फोमो : आपण मोबाइलचा वापर करतोय की मोबाइल आपला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 03:36 PM2017-09-02T15:36:51+5:302017-09-03T07:09:34+5:30

कोणतीही गोष्ट असो, त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. कुठलंही सुंदर दृश्य दिसलं की, सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. एखादा दिवस वायफाय बंद पडलं, नेटपॅक संपला की मनात नाही नाही ते विचार यायला लागतात, आपलं आता कसं होईल, अनेक गोष्टी मिस होतील, ग्रुपमधून आपण बाहेर फेकले जाऊ.. या विचारांनी हैराण व्हायला होतं. का होतंय असं?..

Foamy: Are You Using Mobile or Mobile? | फोमो : आपण मोबाइलचा वापर करतोय की मोबाइल आपला?

फोमो : आपण मोबाइलचा वापर करतोय की मोबाइल आपला?

Next

- डॉ. वैशाली देशमुख

शर्विल नवीन गावात आला तेव्हा त्याला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागला. फारसे मित्रही मिळाले नाहीत. घरी आल्यावर काही उद्योग नाही म्हणून तो कॉम्प्युटरवर बसायला लागला. वाढदिवसाला हट्टानं त्यानं स्मार्ट फोन मागून घेतला. आता तर त्याला कॉम्प्युटरचीही गरज नव्हती. यू ट्यूब, फेसबुक आणि इंटरनेटची तमाम दुनिया त्याच्या फोनमध्ये हजर होती. बघावं तेव्हा त्याचं फोनमध्ये खुपसलेलं डोकं बघून आईचा पारा चढायला लागला. आईबाबांबरोबर सतत खटके उडायला लागले. दिवस-रात्रीचं गणित बिघडलं. रात्री सगळे झोपलेले असायचे तेव्हा तो टक्कं जागा असायचा आणि सकाळी काही केल्या त्याचे डोळे उघडत नसत. अनेकदा नियम करून झाले, शर्विलनं फोन जबाबदारीनं वापरण्याची हमी दिली. पण येरे माझ्या मागल्या. शेवटी आईबाबांनी एक दिवस त्याचा फोन जप्त केला.
ओळखीचं वाटतंय हे चित्र?..
सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. एकूणच व्हर्च्युअल जग हीच रिअ‍ॅलिटी वाटावी अशी स्थिती आहे. खरं तर या शब्दाचा अर्थच असा की ‘जे प्रत्यक्षात नाही, ज्याचा फक्त भास होतो ते.’ तरीही का बरं त्यात रमतो आपण? हा आजार आहे का, याचं व्यसन लागतं का अशा खोलात जरी आज आपण गेलो नाही, तरीही या विषयावर बोलणं मात्र जरुरी आहे असं मला वाटतं. आणि तुमच्यातल्याही काही जणांना असं वाटतंय याची मला खात्री आहे.
एकदा आम्ही याबद्दलची चर्चा एका कॉलेजमध्ये करत होतो. माझ्यासमोर दुसºया वर्षातल्या मुलांचे उत्सुक चेहरे होते. नुकतीच टीनएजमधून बाहेर पडलेली ती मुलं. या तुमच्यासारख्याच तरुण मुलांशी याबाबत झालेल्या चर्चेतले काही मुद्दे सांगते.
खरं तर आमच्या चर्चेची सुरुवात झाली रिलेशनशिप्सबद्दल. जुन्या नात्यांचे बदललेले संदर्भ, नव्यानं फुलणारी नाती, मैत्रीचे बदलते आयाम आणि या सगळ्याबरोबर येणारी आव्हानं... बोलता बोलता गाडी आली व्हर्च्युअल रिलेशनशिप्सवर. सगळ्यांचं एकमत झालं की ही नव्या प्रकारची नाती खूप ठळक आहेत त्यांच्या विश्वात. आणि मग ती चर्चा इन्टरनेट, सोशल मीडिया या विषयांवर घसरली.
आजचा फोन नुसता मोबाइल न राहता स्मार्ट झालाय. आता आपण त्याचा उपयोग कॉल करण्यापेक्षा इतर गोष्टींसाठीच जास्त करतो. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे गेम्स खेळण्यासाठी आणि सोशल मीडियासाठी. पण जेवण्या-झोपण्याइतकाच तो आवश्यक झालाय. आठवून बघा, मोबाइल डिस्चार्ज झाला तर असं वाटतं की आपला श्वासच बंद पडलाय. तो हरवला किंवा कुठे विसरला तर भयानक अस्वस्थ व्हायला होतं.
काहीही खाण्याआधी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याशिवाय घास घशाखाली उतरत नाही. कुठलंही सुंदर दृश्य दिसलं की सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. एखादा दिवस वायफाय बंद पडलं, नेटपॅक संपला की मनात नाही नाही ते विचार यायला लागतात, ‘जगात काय काय घडत असेल, आपले मित्र-मैत्रिणी किती मजा करत असतील आणि हे सगळं आपल्याला कळलं नाही तर? आपण मागे पडू ना ! आपली एखादी पार्टी मिस होईल, ग्रुपमधून आपण बाहेर फेकले जाऊ.’ आणि असं वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात.
ही भीती अगदी सार्वत्रिक आहे. इतकी की त्याला नावही आहे, ‘फोमो’, म्हणजे फिअर आॅफ मिसिंग आउट.
मोबाइलच्या, इंटरनेटच्या या वापराला सवय म्हणायची की व्यसन? तसं बघायला गेलं तर सतत व्हर्च्युअल संपर्कात असणं ही काळाची गरज आहे. चार लोक एकत्र जमलेत आणि प्रत्येकजण फोनकडे बघतोय ही गोष्ट इतकी कॉमन आहे की कुणालाच त्यात आश्चर्य नाही वाटत.
इंटरनेट हा या शतकातला एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. मोठ-मोठ्या राज्यकर्त्यांना, शूर योद्ध्यांना, फिलोसॉफर्सना जे जमलं नाही ते या शोधानं करून दाखवलंय, आणि ते म्हणजे जगाला एकत्र आणणं.
ग्लोबलायझेशनच्या या जादूमुळे आज अशक्य वाटणाºया गोष्टी करणंही शक्य झालंय. कुठेही जाण्याआधी आपण तिथे जायचा रस्ता, ती इमारत, आजूबाजूच्या खुणा, ट्रान्स्पोर्टचे आॅप्शन्स, अशा सगळ्या डिटेल्स पाहू शकतो. घरबसल्या जगभरातलं कुठलंही काम करू शकतो. जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढू शकतो. त्यांच्याशी दिवसभर गप्पा मारू शकतो. बिलं भरू शकतो. कुठलीही माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. मनोरंजनाचे तर असंख्य मार्ग इथे सापडतात. यू ट्यूबवरचे व्हिडीओज, कितीतरी प्रकारचे गेम्स, फूड शोज, मुव्हीज... कधीही न संपणारी लिस्ट आहे ती.
म्हणजे खरंच ही न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. मग प्रॉब्लेम कुठे येतो? आपण मगाशी जे म्हणत होतो ना, ‘सवय की व्यसन’, तोच प्रॉब्लेम आहे.
वापर प्रमाणात होतोय की प्रमाणाबाहेर? जेव्हा आपलं मोबाइलशिवाय पान हलत नाही, तो नसला तर आपण कासावीस होतो, आणि त्याच्या वापरामुळे आपली महत्त्वाची दैनंदिन कामं होत नाहीत, तेव्हा समजायचं की थोडा विचार करायची वेळ आलीये. सुरुवात होते शर्विलसारखी...
करायला दुसरं काही नाही, एकटेपणा, कुणाशी बोलायची संधी नाही म्हणून. काही वेळा दोस्तांचा दबाव असतो. काहीजणांना कुठलाही छंद नसतो, खेळ, व्यायाम यांचा कंटाळा असतो. काही वेळा फार समज येण्याआधीच स्मार्टफोन हातात येतो. काही मुलांना पोर्नोग्राफीची चटक लागते.
अशी अनेक कारणं असतात. शिवाय ‘फोमो’ म्हणजे ‘फिअर आॅफ मिसिंग आउट’ आहेच. आणि मग कुणाशी प्रत्यक्ष बोलायचं म्हणजे अंगावर काटा येतो. बसून बसून वजन वाढतं. पाठदुखी, डोळेदुखी अशी दुखणी तरुणपणातच मागे लागतात. इतरांशी सतत तुलना होत राहते. इतरांचं आयुष्य किती आकर्षक, मोहमयी आहे आणि त्यामानानं आपण किती बोअर आयुष्य जगतोय अशी टोचणी लागते. काहींना त्यामुळे डिप्रेशनही येतं.
कितीतरी मुलं-मुली भुलतात, फसवली जातात. त्यांच्या पर्सनल माहितीचा गैरवापर होतो, फोटोंचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी होतो. कुठलीही माहिती, फोटो, मेसेज इंटरनेटच्या जाळ्यात कायमचे राहतात याचा विचार न करता टाकलेल्या पोस्ट्स नंतर कधीतरी भुतासारख्या मानगुटीवर बसतात. कारण नोकरीवर घेण्याआधी फक्त तुमची क्वालिफिकेशन्सच नव्हे तर तुमची इंटरनेट हिस्टरीसुद्धा चेक केली जाते.
कॉम्प्युटर्स, मोबाइल फोन्स, इंटरनेट यांचं वय फारतर वीस-पंचवीस वर्षाचं. त्याआधीची काही वर्षं टीव्हीसुद्धा सगळ्यांकडे असायचाच असं नाही. पण तुमची जनरेशन या गॅझेट्स बरोबरच जन्माला आली आणि मोठी झाली. मोबाइल फोनशिवाय आयुष्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतका तो तुमच्या रूटीनचा भाग झालाय. तो वापरणं बंद करा असं मुलांना मी सांगणार नाही आणि कोणी सांगितलं म्हणून त्यांना ते पटेल असंही नाही. पण एक प्रयोग करता येईल. तरुणांबरोबर सगळ्यांनीच तो करून पाहा..
रोज झोपण्याआधी एकदा खोल श्वास घ्या, दिवसभराचा आढावा घ्या, स्वत:चीच जरा उलटतपासणी घ्या. आणि स्वत:ला विचारा, आपण मोबाइलचा वापर करतोय की मोबाइल आपला वापर करतोय?..

(लेखिका ज्येष्ठ समुपदेशक आहेत. vrdesh06@gmail.com)

Web Title: Foamy: Are You Using Mobile or Mobile?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल