नैराश्याशी दोन हात कसे कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:00 AM2018-07-08T03:00:00+5:302018-07-08T03:00:00+5:30

‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ची अंमलबजावणी कालपासून देशात सुरू झाली आहे.आजवर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतून अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मानसोपचारांसाठी पुरेशी आणि सक्षम व्यवस्था उभी राहण्याला केवळ कायदा पुरेसा नाही हे खरे ! - पण सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने मानसिक आरोग्यातल्या एका तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या विषयाची सोपी मांडणी

How to deal with depression? | नैराश्याशी दोन हात कसे कराल?

नैराश्याशी दोन हात कसे कराल?

Next

-डॉ. राजेंद्र बर्वे 

‘...आणि हो, एक महत्त्वाचं विचारायलाच हवं. आम्ही कसं वागायचं? आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहे बुवा यांना डिप्रेशनचा त्रास ! ट्रिटमेंटला नाइलाजच आहे. पण आम्ही काय बोलू त्यांच्याशी? म्हणजे त्यांचा त्रास कमी होईल...?’
- बहुतेकवेळा डिप्रेशनग्रस्त रुग्णाचं निदान झाल्यावर त्याचे/तिचे नातेवाईक हे प्रश्न विचारतात. कधी फोनवर तर कधी अगदी मुद्दाम वेळ ठरवून चर्चा करण्यासाठी येतात.
प्रश्न साधे असले तरी त्यांना अनेक पदर असतात. एक तर नैराश्य/औदासीन्य हा मनोविकार म्हणून स्वीकारण्याची अजून तयारी झालेली नसते. ते वास्तव नाइलाजानं पत्करलेलं असतं. रोगनिदान झाल्यावर ‘खरं तर सगळं व्यवस्थित आहे. कशाबद्दल निराश वाटावं? तसं काही घडलेलंच नाही...’ - अशा विधानवजा शंका उपस्थित होतात. यातूनच ‘नैराश्य केवळ एखाद्या दुर्दैवी घटनेला प्रतिसाद म्हणून उद्भवतं, असा सर्वसाधारण (अप) समज व्यक्त होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला निराश, उदास (डिप्रेशन) वाटत असेल तर त्यामागे भक्कम कारण असलं पाहिजे आणि ते दूर केलं किंवा स्वीकारलं तर ते (नैराश्य) आपोआप नाहीसं होईल, असं त्रैराशिकही मांडलेलं दिसतं.

वास्तवात असं ‘प्रतिक्रियात्मक नैराश्य’ असतंच असं नाही. काहीही कारण घडलेलं नसताना मेंदूतील जीवरासायनिक बदलामुळे (बायोकेमिकल, एण्डोजिनस) हा मनोविकार उद्भवतो आणि त्याचं स्वरूप’ गंभीर असतं. त्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक असतं इतकंच नाही तर, आत्महत्येसारख्या घटना घडण्याची शक्यताही दाट बनलेली असते.
‘आम्ही कसं वागू? या प्रश्नात आपल्या विशिष्ट त्रासदायक वागण्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला या नैराश्याने ग्रासलं असावं, असं कुटुंबीयांना वाटतं. आता त्या व्यक्तीशी अधिक प्रेमाने, काळजीने वागलं, की विकारामुक्त होणं सहज शक्य आहे, अशी समजूत बरोबरीने येतेच. आजकालच्या दूरचित्र मालिका, काही चित्रपट यामधून ‘प्रेम’ हाच डिप्रेशनवरचा खराखुरा उपाय आहे, अशा कहाण्या रंगवण्याची टूम आली आहे. त्यांना अल्प प्रमाणात करमणूक मूल्य असलं तरी अशा कहाण्यांनी पेरलेल्या विचारांचा उपद्रव अधिक होतो. एकतर त्या कथा-कहाण्या-कवितांमधून रुग्णाशी मधुर शब्दात संभाषण केलं आणि प्रेमाची पखरण केली तर ते दहा बारा किंवा सोईप्रमाणे कमी जास्त एप्रिसोडमध्ये धडधाकट होतात, असं दाखवतात.
वास्तव, मात्र यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं असतं.

 

साधारणपणे भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांमधले परस्पर नातेसंबंध अधिकच जटिल असतात.नात्यांची वीण कधीकधी नको इतकी घट्ट असते. घरगुती नातेसंबंधामध्ये ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थच मुळी (भयंकर) काळजी करणे असा घेतलेला असतो. अमुक व्यक्ती माझ्यावर प्रेम करते म्हणजे माझी फार काळजी करते. काळजाचं पाणी होतं, अश्रूंच्या धारा लागतात असा अर्थ निघतो.
इंग्रजीमध्ये आपण सहज ‘टेक केअर’ असं म्हणतो तेव्हा केअरचा अर्थ काळजी घे, किंवा मी तुझी काळजी करतो/ते असा होत नसून, तू स्वत:ची फिकीर ठेव, अवधान बाळग, तुझ्या हिताचे विचार मनात आण, मी तुला त्यासाठी साथ करणार आहे असं आपण सूचित करतो.आपल्या कुटुंबातले नातेसंबंध
प्रेमाचे असतात हे खरंच; पण प्रेमामध्ये आपली गुंतवणूक फार असते.आपण आधार देण्यासाठी हात धरण्याऐवजी नखं रोवून दुस-या व्यक्तीला पकडून ठेवतो. ‘आम्ही काय करू?’ - या प्रश्नाला सोपी उत्तरं नाहीत ती म्हणूनच! रुग्णाची मानसिक स्थिती, मूळस्वभाव आणि कुटुंबाच्या नात्याचा पोत यावरूनच ती उत्तर देता येतात. तरीही, काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू.
अनेकदा, काय बोलू? यापेक्षा काय बोलू नये? हे महत्त्वाचं ठरतं. मनात उदास वाटत असताना, विफलतेचे कढ येत असताना अगदी एकटं एकटं वाटत असताना उबदार प्रेमाच्या आधाराची गरज असते. त्या आधारामुळे नैराश्य मावळत नसलं तरी औदासीन्याच्या वेदना हलक्या होतात. नैराश्याची लक्षणं सुसह्य होतात.
यासाठी, खरं पाहता जादूचे किंवा परवलीचे अंतिम शब्द नाहीत; पण हळुवारपणे घडलेला स्पर्श, पाठीवरून फिरवलेला हात खूप आश्वासक वाटतो. दु:खाच्या यातायातीत आपण एकटे नाही, हा विचार मनाला आधार देतो.त्यासाठी आधार देणा-या व्यक्तीमध्ये सहअनुकंपा असावी लागते. सहअनुकंपा म्हणजे एम्पथी. दुस-या व्यक्तीच्या भावना आणि विचार समजून घेणं, त्यांचा विनाअट स्वीकार करणं आणि योग्य शब्दात तो दुस-यापर्यंत पोहचवणं म्हणजे एम्पथी. ‘समजतंय मला तुला काय दु:ख वाटतंय ते, वाईट वाटण्याची तीव्रता ही समजते आहे. मी आहे तुझ्याबरोबर...’ - हे कधी कधी न बोलता आश्वासक स्पर्शानं करुणार्द्र नजरेनं सुचवता येतं.
... काही न बोलता त्या व्यक्तीबरोबर नुसतं बसून राहिलं तरी चालेल; पण आपली रडारड आणि अश्रूपात याला आवर घालावा.

डिप्रेशन हाताळताना काय कराल ?

1 स्पेस : आधार देणं म्हणजे सतत त्या व्यक्तीबरोबर असणं, असं नव्हे. अनेकदा आपला सहवास नैराश्यग्रस्त व्यक्तीला सहन होत नाही. म्हणून त्यांना त्यांचा अवकाश द्या. विशेषत: पुरुष रुग्णांना त्याची जास्त गरज भासते. 
2 दैनंदिन व्यवहार : नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये रोजच्या साधारण गोष्टीही उरकण्याची ऊर्जा नसते. अशावेळी ‘अंघोळ कर’, ‘कपडे बदल’ असं सारखं सुचवू नये. नैराश्यग्रस्त व्यक्ती संध्याकाळी अधिक अँक्टिव्ह होतात. त्यावेळी त्यांना रोजच्या गोष्टी करू द्याव्या.
3 भेटीगाठी : साधारणपणे गप्पागोष्टी करणं, लोकांमध्ये मिसळणं यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. त्यामुळे आपण ते नैराश्यग्रस्तांना पुन्हा पुन्हा सुचवत राहतो. नैराश्यग्रस्त व्यक्तींना याचं दडपण येतं. आपण इतरांसारखे थट्टाविनोद करीत गप्पा मारू शकत नाही, याचं वैषम्य वाटत असतं म्हणूनच ते इतरांना टाळतात. सुचवावं; पण मागे लागू नये.  
4 मन : नैराश्यग्रस्तता हा मनोविकार आहे. निराशेचं सोंग घेऊन सहानुभूती मिळवणारे लोक वेगळे असतात. नैराश्यग्रस्त व्यक्तींना आपण कमकुवत असल्याची लाज वाटते,  हा मनाचा कमकुवतपणा नसून विकार ग्रस्ततेचं लक्षण आहे हे स्पष्ट शब्दात; पण थोडक्यात सांगावं.
 5. ओझं : ‘माझं जगणं मला ओझं वाटतंय’ - असे विचार नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या मनात सतत असणं हा त्यांचा दोष नसतो. ताप आल्यावर अंगदुखी वाटते, तसं हे डिप्रेशनचं लक्षण असतं. अशावेळी  ‘आपल्या प्रेमाच्या माणसाचं ओझं वाटत नसतं. नैराश्याच्या वेदनेमुळे असे विचार येतात, जातील ते हळुहळु’, एवढंच म्हणावं.
6 नैराश्य : झटकून टाक ते नैराश्य ! - हे म्हणणं सोपं असतं. ते कळतं, पण वळत नसतं. रुग्णाला दोष न देता  ‘हळुहळु मावळेल नैराश्य’ असं म्हणावं. पुन्हा पुन्हा समजूत घालू नये. 
7. प्रयत्न : नैराश्यग्रस्त व्यक्तींना प्रयत्न करायचे असतात; पण करण्याची ऊर्जा नसते. त्यामुळे त्यांच्यापुढे अगदी सहजसाध्य उद्दिष्ट ठेवून ती पार करायला मदत करावी.
8. उपचार : नैराश्यग्रस्ततेमुळे अनेकदा, उपचारानं आपण बरे होऊ शकतो, यावर रुग्णांचा विश्वास नसतो. मग औषधोपचाराची टाळाटाळ होते. अशा वेळा प्रसन्नपणे हाताळाव्या. मोठमोठी लेक्चरं देऊ नये.
9. स्वीकार : ‘डिप्रेशन’ हा औषधोपचार, कुटुंबीयांचा आधार आणि नियमित मानसोपचारानं बरा होणारा विकार आहे.  डॉक्टरांच्या मदतीने उपचारांचा स्वीकार म्हणजे अर्धी लढई जिंकण्यासारखं असतं.

(लेखक ख्यातनाम मनोविकार तज्ज्ञ आहेत.)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: How to deal with depression?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.