निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:00 AM2018-08-19T03:00:00+5:302018-08-19T03:00:00+5:30

बेदाग निकल जाऊं ! ही फक्त कवितेची ओळ नव्हती. हीच अटलबिहारी वाजपेयींची इच्छा होती आणि झालंही तसंच!

how Atalaji wanted to die unblemished.. | निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.

निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.

Next

खरे तर मी लिहिण्या-वाचण्यात रमणारा साधा माणूस! माझे वडील उत्तम वक्ते होते. श्रेष्ठ वाणी म्हणतात ती त्यांना अवगत होती. श्रवणभक्ती घडली लहान वयात, ते संस्कार  माझ्याही नकळत पाझरत राहिले असतील, त्यांनी पुढे आयुष्यभर सोबत केली माझी. कविता खूप आधी आली माझ्या आयुष्यात वस्तीला. तिनेही सोबत सोडली नाही.
तरुण वयात दिल्लीत पत्रकारिता करायला म्हणून आलो, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी न भेटते तर पत्रकारितेतच रमलो असतो आयुष्यभर. लिहीत राहिलो असतो. वाचनाचं आत्यंतिक वेड होतं, ते घेऊन आपल्याच मस्तीत जगलो असतो. कवितेच्या हाका ऐकल्या असत्या. कदाचित - किंवा नक्कीच शिक्षक झालो असतो.

 पण आयुष्याच्या वाटांना खूप वळणं फुटत गेली. त्या त्या दिशांनी जात राहिलो.
दिल्लीत पत्रकारिता करत असताना जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन उभं राहिलं होतं. त्या भूमीत प्रवेश करण्यासाठी परवानगीची अट घातली गेली होती. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रवेशबंदी तोडून श्रीनगरमध्ये शिरले, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यांना अटक झाली आणि मी दिल्लीला परत आलो. निरोप घेताना ते मला म्हणाले होते, जा आणि दुनियेला सांग जाऊन सांग. सांगत राहा!

 पुढे श्रीनगरमध्ये नजरकैदेत असतानाच डॉ. मुखर्जी आजारी पडले आणि त्या अवस्थेत इस्पितळातच त्यांचा मृत्यू झाला.
मी मनातून हललो होतो त्या घटनेने. डॉ. मुखर्जींचे काम पुढे नेले पाहिजे, या एकाच प्रेरणेतून मी समाजकारणात आलो आणि ती वाट पुढे राजकारणाच्या युद्धभूमीवर घेऊन गेली.
..आणि इथवर पोहचलो.
पहिल्यांदा लोकसभेत पोहचलो, तेव्हा खुद्द पंडित नेहरुंशीच पहिला आमनासामना घडला होता. सांसदीय कामाची रीत शिकत होतो हळूहळू. त्याच दरम्यान लोकसभेच्या एका सत्रात दिल्लीमध्ये सरकारने ‘अशोक’ नावाचं हॉटेल बांधण्याविषयी चर्चा चालू होती. फायद्या-तोट्याची गणितं घातली जात होती. ते सगळं सहन न होऊन मी उठून उभा राहिलो आणि सभागृहाला म्हणालो, ‘सरकारचा हॉटेल बांधण्याशी काय संबंध? सरकारने हॉस्पिटल बांधले पाहिजे’.
पंडितजींनी चमकून माझ्याकडे पाहिलं आणि ते काहीसे चिडून म्हणाले, पहिल्यांदाच निवडून येतात आणि माहिती नसताना सभागृहात बोलतात हे लोक. सरकार हॉटेल बांधेल आणि त्यातून नफा कमवून त्या पैशातून हॉस्पिटलही बांधेल. सरकारने हे दोन्हीही केलं पाहिजे’.

ही 1957 मधली घटना आहे. त्याला आता इतकी वर्षं उलटली.. मी अजून सार्वजनिक जीवनात आहे. आज दिल्लीतलं अशोक हॉटेल तोट्यात चाललं आहे आणि देशात जिथे हवीत त्या सर्व ठिकाणी हॉस्पिटल्स बांधणं अजूनही आपल्याला साधलेलं नाही.

प्रगतीचे कितीतरी टप्पे गाठले आपण, जे अशक्य वाटत होतं ते साध्य करणंही साधलं आपल्याला; तरीही कार्यक्षम, नि:स्पृह अशी ‘व्यवस्था’ उभी करू शकलो नाही आपण. लोकशाही नावाच्या ज्या तत्त्वाच्या बळावर हा देश उभा आहे, ती लोकशाही प्रत्यक्षात चालवणारी ‘व्यवस्था’ मात्र लोकांच्या अविश्वासाची धनी आहे. या व्यवस्थेला दिशा देण्याची जबाबदारी असलेले राजकीय नेते जनतेच्या रोषाचे कारण आहेत. ‘सरकार’ नामक व्यवस्थेची चौकट वर्षानुवर्षांच्या वळशांनी अधिकाधिक अभेद्य बनत गेली आहे. त्यात ‘शिरायला’ जागा नाही. बदलाला वाव नाही, अशी अवस्था होऊन बसली आहे. 

व्यक्तिगत आयुष्यात मला कसली चुटपुट नाही. रुखरुख नाही. पण राष्ट्र म्हणून आपली विफलता हे माझ्या आयुष्यातल्या निराशेचं, उद्वेगाचं कारण जरूर आहे.

विचार करतो तेव्हा वाटतं, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं उलटली. या एवढय़ा कालावधीत जगभरातल्या कितीतरी देशांनी किती गोष्टी साधल्या. भारताने घेतली त्यापेक्षा अधिक उंच, अधिक सशक्त अशी झेप घेणं या देशासाठी अशक्य होतं का?

 पण ते घडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. दक्षिण आशियामध्ये शीर्षस्थानी पोहचता येईल, अशीही मनीषा या देशाने धरली नाही. जे शक्य होतं, ते आपण घडवू शकलो नाही.

मी निराशा उगाळणारा माणूस नाही. पण वास्तवाकडे दुर्लक्ष करणं हा माझा स्वभाव नव्हे.
खरं तर लिहिणं-वाचणं, प्रवास हेच माझं आयुष्य होतं. आपल्याच मस्तीत जगण्याची स्वप्नं पाहिली होती तरुण वयात. पुढे समाजकारणात आलो, मग राजकारणात पडलो.. आणि फसलो खरा! या धकाधकीत कवितेची संगत फार लाभली नाही .. कविता तो जैसे ओझल होती चली गयी!

राजकीय जीवनातले रोजचे तणाव आणि आजूबाजूचा अखंड गल्बला यात कवितेचं दाणापाणी साधलं नाही खरं! कवितेसाठी एकांत लागतो. बाहेरून ‘आत’ पाहण्याची उसंत देणारं वातावरण लागतं.. कविता एक माहौल चाहती है, कविताके लिए घुमडना जरुरी होता है! बादल घुमडेगा नही, तो बरसेगा कैसे?
दुर्दैव, की माझं उत्तरायुष्य काहीसं कोरडं गेलं. कवितेचा हात सुटत राहिला हातातून.
- जब खुदको रोक नही पाता, तभी लिखता हूं!

और क्या कहूं?  चाहता हूं, की बेदाग निकल जाऊं!

मेरे पश्चात लोग सिर्फ इतना कहे, की आदमी अच्छा था! 

(तवलीन सिंग यांना दिलेल्या मुलाखतीतून)

Web Title: how Atalaji wanted to die unblemished..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.