भावनांची साक्षरता

By ऑनलाइन लोकमत on Sun, March 04, 2018 3:50am

सजग व्हायचे, माइंडफुल व्हायचे म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे.

- डॉ. यश वेलणकर सजग व्हायचे, माइंडफुल व्हायचे म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे. बाह्यविश्वात काय घडते आहे ते आपल्याला आपल्या पाच ज्ञानेंद्रियामुळे कळते. आपण समोरील दृश्य पाहतो, आवाज ऐकतो, गंध जाणतो, चव घेतो आणि स्पर्श अनुभवतो. यामुळे आपल्याला आपला भवताल कळतो. ही सर्व माहिती मेंदू ग्रहण करतो आणि त्याचा अर्थ लावतो. मी रस्त्यावरून चालत असताना मला खमंग भज्यांचा वास येतो. हा वास भज्यांचा आहे हे माझा मेंदू ओळखतो. आणि जवळपास कोठे तरी भज्यांचे हॉटेल असणार असा विचार माझ्या मनात येतो. वा, आज मस्तपैकी भजी खाऊया असा दुसरा विचार येतो. हा विचार भावनेला जन्म देतो. भजी खाण्याची इच्छा ही भावना असते.

सजगता म्हणजे माझ्या मनात ही भावना आहे हे जाणणे! भावना कृतीला प्रेरणा देत असतात, त्यावेळी काय महत्त्वाचे आहे ते ठरवत असतात. इच्छा, आशा, निराशा, राग, चिंता, प्रेम, वात्सल्य, कंटाळा, भीती या सर्व भावना आहेत. आपल्या मेंदूत लिंबिक सिस्टीम नावाचा भाग भावनांशी निगडित असतो. यालाच भावनिक मेंदू असे म्हणतात. या भावनिक मेंदूत अमायग्डला नावाचा अवयव असतो. आपल्या संरक्षणासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जे काही घडते आहे ते तो सतत जाणत असतो, त्याला झोपेतही विश्रांती मिळत नाही. कोणतेही संकट जाणवले की तो सक्रि य होतो, प्रतिक्रि या करतो. त्याच्या प्रतिक्रि येमुळे शरीरात काही रसायने पाझरतात, त्याचवेळी मनात भावना, राग किंवा भीती या भावना निर्माण होतात. उदाहरणार्थ. मी भज्यांचा वास शोधत हॉटेलकडे चालत असतानाच पळा पळा असा मोठा गलका माझ्या कानावर पडला.. बाया, माणसे, पोरेटोरे यांचा लोंढा मोठा आवाज करीत माझ्या दिशेने पळत येत होता, एक वेडा बेभान होऊन हातात सुरा घेऊन लोकांच्या मागे लागला आहे असे काहीतरी मला समजले. त्याक्षणी काहीतरी धोका आहे हे माझ्या अमायग्डलाला जाणवते, मला भीती वाटू लागते आणि मीदेखील त्या जमावात सामील झालो, वेगाने पळू लागलो. आता भज्यांचा वास मला जाणवतही नाही, मी जिवाच्या आकांताने धावत सुटतो.

ही धावण्याची कृती भीती या भावनेमुळे घडते. ही भावना खूप तीव्र असेल तर ती माझ्या वैचारिक मेंदूला विचार करण्याची संधीच देत नाही. मुंबईत एल्फिन्स्टन स्टेशनच्या ब्रिजवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली ती अशा भीतीमुळेच घडली. झुंडीत माणसाची सारासारविवेकबुद्धी काम करेनाशी होते आणि तो आततायी कृती करू लागतो. असा आततायीपणा घडू नये म्हणून माणसाच्या मेंदूत खास व्यवस्था आहे. आपल्या मेंदूच्या वैचारिक भागात म्हणजेच प्री फ्रण्टल कोर्टेक्समध्ये अशी काही केंद्रे आहेत जी भावना मनात येतात त्यावेळी सक्रि य होतात आणि भावनांची तीव्रता कमी ठेवतात. आपण सजगतेनं मनात आलेली भावना ओळखतो आणि तिला नाव देतो, त्यावेळी प्री फ्रण्टल कोर्टेक्समधील या केंद्रांना सक्रि य करीत असतो. त्यामुळे भावनांची तीव्रता अतिरेकी प्रमाणात वाढत नाही. आपले वागणे सैराट होत नाही. राग आणि भीती या भावना अनावर होतात त्यावेळी मेंदूतील अमायग्डला तीव्र प्रतिक्रि या करीत असतो. या स्थितीत वैचारिक मेंदूतील केंद्रांना काम करण्याची संधीच मिळत नाही म्हणूनच या स्थितीला इमोशनल हायजॅक म्हणतात. नेहमीच्या स्थितीत बाह्य ज्ञानेंद्रिय माहिती घेतात आणि मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागात पाठवतात. थॅलॅमस हे मेंदूतील इन्फर्मेशन हब आहे, भवतालाची सर्व माहिती तेथे एकत्रित होते. हा थॅलॅमस वैचारिक मेंदू आणि भावनिकमेंदू या दोघांशीही जोडलेला असतो. परिसराची आलेली माहिती या दोन्ही ठिकाणी पाठवणे अपेक्षित असते. तेथे त्या माहितीचा अर्थ लावला जातो, काय महत्त्वाचे हे भावनिक मेंदूत ठरवले जाते, काय करायचे याचा सारासारविवेक वैचारिक मेंदू करतो, त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शरीरातील स्नायंूना तशी कृती करण्याची सूचना मिळते. मला भज्यांचा वास आला आणि माझी पावले त्या हॉटेलकडे वळली त्यावेळी माझ्या मेंदूत असेच घडले होते. पण माणसांचा गलका, त्यांची आरडाओरड आणि पळापळ यामुळे माझ्या जिवाला धोका आहे, अशी तीव्र प्रतिक्रि या अमायग्डलाने केली. त्यामुळे तीव्र भीतीची भावना निर्माण झाली, त्याक्षणी माझ्या मेंदूत वैचारिक मेंदूकडे संदेश गेलाच नाही. भावनिक मेंदूने तेवढा वेळच दिला नाही, आणि त्याने अंध प्रतिक्रिया दिली आणि मी पळू लागलो. काही आणीबाणीच्या परिस्थितीत अशी रिफ्लेक्स अ‍ॅक्शन आवश्यक असते. खेळाडू आणि कमांडो यांना त्याचेच ट्रेनिंग दिले जाते. पण आपल्या रोजच्या आयुष्यात अशी त्वरित प्रतिक्रि या फारशी आवश्यक नसते, अशी प्रतिक्रि या दिली जाते त्यामुळेच रागाच्या भरात खून आणि नैराश्यामुळे आत्महत्या होतात. त्या टाळायच्या असतील तर आपल्या मेंदूला सजगतेचे प्रशिक्षण द्यायला हवे. माइंडफुलनेसचे वेगवेगळे व्यायाम करायला हवेत. आपल्या मनातील भावनांना नाव देणे हा असाच एक उपाय आहे.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत. yashwel@gmail.com)

 

संबंधित

आठवण पुण्यातील जुन्या उपहारगृहांची..... 
निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 
झरे.. झाकीर हुसेन सांगताहेत आपल्या संगीत प्रवासाची कहाणी..
जो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय !
प्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान

मंथन कडून आणखी

आठवण पुण्यातील जुन्या उपहारगृहांची..... 
निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 
झरे.. झाकीर हुसेन सांगताहेत आपल्या संगीत प्रवासाची कहाणी..
जो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय !
प्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान

आणखी वाचा