डोनाल्ड ट्रम्प आणि किम-जोंग-उन यांना एकमेकांना सिंगापूरमध्ये का भेटावसं वाटलं? असं सिंगापूरमध्ये काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:00 AM2018-06-17T03:00:00+5:302018-06-17T03:00:00+5:30

सतत एकमेकांवर आग ओकणारे डोनाल्ड ट्रम्प आणि किम-जोंग-उन यांनी भेटायचं ठरवलं, तेव्हा ते शिखर बैठकीसाठी सिंगापूरला आले. या चिमुकल्या देशाची मोहिनी आहेच तशी !

Donald Trump and Kim-Jong- meeting each other in Singapore. | डोनाल्ड ट्रम्प आणि किम-जोंग-उन यांना एकमेकांना सिंगापूरमध्ये का भेटावसं वाटलं? असं सिंगापूरमध्ये काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प आणि किम-जोंग-उन यांना एकमेकांना सिंगापूरमध्ये का भेटावसं वाटलं? असं सिंगापूरमध्ये काय आहे?

Next

-दिनकर रायकर

‘सिंगापूरच्या चांगी विमानतळावर आपलं स्वागत आहे’, असे हवाईसुंदरीचे शब्द कानावर पडताच डोळे उघडले. जगाच्या अतिपूर्वेस वसलेल्या या शहरात येण्याची ही माझी पाचवी वेळ होती. १९८९पासून काही वर्षांच्या अंतरानंतर सिंगापूरला कामानिमित्त येणं होत असे. नव्या बदलांसकट प्रत्येकवेळेस नवं रूप दाखवणारं सिंगापूर स्वागत करायचं. तिथली स्वच्छता, कायद्यांची कडक अंमलबजावणी हे सगळं आवडलेलं होतं, त्याचं कौतुकही होत. वाटायचं, इथले रस्ते, बागा, दिव्यांचा लखलखाट पाहून झाला म्हणजे शहर समजलं. पण तसं नव्हतं. कितीही फिरून झालं तरी सिंगापूर समजणं काही अंगुळं उरायचंच.
सिंगापूर हे असं का होतं? ते का यशस्वी झालं या प्रश्नाचं उत्तर केवळ तिथल्या कायद्यांमध्ये नाही हे आजवर लक्षात आलं होतंच. पण यावेळची भेट मला त्यापलीकडे एक पाऊल घेऊन गेली. एखाद्या गावाचं, शहराचं, देशाचं यश तिथल्या लोकांमुळे असतं. तेथे राहाणारे लोक स्वत:च्या आयुष्याचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा कसा विचार करतात यावर त्या देशाची प्रगती आणि सौख्य अवलंबून असतं.

चांगीवरून आम्ही निवासाच्या ठिकाणी गेलो. हॉटेलमध्ये सगळे सोपस्कार झाल्यावर आमच्या हातामध्ये खोल्यांच्या किल्ल्या ठेवण्यात आल्या. किल्ल्या हातात पडताच हॉटेलचा मॅनेजर म्हणाला, या हॉटेलमध्ये धूम्रपान अजिबात चालणार नाही. स्मोकिंग झोन केलेले आहेत त्याच कक्षांमध्ये जाऊन स्मोकिंग करणं अपेक्षित आहे. हा नियम कृपया गांभीर्याने घ्या. - ही सगळी माहिती एकदम कडक नियमांची आहे; पण तरीही त्याच्या बोलण्यात एकप्रकारचं मार्दव होतंं आणि आग्रहही होता. त्या आग्रही भाषेमुळेच कोणीही सिगारेट ओढायला धजावत नसेल असं वाटलं. नियमांचं गांभीर्य हे त्या नियमांबरोबरच ऐकवण्याची त्याची पद्धत मनापासून आवडली..

 

भूभागाच्या तुलनेत विचार केला तर सिंगापूर हे भारताच्या दृष्टीने अगदी चिमुकलं किंवा त्याहीपेक्षा लहान म्हणावं लागेल. सिंगापूर हे एका बेटावर वसलेलं राष्ट्र. अख्खा देश म्हणजे फक्त एक शहरच. १९६५ साली स्वतंत्र झाल्यावर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडू लागले. १९६७ साली सिंगापूरच्या पंतप्रधानपदी ली कुआन यू आले. ली कुआन यांना सिंगापूरचे शिल्पकारचं म्हटलं जातं. एखादा द्रष्टा नेता संपूर्ण देशाची घडी कशी नीट बसवू शकतो आणि देशाला यशोशिखरावर कसा नेऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ या माणसानं घालून दिला. कदाचित ली कुआन यांच्यासारखी उदाहरणं फारच कमी असावीत. केवळ स्वप्न दाखवून गप्प बसणं हे त्यांच्या विचारात नव्हतंच हे लक्षात येतं. त्यांच्या प्रत्येक कार्याला गती होती, झपाटा होता. दरवर्षी प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला सिंगापूर बदलत गेलं. ली कुआन यांच्या स्वप्नामुळे सिंगापूर हे केवळ पूर्वेच आकर्षक शहर म्हणून न राहाता ते व्यवसायाचं मोठं केंद्र झालं. सिंगापूरला उत्तम बंदराची भेट निसर्गानेच दिली आहे. त्यामुळे सिंगापूरच्या बंदराचा विकासही तितक्याच गतीने झाला. ली कुआन यांनी वाहतुकीचं मोठं केंद्रच बनवलं. सिंगापूर जल, आकाश अशा दोन्ही मार्गाने जोडलं गेल्यामुळं तो आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा मोठा थांबाच झाला. आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा इतरत्र कोठेही जायचं झालं तर व्हाया सिंगापूर हे ठरूनच गेलं आहे. आपल्या शहराला (देशाला) असं महत्त्व यावं यासाठीच ली कुआन आणि सिंगापूरचे लोक झटले. सिंगापूर हे व्यापाराचं मोठं केंद्र झालं आहे. जगभरातील सर्व मोठ्या कंपन्यांची कार्यालयं इथं आहेत. सिंगापूरला काम करायला मिळणं हे एक बक्षीस मानलं जातं.
आम्ही तेथे होतो तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम-जोंग-उन यांच्या भेटीची तयारी सुरू होती. एकमेकांभोवती सतत विखारी भाषेचा वापर करणा-या नेत्यांनी भेटीसाठी हेच शहर निवडलं. सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर त्यांची भेट झाली. ही भेट सिंगापूरला होणार याबद्दल आम्ही भेटलेल्या टॅक्सीचालकापासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांनी आनंद व्यक्त केला होता. या भेटीचं सिंगापूर सरकारने प्रचंड मार्केटिंग केलं होतं. या ऐतिहासिक भेटीचं वृत्तांकन करण्यासाठी जगाच्या कानाकोप-यातून ३००० पत्रकार आले होते.

 

 


१९७७ साली सिंगापूरची नदी आपल्या मुंबईतल्या मिठी नदीपेक्षा वाईट होती. सिंगापूरची पायाभरणी करताना या नदीचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. त्यामुळे १९७७ ते १९८३ अशी सलग सहा वर्षे या नदीची स्वच्छता करून तिच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात आली. हे सगळं काम नियोजनबद्ध झालं. आज या नदीचं वाहतं पाणी पिता येऊ शकतं आणि या नदीच्या दोन्ही काठावर रेस्टॉरंट्स आणि बगिचे उभे राहिले आहेत. हे सर्व त्यांना शक्य आहे तर आपल्याला का नाही, असे प्रश्न सतत पडत राहातात.
एखादा देश उभा करायचा म्हटला की तिथली अर्थव्यवस्था उभी करणं आवश्यक असतं. सिंगापूरच्या हातात सुरुवातीला स्वत:चं असं काही नव्हतंच. त्यामुळे वाहतूक-दळणवळणाच्या उद्योगापाठोपाठ सिंगापूरने दुसरा महत्त्वाचा उद्योग हातात घेतला तो म्हणजे पर्यटन. पर्यटन हा एकमेव व्यवसाय आपल्या देशाला तारून नेऊ शकतो याचा विश्वास सिंगापुरी लोकांना होता आणि आहेही. जास्तीत जास्त लोक आपल्या देशात यावेत, त्यांची सरबराई व्हावी, त्यांनी भरपूर खरेदी करावी आणि परत जाण्याआधी पुढच्या फेरीचे प्लॅन्स त्यांनी आखावेत अशी पुरेपूर आणि तितकीच जबरदस्त योजना इथे केलेली आहे. विमानतळावर उतरताच मयसभेत गेल्यासारखे डोळे विस्फारतात. आपण एका मुक्त पर्यटनाच्या राजधानीत आलो आहोत हे लक्षात येतं.
सिंगापूरमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर राहातात. भारतीय पर्यटकांनी विशेषत: मध्यमवर्गाने पर्यटनासाठी भारताची सीमा ओलांडली तेव्हा पहिली पसंती सिंगापूरलाच दिली. त्यामुळेच आजही भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने सिंगापूरला भेट देतात. २०१६ साली सिंगापूरला दहा लाख भारतीय लोकांनी भेट दिली होती, तर गेल्या वर्षी सिंगापूरला साडेबारा लाख भारतीयांनी सिंगापूरची वारी केली. यावर्षी ही संख्या १८ लाखांवर पोहोचल्याचा दावा सिंगापूर करत आहे. छोट्या-छोट्या क्रुझसफारीमुळे भारतीयांच्या   सिंगापूर वा-यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चित्रपट महोत्सव, चित्रपटांचे पुरस्कार वितरण असे मोठे कार्यक्रम करणा-या आयोजकांचे हे आवडतं ठिकाण आहे. २०१७ या वर्षी जगभरातून १ कोटी ७४ लाख पर्यटकांनी सिंगापूरला भेट दिली होती. सध्या सिंगापूरला चार मोठे विमानतळ आहेत. विमानांची सतत ये-जा इथं सुरू असते. दर तीन सेकंदाला एक विमान सिंगापूरला येतं तरी किंवा इथून झेपावतं तरी !
रिव्हर सफारी, टायगर सफारी, बर्ड सफारी, जगातील सर्वप्रकारची झाडं असणारं गार्डन बाय द बे अशा प्रकल्पांमधून लहान मुलांना आकर्षित करण्याची त्यांची योजना आहे. सिंगापूरमधील विद्यापीठंही तशीच विकसित करण्यात आलेली आहेत. या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ७३ विद्यापीठं आहेत.
व्यवसाय, शिस्त, स्वच्छता यांचं शिक्षण देणा-या सिंगापूरला भेट दिली की, ते सिंगापूरपण भारतीयांच्या बरोबर भारतात यावं असं वाटतं.

(लेखक ‘लोकमत वृत्तसमुहा’चे समूह संपादक आहेत.)

dinkar.raikar@lokmat.com

Web Title: Donald Trump and Kim-Jong- meeting each other in Singapore.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.