सुलक्षणा महाजन
 
18 मार्चला मुंबईहून रॉटरडॅमला जायला निघाले त्या दिवशी पेपरमध्ये एक बातमी वाचली.. भारतामध्ये केंद्र शासन हमरस्त्यांवर आणि महामार्गांवर सायकल आणि पादचारी यांच्यावर बंदी घालण्याचा नियम करू बघत आहे अशा अर्थाची ती बातमी वाचून हसावे की रडावे कळेना. त्यानंतर केंद्रीय महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेला खुलासा वाचायला मिळाला. सायकलींसाठी ही बंदी असणार नसल्याचे त्यांनी सांगितले हे उत्तम!
या पार्श्वभूमीवर माझ्या ताज्या युरोप दौऱ्यात मी जे पाहते, अनुभवते आहे; ते मायदेशी कळवावे, यासाठी हा प्रयत्न. आम्ही रॉटरडॅम आणि अ‍ॅमस्टरडॅम शहरात नगर नियोजनाचे नवनवीन प्रयोग बघायला फिरतो आहोत. युरोपमधील सर्व महत्त्वाची शहरे आज सायकलींना प्राधान्य देत आहेत हे दाखविण्यासाठी आम्हा भारतीय नगर नियोजकांना इथे निमंत्रित केले आहे. म्हणूनच म्हटले, ताज्या अनुभवातले हे युरोपमधील नागरी सायकलींचे माहात्म्य!
रॉटरडॅम येथे मुख्य रेल्वे स्टेशन नव्याने बांधले आहे. ते अतिशय आधुनिक आणि प्रशस्त व भव्य आहे. रेल्वे स्टेशनखाली एक प्रशस्त तळघर बांधले आहे. ते केवळ लोकांच्या सायकली ठेवण्यासाठी आहे. आपल्याकडे हल्ली काही इमारतींमध्ये मोटारी ठेवण्यासाठी दुमजली यांत्रिक पद्धत वापरली जाते, तर येथे सायकली ठेवण्यासाठी दोन थरांची यांत्रिक रचना केली आहे. त्यामुळे तेथे एका वेळी ५००० सायकली लोक सुरक्षितपणे ठेवू शकतात आणि गाडी पकडून कामाच्या ठिकाणी, इतर गावी किंवा पुढे मेट्रोने जाऊ शकतात. स्टेशनच्या एका बाजूला लागूनच, रस्त्यावर ट्रामसाठी मार्ग आहे, तर दुसऱ्या बाजूला बस आणि टॅक्सी स्टँड आहे. सुमारे ३०० मीटर परिघामध्ये खासगी मोटारी येऊ शकत नाहीत. स्टेशनच्या समोर मोठे मोकळे चौक हे वैशिष्ट्य सर्वत्र दिसते. स्टेशनच्या इमारतीच्या आत लहान लहान खानपानाची, वर्तमानपत्रांची, लहान गरजेच्या वस्तूंची दुकाने तसेच चहा-कॉफी पिण्यासाठी खास जागा केलेल्या आहेत. आपल्याकडे शेकडो लहान फेरीवाले उघड्या जागेत बसलेले असतात. तेथे मात्र त्यांच्यासाठी स्टेशनमध्येच नीट, सुबक व्यवस्था केलेली आहे. स्टेशन प्रचंड मोठे, उंच आणि मुंबईच्या शिवाजी टर्मिनलच्या लोकल स्टेशनप्रमाणे आहे. त्यास दोन्ही बाजूने बाहेर पडण्याची सोय आहे. विशेष म्हणजे, तेथेही लोकांची गर्दी आणि लगबग भरपूर असते. 
संपूर्ण हॉलंडमध्ये आणि विशेषत: महानगरांच्या परिघावर असलेल्या लोकांनी सार्वजनिक बस सेवा, ट्राम आणि भुयारी मेट्रो वापरावी, तसेच सायकली वापराव्यात यासाठी विशेष रस्ते तयार केले आहेत. या उलट लोकांना खासगी मोटारी वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी हमरस्त्यावरील मोटारींच्या मार्गिका कमी करून कडेची मार्गिका बससाठी राखीव केलेली आहे. या रस्त्याला काटकोनात येऊन मिळणारे अरुंद रस्ते एकदिशा मार्ग करून तेथे मोटारी उभ्या करण्याची सोय असली तरी त्यासाठी भरपूर पैसे आकारण्याची तजवीज केलेली आहे. शिवाय प्रत्येक महत्त्वाच्या स्टेशनजवळ कार्यालये, मोठी दुकाने आणि लहान-मोठ्या आकाराची, उंच इमारती असलेली घरे यांची संख्या भरपूर ठेवलेली आहे. पण गाड्या मात्र कमी असाव्यात यासाठी विशेष नियोजन केले आहे. थोडक्यात, नागरिकांना खासगी गाडी वापरण्याची गरज वाटणार नाही, किंवा मोह होणार नाही अशीच खबरदारी हॉलंडच्या सरकारने घेतलेली दिसते. गाड्या कमी करून चालण्यास आणि सायकलण्यास प्राधान्य देण्याचे हे धोरण येथे अतिशय यशस्वी झाले आहे. सायकलस्वारांची संख्या वाढावी म्हणूनच त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि रुंद मार्गिका रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेवलेल्या आहेत. आणि पदपथ दोन ते तीन मीटर रुंद ठेवले आहेत. त्यावर दुतर्फा दुकाने, खाण्यासाठी टेबल-खुर्च्या यांचीही सोय आहे. शिवाय थंडीसाठी वर, पुढे-मागे होणारे छत आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी विजेच्या शेकोट्या आहेत. या सर्वांचा आस्वाद घेणारे लोकही भरपूर दिसतात. सार्वजनिक सायकलींची व्यवस्था येथे प्रत्येक विभागात, प्रत्येक बस आणि ट्रामजवळ तर आहेच; शिवाय स्वत:ची सायकल बसमध्ये वा ट्राममध्ये नेता येण्याची सोयही केलेली आहे. एका वर्षासाठी केवळ ६० युरो इतक्या स्वस्त दरात या सेवेचे सदस्य होता येते आणि एकावेळी २० ते ३० मिनिटे सायकली फुकट मिळू शकतात. जास्त वापर झाला तर मात्र दंड वा जास्त पैसे आकारले जातात. या सार्वजनिक सायकली खासगी कंपन्यांच्या मालकीच्या असतात. त्यांचे थांबे मात्र महापालिकेच्या सोयीने, नियोजनानुसार बांधलेले असतात. खासगी-प्रशासकीय करारानुसार ह्या सेवा चालविल्या जातात. 
संपूर्ण युरोपमध्ये स्मार्ट शहरांचे प्रयत्न जोमदारपणे चालू आहेत आणि त्यासाठी सर्व शहरांत एक प्रकारची स्पर्धा असलेली दिसते. त्यात ऊर्जाबचत आणि सायकली-पादचारी प्राधान्य यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते आहे. ही चढाओढ सकारात्मक आणि लोकोपयोगी आहे. स्मार्ट वाहतूक हा विषयच सर्व शहरांत प्रकर्षाने जाणवणारा सर्वात महत्त्वाचा नगर नियोजनाचा विषय बनलेला आहे. त्यात खूप प्रयोग होत आहेत. काही ठिकाणी मोटारी आणि यांत्रिक वाहनांमध्ये सध्या वीज फुकट देण्याची सोय केली असली, तरी विजेवर चालणारी वाहने महाग आहेत. परंतु येत्या काळात पेट्रोल आणि खनिज तेल महाग तर वीज स्वस्त होईल अशी तंत्रे विकसित होत आहेत आणि त्यासाठी शहरे भविष्यसज्ज केली जात आहेत. आपल्याही देशातील सर्वच लहानमोठ्या शहरांत सायकली, पादचारी यांना तातडीने प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. महानगरांमध्ये मेट्रो बांधल्या जात असतानाच मोटारींवर बंधने आणून सायकलकेंद्री आणि पादचारीप्रधान धोरण राबविणे शक्य आणि आवश्यक आहे. परंतु आपले निर्वाचित सदस्य त्याबाबत उलटी पावले टाकीत आहेत. छोट्या गावांत चालणे-सायकल चालवणे यास आणि महानगरात मेट्रो, बस आणि रिक्षा-टॅक्सी अशा सार्वजनिक वाहनांस प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्व थरावरील लोकप्रतिनिधींना हे समजावून देणे नगर नियोजनतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सजग नागरिक आणि सामाजिक संस्था या सर्वांचे सामूहिक कर्तव्य मानायला हवे. आजच्या काळाची ही तातडीची गरज आहे. शहरांमधील रोजच्या वाहतूक कोंड्या, जीवघेणे अपघात, त्यात जाणारे मुख्यत्वे तरुणांचे बळी, आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेविषयी वाटणारी सततची धास्ती, विद्यार्थी, नोकरदार यांचा वाहतुकीत जाणारा वेळ, शक्ती यांचा अपव्यय या सगळ्यापासून थोडी मुक्ती हवी असेल, तर गाड्यांचे वेड कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कास धरणे व त्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे हा एकमेव शहाणपणाचा मार्ग उरला आहे. तो पकडण्याऐवजी आपले लोकप्रतिनिधी महामार्गांवरून चालण्यास / सायकल चालवण्यास बंदी घालण्याचा विचार करतात, तेव्हा तो उफराटा उपाय वाटतो. 
महामार्ग सुरक्षित हवेतच; पण त्यासाठी पादचाऱ्यांना शिक्षा करणे हा उपाय नसून त्यांना चालण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे व स्वत:च्या गाड्या काढण्यापेक्षा रेल्वे, सार्वजनिक बस सेवा आकर्षक, सुलभ, आरामदायी करणे हा अधिक शहाणपणाचा उपाय आहे. 
 
सायकल संस्कृतीतले अडथळे
१. हॉलंडमध्ये सायकल संस्कृती रुजली असली, तरी सायकल मार्गांवर महिला, मुले आणि वयस्कर लोकही खूप असतात आणि त्यांना तरुण, बेदरकार सायकलस्वारांचा थोडाफार त्रास होतो.
२. अपघातात लोक पडतात, किरकोळ जखमी होतात, हाडे मोडतात. तेव्हा ते कमी करणे आवश्यक आहे. यासाठी सायकल प्रशिक्षण करणे तेथे आता आवश्यक मानले जाते आहे. 
३. मोटारींना आवर घातल्यामुळे जीवघेणे अपघात मात्र नगण्य झाले आहेत आणि जबरदस्त शिक्षा झटपट दिली जात असल्यामुळे मोटारमालक अतिशय सावध झाले आहेत आणि शहरे अधिक सुरक्षित झाली आहेत.
 
 
(लेखिका नगर नियोजन सल्लागार असून, त्या सध्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. तेथून खास ‘लोकमत’साठी पाठवलेला लेख.)