ज्ञानभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:07 PM2019-01-12T20:07:47+5:302019-01-14T18:57:36+5:30

हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते. या दिवसाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी

Knowledge Language | ज्ञानभाषा

ज्ञानभाषा

googlenewsNext
ठळक मुद्देविश्व हिंदी दिवस विशेष पहिली पसंती इंग्रजीला असली, तरी हिंदी ही आता व्यवहार व ज्ञानाची भाषा बनू लागली आहे

- डॉ. प्रकाश मुंज

हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते. या दिवसाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी २००६ रोजी ‘विश्व हिंदी दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले. यानुसार भारतीय विदेश मंत्रालयाच्यावतीने भारतीय दूतावास हा दिवस ‘विश्व हिंदी दिवस’ म्हणून जगभरात साजरा करतात. या दिवसाचे औचित्य साधून हिंदी भाषेच्या स्थितीचा घेतलेला आढावा...

सध्या भारतामध्ये तमिळनाडू सोडले तर सर्व राज्यांमध्ये हिंदी हा सक्तीचा विषय आहे. नोकरीसाठी इतरत्र जाणाऱ्या लोकांना हिंदी शिकण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. चित्रपटांनी हिंदी देशभर नेली आहे. देशातील ५५ टक्के लोक हिंदी भाषा बोलतात आणि ८५ ते ९० टक्के लोकांना त्यांची मातृभाषा नसूनही हिंदी भाषा समजते, हेच हिंदी भाषेचे मोठे वैशिष्ट्य आहे. हे ओळखून देशी-विदेशी कंपन्यांनी हिंदीचा स्वीकार केला आहे. यात इंटरनेटमध्ये आमूलाग्र बदल दिसत आहे.

इंटरनेट, मोबाईलमध्ये हिंदीचा वापर
आघाडीची सर्च इंजिन गुगल कंपनीने इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत करार केले आहेत. गुगलने आपल्या डिस्प्ले नेटवर्कवर हिंदीत जाहिरात देण्यासही सुरू केले आहे. तसेच हिंदीतही व्हाईस सर्च पर्याय उपलब्ध करून दिला आहे. स्पाईसच्या माध्यमातून पहिला हिंदी अ‍ॅन्ड्राईड फोनही लाँच केला आहे. याचबरोबर गुगल क्रोम, यू ट्यूब मॅप, मोबाईलवरील सर्व फीचर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत. यामुळेच हिंदीमध्ये इंटरनेट सर्च करणाºयांची संख्याही वाढत आहे. जगभरात हिंदीच्या ३००० वेबसाईट्स उपलब्ध आहेत.
भारत सरकारची सकारात्मक पाऊले
भारत सरकारने इंटरनेट व्यवहारास चालना देण्याच्या उद्देशाने ‘डिजिटल इंडिया’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यास सकारात्मक प्रतिसाद देत गुगलने ‘हिंदीवेब’ हे संकेतस्थळ सुरूकेले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदीतून साहित्य शोधण्यास मदत होत आहे. भारताच्या पर्यटन मंडळाच्या (आइआरसीटीसी) वेबसाईटवर हिंदी भाषेत तिकिट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही एटीएम व्यवहाराची पावती हिंदीमधून देण्याची सोय केली आहे. वर्धा येथील विश्व हिंदी विद्यापीठाचे काम उल्लेखनीय आहे.
सेबीद्वारे हिंदी भाषेत व्यवहार
हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधण्यासाठी सेबी (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) प्रयत्न करीत आहे. सेबीने आपल्या विविध दस्तावेजांचा हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी व्यावसायिक मंडळ तयार केले आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीतून संबोधन
संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीतून संबोधित करणारे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान होते़ यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीतून संबोधित केले. हिंदीत चालविलेल्या प्रचार मोहिमेच्या
जोरावरच त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली हे विसरून चालणार नाही. आज जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये हिंदी अभ्यासक्रम चालविले जातात. मॉरिशसमध्ये विश्व हिंदी सचिवालय भवन उभे राहत आहे. विशेष म्हणजे मॉरिशसचे स्वत:चे हिंदी वाङ्मय आहे.

आज देश बदलत आहे. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील हिंदी मातृभाषा नसलेले विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चमकत आहेत. सुरुवात झाली आहे. दक्षिण भारतातही आता तुम्ही हिंदीत बोलू शकता! आणखी काही वर्षे थांबा! हिंदी न बोलणारे लोक अस्खलितपणे हिंदी बोलताना दिसतील. नव्या पिढीची जरी पहिली पसंती इंग्रजीला असली, तरी हिंदी ही आता व्यवहार व ज्ञानाची भाषा बनू लागली आहे. आता सर्व हिंदी भाषिक, हिंदी प्रेमींना एकच आस आहे, ती म्हणजे हिंदी भाषेला विश्वभाषेचा दर्जा मिळावा, ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.

(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीमध्ये
उपसंपादक आहेत.)

Web Title: Knowledge Language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.