निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 07:00 AM2018-12-09T07:00:00+5:302018-12-09T07:00:03+5:30

खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे.

Excuse - Sawai soor Will be found at the new location ? | निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 

निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 

Next
ठळक मुद्देकालनिश्चिततेमुळे महोत्सवाला मैफलीचा दर्जा न राहता साचेबद्ध सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला

- नम्रता फडणीस -

डिसेंबर उजाडला की संगीतरसिकांना ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’चे वेध लागण्यास सुरुवात होते. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी हे रत्न सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) या आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सवाचे बीज पुण्याच्या मातीत रुजवतो काय आणि त्याचे भव्य अशा सांगीतिक वृक्षात रूपांतर होऊन त्याला ’रसिकतेची’ गोमटी फळं लागतात काय, हा अवघा प्रवास अभूतपूर्वच!  कर्नाटकमधील धारवाडसारख्या एका भागातून आलेल्या मनस्वी कलाकारासाठी पुण्याच्या मातीत अभिजात संगीत रुजवण्याची अन् स्वत:ही रुजण्याची प्रक्रिया नक्कीच सोपी नव्हती. पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से आजही ऐकविले जातात. 
खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे. अंतरंगाला भिडणाऱ्या अभिजात संगीताचा श्रवणानंद कसा घ्यायचा, याची जाणीव रसिकहृदयात विकसित करण्याचं काम या महोत्सवानं नक्कीच केलं. यानिमित्त रसिकांची ‘अभिजात आणि कलासक्त’ होण्याकडे वाटचाल झाली. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत या महोत्सवाच्या मैफली पहाटेपर्यंत रंगायच्या. श्रोतृवर्गाची उत्साही उपस्थिती कायम असायची. त्या मैफलीच्या आठवणी आजही अनेक ज्येष्ठ रसिकांच्या मनात रुंजी घालतात. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या सवाई गंधर्वांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांनी रसिकांचे कान तृप्त केले. पण पूर्वी रंगणाऱ्या या मैफली आता रंगतच नाहीत. कारण महोत्सवाला आलेली वेळेची मर्यादा. एखाद्या मैफलीत कलाकारांच्या अभिजात आविष्काराचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला वेळेचे बंधन घातले जावे का? हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला. या कालमर्यादेमुळे रसिक आणि कलाकारांमधून नाराजीचा सूरही आळविण्यात आला. महाराष्ट्राबाहेर कलकत्ता, त्रिवेंद्रम, बंगळुरूमध्येही महोत्सव होतात; मात्र तिथे अशा नियमांच्या चौकटीला सामोरे जावे लागत नसताना महाराष्ट्रातच का? हे कोडे न उलगडणारे आहे. या कालनिश्चिततेमुळे महोत्सवाला आता मैफलीचा दर्जा न राहता त्याला साचेबद्ध अशा सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप येऊ लागले आहे. 
महोत्सवात दिग्गज कलाकारांच्याही मैफलीही ‘विलंबित’ न होता ‘द्रुत’ होत असल्याने रसिकांसह कलाकारांचाही भ्रमनिरास होतो आहे... महोत्सवात एकाच दिवशी चार कलाकारांच्या सादरीकरणामुळे त्यांच्या कलाविष्कारांचा म्हणावा तसा तब्येतीत आस्वाद घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याकडे आयोजकांचे दुर्लक्ष होत आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. केवळ त्यात खंड पडता कामा नये या वृत्तीमधून महोत्सवाकडे पाहिले जात आहे. यातच आता पेठेच्या संस्कृतीत बहरलेल्या महोत्सवाने कूस बदलली असून, यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला आहे. नव्या जागेत महोत्सव पुन्हा स्थिरस्थावर करणे आणि दर वर्षीप्रमाणेच रसिकांची उत्साही आणि उदंड उपस्थिती त्याला कायम लाभणे, हीच आता आयोजकांपुढची कसोटी आहे....बघू या काय होतं ते!  
(लेखिका ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Excuse - Sawai soor Will be found at the new location ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.