‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा

By अोंकार करंबेळकर | Published: October 28, 2017 02:38 PM2017-10-28T14:38:55+5:302017-10-30T14:42:51+5:30

ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी....

Experiencing 'Feeling' 'Lal Pari' vaya Khutadpada | ‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा

‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा

googlenewsNext

- ओंकार करंबेळकर


ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी आदिवासी पाड्यावर जाणारी मुक्कामी बस पकडली आणि गेलो त्यांच्याबरोबर रात्रीवस्तीला. त्यानिमित्त एसटी आतून आणि बाहेरूनही अनुभवता, समजून घेता आली. एसटी कर्मचा-यांच्या आणि ‘लाल परी’च्या प्रवासाचा हा ‘थक्क’ करणारा अनुभव..

मिठाच्या पाण्यात बुडवलेले आवळे, चिंचा, करवंद, जांभळं, कैºया आणि उसाचा रस हा संच एसटीच्या लाल गाडीबरोबर आलाच पाहिजे, अशी लहानपणी ठाम समजूत होती. मे महिन्यामध्ये रत्नागिरीला जायचं किंवा कोल्हापुरात परतायचं म्हटलं की या गोष्टी पाहिजेतच, त्याशिवाय प्रवास अशक्य असं मतच होतं. एसटीच्या बसशिवाय दुसरे पर्याय नसल्यामुळे तिचा भरपूर वापर व्हायचा; पण नंतर पर्याय आल्यावर एसटीचा प्रवास हळूहळू कमी झाला. यावर्षी नेमक्या दिवाळीच्या दिवसांमध्येच एसटीच्या कर्मचाºयांनी अभूतपूर्व संप केला आणि नंतर चार दिवसांनी त्यांना तो मागेही घ्यावा लागला. संपाच्या काळातल्या बातम्यांमुळे ‘लाल परी’ वगैरे म्हणवल्या जाणाºया एसटीची स्थिती आणि त्याहून तिच्या कर्मचाºयांच्या समस्या गंभीर असल्याचं लक्षात येत होतं. ‘वाट पाहिन; पण एसटीनेच जाईन’... प्रवाशांच्या सोयीसाठी या घोषणा, ब्रीदवाक्यं नक्की लोकांसाठी आहेत की नाहीत तेच समजत नव्हतं. संप बेकायदेशीर जाहीर झाला असला तरी त्यांचे प्रश्न सुटलेच नव्हते त्यामुळे स्वत: जाऊनच नक्की काय चाललंय, हे पाहुया असं ठरवलं...
संपाच्या काळात बातम्यांमध्ये ‘घाई’ला आलेल्या गाड्या पाहून एसटीच्या स्थितीचा अंदाज येत होताच; पण शहरी भागात असं आहे तर बाकी भागात काय स्थिती असेल?.. म्हणून शहरी नाही, ग्रामीण नाही सरळ आदिवासी भागातच जाऊ असा विचार करून दुपारी पालघरवरून खुताडपाडा नावाच्या पाड्यावर जाणाºया एसटीत बसलो. आता जिल्हा झाला असला तरी पालघर गावाने तालुक्याची कळा सोडलेली नाही. पालघर सोडल्या सोडल्या काहीवेळात खड्ड्यांनी हजेरी लावली. मुख्य रस्ता सोडल्यावर लहान लहान पाड्यांवरून एसटी जाऊ लागली. एकच चिंचोळा खडकाळ रस्ता, त्यातून उडणारी लालसर धूळ आणि समोरून एखादी जरी गाडी आली तरी केवळ दोन गाड्यांनीच होणारा ट्रॅफिक जाम!.. असं करत पाऊण तासात त्या पाड्यावर पोहोचलो. थोडी गर्दी कमी झाल्यावर बसमध्येच कंडक्टर सचिन बोरसे आणि ड्रायव्हर मेरे या दोघांशी ओळख करून घेतली. पालघरला परतल्यावर त्या दोघांना सातपाटी वगैरे आणखी दोन खेपा करायच्या होत्या. रात्री पुन्हा ते खुताडपाड्यालाच वस्तीच्या बसने येणार होते. आता ओळख झालीच आहे म्हणून त्यांना म्हटलं मग मी रात्री तुमच्याबरोबर पुन्हा येऊ का? मी इथेच राहीन रात्री. त्यावर ते दोघं चमकले.
‘हो, पण मच्छरदाणी लागेल तुम्हाला.’
म्हटलं, मच्छरदाणी तर नाही; पण ओडोमॉस आणेन पालघरातून. ते दोघेही म्हणाले, पण बघा कसं होतंय ते. त्यांच्याशी बोलत असतानाच पालघरला एसटी परतली आणि मी डेपोत उतरलो. पालघरच्या मुख्य केंद्रीय कार्यालयातील सात डेपोंपैकी हा मोठा आणि महत्त्वाचा डेपो समजला जातो. बोरसे-मेरे जोडी आता साडेसातनंतर परतणार होती आणि सव्वाआठच्या गाडीने आम्ही खुतडपाड्यावर जाणार होतो. ड्रायव्हर, कंडक्टर विश्रांती घेतात त्या जागी थोडावेळ जाऊ म्हणून एका पत्र्याच्या शेडसारख्या लांबलचक खोलीत गेलो. लांबलांबून आलेले खाकी पँटीतले, बनियन घातलेले ड्रायव्हर, कंडक्टर तेथे आराम करत होते. बहुतेकांच्या मोठमोठ्या ट्रंका होत्या. ट्रंकांच्या रांगा लावून प्रत्येकाने आपापली जागा निवडली होती, एकीकडे बाथरूम आणि शौचालय. संपासाठी भेटायला आलोय म्हटल्यावर सगळे एकदम चार्ज झाल्यासारखे झाले आणि घोळका करूनच बसले. सगळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं, कानात खुपसलेल्या वायर काढल्या आणि एकदम जोरात बोलू लागले. यांचे पगार फारच कमी असल्याचं संपाच्या काळात ऐकलेलं होतं म्हणून मुख्य प्रश्नावरच त्यांना आधी विचारलं. त्यावर सगळे तावातावाने बोलू लागले. सात-आठ हजारसुद्धा पगार हातात येत नाही आमच्या, मग आम्ही घरं कशी चालवायची तुम्हीच सांगा?..
बहुतेक लोक तिशी-चाळिशीचे होते. काही अगदीच नवीन, नोकरीला लागून तीन-चार वर्षेच झालेले कर्मचारी होते. त्यातला एक अगदीच तरुण होता. म्हणाला, ‘साहेब चार वर्षे झाली. दीडशे रुपये पगार वाढला फक्त!’
एका ड्रायव्हरने आपली पेमेंट स्लीप दाखवली. त्यानंतर सगळ्यांनीच पाकिटांतून आपापली स्लीप काढली. एक २१ वर्षे नोकरी पूर्ण झालेले कंडक्टर स्लीप दाखवू लागले. त्यांचा बेसिक पगार होता ९६२१ त्यावर महागाई भत्ता १२,०२६, घरभत्ता ९६२, धुलाईभत्ता ५०, मेडिकल ५३ आणि रात्रवस्तीचे व इतर भत्ते मिळून १२६५ रुपये मिळून त्यांचा पगार २३,९७७ होता. पण सोसायटीचे कर्ज व इतर कर जाऊन त्यांच्या हातात केवळ १५,४०६ रुपयेच पडत होते. ते म्हणाले २१ वर्षे नोकरी करून ही स्थिती आहे. ही असली पगारवाढ पाहून मी एकाच मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. आपल्याबरोबर पोरांचे हाल नकोत.
त्यांचं बोलणं झाल्यावर म्हटलं, ‘तुम्ही सगळ्यांनी एसटीच्या बँकेचंच कर्ज का घेतलं?’, तर एक वाहक (हे कर्मचारी खास सरकारी मराठीत बोलत होते, मी ड्रायव्हर- कंडक्टर- डेपो म्हटलं तरी ते चालक-वाहक-आगार असंच बोलायचे. किंवा माझं बेसिक चार हजार पाचशे आहे म्हणण्याऐवजी ‘चारपाचशे’ बेसिक असंच सांगत होते.) म्हणाले, ही स्लीप बघून आम्हाला बँका उभंसुद्धा करून घेत नाहीत. मग एसटीच्या बँकेशिवाय पर्याय नाही. शिवाय पगारात भागत नाही म्हणून तिथं जावंच लागतं. ही बँक सव्वाबारा टक्क्याने कर्ज देते. आराम करायचं हे ठिकाण थोडं स्वच्छ दिसत होतं, त्याबद्दल विचारणार त्याआधीच एकानी निळ्या कपड्यातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसलेल्या पोरांच्या घोळक्याकडे बोट दाखवलं. हे जिल्ह्याचं ठिकाण म्हणून सफाईसाठी यांच्या कंपनीला काम आउटसोर्स केलंय. त्यांना पगार विचारा असं म्हणत त्यांनीच त्यांना पगार विचारला, त्यातल्या एका पोराने ‘साडेआठ’ असं उत्तर दिलं. ‘‘बघा! म्हणजे इथं यांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. नक्की कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा तेच कळत नाही. आता आपण ज्या खोलीत बसलोय त्यावर सिमेंटचे पत्रे असूनही त्यावर लोखंडी पत्रे घातलेत. मग हे असले भंपक बिनकामाचे खर्च करून काय मिळतं? त्यापेक्षा आमच्या सुविधांकडे लक्ष द्या ना, तो भिंतीवरचा फॅन बंद झालाय हे लक्षात आणून दिलं तरी दुरुस्त करत नाहीत; पण पत्र्यावर पत्रे घालायला पैसे आहेत त्यांच्याकडे.’’ आमची अशी चर्चा सुरू असताना बोरसे आणि मेरे बस घेऊन आले. रात्री साडेआठची गाडी घेऊन आम्ही आता परत खुताडपाड्याला जाऊ लागलो. शेवटची गाडी असल्यामुळे दुपारपेक्षा गाडी भरलेली दिसत होती.
पालघर सुटल्यावर गच्च काळोखातूनच बस जात होती. क्वचित वळणांवर सौरदिवे होते. दुपारच्या खुणा काहीच ओळखू येत नव्हत्या इतका काळोख झाला होता. पाड्यावर गेल्यावर ड्रायव्हरनी गाडी बाजूला लावली. गाडीच्या बरोबर वर एक बंद पडलेला सौरदिव्याचा खांब होता. बोरसे म्हणाले आम्हाला हा एकच आधार होता, तोपण बंद झालाय. तसे जवळच्या घरांमध्ये एकेक दिवे मिणमिणते दिसत होते; पण त्याचा यांना काहीच उपयोग नव्हता. एसटीच्या बसमधली एकच ट्यूबलाइट लावली आणि काही बसायच्या सीट्स दोन सिट्सच्या मध्ये पुलासारख्या टाकून त्याच्यावरच आम्ही डबे उघडले. जेवताना बोरसे म्हणाले, ‘सगळे दिवे लावले तर बॅटरी उतरेल आणि आपल्यालाच सकाळी गाडी ढकलायला लागेल’ म्हणून या एकाच ट्यूबमध्ये भागवायचं.
जवळपास पाण्याचीद्धा सोय दिसत नव्हती. ते दोघे मच्छरदाणी वगैरे लावून दोन सिटांच्यामधल्या जागेत झोपायच्या तयारीला लागले. त्यांना तुम्ही झोपा असं सांगून मी जवळच्याच आदिवासी घराच्या ओसरीवर जाऊन बसलो.
भात कापणीचे दिवस असल्यामुळे साडेनऊ-दहा वाजले तरी पाड्यावर थोडी जाग होती, नाहीतर हे पाडे अंधार पडल्यावर एकदम शांत होऊन जातात. खुताडपाड्यावर बहुतेक लोक ‘मल्हार कोळी’ (महादेव नव्हे) होते. शेजारच्या पाड्यांमध्ये वारली लोक राहातात. ओसरीवरच भाताच्या पेंड्या बांधायला लागणाºया दोºया वळायचं काम सुरू होतं. पेंड्या बांधणाºया नवरा-बायकोशी बोलू म्हणून एसटी संपाच्या काळात तुम्ही प्रवासाचं काय केलंत विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ‘चार-दिवस पालघरला गेलोच नाही, मुलगी तिकडे नोकरी करते तिही नोकरीला जाऊ शकली नाही.’
पाड्यावर पाण्याची सोय फक्त एका विहिरीवर होती. बाकी कोठेच पाणी नव्हते. थोड्या अंतरावर नदी आहे; पण ते गावात आणायची कोणतीही सोय नव्हती. ते आदिवासी म्हणाले, ‘‘सूर्या नदीचं पाणी तिकडे शहरांना देतात; पण आमच्यासाठी काहीच सोय नाही.’’ ड्रायव्हर-कंडक्टरसाठी पाण्याची सोय नव्हतीच. त्यांनी पालघरमधून भरपूर बाटल्या भरून आणल्या होत्या, त्यावरच त्यांना जेवण करावं लागलं होतं. दुर्भिक्षामुळे सगळ्यांनाच पाणी जपून वापरायला लागत होतं.
एसटी हाच त्यांचा मुख्य आधार होता. इथून सगळ्या गाड्या पॅक होऊनच जातात असं बरंच काही ते बोलत बसले.
थोडावेळ बोलून एसटीत आलो तर हे दोघे झोपले होते. बसचा आणि तिच्या लोखंडाचा येणारा विशिष्ट वास कमी होण्यासाठी एक-दोन उदबत्त्या खिडक्यांमध्ये खोचून, उंदिर येऊ नयेत म्हणून त्यांनी खिडक्या बंद केल्या होत्या. बसच्या सीटवरच झोपायचा प्रयत्न केला; पण खुताडपाड्याचे डास आज पार्टीच्या मूड असावेत. माझ्या कानाशी, तोडांशी गाणी म्हणत डासांनी यथेच्छ जेवणं उरकली. नंतर ओडोमॉसच्या वज्रलेपानंतर थोडी झोप आली. मग आम्ही पहाटे पावणेपाचलाच सगळे उठलो. सकाळी सहाची बस असल्यामुळे लवकर आवरावं लागणार होतं. पहाटेच्या थंडीमुळे गाडी चांगलीच 
गारेगार झाली होती. बसच्या बाहेर येतो तोच अंधारात पहिल्या बसने पालघरला जाणारे लोक बुट्टया, बादल्या, गाठोडी घेऊन बसले होते. पालघरमधून भरून आणलेल्या बाटल्यांच्या मदतीनेच आन्हिकं उरकली.
बोरसे म्हणाले, ''आता शाळेला सुटी आहे म्हणून गदी कमी आहे. नाहीतर बस भरुन जाते. शाळेला जाणारी मुलं आणि इतर लोकांमुळे इथूनच बºयाचशा लोकांना 'स्टँडिंग' जावं लागतं.'' आवरुन झाल्यावर बरोबर सहा वाजता त्या दोघांनी बस सोडली. पुन्हा थोडं बोलणं झालंच. बोरसे म्हणाले, ''सरकारने भरपूर प्रकारच्या सवलती लोकांना देऊन ठेवल्यात, ज्येष्ठ नागरिक, अपंग, आदिवासी पुरस्कार, खेलरत्न, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, विधानमंडळाच्या आजीमाजी सदस्यांना व त्यांच्याबरोबर एका व्यक्तीला मोफत प्रवास करता येतो. अशा सवलती सरकार स्वत: जाहीर करते पण त्यामुळे महामंडळाला येणारा खर्च मात्र देत नाही. ते पैसे मिळाले तरी एसटीचं मंडळ तोट्यातून थोडं बाहेर येईल. सवलती जाहीर केल्यावर नाव त्यांचं होतं पण खर्च आमचाच होतो. आम्ही किती कमी पगारात जगायचं अजून? आता हंगामात एसटीचं भाडं वाढतं पण ते कोणाला माहितीच नसतं. परवा हंगाम सुरु झाल्यावर शाळेच्या पोरांकडे नेहमीपेक्षा एक रुपयाही जास्त नव्हता. मी पहिल्याच दिवशी ३६ रुपये स्वत:च्या खिशातून घातले. असं कसं चालवणार आम्ही. साईडमिररला काही झालं तरी ड्रायव्हरच्या पगारातून त्याचा खर्च भरुन घेतात.''
काल दुपारी १ वाजता ही ड्रायव्हर-कंडक्टरची जोडी ड्युटीवर हजर झाली होती. जवळच्या गावांमध्ये दिवसभर फेºया मारुन ते रात्री पाड्यावर वस्तीच्या गाडीबरोबर राहिले होते. आता पालघरला पोहोचल्यावर त्यांना जव्हारला जावं लागण़ार होतं. मगच त्यांची ड्यूटी संपणार होती. कालपासून
'एसटी' आतूनबाहेरुन थोडी समजायला लागली होती. त्या आठवणीतल्या चिंचा-आवळ््यांविनाच तोंड आंबट झालं, नव्हे कडूच झालं. लाल परी वगैरे विशेषण नाही तर उपहास आहे असं खात्रीनं वाटायला लागलं.

सांगा, संसार कसा करायचा?
अचानक एका एसटी कर्मचा-यानं खिशातून काहीतरी लिहिलेली लांबलचक पट्टी काढली. त्यावर आडवे रकाने करून आकडे लिहिलेले. ही होती त्यांची पगाराची स्लीप. चार वर्षे नोकरी करणाºया त्या ड्रायव्हरचा बेसिक पगार होता ४,७०० रुपये, त्यावर ५८७५ महागाई भत्ता, ४७० रुपये घरभाड्याचे, ५० रुपये धुलाई भत्ता, रात्रीवस्ती केल्याबद्दल मिळणारा ६५१ रुपये भत्ता (हे अंतरानुसार बदलते) असा त्यांना साधारण साडेअकरा हजाराच्या आसपास पगार मिळत होता. नंतर १२६९ रुपये भविष्यनिर्वाह निधीपोटी कापले जातात, २०० रुपये व्यवसाय कर कापलेला दिसत होता. पगारात भागत नाही म्हणून त्या ड्रायव्हरने दिवाळी उचल घेतलेली होती. त्याचा हप्ता १००० आणि एसटीच्या बँकेच्या कर्जाचा हप्ता ९०० रुपये कापलेला होता. त्याच्या हातात कसेबसे ८३३१ रुपये आलेले होते. हे आकडे दाखवून तो म्हणाला, पालघरमध्ये खोली घ्यायची तर अडीच हजार लागतात, लाइटबिल वगैरे इतर खर्च करून आमच्या हातात काहीच पडत नाही, तुम्हीच सांगा या पगारात आम्ही संसार कसा करावा. त्यांचं बोलणं सुरू असताना मी मध्येच ‘सेव्हिंग’ शब्द उच्चारला. तर ते हसायलाच लागले. एक भोकं पडलेला बनियन घातलेले कंडक्टर मी आल्यापासून तावातावाने बोलत होते तेच म्हणाले, ‘‘अहो हा शब्द डेपोत उच्चारायचा नाही. एसटीत पाऊल टाकलं की सेव्हिंग विसरायचं!’’

जेवणासाठी ११ रुपये, कुटुंबासाठी मेडिकल भत्ता ५३ रुपये!
दुपारी खुताडपाड्याला जाताना रस्त्यात खड्डे चांगलेच जाणवत होते, असल्या रस्त्यामुळे पाठीचे आणि कंबरेचे त्रास कोणाला झाले का असं या एसटी कर्मचा-यांना विचारताच एक वाहक म्हणाले, ‘‘कोणाला हा त्रास नाही ते विचारा. सगळ्यांच्या पाठीत ‘गॅप’ आहे. संपूर्ण कुटुंबासाठी आम्हाला मंडळ ५३ रुपये मेडिकल भत्ता देतं, यापेक्षा दुसरी चेष्टा नसेल. काही औषधपाणी करून बिल दाखवलं तर ते आधी एसटीच्या डॉक्टरला दाखवावं लागतं मग मुख्यालयात त्यात शंभर शंका काढतात, ही ट्रीटमेंट चालणार नाही, हे नको, फक्त गोळ्याच चालतील.. असं करत कसंबसं निम्मं बिल मिळतं. ५३ रुपयांप्रमाणे दुसरी चेष्टा आहे ती रात्रवस्ती जेवणाची. रात्रवस्तीला जेवणापोटी आम्हाला ११ रुपये मिळतात. या ११ रुपयांमध्ये खेड्या-पाड्यांत चालक-वाहक ४० लाखाची गाडी घेऊन राहतात. कोणी दगड मारला, काच फुटली, आरसा गेला तर तुझं लक्ष कुठं होतं असं विचारून प्रसंगी आमच्या पगारातून पैसे कापून घेतात!’’
(लेखक लोकमत आॅनलाइनमध्ये उपसंपादक आहेत. onkark2@gmail.com)

Web Title: Experiencing 'Feeling' 'Lal Pari' vaya Khutadpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास