‘दारूचा पेट्रोलपंप’ बंद झाला, त्याची कहाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:01 AM2019-03-24T06:01:00+5:302019-03-24T06:05:01+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील काकडयेली गाव. काही वर्षांपूर्वी तिथे दारू पाण्यासारखी वाहात होती. गाव पुरतं बदनाम झालं होतं. याच गावात आज दारूचा थेंबही विकला जात नाही. कुणी लपून जरी विकताना दिसला तर त्याला गावजेवण द्यावं लागतं! कसं घडलं हे?..

How liqueur flood is stopped in the village of Kakadyeli | ‘दारूचा पेट्रोलपंप’ बंद झाला, त्याची कहाणी..

‘दारूचा पेट्रोलपंप’ बंद झाला, त्याची कहाणी..

Next
ठळक मुद्देआपल्या गावाची समस्या सोडवायला कुणीही बाहेरचं येणार नाही. येईल तरी तात्पुरतं. समस्या आपली, त्रास आपला म्हटल्यावर ती दुसरं कुणी कशाला सोडवेल. आपल्यालाच ती सोडवावी लागेल हे या गावांना आणि येथील जिवंत माणसांना कळून चुकलं आहे. दारूचा पेट्रोलपंप बंद झाला आहे..

- पराग मगर
वर्षभरापूर्वीची गोष्ट असावी. १८ वर्ष पूर्ण झालेले काही महाविद्यालयीन युवक एक दिवस मतदान ओळखपत्र काढण्याबाबत विचारणा करण्यासाठी गडचिरोली तहसील कार्यालयात गेले. युवकांनी आपल्या गावाची नावे सांगितली; पण त्यातल्या एकाने गावाचं नाव काकडयेली न सांगता ‘मी दूधमळा गावचा’, असं सांगितलं. सगळे मित्र त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाले, ‘अरे, तू काकडयेलीला राहातो ना’! काकडयेली नाव ऐकताच तो शासकीय कर्मचारीही उत्तरला, आज आणली की नाही दारू विकायला? तो मुलगा निरु त्तर होऊन संतापाने बाहेर पडला....
रात्रीला धानोऱ्याचा बाजार करून काकडयेली येथील काही स्त्रिया गावाकडे येण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. बस आली. कंडक्टरने तिकीट विचारल्यावर बायांनी गावाचं नाव सांगितलं, ‘काकडयेली’. कंडक्टर म्हणाला, तुम्ही दुसऱ्या वाहनाने या. रात्री त्या गावी गाडी थांबवणं नकोच. बिचाºया स्त्रिया शरमेनं तोंड लपवून तशाच उभ्या राहिल्या. असे एक ना अनेक किस्से काकडयेली गावाशी जुळले आहेत. त्याला कारणही तसंच होतं..
गाव दारूच्या महासागरात बुडालं होतं. अगदी आता आता २०१८ च्या आॅगस्ट महिन्यापर्यंत. आपल्याच गावाची इज्जत अशी इतरांसमोर सांगताना गावचे पोलीसपाटील घनश्याम उसेंडी काहीसे खजील झाले होते. ९० घराचं पूर्ण गोंड आदिवासी समाजाचं वास्तव्य असलेलं काकडयेली हे गडचिरोली-धानोरा हायवेवर असलेलं छोटंसं गाव. आज गावात नीरव शांतता आहे, बाहेरच्या माणसाला ठळकपणे जाणवावी अशी. रस्त्याला लागून काही घरे आहेत; पण मुख्य गाव जवळपास अर्धा किमी आत विखुरलेलं. वर मातकट रंगाने तर खालचा भाग पिवळ्या मातीने रंगवलेली कौलारू घरे. गावात फिरताना आपण ऐकलेले किस्से या गावाचे नसावे असंच वाटत होतं. कारण काही महिन्यांपूर्वी ‘दारूचा पेट्रोलपंप’ अशी ओळख असलेल्या या गावात आज दारूचा थेंबही विकला जात नाही. कुणी लपून जरी विकताना दिसलाच तर गावाला बकºयाचं जेवण द्यावं लागतं.
गावाचा चरित्रपट उलगडताना घनश्याम उसेंडी सांगतात, मी लहान असताना गावात एवढी दारू नव्हती. गाव गोंड समाजाचं. देवपूजेला मोहाच्या दारूचा मान. पण तीदेखील काही ठरावीक घरीच काढून हवी त्यालाच दिली जायची. बाकी पूर्ण वेळ लोक कोरडवाहू धानाची शेती करायचे. बाकी गरजा जंगलातून पूर्ण व्हायच्या.
गडचिरोली-धानोरा हा रस्ताही तेव्हा एवढा मोठा नव्हता; पण १० ते १५ वर्षांपूर्वी रस्ता मोठा झाला तशी दोन्ही तालुक्यांकडे जाणारी वर्दळ वाढली. धानोरा तालुक्याच्या गावातून, नोकरदार वर्गातून दारूची मागणी व्हायला लागली. मागणी वाढली म्हणून गाळण्याचं प्रमाणही वाढलं. पैसा दिसायला लागला तसा एक एक म्हणता घराघरात दारू गाळली जाऊ लागली. गाव महामार्गाला लागूनच असल्याने तालुक्याला जाताना दारू पिणे सोयीचं होऊ लागलं. गावात रोज शेकडो लोकांचा रतीब घरोघरी असायचा. भांडणं वाढायला लागली.
१९८८ साल उजाडलं. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यासाठी लोकचळवळ सुरू झाली. यातूनच १९९३ पासून राज्य शासनाने जिल्ह्यात दारूबंदी लागू केली; पण याचा गावावर फारसा फरक पडला नाही. कधीकाळी एखादी कारवाई व्हायची. कुणी तक्र ार करायला गेल्यावर, ‘आम्हाला तेवढीच कामं नाही. तालुका नक्षलग्रस्त आहे. आम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागतं’ - अशी उत्तरं मिळायची. वर्षं जात होती. गाव दारूच्या महापुरात आणखी खोल बुडत होतं. तालुक्याला, इतर गावांना दारू पुरवत होतं. लोकांची दारूची भूक भागत होती. प्रश्न सुटत नव्हता. आरोग्याच्या अनेक समस्या तोंड वर काढत होत्या. काकडयेलीसारखी अनेक गावे निर्माण होऊ लागली होती. या लढ्यत लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे होते. गावच स्वत:ची दारूविक्र ी बंद करू शकतं हे ओळखून डॉ. अभय बंग यांनी राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात मुक्तिपथ हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. व्यसनमुक्तीचे वारे वाहू लागले. मुक्तिपथची धानोरा तालुक्यातील चमू गावांना वारंवार भेटी देऊन दारूविक्र ी बंद करण्याचा प्रयत्न करीत होते. घनश्याम उसेंडी यांनी मुक्तिपथच्या सहकार्याने गावात दारूविक्र ी बंद करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले; पण यश येत नव्हतं. दारूचा महापूर कायम होता.
२०१८ मध्येच एक दिवस ‘काकडयेली : दारूचा पेट्रोलपंप’ या मथळ्याखाली बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. सर्वत्र चर्चेचा विषय झाला. गावातून कामानिमित्त बसने शहरात जाणाºया महिला-युवतींकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जायला लागलं. मुलांवर दारूची डिलिव्हरी करणारे एजंट असा शिक्का बसत होता.
घनश्याम उसेंडी यांना हे सहन होत नव्हतं. त्यांनी महिला, युवती आणि काही सुजाण नागरिकांसोबत सातत्याने चर्चा सुरू केली. यातून मुक्तिपथ गावसंघटन स्थापन झालं. नियमित बैठका होऊ लागल्या; पण दारूविक्र ी बंद होत नव्हती. विक्रेते मुदत मागायचे. आॅगस्ट २०१८ मध्ये पोलीस आणि मुक्तिपथ चमूच्या उपस्थितीत मोठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. गावातील दारूविक्र ी पूर्ण बंद करायची अशी भूमिका महिलांनी व गावसंघटनेने घेतली. पण दारूविक्रे ते तयार होईना. आम्हाला दोन एकर जमीन द्या मग आम्ही दारू गाळणे बंद करू असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला. त्यावर गाव संघटना म्हणाली, ‘ठीक आहे, पण इतकी वर्षं दारू विकून जमवलेला पैसा ग्रामसभेत जमा करा’ विक्रे ते गप्प झाले. दारूविक्र ी बंदीसाठी तंटामुक्ती संघटना तयार करायची असा ठराव झाला; पण कुणीच पुढाकार घेत नव्हतं. तासभर हा प्रकार चालला. दिवस कलत चालला होता. काही वेळाने अचानक एक युवक उठला आणि म्हणाला माझं नाव लिहा, मी होतो अध्यक्ष. हा युवक म्हणजे नरेश मडावी. ३० च्या आसपास वय. सर्वात जास्त दारू गाळणारा अशी त्याची ख्याती होती. त्यामुळे सगळेच अवाक् झाले. तो अध्यक्ष तर झालाच पण विक्रेत्यांना एकही दिवसाची मुदत मिळणार नसल्याची भूमिका त्याने घेतली. दुसºयाच दिवशी गाव संघटनेने गावातील ९० घरांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली. दारू न विकण्याची विनंतीवजा सूचना केली. विकताना आढळल्यास ५ हजार रुपये आणि गावाला बकºयाचे जेवण असा दंड ठोठावला.
दारूविक्र ी बंद होण्यात नरेश मडावीचा मोठा वाटा होता. तो सांगतो, दहावी नापास झालो. काही वर्षं शेतातली कामं केली. एकदा गावातच एका घरी दारू गाळताना पाहिलं. खूप कठीण नव्हतं. पैशाची तंगी होतीच. सहज म्हणून गाळून पाहिली. भट्टी जमली आणि विकणं सुरू केलं. सगळेच जण करायचे. म्हटलं आपण केलं तर काय बिघडतं; पण कधी पिली नाही. बापाने सुरुवातीला विरोध केला, पण पैसा यायला लागला तसा त्याचाही विरोध मावळला. लग्न झालं, दोन मुली झाल्या. याच दसºयाची गोष्ट. तेरा-चौदा वर्षांची चार मुलं घरी एकदा प्यायला आली. फार बेकार वाटलं तेव्हा. घरी भांड्यांमध्ये दारू भरून असायची. एखाद्या वेळी मुलीने पिली तर काय करायचं हा विचार मनात यायचा. पोलीसपाटील घनश्यामभाऊ समजावयाचे. म्हणून ग्रामसभेत डोक्यात तिडीक गेली आणि दारूबंदीच्या या लढ्यात सहभागी झालो.
दारूचा पैसा जसा यायचा तसा जायचा हे त्याने अनुभवलं होतंच. दारू गाळण्यासाठी उपयोगात येणारा जर्मलचा मोठा हंडा आजही त्याच्या अंगणात आहे; पण त्यावर आता केवळ अंघोळीचं पाणी गरम होतं. गावातील महिला समाधान व्यक्त करताना एकच वाक्य बोलतात, दिवाळी यंदा सुखात आणि शांततेत गेली... होळीही तशीच जावी....
गडचिरोली जिल्ह्यातील काकडयेली गावातील संघटनेने मिळून दारूविक्र ी बंद केल्याची ही प्रातिनिधिक कथा. अशा अनेक कथा येथील गावांमध्ये दडल्या आहेत. आपल्या गावाची समस्या सोडवायला कुणीही बाहेरचं येणार नाही. येईल तरी तात्पुरतं. समस्या आपली, त्रास आपला म्हटल्यावर ती दुसरं कुणी कशाला सोडवेल. आपल्यालाच ती सोडवावी लागेल हे या गावांना आणि येथील जिवंत माणसांना कळून चुकलं आहे. दारूचा पेट्रोलपंप बंद झाला आहे..

अशी बंद झाली दारू!..
दारू गाळणे, विकणे आणि दंगा करून लोळत पडणे हा गावातील माणसांचा शिरस्ता बºयाच वर्षांपासून झाला होता. शेतीची, बाहेरची सर्व कामे महिलांच करायच्या. वरून मारझोड, भांडणे नित्याची. त्यामुळे दारूविक्र ी बंदीच्या मोहिमेत महिला उत्स्फूर्त; पण तितक्याच उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. रोज सकाळी ७ ते १० आणि रात्री ८ ते ११ या वेळात ४० ते ५० महिला, त्यांच्या मागे २० ते ३० पुरु ष व युवक असा जत्था गावभर, गावाच्या सभोवताल फिरायचा. महिलांच्या भीतीने घरी दारू गाळणं बंद केल्यावर विक्रेत्यांनी शेतात, जंगलात, कठाणी नदीच्या परिसरात दारू गाळणे सुरू केले. या सर्व जागा हुडकून त्या नष्ट करण्याचा सपाटा संघटनेने सुरू केला. प्रत्येक घरून एक जण तरी सहभागी झालच पाहिजे अन्यथा दंड भरा, असा नियमही गाव संघटनेने सुरू केला. दारू गळण्याच्या जागा बदलत गेल्या आणि महिला त्या शोधून नष्ट करीत गेल्या. दारू मिळतच नाही म्हटल्यावर पिणंही कमी झालं. बाहेरून येणाºया लोकांचे लोंढे थांबले. हे सर्व गावानं पाच महिन्यात केलं. सोबत नियम मोडणाºयाकडून यथेच्छ बोकडाचं जेवणही गावाने अनेकदा खाल्लं.
(लेखक ‘सर्च’ या संस्थेत जनसंपर्क अधिकारी आहेत.)

parag_magar@searchforhealth.ngo

 

Web Title: How liqueur flood is stopped in the village of Kakadyeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.