Google to Kill Google Plus Due to Data Theft | गूगल प्लस अखेर बंद पडणार..
गूगल प्लस अखेर बंद पडणार..

ठळक मुद्देडेटाचोरीची आणि खासगीपणाचा संकोच होण्याची बाधा कोणत्याही डिजिटल नगरीत कोणालाही होऊ शकते हे वास्तव निदान सध्यातरी स्वीकारलेच पाहिजे. मग ती अगदी गूगल प्लसची ओसाडनगरी असली तरी.

- विश्राम ढोले
गूगल प्लस अखेर बंद पडणार. खरं तर, त्यात बातमी म्हणावी असे काही नाही. कारण बहुतेकांच्या लेखी गूगल प्लसमध्ये गूगलच्या नावाखेरीज ‘प्लस’ काही नव्हते. फेसबुकला पर्याय म्हणून गूगलने वसविलेले हे गाव खऱ्या अर्थी कधी वसलेच नाही. ते ओसाडच राहिले. त्यामुळे ते बंद करणार असल्याची गूगलची घोषणा म्हणजे ‘राजाचा पोपट मेला आहे’ हे राजानेच शेवटी मान्य करणे यापेक्षा अधिक काही नव्हते. तरीदेखील त्याची बंद पडण्याची घोषणा ‘बातमी’ ठरली आणि ती महत्त्वाचीही होती.
अपयशी ठरले तरी प्लसचे ते ओसाड शहर नावापुरते टिकविणे गूगलसारख्या बलाढ्य कंपनीला अशक्य नव्हते. किंबहुना गेले दोन-तीन वर्षे प्लस भूतनगरीच झाले होते. पण या वर्षी मार्चच्या सुमारास या भूतनगरीतील काही वेगळीच भुते मानगुटीवर बसण्याची भीती आहे, हे गूगलच्या लक्षात आले. लगेच गूगलने व्हेंटिलेटरवर असलेल्या प्लसच्या नळ्या काढण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुरु वात केली आणि प्लसची बिझनेस सेवावगळता बाकी सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
गंमत म्हणजे मार्चमध्ये जेव्हा गूगलला हे भूत आपल्या प्लसनगरीत पहिल्यांदा दिसले नेमके तेव्हाच ही भूतबाधा याआधीच झालेल्या फेसबुकची बाधा उतरविण्याचे काम सुरू होते. अमेरिकी काँग्रेस मार्क झुकरबर्गची कसून चौकशी करीत होते आणि या बाधेवर काय तंत्र-मंत्र काम करू शकेल याचा विचार करीत होते. भरभरून वाहणारे फेसबुकचे महानगर आणि ओसाड पडलेले प्लसचे गाव या दोघांनाही बाधलेले हे भूत डेटाचोरीचे आहे.
एका तांत्रिक त्रुटीमुळे प्लसवरील सुमारे पाच लाख वापरकर्त्यांची व त्यांच्या तेथील मित्रांची काही प्रकारची माहिती मिळविणे वेगवेगळ्या ४३५ अ‍ॅप्लिकेशनला शक्य झाले होते. गूगलला मार्चमध्ये ते पहिल्यांदा लक्षात आले. गूगलने त्याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. पण या महिन्याच्या सुरु वातीला वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राला त्याचा सुगावा लागला. गूगलच्या कायदा विभागातील एका अधिकाºयाने लिहिलेली एक अंतर्गत गोपनीय टिपणी जर्नलच्या हातात लागली. त्यात म्हटले होते की, ‘डेटागळतीचे हे प्रकरण बाहेर आले तर सुंदर पिचार्इंना नक्कीच काँग्रेसपुढे चौकशीला बोलावले जाईल. कदाचित नवे नियम लागू केले जातील.’ जर्नलमध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच गूगलने वेगाने पावले उचलली. प्लसची लोकांसाठीची सेवा बंद करणार असल्याचे जाहीर केले. ‘प्लसमधील तांत्रिक त्रुटीमुळे डेटाचोरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याबाबत अ‍ॅप्सला काही कल्पना होती, असे आम्हाला वाटत नाही. त्यांनी त्याचा काही गैरवापर केल्याचा वा ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचा काहीही पुरावा मिळालेला नाही’, असा दावा करीत गूगलने सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय खरा. पण त्याला तसा विशेष अर्थ नाही.
गूगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सेवेमध्येही डेटाचोरीला पूरक त्रुटी राहतात, कंपनीला अनेक दिवस त्या कळतही नाहीत आणि कळल्यानंतर कंपनी सहा सहा महिने त्याची स्वत:हून कबुलीही देत नाही, हे वास्तव मात्र त्यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
आता हे खरचं आहे की प्लसमधील चोरी म्हणजे ओसाडगावची चोरी आहे. पण काय चोरीला गेले यापेक्षा सहज चोरी होऊ शकेल इतपत प्लसची यंत्रणा गाफील होती आणि ही गाफिली लक्षात येऊनही ती स्वत:हून मान्य न करण्याइतपत गूगलची भूमिका अप्रामाणिक होती हे अधिक महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने अशी गाफिली आणि असा अप्रामाणिकपणा इंटरनेटच्या दुनियेला नवा नाही. सोशल मीडिया साइटवरचा डेटा लिक होण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रकार या आधीही घडले आहेत. सोशल मीडियाच कशाला, बँका, क्रे डिट कार्ड कंपन्या, आॅनलाइन विक्री कंपन्यांमधील ग्राहकांची माहितीही कमी-अधिक प्रमाणात चोरीला गेल्याच्या, त्याचा गैरवापर झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतोच.
या सेवांचे वापरकर्ते कळत न कळत त्यांच्याविषयीची खूप सारी माहिती या सेवांच्या माहितासाठ्यात नोंदवित जात असतात. अनेकदा ही माहितीच या कंपन्यांचे मोठे उत्पन्नस्रोत असते. सोशल मीडियाच्या कंपन्याच्या बाबतीत तर विशेषत्वाने. पण ही माहिती इतरांना विकताना वापरकर्ते व्यक्तिश: ओळखले जाणार नाही, त्यांच्या इतर गोष्टींविषयीची माहिती अनावश्यकपणे कोणाच्या हातात पडणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असते. अनेकदा तर या कंपन्या आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील लिखित-अलिखित कराराचा तो भागच असतो. पण कधी तांत्रिक त्रुटीमुळे, कधी गाफीलपणामुळे, कधी कंपन्यांच्या लालचीपणामुळे तर कधी अ‍ॅप वा हॅकर्सच्या तांत्रिक कौशल्यामुळे अशा माहितीला पाय फुटतात आणि त्याचा गैरवापर होतो. त्याखेरीज कंपनीतीलच कोणीतरी कुठल्यातरी चांगल्या हेतुने किंवा सुडापोटी ही माहिती फोडण्याची भीतीही असतेच. ज्युलियन असांजचे विकिलिक्स आठवा.
जितकी मोठी कंपनी तितका मोठा माहितीसाठा आणि जितका मोठा माहितीसाठा तितकी चोरी किंवा गळतीची जास्त भीती, हा फक्त तर्क नाही. ते नेटवर्क जगण्यातील एक वास्तव आहे. बरं यातील तांत्रिकता व कायद्याची गुंतागुंत इतकी की, सामान्य माणसाला आपल्याविषयी कोणती माहिती साठविली जाते, कोणती विकली जाते, कोणती चोरीला गेली किंवा कोणी चोरली याबाबत काही कळणे अतिशय अवघड. अशा वेळी वैधानिक पातळ्यांवर त्याचे नियमन करणाºया संस्थांची जबाबदारी अधिकच वाढते. पण या कंपन्यांचे अवाढव्य आकार आणि त्यांचे बहुराष्ट्रीय रूप बघता एकाच एका वैधानिक संस्थेकडूनही त्यांचे योग्य नियमन होऊ शकेल ही शक्यताही अवघड. म्हणूनच डेटाचे आणि पर्यायाने व्यक्तीच्या खासगीपणाचे कसे संरक्षण करावे ही जगभरच्या देशांपुढील एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. ते आव्हान सुटेल तेव्हा सुटो. पण तोवर आपणच आपले सेटिंग्स लावत, पासवर्ड भक्कम करत आणि मुख्य म्हणजे डिजिटल जगात आपल्याविषयी अकारण माहिती देत फिरत बसण्याचा मोह टाळत थोडीफार खबरदारी घेऊ शकतो. एरवी डेटाचोरीची आणि खासगीपणाचा संकोच होण्याची बाधा कोणत्याही डिजिटल नगरीत कोणालाही होऊ शकते हे वास्तव निदान सध्यातरी स्वीकारलेच पाहिजे. मग ती अगदी गूगल प्लसची ओसाडनगरी असली तरी.
(लेखक संज्ञापन आणि माध्यमतज्ञ आहेत.)

vishramdhole@gmail.com


Web Title: Google to Kill Google Plus Due to Data Theft
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.