Kamalapur Elephant Camp | कमलापूरचा हत्ती कॅम्प
कमलापूरचा हत्ती कॅम्प

ठळक मुद्देगडचिरोली : राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता

सर्कसमध्ये फुटबॉल खेळणारा किंवा सोंडीत बॅट पकडून क्रिकेटचा चेंडू टोलवणाऱ्या हत्तीला आजच्या मध्यमवयीन आणि त्यापेक्षा आधीच्या पिढ्यांनी अनेक वेळा पाहिले असेल. पण आता सर्कसींचे प्रमाण कमी झाल्याने नवीन पिढीला प्रत्यक्षात हत्ती पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळेच की काय, गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरमध्ये असलेल्या वनविभागाच्या हत्ती कॅम्पचे आकर्षण वाढत आहे. एक-दोन नाही तर लहान-मोठे मिळून तब्बल ९ हत्ती असलेला हा राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे.
एरवी गडचिरोलीचे नाव काढले की ‘नक्षलवादी’ एवढेच चित्र आपसुकपणे नजरेसमोर येते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी बरबटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘पर्यटन’ ही कल्पनाही कोणी सहसा करत नाही. परंतू गडचिरोली जिल्ह्यातल्या काही पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर कोणीही पर्यटक त्या स्थळांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कमलापूरचा हा हत्ती कॅम्पही अशाच पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या वनवैभवात भर घालणाऱ्या या कॅम्पमध्ये आधी वनविभागाने आपल्या कामांसाठी केवळ एक हत्तीण आणली होती. नंतर एक हत्ती आणण्यात आला. त्यांची वंशावळ वाढत गेली आणि हा हत्ती कॅम्प अस्तित्वात आला. या कॅम्पमध्ये आतापर्यंत मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य, रूपा हे ८ हत्ती होते. महिनाभरापूर्वी जन्मलेल्या ‘सई’मुळे येथील हत्तींची संख्या आता ९ वर पोहोचली आहे. पूर्वी या हत्तींकडून जंगलातील लाकडं वाहण्याचे काम करून घेतले जात होते. आता हे काम बरेच कमी झाले आहे. पण या हत्तींना पाहण्यासाठी सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र वाढत आहे.
येथील हत्तींना आपल्या हातांनी चारा भरवण्यापासून तर त्यांच्यासोबत फोटो काढण्यापर्यंतचा मनमुराद आनंद पर्यटक लुटतात. मात्र या ठिकाणी लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी सध्यातरी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. त्या सुविधा निर्माण करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जिल्हास्तरिय पर्यटन समितीने कमलापूरच्या हत्ती कॅम्पला पर्यटनस्थळाच्या रूपात विकसित करण्यासाठी तिथे दिड कोटी रुपये खर्चून पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतू त्यासाठी प्रत्यक्ष नियोजन अजून झालेले नाही.
अहेरी तालुक्यात येणारे हे ठिकाणी अहेरीपासून ४५ किलोमीटर, आलापल्लीवरून ४० किलोमीटर तर गडचिरोली आणि चंद्रपूरवरून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी सध्यातरी स्वत:चे किंवा खासगी भाड्याचे वाहन हाच पर्याय आहे.
नक्षलवादाने होरपळलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील या हत्ती कॅम्पला पर्यटनस्थळाच्या रुपात कधी पाहिल्याच गेले नाही. पण नागरिकांचे आकर्षण आणि उत्सुकता पाहता हे ठिकाण चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते. या ठिकाणी विविध सोयीसुविधा देऊन योग्य विकास केल्यास पर्यटकांचा ओढा वाढून या भागातील नागरिकांना थोडाफार रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो. जिल्हा प्रशासन, वनविभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मनावर घेतले तर या ठिकाणी बरेच काही करणे शक्य आहे.
देशातील ११५ ‘आकांक्षित’ जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. या जिल्ह्याच्या विकासाकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मनावर घेतले तर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास निधीतूनही कमलापूरच्या विकासासाठी निधी मिळू शकतो. राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या जिल्ह्याला पर्यटनाच्या नजरेतून पाहून पर्यटकांसाठी सुविधा आणि योग्य मार्केटिंगची गरज आहे. हे केल्यास या जिल्ह्याच्या नावासमोर लागलेला ‘नक्षलग्रस्त’ हा ठप्पा पुसल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे आहे.
मनोज ताजने


Web Title: Kamalapur Elephant Camp
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.