Jezuri | जेजुरी

- चंद्रमोहन कुलकर्णी

मला हा फोटोग्राफर माहिती नव्हता आणि मी त्याचं कामही पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत. माझ्या मनात काही प्रतिमाच नव्हती फोटोग्राफरची आणि त्याच्या विचारसरणीबद्दल काहीच माहिती नव्हतं मला. अचानकच हा फोटो मी जेव्हा पाहतो तेव्हा कोणताच दृष्टिकोन नसतो माझ्या मनात. समोर असतो तो माझ्या आयपॅडवर उतरलेला हा जेजुरीचा फोटो. विकिमीडियाबद्दलही मी तासाभरापूर्वीच ऐकलं. विकिपीडियाचं भावंडं, म्हणजे लाइटली घेऊन चालणार नाही हे मात्र नक्कीच वाटलेलं. मुद्दा असा, की फोटो फक्त, निव्वळ फोटो आहे.
पूर्वीचं काही घेऊन न आलेला फोटो आहे, पूर्वग्रहाला चान्स नाही. आवाज आणि उजेड यांचं मिश्रण असलेला तऱ्हेवाईक फोटो आहे हा. तऱ्हेवाईक अशासाठी म्हणायचं, की निरनिराळ्या
तऱ्हा आहेत ह्या फोटोत.
आवाज आहे. कोलाहल आहे. गलका आहे. कुजबूज आहे. आरोळ्या आहेत. पाहिल्या पाहिल्या जाणवणारी सळसळ आहे.

आपण गर्दीत आहोत.. आपल्या मागून कुणी बोलतंय, आपल्या शेजारनं, पुढनं, कडेनं कुणी बोलतंय..

आवाजात मिसळलाय उजेड. तऱ्हेवाईक उजेड. लांबवरचा, वरचा स्वच्छ उजेड. उजेड फाटलाय. दगडावरच्या बटबटीत ऑइलपेंटनं रंगवलेल्या लालगुलाबीनिळ्यापिवळ्या नक्षीकामावर फाटलाय. बटबटीत काम सुंदर, उजळून दिसावं इतपत फाटलाय!

तऱ्हेवाईक सुंदर फाटका उजेड. फाटक्या उजेडाचं रिफ्लेक्शनसंपूर्ण आसमंतात.
तऱ्हेवाईक रिफ्लेक्शन. बटबटीत रंगसंगती झाकणारं रिफ्लेक्शन.

इनडायरेक्ट उजेडाची तऱ्हा, तऱ्हेवाईक इनडायरेक्ट उजेड . टोप्या टोप्या मुंडाशी मुंडाशी फेटे फेटे उजेड उजेड उजेड. उजेड उजेड उजेड. पिवळा उजेड. उजेडाची पिवळी तऱ्हा. मला गंमत वाटली ती पिवळ्या पिवळ्या पिवळ्या पिवळ्या टिंबांमधनं मधूनच उजळलेल्या शुभ्र पांढऱ्या टिंबांची.

मधूनच झळकणारे भगवे ठिपके आणि सावलीतले दोनतीन मोठे हिरवे तुकडे.
 कमानीखालच्या टिंबांची ओळ आणि दीपमाळेवरचे वरती जात जात
पातळ रेघा रेघा होत जाणारे
चौकोन चौकोन चौकोन चौकोन.
ठिपक्यातल्या चौकोनातल्या रेघांमधल्या
टिंबामधल्या उजेडाची तऱ्हा.

ही इकडची डावी बाजू.
उधळलेल्या भंडाऱ्याचा स्पर्श आहे इथं, पिवळा गंध आसमंतात इथं. पांघरलेल्या, पहनलेल्या वस्त्रांचे भगवे पिवळे तुकडे इथं ह्या डाव्या कोपºयात वरपासून खालपर्यंत पिवळ्या उजेडाची तºहा.

महाराष्ट्राच्या त्वचेचा काळा रंग इथं, खंडोबाची सावली सावली इथं खंडोबाचा उजेड इथल्या तुकड्यातुकड्यांवर खंडोबाचा भक्त फेकतो भंडारा मूठभर नि फेकतो दु:ख खंडोबाकडे.

सुख मागतो खंडोबाचा भक्त चिमूटभर सुख मागतो चिमूटभर खंडोबाकडे...


(‘विकिमीडिया’ हे ‘विकिपीडिया’चं जगप्रसिद्ध भावंडं! ‘विकिमीडिया’तर्फे दरवर्षी जगभरातल्या छायाचित्रकारांसाठी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते. यावर्षीच्या स्पर्धेसाठीचा
विषय होता ‘विकि लव्हज मॉन्यूमेन्ट्स’! एकूण बावन्न देशांमधून काही लाखांवर छायाचित्रं या स्पर्धेसाठी पाठवली गेली, त्यात एकट्या भारतातूनच ७,७०० प्रवेशिका आल्या होत्या.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा सन्मान मिळाला तो सोमवती अमावास्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबा यात्रेच्या या अलौकिक क्षण-चित्राला! ‘लोकमत वृत्तपत्रसमूहा’च्या नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी ‘पाहिलेल्या’ या जेजुरीने त्यांच्या कामाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे...)