तडप तडप जिया जाये ! गिरिजा देवी यांचा 'लोकमत'सोबतचा खास संवाद

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 28, 2017 3:02pm

ख्यातनाम ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांनी जुन्या स्वरपरंपरांचा वर्तमानाशी जोडलेला दुवा त्यांच्या देहावसानाने भंगला खरा; पण त्यांचे स्वर चिरंतन! २०१६च्या दिवाळीत त्यांनी ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकासाठी ‘लोकमत’शी दीर्घ संवाद केला होता. त्या लेखातला हा एक अंश.

-गिरिजा देवी आईचा मार खात घरीच हिंदी, संस्कृतचे धडे घेणारी, गुडीयाकी शादी मनानेवाली बनारसची एक सिधी लडकी मी...! - मला बंडखोरी शिकवली मीरेने! स्वरांच्या प्रेमात बुडून जायला शिकवले सूरदासाने आणि गाणे घेऊन जगण्यात उतरायला शिकवले ते आमच्या काशी-विश्वेश्वराने. त्याने मला माझे गाणे माझ्या जगण्याशी जोडून द्यायला शिकवले.

आमचे कुटुंब गावाकडून बनारसला आलेले. माझे गुरु सरजू प्रसाद मिश्र हे बनारस-सैनिया घराण्याचे सारंगीवादक; पण संगीतातील विद्वान. बनारस-सैनिया घराण्याची ख्याल गायकी जशी त्यांना अवगत होती तशीच या घराण्याची धृपदची तगडी परंपरा ते उत्तमरीतीने जाणून होते. बनारस ही शंकराची भूमी. त्यामुळे माझे शिक्षण सुरू झाले ते अर्थात भैरव रागापासून. गाण्याच्या ‘क्लास’साठी तासभराची फी भरून शिकणाºया आणि शिकवणाºया गुरु -शिष्यांचे दिवस अजून आले नव्हते त्यामुळे गाणे शिकणे याचा अर्थ, दिवसाची सुरुवात गाण्यापासून आणि शेवटही. बनारसमधील सांस्कृतिक-सांगीतिक जीवन अखंड गजबजलेले असे. चैत्रात गंगेच्या पात्रात विहरणाºया सजलेल्या नावांमध्ये बसून गायल्या जाणाºया बुढवा मंगलच्या चैती असोत किंवा वसंतात होणारा गुलाबांचा उत्सव आणि त्यात म्हटले जाणारे झुले... सोबत गुलाबपाणी, गुलाबाची अत्तरे, गुलाबाची सजावट आणि गुलाबी कपडे घालून केलेले वसंताचे स्वागत असो, बनारसची माती त्यावेळी सदैव संगीत-नृत्याने घमघमत होती. मंदिरातील मैफली, कथा-कीर्तने, राजे-महाराजांच्या घरी होणारे खास कलाकारांचे जलसे यातून कोण-कोण नाही भेटले मला? किशन महाराज, कंठे महाराजांचा तबला आणि लच्छू महाराज, शंभू महाराज यांचे नृत्य हे बघता-ऐकताना, विविध व्रत-वैकल्यांच्या निमित्ताने आसपासच्या स्त्रिया म्हणत असलेली गाणी ऐकत असताना ते संस्कार किती खोलवर झिरपत गेले आहेत त्याचा प्रत्यय आला पुढे माझ्या ठुमरीतून जेव्हा हे खोलवरचे झरे बाहेर येऊ लागले तेव्हा! माझ्या गुरुंबरोबर या संस्कारांचा फार मोठा वाटा माझ्या ठुमरीच्या घडण्यात आहेच; पण या ठुमरीला घडवण्यात मोठा वाटा आहे तो सारनाथमधील माझ्या एकांताचासुद्धा...!संसारात राहून आपणहून, हट्टाने स्वीकारलेल्या एकांताचा..! त्या काळातील एक अतिशय अवघड निर्णय होता तो. हा निर्णय होता माझ्या संसारापासून, माझ्या एक वर्षाच्या मुलीपासून वर्ष-दोन वर्ष दूर राहून निव्वळ संगीताची साधना करण्याचा..! गाण्याचे शास्त्र, त्याबरोबर कानावर पडत गेलेले लोकसंगीत यावर मला माझ्या म्हणून संस्कारांचे वळसे चढवायचे होते आणि त्यासाठी मला माझ्या गाण्याबरोबर एकटीने निवांत काही काळ राहायला हवे होते. मला माझे गाणे शोधण्यासाठी एकांत गरजेचा होता. - एका शादीशुदा, इभ्रतदार संसारी स्त्रीने संसारापासून दूर राहण्याचा असा निवांतपणा मागणे म्हणजे संसार नावाच्या व्यवस्थेला आपल्याच हाताने सुरुंग लावण्यासारखे होते. समाजाच्या दृष्टीने नक्कीच. पण व्यावहारिक जगात ठोक व्यापारी असलेल्या आणि संगीतावर मनापासून प्रेम करणाºया माझ्या उदारमनस्क पतीने, मधुसूदन जैन यांनी, माझी गरज जाणली. संसाराचा कोणताही बोजा खांद्यावर पडणार नाही अशी सगळी सोय त्यांनी माझ्यासाठी सारनाथला उभी केली. श्रीचंद मिश्र सारखे दुसरे गुरु शोधले. घरदार, गडी-माणसे, कंदील दिवाबत्तीची सोय सगळे होते तिथे. पाचव्या वर्षापासून संगीत शिकत होते, शाळा वगैरे धुडकावून फक्त त्यातच जगत होते, ऐकत होते. मनात- डोक्यात तुडुंब भरलेले हे गाणे उसळ्या मारून बाहेर येऊ बघत होते, जाणत्यांपर्यंत पोहचू बघत होते, दाद मागत होते, इतक्या आवेगाने की त्याला वाट नसती मिळाली तर कदाचित मी फुटून गेले असते...! संगीत अनेक वाटांनी माझ्यापर्यंत येऊ लागले. माझ्या गाण्याला भिडू लागले. त्यातील रिकाम्या जागा दाखवू लागले. या सगळ्या वर्दळीत माझी वेगळी जागा निर्माण करण्याची गरज पुन्हा पुन्हा सांगू लागले. ...आणि याच प्रवासात भेटली मला माझी ठुमरी. नव्या ढंगाची. ठुमरीच्या बंदिशीतील भाव तळापासून व्यक्त करणारी. त्या अर्थापर्यंत रसिकांना नेणारी. ठुमरीवर तेव्हा शिक्का होता तो ती राजदरबाराची गुलाम असल्याचा. शृंगार हीच जणू तिची मर्यादा होती. त्यापलीकडे असलेले ठुमरीच्या बंदिशीतील भाव, त्या रचनेचे सौंदर्य यापर्यंत ती ठुमरी जातच नव्हती. गाता-गाता मला या ठुमरीमधील अफाट आकाश दिसू लागले. एकाच ठुमरीमध्ये येऊ शकणारे भिन्न-भिन्न रागांच्या स्वरांचे गुच्छ आणि त्यातून वाढणारी तिची रंगत दिसत होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शंभू महाराज-लच्छू महाराज यांच्या नृत्यात बंदिशीमधील भाव व्यक्त करणाºया ज्या असंख्य नृत्यमुद्रा मी बघितल्या होत्या, त्या सर्व अदा स्वरांमधून मांडण्याच्या जागा मला ठुमरीमध्ये दिसत होत्या. आता हेच पहा ना, ‘घेरी आयी बदरी, नाही आये श्याम’ किती साधीशी ओळ; पण केवढे भाव दडले आहेत त्यात. ‘श्याम नाही आये’ ही तक्र ार, तो का आला नसेल बरं अशी कुरतडणारी काळजी, इतका पाऊस दाटून आलाय; पण त्याला माझी फिकीरच नाहीय हा लटका रुसवा आणि अखेर तो आलाच नाही ही निराशासुद्धा...! त्या त्या प्रसंगातील सगळे भाव कपाळावर उमटणाºया नाराजीच्या आठीतून, घट्ट मुडपलेल्या ओठाद्वारे, चहू दिशांचा वेध घेणाºया भिरभिरत्या नजरेतून आणि निराश देहबोलीतून जर नृत्यातून व्यक्त करता येतात, मग माझे सूर का नाही व्यक्त करू शकत ते? ...स्वरांच्या छोट्या-मोठ्या आकृती आणि ताना-पलटे म्हणण्याचा वेग, लयीचे अंदाज घेत निवडलेल्या उठावाच्या जागा हे यासाठी पुरेसे नाही?... ठुमरीतील भावांचे तपशील असे विविध तºहेने व्यक्त करण्याची अफाट शक्यता मला या स्वरांमधून दिसू लागली आणि तेही विविध रागांच्या स्वरांचा गोफ गुंफीत...! याच प्रयत्नांतून मला माझ्या ठुमरीची वाट सापडत होती. त्यात फक्त शृंगार नव्हता. मीरेची भक्ती होती, त्या भक्तीतील व्याकुळता होती, जगाला अव्हेरून कृष्णाकडे जाण्याची नि:संगता होती. माझी ठुमरी बंदिशीच्या अर्थाच्या छटा शोधत जाणारी होती आणि तिच्या हातात स्वरांचे रंगीबेरंगी गेंद होते. एका रागातून दुसºया रागाच्या वाटेवर नेणारे आणि बोट धरून त्याच रागात परत आणत रसिकांना चकित करणारे, गुंतवून टाकीत चकवा देणारे. कधी आर्त तर कधी लडिवाळ. वडिलांची इच्छा म्हणून गाणे शिकायला निमूटपणे गुरुपुढे बसलेली माझ्यासारखी मुलगी मशहूर गायिका, प्रसिद्ध कलाकार वगैरे होईन असे स्वप्नसुद्धा मला कधी पडले नसेल..! शाळेचे फारसे तोंड न बघितलेली, आईचा मार खात घरीच हिंदी, संस्कृतचे धडे घेणारी, घोड्यावर मांड ठोकून त्याला पळवणारी आणि रोज हौशी-हौशीने गुडीयाकी शादी मनानेवाली बनारसची एक सिधी लडकी होते मी...! - मला बंडखोरी शिकवली मीरेने! स्वरांच्या प्रेमात बुडून जायला शिकवले सूरदासाने आणि माझे गाणे घेऊन जगण्यात उतरायला शिकवले ते आमच्या काशी-विश्वेश्वराने. - बनारसचा हा शिव हा दुरून संसाराकडे बघणारा देव नाही असे आम्ही बनारसवाले मानतो. अंगाला राख फासून हिमालयात जाणारा विरक्त भोळा सांबही नाही, तो आहे रोजच्या जगण्यात रमणारा, त्याच्या रंगात रंगणारा. त्याने मला माझे गाणे माझ्या जगण्याशी जोडून द्यायला शिकवले. लहानपणी गंगेच्या पाण्यात पोहता पोहता हातात लागणाºया मासळ्या आम्ही हातात घेऊन पाण्याबाहेर घेऊन यायचो. त्या मासोळ्या तळहातावर घेऊन पाण्याविना होणारी त्यांची फडफड बघायचो आणि काही क्षणानंतर त्यांना पुन्हा पाण्यात सोडून द्यायचो. माझ्या ठुमरीतील आर्त म्हणजे मी बघितलेली त्या मासोळीची फडफड आहे हे जेव्हा जाणवते तेव्हा वाटते, जगणे म्हणजेच तर गाणे आहे, आणि मी गाऊ लागते, तडप तडप जिया जाये, सावरिया बिना, गोकुळ चढे, मथुरामी छाये, कि संग प्रीत लगाये, तडप तडप जिया जाये... शब्दांकन : वन्दना अत्रे    vratre@gmail.com

 

संबंधित

गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !
अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे
अकोल्यात शॉर्ट फिल्मच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी
पुन्हा राम..
मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

मंथन कडून आणखी

गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !
अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे
अकोल्यात शॉर्ट फिल्मच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी
पुन्हा राम..
मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

आणखी वाचा