गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:05 AM2018-12-02T09:05:00+5:302018-12-02T09:05:03+5:30

आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदीपात्राच्या रचनेत बदल होणे, नदीतील गाळाचे प्रमाण वाढणे, पाण्याची झिरप जास्त होऊन नदीतील पाणी कमी होणे, तसेच नदीतील मासे, झिंगे आणि इतर जलीय जिवांचे अधिवास धोक्यात येणे हे दुष्परिणाम संभवतात.

Godavari is on the edge of death in Nanded ! | गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !

गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !

googlenewsNext

- प्रा. विजय दिवाण 

नाशिकपासून उगम पावणारी गोदावरीनदी अहमदनगर, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यांतून वाहत नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे खुद्द नांदेड शहराच्या मध्यातून वाहत जाऊन ही नदी पुढे तेलंगणा राज्यात प्रवेश करते. नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. त्यातील बहुतेक घाटांवर स्मशाने आणि दशक्रिया विधी करण्याच्या जागा निर्माण केलेल्या आहेत. शहरात निधन पावणाऱ्या व्यक्तींच्या मृतदेहांचे दहन गोदाकाठच्या या स्मशान घाटावरच केले जाते. 

दररोज एखाद-दुसरे शव तिथे जळत असताना दिसते. दहनानंतर उरणाऱ्या अस्थी आणि पोते भरून निघणारी राख गोळा करून त्यांचे विसर्जन नदीच्या पाण्यात तिथेच केले जाते. जिथे दहन करतात त्याच घाटांवर नंतरच्या दशक्रियाही केल्या जातात. नांदेड शहरातून वाहणाऱ्या या गोदावरीच्या दोन्ही काठांवर दाट लोकवस्ती आहे. अनेक ठिकाणी नदीच्या कमाल पूर पातळी रेषेच्या आतच दाटीवाटीने घरे बांधलेली आहेत. काही ठिकाणी नदीकाठी काँग्रेस गवत, वेडी बाभळ आणि इतर काटेरी झुडपांचे रान माजलेले आहे. सकाळच्या वेळी आजूबाजूच्या वस्त्यांतील अनेक जण त्या रानात प्रातर्विधीला बसलेले दिसतात. शिवाय नदीकाठी असणाऱ्या स्मशानघाटांच्या जवळ जी मंदिरे उभारलेली आहेत त्यातून निघणाऱ्या निर्माल्याचे ढीगही काठांवर साचलेले असतात. त्यामुळे नदीकाठांवरून चालत जाणाऱ्यांना तिथे प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. 

नदीच्या दुसऱ्या काठालगत शीख पंथियांचे तीन गुरुद्वारे आहेत. त्याच्या समोरच्या नदीकाठच्या भागात सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच भाविकांना जाणे-येणे सुलभ व्हावे म्हणून नदीकाठी सिमेंटचा एक रस्ताही बांधला आहे. आजूबाजूच्या वस्त्यांमधून राहणारे अनेक लोक आपापल्या घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून नदीकाठी येतात आणि तो कचरा नदीत फेकून देतात. नांदेड शहराच्या हद्दीत गोदावरीवर तीन-चार मोठे पूल आहेत.  अनेक लोक त्या पुलांवरूनही नदीत कचरा फेकत असताना दिसतात.

या गोदावरी नदीचे पाणी आपण रोज पीत असतो. त्या पाण्यात घाण टाकता कामा नये हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसावा. शिवाय सकाळच्या वेळी अनेक माणसे लोक बाबूंच्या आणि फोम-गाद्यांचे तराफे घेऊन नदीवर येतात आणि नदीत बुड्या मारून टोपल्या-टोपल्यांनी वाळू काढून तराफ्यावर तिचे ढीग लावतात. नंतर ते तराफे किनाऱ्यावर नेऊन वाळू ट्रक्समध्ये भरून नेली जाते. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे पात्राच्या रचनेत बदल होणे, गाळाचे प्रमाण वाढणे, पाण्याची झिरप जास्त होऊन नदीतील पाणी कमी होणे, तसेच नदीतील मासे, झिंगे आणि इतर जलीय जिवांचे अधिवास धोक्यात येणे हे दुष्परिणाम संभवतात. नांदेडमध्ये गोदावरी या धोक्याचा सामना करीत आहे.

( vijdiw@gmail.com ) 
 

Web Title: Godavari is on the edge of death in Nanded !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.