- मुकेश माचकर

हॉलिवूड असो, वा बॉलिवूड, दोन्हीकडे कशाहीपेक्षा अधिक ग्लॅमर आणि पैसा ! तिथे यश कमवण्यासाठी रूप, गुणवत्ता आणि नशीब असावं लागतं... ही नशीब नावाची गोष्टच पडद्यामागच्या ‘डर्टी पिक्चर’ची सुरुवात ! इथल्या व्यापाराचं चलन एकच : देह ! संभाव्य यशाची, सुबत्तेची, ग्लॅमरची किंमत या चलनात मोजत जायचं... काही लाभ तात्काळ मिळवायचे, काही सोडायचे ! हा खेळ इथे रोज खेळला जातो... दोन्ही बाजूंनी ! तुम्ही कोण आहात आणि कुठे आहात, यावर तुमचा खेळ होणार, तुम्ही खेळ खेळणार की स्वेच्छेने खेळाबाहेर राहणार, हे ठरतं... आतापर्यंत सुंदर मुली वासनांधांची शिकार होत होत्या, आता मॉडेलिंगपासून ते मालिकांपर्यंतच्या जगातली कोवळी, देखणी,
सुबक तरुण मुलंही वापरून घेतली जातात... हा नियतीचा फिल्मी न्याय वाटू शकतो..
पण, भक्ष्य ते भक्ष्यच !


अरे, जुन्या जमान्यातली ती नटी एक्स्ट्रामधून कशी वर आली माहितीये का? तिला महिन्यातून पाच दिवस निसर्ग तरी सुटी द्यायचा की नाही, कुणास ठाऊक...’
‘ही टॉपची नटी आहे ना, तिची आईच सगळ्या निर्मात्यांकडे फिरते, महत्त्वाचा रोल असेल तर हिलाच द्या, ती सगळी ‘मेहनत’ घ्यायला तयार आहे, असं सांगते...’
‘तो तमका स्टार आहे ना, तो कुठेही शूटिंग करत असला तरी रोज रात्री त्याला ब्लू लेबलची बाटली आणि नवी पोरगी पुरवावीच लागते... विदाउट फेल...’
‘तो तगडा नट होता ना, तो एकदा रात्री दारू पिऊन त्या सुंदर नटीच्या रूममध्येच शिरला बेबंद होऊन... सकाळीच बाहेर पडला... पण ती काही बोलली नाही नंतर त्याबद्दल...’
‘तो तमका माणूस किती कुरूप, काळाकभिन्न होता, माहितीये का? पण त्या काळातल्या सगळ्या आघाडीच्या देखण्या नायिकांनी मिळून त्याला ‘ठेवला’ होता, बोल...’
‘ती हिरोइन तर गर्भश्रीमंत घराण्यातली मुलगी होती. नायिका बनवून तिचा वापर करून झाल्यानंतर निर्मात्यांनी वाºयावर सोडली... एक दलालच तिचा नवरा म्हणून वावरायचा... हातगाडीवरून अंत्ययात्रा निघाली बिचारीची...’
‘वो प्रोड्यूसर मरा ना अ‍ॅक्सिडेंटमे... उस को उस हिरोइन की हाय लग गयी... उस को गनपॉइंट पे उठा के लेके गया था फार्महाऊस पे...’
‘एका सेक्सी साइड रोलसाठी दोन नट्या स्पर्धेत होत्या. एकीला आपला पत्ता कट होणार, हे लक्षात आलं तशी ती प्रोड्यूसरच्या हॉटेल रूमवर गेली. तिथे प्रोड्यूसर, हीरो आणि हिची प्रतिस्पर्धी मदनिका हे सगळे एकत्रच सापडले. ही म्हणाली, अरे, मला विचारलं असतं तर मी काय नाही म्हणाले असते का?...’
...सिनेमाचं परीक्षण करत असतानाच्या काळात ज्येष्ठांकडून ऐकलेले हे सांगोवांगीचे किस्से... आता नव्याने आठवले हार्वे वाइनस्टीनमुळे... हॉलिवूडचा मूव्ही मुघल म्हणून ओळखल्या जाणाºया या चित्रपट निर्मात्याने आपल्याशी लैंगिक दुर्वर्तन केलं, असा जाहीर दावा एका आॅस्करविजेत्या कृष्णवर्णीय अभिनेत्रीने केला आणि काही आठवड्यांमध्येच वाइनस्टीनची पुरती वाताहत झाली. त्याने आपल्याशीही असभ्य वर्तन केलं होतं इथपासून ते त्याने आपल्यावर बलात्कारच केला होता, असं सांगणाºया अभिनेत्री, नवोदित अभिनेत्री, मॉडेल आणि अन्य महिलांनी #ेी३ङ्मङ्म हा ट्रेण्ड आणखी व्हायरल केला. परिणामी हार्वेला त्यानेच स्थापन केलेल्या प्रॉडक्शन कंपनीतून बाहेर काढण्यात आलंय आणि त्याची पत्नीही त्याला सोडून गेलीये.
वाइनस्टीनचे एकंदर प्रताप पाहता, त्याच्या बाबतीत घडलं ते सौम्यच म्हणायला हवं. कायदेशीर कारवाई आणि नुकसानभरपाईच्या स्वरूपात त्याला त्याच्या कृत्यांची पुरती सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही...
मात्र, या आरोपसत्रातून काहीजणांच्या मनात एक प्रश्न नक्की उभा राहिला असेल की या सगळ्या स्त्रिया इतके दिवस गप्प का बसल्या होत्या? कशासाठी शांत होत्या? त्यांनी हे सगळं का सहन केलं असेल?
उत्तर अगदी सोपं आहे, वाइनस्टीनची आणि त्याच्यासारख्याच बड्या हस्तींची खप्पामर्जी टाळण्यासाठी. हॉलिवूडवर स्टुडिओ सिस्टमचा आजही पगडा आहे आणि वाइनस्टीनसारखा प्रबळ निर्माता एखाद्या व्यक्तीचं करिअर घडवू-बिघडवू शकतो, संपवूही शकतो, हे एक सर्वात मोठं कारण आहेच. पण तेवढंच कारण आहे का?
सध्या आंतरराष्ट्रीय स्टार असलेल्या प्रियांका चोपडाने वाइनस्टीन प्रकरणात हॉलिवूडवर बोलताना हिंदी चित्रपटसृष्टीवरही सूचक कमेंट केली. भारतात वाइनस्टीनचे भाऊबंद कमी असतील का? आहेतच. त्यांच्या कहाण्या फिल्म इंडस्ट्रीच्या प्रारंभकाळापासून चर्चेत आहेत... अलीकडच्या काळात कंगना रणौतपासून अनेक अभिनेत्री कुख्यात कास्टिंग काऊचबद्दल थेट बोलतात... आत्ताच रिचा चढ्ढाही यासंदर्भात बोलली आहे आणि हिंदी सिनेमातल्या बहुतेक अभिनेत्रींना अशा प्रकारच्या लैंगिक दुर्वर्तनाला सामोरं जावं लागतं, असं तिनं म्हटलेलं आहे... पण, बहुतेक अभिनेत्रींचं यासंदर्भातलं उत्तर ‘हा प्रकार निश्चितच आहे; पण, मला काही ते भोगायला लागलं नाही,’ असं असतं...
...मग कास्टिंग काऊचला नेमकं बळी पडतं तरी कोण? आणि का?
ज्येष्ठ स्तंभलेखिका शोभा डे यांनी या विषयावर भाष्य करताना सत्तरच्या दशकात नायिका बनलेल्या एका उफाड्याच्या नायिकेच्या आईचा किस्सा सांगितला आहे. ती स्वत:च आपल्या अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो छापायला द्यायची आणि वरून म्हणायची, ‘माझी मुलगी सेक्सी आहे, तर त्यात वाईट काय आहे,’
- आता अशा मुलीकडून वाइनस्टीनच्या देशी बांधवांच्या ‘अपेक्षा’ वाढल्याशिवाय राहतील का?
पन्नास-साठच्या दशकात ए. आर. कारदार यांच्या स्टुडिओमधल्या एका स्क्र ीन टेस्टचे फोटो ‘लाइफ’ या अमेरिकन मॅगझिनमध्ये छापून आले होते... इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या या स्क्र ीन टेस्टमध्ये एक कोवळी मुलगी पूर्ण कपडे घालून येते आणि एकेक कपडा उतरवत शेवटी अंतर्वस्त्रांवर उभी राहते. कारदार आणि मंडळी अगदी गंभीरपणे तिचं निरीक्षण करत असतात... ही तिच्या अभिनयक्षमतेची, कॅमेरायोग्य रंगरूप आहे की नाही, याची ही स्क्र ीन टेस्ट होती का? अशी स्क्र ीन टेस्ट तिने आपखुशीने दिली असेल का? का?
भारतात सिनेमाच्या व्यवसायाला ग्लॅमर येण्याच्या आधीपासून हा व्यवसाय सैल नीतिमत्तेचा व्यवसाय म्हणूनच ओळखला जात होता. सुरु वातीला या व्यवसायात कलावंतिणी आणि सभ्य समाजात स्थान नसलेले नट मोठ्या प्रमाणावर वावरत होते. त्यांना सभ्य समाजात स्थान नव्हतं, सभ्य समाजाची नैतिकताही त्यांच्यावर लादली 

गेली नव्हती. सिनेमाची लोकांवर गारुड करण्याची क्षमता वाढत गेल्यानंतर पडद्यावरच्या प्रतिमांना देवत्व प्राप्त झालं, ग्लॅमर आलं, हा धंदा प्रचंड मोठ्या फायद्याचा ठरू शकतो म्हटल्यावर आधी स्टुडिओ सिस्टम आणि नंतर स्टार सिस्टम आली. त्यात अनेक सुशिक्षित, सुसंस्कृत मंडळी आली. पण, तत्कालीन भारतीय समाजाच्या तुलनेने अपरिचित किंवा नात्याने न बांधलेल्या स्त्री-पुरु षांना फारच मोकळेपणाने रात्रंदिवस एकत्र आणणारं हे क्षेत्र होतं... फिल्मी शब्द वापरायचे तर आग आणि लोणी यांना एकमेकांबरोबर येण्याची संधी होती... लोणी वितळणारच होतं... त्यामुळे, या व्यवसायाचा कासोटा नंतरही सैलच राहिला.
त्यातही परंपरागत पद्धतीने पुरु षांकडे सत्ता अधिक राहिली, त्यांचा वरचष्माही अधिक राहिला. भारतीय समाजाप्रमाणेच चित्रपटांचा व्यवसाय, प्रेक्षकवर्गापासून ते निर्मितीसंस्था आणि कलावंतांमधल्या उतरंडीपर्यंत सगळीकडे पुरु षप्रधानच होता आणि आजही मोठ्या प्रमाणात तसाच आहे. त्यात पुन्हा व्यावसायिक सिनेमाचा प्रधान विषय राहिला आहे तारु ण्यातल्या प्रेमाचा. ज्या सिनेमांमध्ये प्रेमावर फोकस नसेल त्यातही, अगदी सूडपटातही रोमॅण्टिक ट्रॅक असतोच. सिनेमा ही सर्वांना आवडणारी चटकदार भेळ असावी, यातून आलेलं ते कम्पल्शन आहे. व्यावसायिक सिनेमाचा सगळा डोलारा नायकप्रधान. त्यात नायिका ही निव्वळ प्रेमपात्राच्या भूमिकेत. देश-परदेशांतल्या नयनरम्य ठिकाणी, सर्वसामान्यांना अपरिचित अशी शारीर जवळीक, असोशी दर्शवणारी गाणी गात, नायकाशी लगट करत आणि त्याच मिषाने प्रेक्षकांशीही लगट करत पडद्यावर बागडणं, हे तिचं मुख्य काम. नटीमध्ये असे प्रसंग पुरु ष प्रेक्षकाच्या भावना चाळवतील अशा प्रकारे साकारण्याची ‘गुणवत्ता’ असणं अपेक्षित असायचं... आता अशा गुणवत्तेची ‘चाचणी’ साधारणपणे काय प्रकारे होत असेल? कारण, स्त्रीची जागा पुरुषाच्या पायाशी हे पडद्याबाहेरचं, पडद्यावरचं आणि पडद्यामागचंही तत्त्वज्ञान होतं आणि आजही काही प्रमाणात आहे.
अशा या व्यवसायात अन्य कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक ग्लॅमर आणि पैसा आहे. तिथे अशा तडजोडी न करता, देशी वाइनस्टीनांचं भक्ष्य न बनता यश कमावणं शक्य नाही का? आहेच की. त्यासाठी तुमच्याकडे रूप, गुणवत्ता आणि नशीब असावं लागतं... ही नशीब नावाची गोष्टच पडद्यामागच्या ‘डर्टी पिक्चर’ची सुरु वात असते... समसमान गुणवत्ता आणि रूप असलेल्या शेकडो समवयस्क प्रतिस्पर्ध्यांमधून आपलीच निवड व्हायची असेल, तर महत्त्वाकांक्षी माणसांना निव्वळ नशिबावर विसंबून राहता येत नाही... त्यासाठी नशिबाला वळवावं, वाकवावं लागतं... नशीब पालटावं लागतं... ते असतं बुभुक्षित लांडग्यांच्या हातात... हे कधी निर्मात्याच्या रूपात असतात, कधी नायकाच्या रूपात, कधी तंत्रज्ञाच्या रूपात, कधी मध्यस्थाच्या रूपात तर कधी कधी तथाकथित जिव्हाळ्याच्या माणसांच्याही रूपात! त्यांना फक्त एकच व्यापार माहिती असतो... देहाचा! त्यांना एकच चलन माहिती असतं... चमडीचं चलन... लेदर करन्सी! आपल्या संभाव्य यशाची, सुबत्तेची, ग्लॅमरची किंमत या चलनात मोजत जायचं... काही लाभ तात्काळ मिळवायचे... काही देवाचं दान म्हणून सोडून द्यायचे... विचारपूर्वक आहुती देत जायचं... हळूहळू भक्ष्यालाच ‘शिकारी’ बनल्याचा फील येत जातो... हे अधिक भयंकर आणि करुण!
...पण, हा सगळा खेळ ही मंडळी कमालीच्या असोशीने खेळतात. अनेकांना नाव-पैसा कमावण्याच्या पलीकडचं काहीतरी श्रेयस किंवा प्रेयस खुणावत असतं. काहींना ही खात्रीच असते की आपण अभिनय करायलाच जन्मलो आहोत. त्यापेक्षा वेगळं काही करण्याची कल्पना मानवणारी नसते. मग त्या अटळ रस्त्यावरची फरपटही अटळ होते...
काहीजणांना यशाची पायरी चढायला मिळते आणि ते या कचाट्यातून सुटतात... पण, त्यांचं रूपांतर नव्या वाइनस्टीनमध्ये व्हायला वेळ लागत नाही. काहींच्या बाबतीत यशाचे ठोकताळे चुकतात आणि नुसत्याच तडजोडी शिल्लक राहतात. एकेकाळचा दुर्व्यवहार किंवा अत्याचार कधी उभयपक्षी व्यवहार होऊन जातो, हेही कळत नाही. कधी कोरडाठाक, कधी बेतीव ओलाव्याचा, कधी खºयाखुºया आत्मीयतेचा... इथे सगळेच कसलेले अभिनेते... त्यामुळे समोर घडतंय ते यातलं नेमकं काय आहे, हे समजणं अशक्यप्रायच असतं!
...हा खेळ इथे रोज खेळला जातो...
दोन्ही बाजूंनी...
तुम्ही कोण आहात आणि कुठे आहात, यावर तुमचा खेळ होणार की तुम्ही खेळ खेळणार की स्वेच्छेने खेळाबाहेर राहणार, हे ठरतं...
हिंदी सिनेमात किंवा दक्षिणी सिनेमांमध्ये नेपथ्याचाच भाग असावा अशा रीतीने ‘प्रॉप’ म्हणून वापरल्या जाणाºया कचकड्याच्या शोभिवंत बाहुल्यांसारख्या नायिकांच्या, सहनायिकांच्या, व्हॅम्प्सच्या बाबतीत त्यांचा वापर होण्याचं, त्यांच्याशी दुर्व्यवहार होण्याचं किंवा अत्याचार होण्याचं प्रमाण वाढतं... पण, तीच नायिका कसदार आणि आशयपूर्ण अशा भूमिकांमध्ये झळकत असेल, तर तिच्या बाबतीत असले प्रकार कमी प्रमाणात घडतात. तिच्याकडे अशा वाइनस्टीनना धुडकावण्याची ताकद असते... पडद्यावर आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची ताकद!
काही नायिका रिलेशनशिपमध्ये असल्याचं संरक्षण घेतात. अनेक नवोदित अभिनेत्री बॉयफ्रेण्डबरोबरची जवळीक जाहीर पीडीएमधून (पब्लिक डिस्प्ले आॅफ अफेक्शन) दाखवतात, ते त्यासाठीच... ते एक मोठं कवच असतं.
काहीजणी एकाच बलशाली नरपुंगवाच्या आश्रयाला जातात... त्याची खेळवस्तू बनल्या तरी मग इतरांची हिंमत होत नाही...
...एक अगदी साधं उदाहरण पाहा. डर्टी पिक्चरचंच उदाहरण. ज्या सिल्क स्मिताच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला होता, तिचे दक्षिणेतले, निव्वळ आयटम नंबर आणि अंघोळप्रसिद्ध सिनेमे पाहा... सिल्कच्या शरीरात आणि चेहºयात अशी काही मादकता आहे की ती कोणाही बाप्याला चेतवल्याशिवाय राहात नाही... कारण, त्या सिनेमांमध्ये तिची वर्णीच मुळात त्या विशिष्ट कामासाठी लागलेली असते...
आता तिच्या आयुष्यावर बेतलेला ‘डर्टी पिक्चर’ आठवा... त्यात विद्या बालनने खुल के एक्स्पोझ केलं आहे, सिल्कच्या ‘शैली’तली बोल्ड दृश्यं दिली आहेत. पण, सिनेमा संपूर्ण पाहणाºया (शेलक्या क्लिपा पाहणारे सिनेमाचे नाही, पॉर्नचे प्रेक्षक असतात) कोणाही सहृदय प्रेक्षकाला तिच्या त्या चेतवण्यामागची करुणा आणि ससेहोलपट हेलावून टाकते. प्रेक्षक सिल्क स्मिताला जसं फँटसाइझ करतो, तसं विद्या बालनच्या बाबतीत करू शकत नाही. त्याला तिच्या अभिनयाचा आदर करावाच लागतो... तो ते टाळू शकत नाही...
सिल्क स्मिताला एका टप्प्यानंतर कधीच असा सिनेमा मिळाला नाही... ती प्रेक्षकांसाठी भोगवस्तू म्हणूनच ताटात वाढल्यासारखी बाजारूपणे सिनेमात मांडली गेली... मग तोच बाजार पडद्यामागेही तिच्या वाट्याला आला... त्या बाजारानेच तिला अकाली संपवून टाकलं...
पडद्यामागचं डर्टी पिक्चर हे असं आहे...
आता त्यात टेलिव्हिजनच्या प्रचंड मोठ्या मनोरंजनविश्वाची भर पडली आहे. माध्यम वेगळं... पण, खेळ तोच... आतापर्यंत सुंदर मुली वासनांधांची शिकार होत होत्या, आता मॉडेलिंगपासून ते मालिकांपर्यंतच्या जगातली कोवळी, देखणी, सुबक तरुण मुलंही कोणा ना कोणा मॅडमच्या लैंगिक भुका भागवण्यासाठी वापरून घेतली जातात... हा नियतीचा फिल्मी न्याय वाटू शकतो... पण, भक्ष्य ते भक्ष्यच... स्त्री असो की पुरु ष... म्हणूनच वाइनस्टीनच्या निमित्ताने सुरू झालेल्या #metoo ट्रेण्डमध्ये फक्त मुलीच नाहीत, तर अशाच प्रकारे पुरु षांकडून किंवा स्त्रियांकडून कुस्करले गेलेले पुरुषही आहेत.
वाइनस्टीनसारख्या बड्या निर्मात्याला एरवी कोणी हात लावू शकेल, असं कुणालाच वाटलं नसेल. ते अशक्य आहे, याच समजुतीने अनेकांनी मन मारून किंवा तडजोड करून त्याच्या गलिच्छ व्यवहारापुढे मान तुकवली असेल... वाइनस्टीनही लोळवला जाऊ शकतो, हा दिलासा अशा प्रकारच्या दुर्व्यवहारांना बळी पडणाºयांसाठी मोठा आहे.
... मात्र, हे डर्टी पिक्चर लगेच डब्यात जाणार नाही, याचंही भान ठेवायला हवं... कारण, आपणही त्याच्या बाहेर नाही...
...उदाहरणार्थ, हा लेख वाचल्यानंतर बहुतेकांच्या डोक्यात काय प्रश्न येतील?...
...लेखाच्या सुरु वातीला जे किस्से सांगितलेत, ती माणसं कोण बरं असतील, याचेच ठोकताळे अनेकजण बांधू लागतील; त्यावर चविष्ट चमचमीत चर्चाही झडतील...
...हो की नाही?
...बॉस, पडद्यावरचा सगळा खेळ रंगतो तो आपल्या ‘एंटरटेनमेंट’साठी... आपल्याही नकळत आपली ‘मनोरंजना’ची संकल्पना त्या व्यवसायाचं स्वरूप ठरवत असते... त्यामुळे, ‘डर्टी पिक्चर’ पडद्यावरचं असो की पडद्यामागचं... ते आपल्याशिवाय म्हणजे प्रेक्षकांशिवाय अपूर्ण आहे...
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘बिगुल’ या पोर्टलचे संपादक आहेत mamanji@gmail.com)
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.