेळापत्रक, मोबाइलसाठी चार्जर, कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, अत्यावश्यक सेवांचे फोन नंबर, आग प्रतिबंधक यंत्रणा.. 
ही रिक्षा कमालीची स्वच्छ असते. किमान पन्नास हजार रुपये खर्च करून त्यामध्ये साउंड सिस्टीम बसवलेली असते. प्रवासीही चांगली साउंड सिस्टीम असेल तरच रिक्षात बसतात. जुने नाट्यप्रेमी बालगंधर्व यांच्याबद्दल एक आठवण सांगतात. त्यांचे नाटक सुरू होताना अगोदर विंगेत ते अत्तराचा सुगंध भरून घेत व पडदे उघडले की सभागृहात तो सुगंध दरवळत असे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचे मन दरवळून जाई. 
कोल्हापूरचा रिक्षावालाही आपल्या मायबाप प्रवाशांबद्दल अशीच काळजी घेतो. प्रवासी बसण्यापूर्वी रिक्षात तो परफ्यूम मारतो. वातावरण सुगंधित करतो आणि मगच रिक्षा सुरू करतो..
कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांची म्हणून काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती राज्यात व देशातही इतरत्र कुठेही अनुभवास येणार नाहीत. 
महाराष्ट्रात फार कमी शहरात मीटरप्रमाणे रिक्षा सेवा पुरविली जाते, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. 
कोल्हापूरचा रिक्षावाला कमालीचा प्रामाणिक आहे. प्रवाशांकडून हक्काचे दोन-पाच रुपये मिळविण्यासाठी तो त्याच्याशी एकवेळ हुज्जत घालेल, परंतु मायबाप प्रवाशांच्या सेवेत काडीची कमतरता राहू देणार नाही. प्रवासी रिक्षामध्ये छोटीशीही वस्तू विसरला तर हा रिक्षावाला त्याचा ठावठिकाणा हुडकून ती वस्तू त्याच्या स्वाधीन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. 
काही दिवसांपूर्वीचीच घटना.. 
‘लक्षतीर्थ’ वसाहतीत राहणाऱ्या हृषिकेश लक्ष्मण कापूसकर या रिक्षाचालकाच्या गाडीत तीन महिला बसल्या. त्यांनी मुलाच्या शाळेच्या बॅगेमध्ये डब्यात दागिने ठेवले होते. मुलाने रिक्षात बसल्यावर ही बॅग रिक्षाच्या मागील बाजूस असलेल्या कप्प्यात ठेवली आणि बॅग न घेताच तो उतरला. 
घरी रात्री जेवण-खाण झाल्यावर घरच्यांच्या ही बाब लक्षात आली. मग शोधाशोध सुरू झाली. ज्या स्टॉपवर त्या उतरल्या तिथे जाऊन चौकशी केली. तेथील रिक्षाचालकांनी त्यांना धीर दिला. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. कोल्हापूरचा रिक्षावाला आहे तो. त्याच्या लक्षात आल्यावर तोच तुम्हाला शोधत येणार म्हणजे येणार..
दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलीस व रिक्षा संघटनांशी त्यांनी संपर्क साधला. तोपर्यंत रिक्षात बॅग सापडल्याचे रिक्षाचालकाच्याही लक्षात आले होते. त्या बॅगेत काय होते हे त्यालाही माहीत नव्हते. पोलिसांच्या मध्यस्थीने जेव्हा ही बॅग ज्यांची होती, त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली तेव्हा त्यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने मिळाले!
या रिक्षाचालकाचा पोलीस अधिकाऱ्याच्या हस्ते नंतर सत्कार करण्यात आला. 
रिक्षावाल्यांच्या प्रामाणिकपणाच्या अशा अनेक घटना..
शिवाजी पेठेतील महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक सेनेचे अध्यक्ष व स्वत: रिक्षा व्यावसायिक राजू जाधव सांगत होते, ‘राजारामपुरीतील बापू सरनाईक यांच्या कुटुंबातील महिलांची साड्यांची बॅग त्यांच्या रिक्षात विसरली होती. त्यांच्या घरी लग्नकार्य होते व त्या हौसेने घेतलेल्या अहेराच्या साड्या होत्या. जाधव दुसऱ्या दिवशी सरनाईक यांचे घर शोधत तिथे गेले व त्यांना त्यांची बॅग परत केली. त्यातून सरनाईक यांच्याशी जाधव यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले. सरनाईक यांनी पुढाकार घेऊन ‘हा रिक्षाचालक प्रामाणिक आहे’ म्हणून सुशिक्षित बेकार कर्ज योजनेतून त्यांना ‘४०७’ हा टेम्पो घेण्यास मदत केली.
कोल्हापूरचा रिक्षावाला अगदी प्रामाणिक आणि दिलदार, पण प्रसंगी ‘आरं ला कारं’ म्हणायलाही तो कधीच सोडत नाही. कोणत्याही घटनेबद्दल तो लगेच व्यक्त होतो. आपल्या बोलण्याचे काही पडसाद उमटतील का याचीही फिकीर त्याला नसते. जे मनात येईल, ते बिनधास बोलून तो मोकळा होतो. 
कोल्हापूरचा रिक्षावाला आपल्या गाडीवर (रिक्षा) मनापासून प्रेम करतो. लग्नात जसे नवरीला सजवतात तसं तो रिक्षाला सजवतो. बरं हे सजवणंही फक्त एक-दोन दिवसांपुरतं किंवा नव्याचे नऊ दिवस असं नसतं. त्यांची ही ‘नवरी’ कायम सजलेली. केव्हाही पाहा, ती चकाचकच दिसणार. 
कोल्हापूर हे मर्सिडिझ गाड्यांच्या वापरात अग्रेसर असणारे शहर आहे. मोटारसायकलमध्येही बुलेट कोल्हापूरकरांची प्राणप्रिय आहे. तिच्या आवाजाचा ठेका इथल्या लोकांना खूप आवडतो. कोल्हापूरचं सगळंच दणदणीत आणि अघळपघळ. खरी मर्सिडिझ घेण्याची ऐपत नसली म्हणून काय झालं, मला रोजीरोटी मिळवून देते ती माझी मर्सिडिझच, अशी त्यांची भावना. त्यामुळे या रिक्षाची देखभालही अशीच राजेशाही असते. 
राजोपाध्येनगरमधील दीपक बाजीराव पोवार हा रिक्षाचालक सांगत होता, ‘माझे वडील पूर्वी टांगा चालवायचे. १९६२ पासून आमच्या घरात हा व्यवसाय आहे. त्यावेळी आम्ही ६ हजार ३०० रुपयाला लॅम्ब्रेटा गाडी घेतली होती. वडील गेली ५० वर्षे रिक्षा चालवतात. मी रिक्षाच्या सजावटीवर दीड लाख रुपये खर्च केले आहेत. ‘कोल्हापूरचं नाव राखायचं’, हीच त्यामागची भावना. 
सकाळी सात वाजता मी रिक्षा सुरू करतो. सायंकाळी पाच वाजता मीटर डाउन. लाइट लावून गाडी चालवायची नाही, असा माझा नियम. दिवसभरात चार पैसे चांगले मिळतात म्हणून सायंकाळी घरी परत. रोज रिक्षा स्वच्छ केल्याशिवाय रात्रीचे जेवण नाही. माझ्या रिक्षावर माझं पोट चालतं. हा व्यवसाय एक दिवसापुरता नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे धंदा करायचा हे आमच्या अंगवळणीच पडलंय..’ 
कोल्हापूर शहरात सुमारे सहा हजार रिक्षा आहेत. जिल्ह्यात १५ हजार रिक्षा आहेत. रिक्षावाल्यांच्या १४ संघटना आहेत. 
दिवसभर तो रिक्षा घेऊन रस्त्यावर फिरला तर त्याला ५०० रुपये मिळतात. पेट्रोल आणि देखभाल खर्च गेल्यावर त्याला २५० ते ३०० रुपये मिळतात, असे करवीर आॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे यांनी सांगितले. रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून विविध परवान्यांसाठी जबर शुल्कवाढ करण्यात आली आहे. ‘थर्ड पार्टी’ विम्यापोटी कंपन्यांकडून फारसा मोबदला मिळत नाही. महागाई वाढली आहे, आजारपण, कर्जबाजारीपण अशा अडचणी असल्या तरी त्याला रोजीरोटीचा दुसरा काहीच पर्याय हाती नसल्याने तो या व्यवसायात तग धरून आहे. 
‘जिना यहाँ मरना यहाँ.. रिक्षाके सिवा जाना कहाँ...’ असं त्याचं त्यामागचं तत्त्वज्ञान आहे.

रिक्षावाल्यांचं समाजभान

कोल्हापूरचा रिक्षावाला जेवढा स्वत:च्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे, तेवढाच तो सामाजिक प्रश्नांबद्दलही सजग आहे. शहरातील रस्त्यांची वाट लागल्यावर सन १९८२ मध्ये रिक्षाचालकांनी महापौर निवडीदिवशीच कोल्हापूर महापालिकेला घेराव घातला होता. नगरसेवकांना गल्लीबोळातून वाट काढत सभेला जावे लागले होते. त्याची नोंद त्यावेळी ‘बीबीसी’ने घेतली होती असं जाणकार सांगतात. 
गेल्या पाच-सहा वर्षांत राज्यभर गाजलेले आयआरबी कंपनीच्या विरोधातील टोलचे जे आंदोलन झाले, त्यात इथला रिक्षाचालक सर्वांत पुढे होता. खरंतर रिक्षाला टोल लागूच करण्यात आलेला नव्हता, तरीही सामाजिक भान म्हणून बंद आणि सगळ्या आंदोलनात रिक्षाचालक हिरीरीनं पुढे होते. 
कोल्हापूरचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे इथल्या सामान्य माणसाला त्याच्या अस्मितेला कुणी आव्हान दिलेले आवडत नाही. तो त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. टोलच्या आंदोलनात तसेच घडले. रिक्षाचालकांसारखा सामान्य माणूस रस्त्यावर उतरल्यानेच टोल रद्द होऊ शकला.

महिलांशी गैरवर्तन नाही..

कोल्हापूरचा रिक्षावाला जसा प्रामाणिक आहे तसाच त्याचा आणखी एक गुणविशेष. कोल्हापुरात गेल्या पन्नास वर्षांत रिक्षात बसलेल्या महिला प्रवाशाशी रिक्षाचालकाने गैरवर्तन केल्याची एकही घटना घडलेली नाही. मध्यरात्री जरी एखादी महिला बसस्थानकावर उतरली आणि तिथे ‘दादा, मला अमुक अमुक नगरात जायचे आहे’ म्हणून सांगितले तर तो त्यांना घेऊन जाणार.. घरी जाऊन दार उघडून ती महिला सुरक्षित घरी पोहचल्याची खात्री झाल्यावरच तेथून रिक्षा स्टार्ट करणार... 
एखाद्या असहाय्य महिलेस कोणी त्रास देत असेल तर त्यालाही विरोध करणारा हा रिक्षावाला आहे. परगावचा प्रवासी आहे म्हणून रिक्षा इकडे-तिकडे फिरवून भाडे वाढविणे असे प्रकार सहसा होत नाहीत. एखाद्या गोष्टीबद्दल प्रवाशाला माहिती हवी असल्यास त्याच्याकडे असलेली आणि प्रवाशाचे समाधान होईपर्यंत इत्थंभूत माहिती देणार. 

रिक्षांची सौंदर्य स्पर्धा

महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक संघटना प्रतिवर्षी कोल्हापुरात प्रजासत्ताकदिनी कोल्हापुरातील रिक्षांची सौंदर्य स्पर्धा घेते. या स्पर्धा दोन गटांत होतात. त्यातील विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार, सात हजार, ५५५५ आणि ४४४४ अशी रोख बक्षिसे व चषक दिला जातो. दोन्ही गटांतील विजेत्यांतून ‘कोल्हापूर सुंदरी’ असा किताब व त्यास चांदीचे मेडल दिले जाते. या स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा, पंढरपूर, बार्शी, बेळगाव, संकेश्वर, निपाणी, मालवण, रत्नागिरी आदि शहरांतील रिक्षाचालक सहभागी होतात. लोकवर्गणीतून सुमारे दोन-अडीच लाख रुपये जमा करून ही स्पर्धा होते.

सारं काही हटके

कोल्हापूरच्या या आगळ्या-वेगळ्या रिक्षावाल्यांबद्दल एकेकाळी स्वत: रिक्षाचालक असलेले शिवशाहीर राजू राऊत म्हणतात, 
‘कोल्हापूरचा माणूस खाण्याच्या बाबतीत मसालेदार आहे. पै-पाहुण्यांची हौस करण्यात तो आग्रही आहे. हातचं राखून वागायचं त्याला कधीच जमत नाही. इतर शहरांप्रमाणे ‘भाडं मारलं की झालं’ असा विचार कोल्हापूरचा रिक्षावाला कधीच करत नाही. आपल्या रिक्षात बसलेल्या प्रवाशाला पूर्ण समाधान मिळाले पाहिजे अशी त्याची धडपड असते. यासाठीच पदरमोड करून तो तिची सजावट करतो.’

चित्रपटसृष्टीलाही भुरळ..

कोल्हापूरचे दिग्दर्शक सतीश रणदिवे यांनी २००९ मध्ये अलका कुबल यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘रिक्षावाली’ हा चित्रपट काढला होता. 
त्यातील ‘कामावर जायला उशीर झायला.. बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला..’ हे गाणं अभिनेत्री मानसी नाईक हिच्या अदाकारीमुळे आजही महाराष्ट्राच्या चांगले लक्षात आहे.