मंगळावर असेल घर, शाळा अन् सार काही...

By पवन देशपांडे | Published: December 16, 2017 06:17 PM2017-12-16T18:17:59+5:302017-12-17T18:53:09+5:30

हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं.

The house on Mars, at an average distance of 22.6 crores from Earth | मंगळावर असेल घर, शाळा अन् सार काही...

मंगळावर असेल घर, शाळा अन् सार काही...

googlenewsNext

तिथं घरं असतील. शाळा असतील.  मनोरंजनाची ठिकाणं, रुग्णालयं, आॅफिसेस, दुकानं असं सारं काही असेल़ पण हे जिथंअसेल ते ठिकाण आपल्या सध्याच्या वस्तीपेक्षा म्हणजेच पृथ्वीपासून सरासरी २२.६ कोटी किलोमीटर अंतरावर असेल.

मार्शियन’ नावाचा एक चित्रपट आहे. त्यात काही अंतराळवीर मंगळ ग्रहावर जातात. संशोधन करण्यासाठी उतरतातही. अचानक तिथले हवामान बिघडते. वादळ उठते. ही चाहूल लागताच मोहीम आटोपती घेऊन सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी यानापर्यंत पोहोचतात; पण तिथपर्यंत पोहोचतानाच वादळात मार्क नावाचा अंतराळवीर अडकतो. धडपडतो. तिथेच राहतो. नाइलाजानं मार्कला तिथंच सोडून निघून बाकीच्यांना पृथ्वीकडे प्रस्थान करावं लागतं. हा मार्क या वादळातही कसाबसा वाचतो. आणि नंजर तो जे करतो त्याबद्दल आता ‘नासा’मध्ये संशोधन सुरू आहे.

भविष्यात मंगळावर मानवी वस्तीची शक्यता निर्माण झालीच, तर पुढे काय? - हा सध्या अनेक वैज्ञानिकांना झपाटून टाकणारा विषय आहे.
मंगळ ग्रह तसा साधा नाही. तिथं सूर्यमालेतील सर्वांत मोठा ज्वालामुखी आहे. सर्वांत खोल दरीही आहे. जी आपल्या पृथ्वीवरून दुर्बिणीतूनही सहज दिसू शकते. तिथं हिवाळ्यात उणे ६० डिग्री ते उणे १४० डिग्री सेल्सिअसपर्यंत तपमान असतं. दुसरीकडे उष्णतेच्या अक्षरश: लाटाही असतात. वादळं असतात.

हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं. त्यावर कॅनल असतील असे तर्कही तेव्हा वर्तविले गेले.

मंगळावर पाणी असल्याबद्दल अजूनही शोध सुरू आहे़ तेथील खडकांची रचना, त्यांचा आकार आणि नदीसारखी पात्रंं तिथं कधीकाळी पाणी असल्याचा पुरावा देतात़ पण हे पुरावे अजूनही सिद्ध झालेले नाहीत़ त्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा असो वा युरोपची युरोपियन स्पेस एजन्सी इसा असो किंवा भारताची इस्रो ही संस्था असो. या साºयाच अंतराळ संस्थांमधील संशोधक यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

नासाने आतापर्यंत चार रोव्हर मंगळावर पाठवलेली आहेत़ त्यांनी आतापर्यंत जी काही छायाचित्रं पाठवली आहेत त्यातून हा ग्रह आणि पृथ्वीत बरंचसं साम्य असल्याचं दिसून आलं आहे़ त्यामुळेच एवढ्या दूरवरही मानवी वस्तीची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते़
मार्स सिटी डिझाइन नावाची एक संस्था आहे़ नासा आणि इसा या दोन्ही अंतराळ संस्थेच्या मदतीने ही ‘मार्स सिटी डिझाइन’ संस्था दोन वर्षांपासून एक स्पर्धा घेते. मंगळावर मानवी वस्ती करायची असेल तर तिथं कशा प्रकारची घरं असावी, मानव राहू शकेल असं वातावरण तिथे कसं निर्माण करता येईल? प्रवासासाठी सोय कशी असावी?- अशा प्रश्नांचा शोध घेण्यासाठी शास्रज्ञांच्या गटांना प्रेरित करणं हा या स्पर्धांचा उद्देश आहे. अलीकडे या स्पर्धेत मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीने आपलं डिझाइन सादर केलं. नऊ जणांच्या टीमनं सादर केलेलं मंगळावरील वस्तीचं हे प्रारुप स्पर्धेत अव्वल ठरलं.

‘रेडवूड फॉरेस्ट’ एमआयटीच्या टीमनं या डिझाइनला ‘रेडवूड फॉरेस्ट’ असं नाव दिलंय़ म्हणजेच मंगळावर झाडांचं जंगल तयार केलं जाईल, हे या नावावरून स्पष्ट तर होतंच़; पण ही झाडं जगतील कशी यावरही त्यांनी उपाय सुचवला आहे़ हे डिझाइन एका डोमसारखं आहे़ म्हणजे मंगळावरील खोलगट भागात एक डोम उभा केला जाईल़ या डोमच्या वरच्या आणि आतल्या भागाच्या मधोमध पाण्याचं आवरण असेल़ हे पाणी फिरतं असेल़ म्हणजे सूर्याची कितीही प्रखर किरणं आली तरी त्यापासून हे पाणी बचाव करेल़ या डोममधल्या झाडांद्वारे एक वातावरण निर्माण होईल़ आॅक्सिजन तयार होईल आणि त्याचा वापर विविध प्रकारे केला जाईल़ डोमच्या आतल्या भागात भुयारं असतील़ या भुयारांतून मार्ग निघतील आणि ते विविध ठिकाणी पोहोचतील़ छोट्या गुहा असतील आणि त्यांचा वापर घरं, शाळा म्हणून केला जाईल़ अशा गुहांचाच एक हॉल बनविला जाईल़ तिथंच आॅफिसेस असतील़ एका डोममध्ये किमान ५० लोक राहू शकतील़ किमान दहा हजार लोक मंगळावर राहू शकतील अशा प्रकारची सोय करण्यासाठी २०० डोम तयार करण्याचा प्रयत्न असेल.

याच स्पर्धेत आणखी दोन प्रकारांमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सना अव्वल क्रमांक मिळाला आहे़े मंगळावर राहणाºयांनी प्रवास करण्यासाठी बलूनचा उपाय सुचवला गेला आहे. मोठमोठी बलून्स तयार करून त्याद्वारे प्रवास करण्याचा हा पर्याय आहे. हे बलून एका गाडीला बांधलेले असतील आणि ती गाडी रिमोटद्वारे चालेल़ त्या मागोमाग बलून हवेत असेल. हे संशोधन ‘अराउण्ड मार्स इन एटी डेज’ नावाने काही संशोधकांनी सादर केलं.

मार्स सिटी डिझाइन नावाच्या संस्थेनं घेतलेली ही स्पर्धा आता नासासाठी संशोधनाची नवीन क्षितिजं खुली करणारी ठरत आहे़ मानवाला २०४३ मध्ये मंगळावर नेण्याचा कयास बांधला जात आहे़ त्यादृष्टीने आतापासूनच वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत़ अर्थात, सध्याचा तंत्रज्ञानाचा वेग बघता हे प्रयोग यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता जास्त आहे.


मंगळावर फिरताहेत ‘रोबो’
मंगळ ग्रहावर काय आहे? हे शोधण्यासाठी काही रोव्हर सध्या तिथे आहेत़ म्हणजे ते तिथं चालतात, फिरतात त्यांना चाकं आहेत़ त्यांच्यावर प्रयोगशाळा आहेत़ ज्यात मातीचं, दगडांचं परीक्षण केलं जातं़ जिथं जिथं जाणार तिथली छायाचित्रं घेण्यासाठी बरेच कॅमेरे आहेत़ ही सर्व माहिती हे ‘रोबो’ पृथ्वीवर सातत्यानं पाठवत आहेत़ आतापर्यंत अशी पाच रोव्हर्स मंगळावर पाठवण्यात आली आहेत़ त्यातील दोन संपर्कात आहेत़ दोघांचा संपर्क तुटला आहे तर एक क्रॅश झाल्याची शंका आहे़ जे संपर्कात आहे त्यातलं क्युरिअ‍ॅसिटी नावाचा रोव्हर अत्याधुनिक आहे़ याहीपेक्षा अत्याधुनिक रोव्हर पाठवण्याची तयारी नासाने केली असून, त्यानुसार आणखी एक रोबो पुढच्या वर्षी मंगळावर दाखल होणार आहे़. 

मंगळावर जायला किती वेळ लागतो?
पृथ्वीवरून अग्निबाण झेपावल्यानंतर मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत: १५० ते ३०० दिवस लागतात; पण तेही कोणत्या वेळी आपण उड्डाण घेतो, त्यावेळी पृथ्वी आणि मंगळातील स्थिती काय यावरही सारे अवलंबून आहे. अग्निबाणाचा जेवढा अधिक वेग असेल तेवढ्या लवकर आपण तेथे पोहोचू शकतो.

परतण्यासाठी इंधन
पृथ्वीवरून मानवाला घेऊन जाणं सोप्पं होईलही कदाचित. कारण इथं हवं तेवढं इंधन उपलब्ध आहे़; पण एकदा मंगळावर गेल्यावर परतण्याचं काय? एक तर पृथ्वीवरून जातानाच परतण्याची सोय करावी लागेल किंवा तिथेच तशा प्रकारचं इंधन तयार करावं लागेल. ही व्यवस्थाही व्हावी यासाठी एमआयटीच्या संशोधकांनी प्रयोग सुरू केला आहे़ हायड्रोजन फ्यूएल तयार करण्यासाठी त्यांनी उपायही सुचविला आहे़ तो यशस्वी झाला तर मंगळावरून रॉकेट झेपावेल़

मंगळावर शेती
मंगळावर शेती कशी केली जाईल, हे द मार्शियन चित्रपटात दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात त्याचा प्रयोग पृथ्वीवर यशस्वी झाला आहे़ मंगळावरील जशा प्रकारची जमीन आहे तशीच माती घेऊन त्यात डुकराची लीद मिसळून एक मिश्रण तयार करण्यात आलं आणि त्यात काही रोपं लावण्यात आली़ मंगळावर जसं वातावरण आहे तशाच कृत्रिम वातावरणात ही रोपं उगवली़ विगर वामेलिंक या वनस्पतिशास्त्रज्ञाने हा प्रयोग यशस्वी केला आहे़ आता प्रत्यक्षात मंगळावर त्याची परीक्षा होणं मात्र बाकी आहे़

चिरंतन विकास
पृथ्वीवर विकासाच्या वेगात जी काही निसर्गाची हानी केली गेली तशी हानी मंगळाची होऊ नये म्हणून विशेष डिझाइन्स तयार केली जात आहेत. तिथं प्रदूषण वाढू नये, हा पहिला प्रयत्न असेलच. तिथल्या वस्त्याही निसर्गाला पूरक अशाच असतील, यावरही भर दिला जात आहे.

 

Web Title: The house on Mars, at an average distance of 22.6 crores from Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा