विदर्भातील नाट्यचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:22 AM2019-01-13T00:22:56+5:302019-01-13T00:25:20+5:30

५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून निर्मिती झालेलं हे ३०-३५ वे नाटक. गेल्या ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत वाहून घेतलेल्या संजय भाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून एकांकिका व नाटकांसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांनी नागपूरच्या भूमीतून विदर्भात स्वतंत्र नाट्यचळवळ उभी झाली आहे.

Drama movement in Vidarbha | विदर्भातील नाट्यचळवळ

विदर्भातील नाट्यचळवळ

Next
ठळक मुद्देसंजय भाकरे : ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत

५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून निर्मिती झालेलं हे ३०-३५ वे नाटक. गेल्या ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत वाहून घेतलेल्या संजय भाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून एकांकिका व नाटकांसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांनी नागपूरच्या भूमीतून विदर्भात स्वतंत्र नाट्यचळवळ उभी झाली आहे.
घोटभर पाणी, केस नं. ९९, मृगाचा पाऊस, बाप हा बापच असतो अशा गाजलेल्या एकांकिका व नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय करणाऱ्या संजय भाकरे यांनी अनेक अडचणींना पार करून आतापर्यंत जवळपास ३० ते ३५ नाटक व ६० च्या वर एकांकिका बसविल्या व सादर केल्या. या सर्व प्रयोगाच्या माध्यमातून १३५ च्या वर नव्या कलावंतांना घडविण्याचे कार्य निश्चितच दखल घेण्यासारखे आहे. त्यांच्या अभिनय कलेची पहिली रसिक असलेल्या आजीच्या कौतुकाने रंगभूमीवर उभ्या राहिलेल्या या कलावंताने अनेक उतार चढाव पाहिले आहेत. मात्र तरुण कलावंतांना संधी मिळावी म्हणून नाट्य चळवळ रुजविण्यासाठी घेतलेले प्रामाणिक परिश्रम महत्त्वाचे ठरले.
सुरुवातीचे सात ते आठ वर्षे वडील मधुकर भाकरे यांच्या आकाशवाणीच्या टीमसह बालनाट्यात सहभाग घेतल्याने वाचिक अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. ही आवड वाढत गेली. शालेय व महाविद्यालयीन जीवनात नाटकांमधील अभिनयाद्वारे त्यांचे नाव चर्चेत आले. त्यांनतर गजानन पांडे यांच्या कंपनीद्वारे निर्मित विविध नाटकातून अभिनय व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत वेगळी ओळख निर्माण झाली. त्यावेळी केलेल्या घोटभर पाणी या एकांकिकेला बहुतेक स्पर्धामधील पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली. पुढे मित्रांना घेऊन उभ्या राहिलेल्या तन्मय संस्थेद्वारे अनेक नाटके सादर केली. २०१४ साली सुरू झाला तो संजय भाकरे फाऊंडेशनचा प्रवास. नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून द्यावा, नागपूर व बाहेरच्या ज्येष्ठ दिग्दर्शकांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे आणि शिबिरासारखे भाषण ठेवण्यापेक्षा एकांकिकांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करावा यासाठी दर महिन्याला एक एकांकिका बसवायची व ती सादर करायची, हा नित्यक्रम त्यांनी चालवला. मृगाचा पाऊस, हॉफ पॅन्ट, चिमणीचं मत कुणाला?, तळ्यात मळ्यात, ओनामा, प्रश्नचिन्ह, बॉम्ब ए मेरी जान, पिद्दी, इंदूचे घर अशा एकांकिकांचे प्रयोग केले. विशेष म्हणजे या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्साही गर्दी केली. फाऊंडेशनद्वारे राज्यस्पर्धांसाठी दरवर्षी नाटकांची निर्मिती होऊ लागली आणि अनेक कलावंत जुळत गेले. याद्वारे राज्यभरातील नामवंत दिग्दर्शकांचे मार्गदर्शन विदर्भातील कलावंतांना मिळायला लागले आहे. अनेकांच्या सहकार्याने संजय भाकरे फाऊंडेशन नाट्य चळवळीप्रमाणे उभी राहिली. आतापर्यंत ४० हून अधिक एकांकिका व काही नाटकांची निर्मिती फाऊंडेशनने केली. रसिकांची दाद, अनेक पुरस्कार आणि महत्त्वाचे म्हणजे नाटकाचे व्यासपीठ नागपुरात व पर्यायाने विदर्भात निर्माण करण्याचे काम संजय भाकरे फाऊंडेशनने केले आहे. सोबतच ७५०० च्यावर नाटकांच्या संहिता फाऊंडेशनच्या लायब्ररीत सुरक्षित असल्याचे संजय भाकरे यांनी सांगितले. रंगभूमीची आवड असलेल्या तरुणांना नाट्यक्षेत्राशी जोडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. आर्थिक पाठबळ नसताना नोकरी सांभाळून रंगदेवतेच्या सेवेत राबणाऱ्या संजय भाकरे यांच्या नेतृत्वात ही नाट्य चळवळ जोमाने पुढे सरकत आहे. झारीतील शुक्राचार्यही मिळाले, पण मित्रांच्या भक्कम आधाराने हे थांबले नसल्याची कृतज्ञता त्यांनी नावासह व्यक्त केली.
निशांत वानखेडे

Web Title: Drama movement in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.