एका अवघड आजाराशी लढा देणा-या इरफाननं लिहिलेलं पत्रं वाचलं आहे का? तो जे म्हणतो त्याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:00 AM2018-06-24T03:00:00+5:302018-06-24T03:00:00+5:30

चालत्या गाडीला एक हेडलाइट असतो.समोरच्या टप्प्याइतकाच उजेड देत गाडी अंधारात पुढे जात राहाते..पुढे रस्ता असेल की नाही,लाइट्स सुरू राहतील की नाही, गाडी चालेल की नाही, असे अनेक प्रश्न असूच शकतात..पण म्हणून पुढे जाणेच थांबवून कुठे चालते?

Diagnosed with Neuroendocrine Tumour, actor Irrfan Khan says something that is relevant to all of us | एका अवघड आजाराशी लढा देणा-या इरफाननं लिहिलेलं पत्रं वाचलं आहे का? तो जे म्हणतो त्याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा!

एका अवघड आजाराशी लढा देणा-या इरफाननं लिहिलेलं पत्रं वाचलं आहे का? तो जे म्हणतो त्याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा!

Next


-प्राची पाठक

एका अवघड आजाराशी लढा देणाऱ्या इरफाननं लिहिलेलं पत्रं वाचलं आहे का? तो जे म्हणतो त्याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा!आपल्या आयुष्याबद्दलची आपल्याला असणारी ‘समज’ आणि कालांतराने येणारी ‘उमज’ यात सर्वच जण आपापल्या परीने काहीतरी शोधत असतात. मी कोण आहे, का आहे, कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे, काय करायचे आहे, कसे करायचे आहे, माझ्याच बाबत असे का घडते, माझ्याच नशिबी असे का, त्या अमक्या-तमक्याचे आयुष्य तसे का, त्याचे बरे की माझे बरे, माझे नेमके काय कमी आहे, का कमी आहे, असे अनेक स्वशोधाचे प्रश्न आपल्या मनात उमटत असतात. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या नजरेने समजून घ्यायचे प्रसंगही वरचेवर येत असतात. जगण्याच्या रेट्यात त्यांना आपण नेहमीच समोर मांडून ठेवतो, असे नाही. नेहमीच त्या प्रश्नांना नीट वेळ देतो, असेही नाही. पण आतल्या आत मनात कुठेतरी एक ‘स्व’ कायम आपल्याशीच हे मुद्दे घेऊन बोलायची संधी शोधत असतो.
रस्त्यात तावातावाने भांडणा-या लोकांना बघून ‘‘अरे का भांडताय? छोटेसेच तर आयुष्य आहे’’, असे दुरून कुठेतरी ते भांडण बघत बसणा-याच्या मनात किती नकळत येऊन जाते. ‘आज नको, नंतर बोलू’ करत तेव्हाही तो जरा उफाळून वर आलेला स्व आपण टाळत राहतो. तो नेहमी आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतो आणि आपण त्याला पुरेसे ऐकूनच घेत नाही.
अचानक कुठेतरी अपघात होतो, एरवी अतिशय आनंदी असणारे कोणी आत्महत्या करते, कुणाचे कोणाशी बिनसते, आपलेही ताणतणाव नकोसे झालेले असतात आणि मग एखाद्या हताश क्षणी आपण परत ह्या ‘स्व’शी गप्पा मारायला जातो.
असाध्य कर्करोगाशी झगडणे अगदी अचानक नशिबी आलेल्या इरफान खान या गुणी अभिनेत्याने लिहिलेले असे एक पत्र सध्या चर्चेत आहे. त्याच्या आयुष्यातल्या धक्क्यातून सावरताना आणि तो धक्का स्वीकारताना होणा-या ‘स्व’च्या जाणिवेचे फार छान प्रकटीकरण त्यात झाले आहे आणि म्हणूनच ते इतके सच्चे वाटते. मनाला भिडते. हेलावून सोडते...
इरफानला झालेल्या व्याधीचे निदान आहे ‘न्यूरो इण्डो क्राईन कॅन्सर’!

 

तो म्हणतो, मी हा शब्दही कधी ऐकलेला नव्हता. म्हणजे मला जे झाले आहे, त्या शब्दापासून सगळेच नवीन ! ही व्याधी तशी दुर्मीळ. त्यामुळे आधीच्या रुग्णांविषयीच्या अनुभवाचे, निदानाचे गाठोडे अगदी डॉक्टरांकडेही नाही. त्यामुळे वैद्यकीय विश्वासाठीही सगळेच नवीन. बेभरवशाचे. ट्रायल अ‍ॅण्ड एरर या प्रकारचे. अशा सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात डॉक्टरी उपचारांच्या एका प्रयोगशाळेत मी दाखल झालो, त्या उपचारांचे फलित काय असेल, ते आत्ता मला माहीत नाही. ते माझ्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनाही आत्ता माहिती नाही.’
हे सगळे आयुष्यात अवचित येण्याच्या धक्क्यासाठीही इरफानने एक हळवे प्रतिमान वापरले आहे. वेगवान रेल्वेत बसून आपल्या ध्येयाच्या दिशेने धावण्यात रंगून गेलेल्या कोणा वाटसरूच्या खांद्यावर अचानक मागून कुणी हात ठेवावा... मागे पाहावे, तर गाडीतला तिकीट तपासनीस. तो सांगतो आहे, ‘‘उतरा आता, स्टेशन आले तुमचे!’’
वाटसरू चकीत होऊन, गांगरून म्हणतो, इतक्या लवकर कसे येईल? खूप प्रवास आहे अजून!
पण टीसीला माहिती आहे. तो म्हणतो, हेच तुमचे स्टेशन. उतरा इथे. असे अवचित उतरावे लागणार असल्याच्या नुसत्या शंकेनेदेखील व्याकुळ झालेले मन!
या अपरिहार्य अनिश्चिततेशी झुंजणे नशिबी आलेल्या मनातल्या हिंदोळ्यांचे अत्यंत अलवार असे वर्णन इरफानने त्याच्या पत्रात केले आहे.
तो लिहितो,
‘अथांग महासागरात उसळलेल्या लाटांवर एखादी रिकामी बाटली भिरकावून द्यावी तसे माझे झाले आहे. त्या उसळत्या लाटांच्या पाशवी ताकदीवर नियंत्रण मिळवण्याची धडपड किती केविलवाणी असेल, तसे हे केविलवाणेपण ! मनात नवनवीन आशा, आकांशा आणि स्वप्नं घेऊन जगण्याच्या खेळात उतरलेलो असताना अचानक तो खेळ सक्तीने संपवायची वेळ येणार, याची जाणीव एकीकडे झालेली आहे आणि दुसरे मन म्हणतेय, ‘नाही, असे होऊ शकत नाही !’
- हा सगळा अस्वस्थ करणारा कल्लोळ इरफानने ज्या समंजसपणे मांडला आहे, त्यातला साधेपणा हेलावून टाकतो.
एकीकडे जगण्यातल्या अडथळ्यांनी खचून जाऊन, निराशेच्या वादळात मिटून जाऊन थेट आत्महत्येचे पाऊल उचलणारे लोक सातत्याने समोर येत असताना, समोर मृत्यू दिसत असताना जगण्याचा इतका सखोल विचार करणारा इरफान वेगळा ठरतो.
‘मला माझा प्रवास इथे थांबवायचा नाहीये; पण माझ्या वाट्याला आलेली वेदनाच तशी आहे,’ म्हणून तो त्या वेदनेच्या खोलात जाऊ बघतो. कशालाही दाद न देणारी, सांत्वनाने-प्रेमाने-स्नेहाने कशानेही न सांधणारी, ईश्वराहून सर्वव्यापी असणारी वेदना. अखंड वेदना.
अचानक इरफानला जाणवते, आपण ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय, त्या हॉस्पिटलसमोरच लॉर्ड्स आहे. जगप्रसिद्ध क्रिकेटचे मैदान ! लहानपणापासून ज्या खेळाची स्वप्ने पाहिली, त्या क्रिकेटची मक्का!
इकडे हॉस्पिटल.
तिकडे लॉर्डस !
मध्ये एक रस्ता फक्त!!
एकीकडे मृत्यूचे सावट. दुसरीकडे जगण्याची ईर्ष्या! या दोन्हीच्या मध्ये एक रस्ताच तर फक्त असतो.
जगणे-मरणे असो, नाहीतर खेळ ! सगळीकडे निश्चित असे एकच - अनिश्चितता !
- इरफानने हे सारे मोकळ्या अलवारपणे मांडले आहे त्याच्या पत्रात!
खेळात हार-जीत असते, क्षणाक्षणाला बदल होत असतात, तसेच आयुष्याचेही आहे, असा स्वसंवाद साधत तो एका क्षणी मनातच त्या वेदनेला शरण जातो.
‘मी शरण गेलो आहे माझ्या शरीरातल्या वेदनेला. प्रश्न पुसून टाकले आहेत मनातले. स्वीकारले आहे सारे. आता इथून पुढे जगण्यासाठी दोन वर्षे असतील की काही महिने, यातले काही मला माहीत नाही’.
- तो लिहितो.
मग उरते काय हातात? - आपली सगळी ताकद एकवटून, अचानक पुढ्यात येऊन पडलेल्या खेळाचे नियम समजून वाट्याला आलेला खेळ जास्तीत जास्त चांगल्या रीतीने खेळावा!
- तेच करायचे असे आता इरफानने ठरवले आहे.
***
‘आहे हे असे आहे’, - याचे भान मनात स्पष्ट होणे ही एक अतीव सुंदर गोष्ट आहे. ‘आता फुटून जाऊ’ असे क्षण खरे तर अनेकदा आपल्याही आयुष्यात येत असतात. तेव्हा त्या परिस्थितीला शरण जाऊन तिचा स्वीकार करून त्याच मर्यादेत नवा खेळ मांडायचा आणि मैदानात उतरायचे की स्वत:लाच मिटवून टाकायचे, हे खरे तर इरफानच्या ह्या स्व जाणिवेतून आपण आपल्यासाठीही समजून घेऊ शकतो.
एकेक आयुष्य म्हणजे समुद्रात पडलेली छोटीशी वस्तू असते आणि ती लहानशी वस्तू समुद्राच्या लाटांचा प्रवाह बदलू शकत नाही, असेही इरफान या पत्रात मांडतो. त्या मर्यादित अवकाशाचेच नियम समजून घ्यावे आणि झुंजावे त्या लाटांशी, इथवर त्याच्या मनातल्या अस्थिरतेचा प्रवास होतो. आयुष्याकडे बघायची नजर एकदम बदलते असा विचार केला की, आपल्याकडे परिस्थितीवर मात करायला काय आहे, काय नाही याचे पुरेसे भान ही नजर देते. तो एक टप्पा असतो आणि तो टप्पा म्हणजेच सारे आयुष्य नसते, हे ते भान ! ‘जातील हेही दिवस’ असा विचार करत तरून जायचे बळ आपल्याला मिळते.
गाडीला जसा हेडलाइट असतो आणि तेव्हाच्या टप्प्याइतकाच उजेड देत कार अंधारात पुढे जाते, पुढे रस्ता असेल की नाही, लाइट्स सुरू राहतील की नाही, गाडी चालेल की नाही, असे अनेक प्रश्न असूच शकतात. पण तेव्हाच्या पावलापुरताच उजेड घेऊनसुद्धा आपण मार्गाला लागू शकतो, हेच खरे तर इरफानच्या स्वसंवादातून खूपच प्रगल्भपणे आपल्यापुढे येते.
समज आणि उमज ह्यांचाही सुरेख मेळ त्यात आहे.
आपल्यातला स्वसुद्धा असाच धडपडतोय का आपल्याशी बोलायला?
... एकदा ऐकू तरी त्याचे.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत)

prachi333@hotmail.com

Web Title: Diagnosed with Neuroendocrine Tumour, actor Irrfan Khan says something that is relevant to all of us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.