अंबाडी पुराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:04 AM2019-05-26T06:04:00+5:302019-05-26T06:05:08+5:30

अमेरिकेहून पुण्यात आल्यावर,  आईने विचारलं होतं, ‘काय खावंसं वाटतंय?’ डोहाळे वगैरे काहीही नव्हते;  पण बिनधास्त ठोकून दिलं,  ‘अंबाडीची भाजी-भाकरी खावीशी वाटतेय!’ तेव्हा बोलून गेले आणि मग  अंबाडीचा आणि माझा  एक छान प्रवास सुरू झाला. 

Journey of vegitable Ambadi from India to America, an interesting experience shared by Amruta Hardikar | अंबाडी पुराण!

अंबाडी पुराण!

Next
ठळक मुद्देकाळ बदलला, तसे देशांतराचे संदर्भ आणि कहाण्याही बदलत गेल्या. जिथे जन्मलो-शिकलो-वाढलो ती भूमी सोडून माणसे परदेशी मातीत आपली मुळे रुजवतात; तेव्हा नेमके काय बदलते? - त्या अनुभवांचा हा कोलाज.

- अमृता हर्डीकर2014 सालच्या ऑक्टोबरमध्ये, सात महिन्यांची प्रेग्नंट असताना अमेरिका ते पुणे प्रवास करून आल्यावर, आईने विचारलं होतं, ‘काय खावंसं वाटतंय?’ डोहाळे वगैरे काहीही नव्हते. भाकरी खावीशी वाटायची. पालक, मेथी. यासारख्या स्टॅण्डर्ड पालेभाज्या खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे बिनधास्त ठोकून दिलं, ‘अंबाडीची भाजी-भाकरी खावीशी वाटते आहे!’
तसं पहायचं झालं तर त्यावेळेला पुणं सुटून पाच-सहा वर्षं झाली होती आणि त्या पाच-सहा वर्षात, भारतवारी दरवर्षी घडली असली तरी अंबाडीची आसबिस मनाला लागली नव्हती. आई खूपच छान अंबाडीची भाजी करते; पण डोहाळे पुरवण्यासाठी चौकशी करेपर्यंत, मनातल्या यादीत अंबाडीचा सहभाग नव्हता. पण तेव्हा बोलून गेले आणि मग अंबाडीचा आणि माझा एक छान प्रवास सुरू झाला. अर्थातच त्या माझ्या तीन आठवड्याच्या सुटीत अंबाडी काही मिळाली नाही. चंदनबटवा, केळफुल अगदी कोकणातून फणस येऊन त्याची भाजी माझ्या पोटात गेली; पण दोन्ही आय्यांना बाजारात अंबाडी मिळाली नाही..
2015 मध्ये आठ महिन्याच्या मुलीला घेऊन पुण्यात आले आणि वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनली माझ्या ताटात डाळ-तांदूळकण्या-दाणे-मेथीचे दाणे घातलेली आणि वरून चुरचुरीत लसणाची आणि लाल मिरचीची फोडणी घातलेली, जिभेला अमृताचा प्रत्यय देणारी अंबाडीची भाजी आणि लोण्याच्या गोळ्याने सजवलेली ज्वारीची भाकरी पडली. पहिला घास घेतल्यावर, कढईत नक्की किती भाजी आहे हे पाहत असताना दाराची बेल वाजली. इराला आणि मला भेटायला माझे कॉलेजमधले मित्रमैत्रिणी दारात उभे. दारातच कळलं अंबाडीचे अनेक वाटे पडलेत. त्यानंतरच्या पुण्यातल्या खाद्य दौर्‍यात अंबाडीचा योग परत आला नाही.
2016 मध्ये भारतात येणं झालं नाही. मे-जूनमध्ये कळलं की यंदा भारतवारी नाही, मग अचानकसा एक विरह जाणवायला लागला आणि चक्क सिनेमात किंवा नाटकात प्लॉट पॉइंट असतो ना तसाच, बर्कलीमधल्या एका भारतीय मैत्रिणीने डब्ब्यात अंबाडीची भाजी आणून दिली. मनात विचार आला की सलाड, टोमॅटो, भोपळा, मटार, पालक, मेथीच्या जोडीला बागेत एक अंबाडीचं रोप लावावं. मग गूगलवर शोध. आणि आजच्या जगात माझ्यासारखी वेंधळी मीच असणार. अंबाडी म्हणजे रोजेल; पण मी आणले सोरेल. रोजेल - सोरेल.. गंगारानी-जमनारानी. मिसटेकन आयडेण्टिटी..
पण गम्मत इथेच संपली असती तर पुराण ते काय? अतिशय देखण्या लाल रेषा असणारं, हिरव्या पानाची दोन रोपं माझ्या हाफ वाइन बॅरलमध्ये जोमाने वाढायला लागली. त्याची कोवळी पानं आंबट जास्त, ती म्हणे फ्रेंच आणि व्हिएतनामिज लोकं सूप, स्टू करायला वापरतात असं रोपाच्या माहितीपत्रावर लिहिलेलं वाचलं होतं. अंबाडीचे आंतरराष्ट्रीय स्थान पाहून खूप भारी वाटलं. (डोक्यात हेच ते अंबाडीच अमेरिकन भावंडं म्हणून मी स्वीकारलेलं.) मग आल्या गेल्या सगळ्यांना अंगणातली ही दोन रोपटी मी न चुकवता दाखवायचे. पहिली भाजी करताना सगळी कोवळी पानं तोडताना जिवावर आलं; पण रोपं अजून जोमाने वाढली. मग आमच्या मराठी मित्र-मैत्रिणींच्या पार्टी, जेवणांना मी मुद्दाम अंबाडीची भाजी करून न्यायला लागले. इतकी की कुणाला वाटावं मला इतर कुठली भाजी येत नाही. (ही अतिशयोक्ती आहे हे समजून घ्यावे!) एकदा तर माझी उस्मानाबादची मैत्रीण बोस्टनला तिच्या भावाला भेटायला येणार हे कळल्यावर मी विमानातून पिशवीभर घरची अंबाडी घेऊन गेले. त्या पिशवीचे 100 ग्राम सोन्यापेक्षा जास्त अदबीने स्वागत झाले. मी माझी अमेरिकेतल्या अंगणातली अंबाडी मिरवत राहिले. साधारण वर्षभराने लक्षात आलं की, मोठी किंवा जुनं पानं तितकीशी आंबट नाहीत. भाजीत चक्क चिंच घालावी लागली दोनदा. तरीही माझे डोळे उघडले नाहीत.
अखेर साक्षात्काराची घडी आली. मोठय़ा बहिणीच्या घरी जाऊन तिला गरम स्वयंपाक करून वाढायचे ठरवले होते. बरोबर कुठली भाजी? अर्थात अंबाडी. पण  अंबाडीची  पानं हं.) गप्पा मारत सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करायचा, असं ठरलेलं. क्लायमॅक्स जरा अँण्टी क्लायमॅटिक होता. भाजी झाल्यावर त्यात घालायला चिंच मागितल्यावर ताईने मला वेड्यात काढणारा कटाक्ष टाकला. मग नव्याने गूगल रिसर्च झाला. गंगारानी, जमनारानी समोरासमोर उभ्या ठाकल्या विकिपीडियाच्या पानांवर. सोरेल आणि त्यात रेड रिबन सोरेल म्हणजे सध्याचे नवीन ग्रीन सुपरफूड, व्हिटॅमिन ए, सी  आणि पोटॅशिअम भरपूर, शिवाय दिसायला देखणे (मी या कशासाठीच ते आणलं नव्हतं; पण ते माझ्या पदरात आपसूक पडलं होतं). नवीन पालेभाजी पानात करून वाढल्याबद्दल माझं कौतुक झालं. पण माझा किती मोठा पोपट झालाय हे मला कळत होतंच की !
जिभेच्या कक्षा अजून रु ंद करायला मग मी स्विस चार्ड आणि डँडेलीअन या दोन अजिबात आंबट नसणार्‍या पालेभाज्यांची अंबाडीची भाजीसारखी म्हणजे डाळ-तांदूळ कण्या-मेथीचे दाणे- शेंगदाणे घालून भाजी केली, वरून चमचा दीड चमचा चिंचेचा कोळ, लसूण-लाल मिरचीची फोडणी.
या दोन-अडीच वर्ष घडत असणार्‍या अंबाडी पुराणात मला माझ्या परदेशातल्या वास्तव्याबद्दल खूप महत्त्वाची शिकवण मिळाली. स्वत:चा प्रांत किंवा देश सोडून गेल्यावर, जशी आपल्या घरची, मित्रमैत्रिणींची कमी जाणवत राहते, एक पोकळी निर्माण होते; ती पोकळी नवीन देशातल्या माणसांनी भरता येत नाही. पण आपल्याच आत एक नवीन अवकाश निर्माण होतं नवीन लोकांना सामावून घ्यायला. ज्या खाद्यसंस्कृतीवर आपला पिंड पोसलेला असतो, माहेर-सासरची समृद्ध खाद्यसंस्कृती जिभेवर तरंगळत असते, ती पोकळी नवीन खाद्यसंस्कृतीने भरून काढणं अशक्य आहे. एक नवीन अन्नपूर्णा पुजायला लागते, आजी-आईकडे शिकलेल्या क्लृप्त्या स्वत:च्या अनुभवांवर, नवीन प्रांतातल्या देणग्या, नवीन खाद्यसंस्कृती अभ्यासून, पारखून, त्यातूनच एका नवीन सुगरणीचा जन्म होत असतो. या शोधाच्या मार्गावर निघाल्यावर, तिथेच कुठेतरी फ्यूजनचा जन्म होतो का?
2 ऑगस्ट 2018ला मुंबईत पोहचले. मैत्रिणीला आठवडाआधी खरी अंबाडी आणून ठेवायला सांगितली होती. तिचा सहा महिन्याचा मुलगा, माझी साडेतीन वर्षाची मुलगी, जेटलॅग, रात्रभर गप्पा; धुवून निवडून ठेवलेली अंबाडी असूनसुद्धा आम्ही रडेपणा करून भाजी करणार नव्हतो. पण मग राहवलं नाही. खोचायला पदर नव्हते; पण तरीही कामाला लागलो. शिळा भात, गूळ घालून सारखं केलेलं वरण, मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले शेंगदाणे आणि मेथीचे दाणे. कांदा परतत असताना चिरलेली अंबाडी. आई जेवायला बसल्यावर रडायला लागलेलं आमचं सहा महिन्याचं तान्हुलं.. मला वाटलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं, माझ्यासाठी.
अंबाडीच्या शोधात सोरेल, चार्ड, डँडेलीअनची भर आमच्या खाद्यविश्वात पडली.. ती शिकण्याची सुरुवात आहे, अजून शिकलेलं बरंच काही पुन्हा कधीतरी..
(लेखिका अमेरिकास्थित रहिवासी आहेत.)

amrutahardikar@gmail.com

Web Title: Journey of vegitable Ambadi from India to America, an interesting experience shared by Amruta Hardikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.