कुत्री, मांजरं आणि बकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:03 AM2019-03-24T06:03:00+5:302019-03-24T06:05:05+5:30

होळी म्हटलं की रंग आणि पिचकाऱ्या घेऊन मुलं जो काही धिंगाणा घालतात, त्यानं पालक धास्तावले होते; पण यंदा एकाही मुलानं ना रंग मागितला, ना पिचकारी ! यावेळी ते काय करणार आहेत, याची खबरही त्यांनी कोणाला लागू दिली नाही. मग या मुलांनी केलं तरी काय?

Eye opening experiment of children on the occasion of Holi.. | कुत्री, मांजरं आणि बकरी!

कुत्री, मांजरं आणि बकरी!

googlenewsNext
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन
चौथीतल्या पीयूषला मार्च सुरू झाला आणि पिचकारीची आठवण झाली होती. तेव्हापासून ते रविवारपर्यंत त्याने ‘पिचकारी आणायला कधी जायचं?’ या एकाच प्रश्नाने बाबाचं रोज डोकं खाल्लं होतं. पिचकाऱ्या बाजारात मिळायला लागल्यावर त्यातली एक आणून द्यायला बाबाची काही हरकत नव्हती; पण एकदा पिचकारी घरात आली की पीयूष आणि त्याचे मित्र काही होळी, धुळवड किंवा रंगपंचमीची वाट बघणार नाहीत हे आईबाबाला नक्की माहिती होतं.
एकदा हातात पिचकारी आली की ते शाईचं पाणी करणार, स्केचपेनमधली शाई बाहेर काढून त्याने रंग खेळणार, शिवाय वॉटर कलर्स तर असतातच! असले रंग आणि पिचकाºया घेऊन मुलं रोज सोसायटीच्या आवारात खेळतील याची पीयूषसकट सगळ्यांच्या आईबाबांना खरं म्हणजे भीती वाटत होती. सरळ आहे ना! लहान मुलांच्या हातात रंग आणि पिचकाºया मिळाल्यावर ते काय रंगवतील याचा काही नेम नाही. लोकांच्या पार्ककेलेल्या गाड्या आणि स्कूटर्स, वाळत घातलेले कपडे, सोसायटीची सहा महिन्यांपूर्वी स्वच्छ व्हाइटवॉश दिलेली कंपाउण्ड वॉल, एकमेकांचे कपडे आणि तोंडं... रंगात खराब करण्यासाठी एखादा कपडा वाया घालवण्याची आईबाबांची तयारी होती; पण रोज एक??? छ्या!
आणि त्यामुळेच पीयूष आणि त्याच्या सोसायटीतल्या ६-७ मित्र-मैत्रिणींना त्यांच्या आईबाबांनी काय वाटेल ती कारणं सांगितली होती; पण होळीच्या आधीच्या रविवारपर्यंत पिचकारी आणून दिलेली नव्हती. आज फायनली सगळ्या आईबाबांनी ठरवलं की आता तीन दिवसांवर होळी आहे तर आता पिचकाºया आणायला काही हरकत नाही. म्हणून बाबाने सकाळी नास्ता करताना पीयूषला हाक मारली आणि म्हणाला,
‘‘पीयूष, तुला पिचकारी हवी होती ना? चल आपण घेऊन येऊ.’’
त्यावर शांतपणे गाड्या खेळत बसलेला पीयूष म्हणाला, ‘‘मला नकोय.’’
‘‘अरे!’’ आईबाबाने एकमेकांकडे बघितलं, ‘‘तुला हवी होती ना?’’
‘‘हो, पण आता नकोय.’’ सगळ्या गाड्या पलंगाखालच्या गॅरेजमध्ये पार्क करत पीयूष म्हणाला. आता आईबाबाला काही कळेना. ज्याने दोन आठवडे पिचकारी पाहिजे म्हणून डोकं खाल्लं, तो आता नको का म्हणतोय? आईला वाटलं की बहुतेक त्याला मागितल्याबरोबर दिली नाही म्हणून तो रुसलाय. ती त्याला चुचकारत म्हणाली,
‘‘अरे असं काय करतोस? मीपण येते. आपण तिघं बाजारात जाऊ आणि तिथली सगळ्यात मोठ्ठी आणि सगळ्यात भारी पिचकारी घेऊन येऊ.’’
‘‘हो हो. तुला हवी ती आणू. चल आता लवकर.’’ बाबा घाईघाईने हातातली खाऊन झालेली ताटली सिंकमध्ये ठेवत म्हणाला, ‘‘म्हणजे तिथे दहा दुकानं फिरायला वेळ मिळेल आपल्याला.’’
आता पीयूषने गाड्या खेळणं पूर्ण थांबवलं आणि म्हणाला, ‘‘मला नको आहे पिचकारी.’’
‘‘अरे पण का? आमच्यावर चिडलास का?’’ आईने न राहवून विचारलंच.
‘‘नाही.’’ असं म्हणत पीयूषने मेकॅनो खेळायला काढला.
‘‘मग निदान का नकोय ते तरी सांग.’’
‘‘आमचा प्लॅन बदलला.’’
‘‘कसला प्लॅन?’’
‘‘ते आमचं सिक्रे ट आहे.’’
‘‘कसलं सिक्रे ट?’’
‘‘बाबा, मी जर तुम्हाला सांगितलं तर ते सिके्रट राहील का? तुम्ही पण ना..’’ एवढं साधं कसं कळत नाही असा चेहरा करून पीयूष मेकॅनो घेऊन घर बनवत बसला. त्यानंतर आईबाबाने तºहेतºहेने विचारूनसुद्धा त्याने त्यांचं काय सिक्रेट आहे याचा पत्ता लागू दिला नाही. आता आईबाबाला वेगळीच भीती वाटायला लागली. हातात पिचकारी दिली तर मुलं काय करतील याचा त्यांना चांगला अंदाज होता. पण हे पिचकारी न आणता यांचं काय सिक्र ेट असेल आणि त्यातून ते काय वाढवा उद्योग करतील या कल्पनेने ते अस्वस्थ झाले. शेवटी आईने नास्त्याला केलेले दोन पराठे एका ताटलीत झाकून घेतले आणि ‘‘सामंत वहिनींना चवीला देऊन येते’’ असं म्हणून ती सामंतांच्या घरी गेली. त्यांची देविका पीयूषच्याच वर्गात होती. त्यामुळे हा पिचकाऱ्यांचा काय प्रकार आहे हे तिथे तरी समजेल असं आईला वाटत होतं. पण छे! देविकानेही पिचकारी आणायला ठाम नकार दिला होता आणि तीही त्याचं कारण सांगायला तयार नव्हती. मग पीयूषची आई आणि देविकाची आई सगळ्या सोसायटीभर फिरून आल्या. त्यातून त्यांना एवढंच समजलं, की सोसायटीतल्या प्रत्येक मुलाने आणि मुलीने रंग खेळण्यासाठी सामान आणायला नकार दिलेला आहे. हा प्रकार अगदी छोट्या मुलांपासून ते कॉलेज संपून नोकरीला लागलेल्यांपर्यंत होता. कोणीही त्याचं कारण सांगत नव्हतं. आता रंग खेळण्याचा दिवस येईपर्यंत वाट बघणं सोडून काही करणं शक्यच नव्हतं.
अखेर तो दिवस उजाडला. सगळी मुलं घाईघाईने नास्ता करून जुने विटके कपडे घालून खाली आली. यांना जर काही रंग खेळायचाच नाहीये तर हे का खाली गेले म्हणून आईबाबा बघायला गेले, तर स्वच्छ पाण्याने दोन मोठे ड्रम्स भरून ठेवलेले होते. सगळी मुलं काहीतरी खेळत टाइमपास करत होती. असा सुमारे अर्धा तास गेला. मग नोकरीला लागलेला एक दादा एका रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन आला. त्याला कोणीतरी आॅइलपेंटने रंगवलं होतं. बहुदा त्याच्या डोळ्यांत पण रंग गेला असावा, कारण ते सारखं पंजाने डोळा खाजवायचा प्रयत्न करत होतं. त्याला आणल्याबरोबर मोठी मुलं कामाला लागली. एकाने त्याच्या गळ्यात साखळी बांधली, दुसºयाने एका बादलीत साबणाचं पाणी बनवलं, तिसºयाने एक मोठी जुनी चादर आणली आणि सगळ्यांनी मिळून त्या पिलाला स्वच्छ अंघोळ घातली. त्यालाही बहुतेक समजलं होतं की हे सगळे आपल्याला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करताहेत. त्यानेही शांतपणे अंघोळ घालून घेतली. मग त्या सगळ्यांनी त्याला त्या जुन्या चादरीने पुसून काढलं. मग तो तिथेच एका कोपºयात बसला.
जरा वेळाने मोठ्या मुलांनी लहान मुलांना बादलीत पाणी काढून दिलं आणि नैसर्गिक रंग दिले. त्याने ती छोटी मुलं आपापसात खेळत होती. मोठी मुलं मात्र रस्त्यावर इतर टारगट लोकांनी रंगवलेल्या प्राण्यांना अंघोळी घालून स्वच्छ करत होती. संध्याकाळ होईपर्यंत सोसायटीच्या आवारात पाच कुत्री, एक बकरी आणि दोन मांजरं गोळा झाली होती.
अंधार पडला, रंग खेळायची वेळ संपली तशी मुलं पाण्याचे ड्रम्स आवरून घरी गेली आणि इतका वेळ अक्षरश: त्यांच्या आश्रयाला आलेले सगळे प्राणी त्यांचे त्यांचे निघून गेले. हा सगळा प्रकार मोठी माणसं आ वासून दिवसभर बघत राहिली. ‘‘स्वत:च्या सुखाआधी दुसºयाचं दु:ख दूर करावं’’ हे त्यांनी आयुष्यभर फक्त ऐकलेलं होतं, पण त्यांना ओलांडून त्यांच्या मुलांनी ते प्रत्यक्षात आणलेलं होतं. कारण पीयूष म्हणाला तसं, ‘‘आम्ही पुढचं व्हर्जन आहोत बाबा.. आम्ही जास्त भारी असणारच ना!’’

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: Eye opening experiment of children on the occasion of Holi..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.