क्यूबा....कम्युनिस्ट राजवटीची पहिली ओळख अशा पद्धतीनं झाली..

By ऑनलाइन लोकमत on Sun, November 05, 2017 1:00am

काहीतरी हटके अनुभव हवा होता, म्हणून मी क्यूबाला जायचं ठरवलं. क्यूबानंही निराश केलं नाही. इथे लिमिटेड इंटरनेट आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत तर नेट हा प्रकारच नव्हता. काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन्स आहेत. तिथूनच सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं. सगळं पब्लिकली ओपन. तसा हा गरीब देश, पण सगळ्यांना सारखाच पगार. सरासरी वेतन ३० ते ३५ डॉलर! कम्युनिस्ट राजवटीची पहिली ओळख अशा पद्धतीनं झाली..

अनघा दातार

या वर्षी मी वाढदिवसाला क्यूबाला जाणार आहे... हे मी जेव्हा माझ्या मित्र- मैत्रिणींना सांगितले तेव्हा सगळ्यांच्या चेहºयावर एकच प्रश्न होता... का? काय आहे तिथं एवढं बघण्यासारखं? खरं सांगायचं तर मलाही माहीत नव्हतं तिथे काय आहे. पण नेहमी कुठल्यातरी हटके देशात फिरायला जायच्या माझ्या प्लॅनमध्ये क्यूबा येत होतं आणि मी ठरवलं तिकडंच जायचं. क्यूबा आणि फिडेल कॅस्ट्रो एवढंच कनेक्शन क्यूबाबद्दल माहिती होतं. बाकी बरेच किंतू, परंतु मनात होते. पण आता ठरलं होतं तेव्हा नेहमीप्रमाणे गूगल शोध सुरू झाला. काही दिवस स्वत:च स्वत: फिरायचं आणि काही दिवस ग्रुप टुर करायची असा प्लॅन होता. शोधता शोधता क्यूबन अ‍ॅडव्हेंचर्स ही एक मस्त कंपनी सापडली आणि त्यांच्याबरोबर आठ दिवसांची हवाना-विन्यालेस-सीएनफुएगोस-त्रिनिदाद-हवाना अशी टुर बुक केली. तीन दिवस एकटीने आधी हवाना फिरायचा प्लॅन केला. जगातल्या शेवटच्या काही उरलेल्या सोशलिस्ट देशांपैकी एक देश म्हणजे रिपब्लिकन आॅफ क्यूबा. आजपर्यंत मी कधीच कुठल्या सोशलिस्ट देशात गेले नव्हते. पण जायची उत्सुकता मात्र होती. व्हिसा, तिकीट वगैरे सोपस्कार पूर्ण करून क्यूबाला जायला निघाले. क्यूबाची करन्सी पेसो ही आहे. त्यात दोन प्रकार. एक सीयूसी; जी टुरिस्टकरता आहे आणि दुसरी सीयूपी; जी क्यूबन नागरिकांसाठी आहे. सीयूसीचा एक्स्चेंज रेट अर्थातच महाग आहे. जवळ जवळ सगळ्या इतर करन्सीजशी १:१ असा एक्स्चेंज रेट आहे. त्यामुळे क्यूबा वाटतं तितकं टुरिस्टसाठी स्वस्त नाहीये. क्यूबाची करन्सी क्यूबाव्यतिरिक्त कुठेही एक्स्चेंज करता येत नाही. त्यामुळे हवाना एअरपोर्टवरून बाहेर पडल्यावर पहिली गोष्ट म्हणजे पैसे एक्स्चेंज करून घेणे. लोकल करन्सी फारच स्वस्त आहे. साधारण १ सीयूसी = २५ सीयूपी. तसेच यूएस डॉलर एक्स्चेंज करणेपण बरंच महाग आहे. कारण त्यावर १० टक्के एक्स्ट्रा पेनल्टी द्यावी लागते. त्यामुळे युरो, पौण्ड्स, आॅस्ट्रेलिअन करन्सीज् एक्स्चेंज करणे सोपे आहे. अर्थात क्यूबात बºयाच प्रकारचे एटीएम, बँक्स आहेत. त्यामुळे एक्स्चेंजचा फारसा प्रॉब्लेम नाही येत. क्यूबा हा असा देश आहे, जिथे लिमिटेड इंटरनेट आहे. दचकलात न वाचून. पाच वर्षांपूर्वीपर्यंत तर इंटरनेट अजिबातच नव्हते. पण आता थोडेतरी आहे. पण त्याचमुळे कुठेही क्रेडिट कार्डनी व्यवहार करता येत नाही. सगळीकडे फक्त कॅश ट्रॅन्झॅक्शन्स. आॅनलाइन शॉपिंग, कार्ड पर्चेस हे सगळं आपल्या जीवनाचा इतका सहज भाग आहे की कॅशमध्ये व्यवहार करणे जरा कठीणच जातं आणि परत सतत जवळ कॅश बाळगणं तर अजूनच कठीण. पण क्यूबात याला पर्याय नाही. क्यूबात सामान्य नागरिकांच्या घरात इंटरनेट नसते. अगदी महत्त्वाची; म्हणजे जर्नलिस्ट किंवा सरकारातील मोठ्या हुद्द्यावरची लोकं.. अशांच्या घरी इंटरनेट असते; पण तेसुद्धा डायल अप कनेक्शन जे आपण सगळे १५-१६ वर्षांपूर्वी वापरत होतो. पण मग बाकीचे लोक काय करतात? ती एक गंमतच आहे. सरकारनी सगळ्या शहरांत/गावांत वायफाय झोन्स केले आहेत. हे वायफाय झोन्स एखाद्या बागेत किंवा मध्यवर्ती चौकात, मोठ्या हॉटेल्सच्या बाहेर, एखाद्या रस्त्याच्या टोकाला असे कुठेही आहेत. प्रत्येकजण एक इंटरनेट कार्ड विकत घेतात. त्यावर यूजरनेम पासवर्ड दिलेला असतो. साधारण एक तासासाठी हे कार्ड वापरता येते. आणि त्यांच्या अधिकृत टेलिफोन नेटवर्कच्या आॅफिसमधून हे कार्ड १.५० सीयूसीला विकत घेता येते. हे कार्ड घेऊन त्या वायफाय झोनमध्ये जायचं आणि इटीइसीएसएच्या नेटवर्कला कनेक्ट करून इंटरनेट वापरायचं. सतत कनेक्टेड राहायच्या आपल्या सवयीचा इथे खूप त्रास होतो. परत हे सगळं पब्लिकली उघड्यावर वापरता येतं तेव्हा तुम्ही कोणाबरोबर स्काईप कॉल करा किंवा व्हॉट्सअ‍ॅपचा व्हिडीओ कॉल.. सगळं पब्लिकली ओपन, ही कम्युनिस्ट विचारसरणीची पहिली झलक मिळाली होती. प्रत्येक गोष्टीवर सरकारचा अंकुश होता. क्यूबा इज अ सोशियालिस्ट कंट्री विथ कम्युनिस्ट आयडॉलॉजी. ही इंटरनेट काडर््स मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा काही खासगी लोकांकडूनपण विकत घेता येतात; पण त्याची किंमत ३-४ सीयूसी असते. त्यामुळे अधिकृत इटीइसीएसएच्या आॅफिसमधूनच ही काडर््स घ्यावीत. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे इथली टॉयलेट सिस्टीम. इथे टॉयलेट पेपर फ्लश करता येत नाही. त्यांची ड्रेनेज सिस्टीम इतकी जुनी आहे की पेपर फ्लश केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पेपर फ्लश न करता डस्टबिनमध्ये टाकायची सवय करायला जरा त्रासच होतो. क्यूबा तसा गरीब देश आहे. सगळे उद्योगधंदे सरकारच्या ताब्यात असल्यामुळे सगळ्यांनाच सारखे वेतन. सरासरी मासिक उत्पन्न साधारण ३० ते ३५ डॉलर! पण आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे. राऊल कॅस्ट्रोच्या नवीन सरकारनी हळूहळू बदल घडवायला सुरुवात केली आहे. नागरिकांना आता स्वत:चा प्रायव्हेट बिझनेस करायची परवानगी मिळायला लागली आहे. अर्थात जास्त करून टुरिस्ट उद्योगात याची परवानगी आहे. सगळ्या क्षेत्रात स्वत:चा उद्योग सुरू करायची परवानगी नाहीये. पण जास्त करून सेवा क्षेत्रात सध्या तरी परवानगी आहे. त्यामुळे टुरिस्ट इंडस्ट्री सध्या जोरात आहे. बरेच लोक स्वत:ची रेस्टॉरण्ट्स किंवा भाड्याने खोल्या देणे, टुरिस्ट गाइड अशा उद्योगात येत आहेत. इथे त्यांना इतर कामांपेक्षा बराच जास्त मोबदला मिळतो. मी ज्या ज्या टुरिस्ट गाइडबरोबर टुर केल्या ते जवळ जवळ सगळे आधी इंजिनिअर, शिक्षक, लॉयर असे काम करत होते. पण आता सगळे टुरिस्ट बिझनेसमध्ये काम करतात. माझ्या एका गाइडनी मला सांगितलं की सध्या क्यूबामध्ये निगेटिव्ह बर्थ रेटचा प्रॉब्लेम आहे. गरिबीमुळे लग्न, मुले असा विचार तरुण पिढी फारसा करत नाही. दुसरे घर घेणे किंवा कार घेणे हे तिथल्या लोकांना परवडत नाही. त्यामुळे बरेच जण आई-वडिलांबरोबर एकाच घरात राहतात. निगेटिव्ह बर्थ रेट सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लहान मुलांसाठी शाळा संपल्यावरसुद्धा पाळणाघराची सोय उपलब्ध करून देणे ज्यामुळे बायकांना नोकरीपण करता येईल आणि मूल वाढवणे सोपे जाईल. त्यामुळे त्या मूल होऊ देण्याचा विचार करतील. क्यूबामध्ये इन्कम टॅक्स ही कन्सेप्ट नाही. कारण अर्थातच ३०-३५ डॉलर इन्कममध्ये टॅक्स काय देणार? पण आता सरकारनी प्रायव्हेट बिझिनेसला मान्यता दिल्यामुळे अशा उद्योगांवर कर लावला आहे. अर्थात कर फार नाही. अजूनही सरकार टॅक्स सिस्टीम डेव्हलप करत आहे. क्यूबाचे आणि सोव्हिएत युनियनचे संबंध फारच घट्ट होते. पण सोव्हिएत युनियनच्या कोलमडण्याने क्यूबाची इकॉनॉमिक सिस्टीम पारच कोसळली. तो क्यूबाचा अतिशय वाईट काळ होता. त्यावेळी फिडेल कॅस्ट्रोचे त्यावेळच्या कॅनडाच्या पंतप्रधानांबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध होते आणि कॅनडानी त्यावेळेला पहिल्यांदा क्यूबात टुरिस्ट पाठवले. त्यानंतर हळूहळू टुरिस्टची संख्या वाढायला सुरुवात झाली. आजही सर्व टुरिस्टमध्ये कॅनडातून क्यूबात येणाºया टुरिस्टची संख्या सर्वात जास्त आहे. क्यूबात मला फारसे भारतीय टुरिस्ट दिसले नाहीत. पण मला बघितल्यावर पहिला गेस मी भारतीय असणार असाच होता. त्याचं कारण पण मजेशीर होतं. क्यूबात रोज रात्री टीव्हीवरील एका चॅनलवर बॉलिवूड सिनेमा दाखवला जातो. स्पॅनिश सबटायटल्सबरोबर. बºयाच कॅसाच्या होस्टनी त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये ते बॉलिवूड बघतात आणि त्यांना ते आवडतात असं मला आवर्जून सांगितलं. आणि ते सिनेमे बघून बघून त्यांना लगेच कळलं की मी भारतीय असणार. माझ्या आतापर्यंतच्या भटकंतीतील क्यूबा हा एक फारच वेगळा देश होता. अजूनही फारसा ओपन नसलेला, गरीब; पण अतिशय प्रेमळ माणसांचा, संगीत, नाच, कला अंगात मुरलेला, हळूहळू बदल घडणारा देश आहे.

(पुढच्या लेखात क्यूबन खाद्यसंस्कृतीविषयी.)

(लेखिका संगणक अभियंता असून जर्मनीत हायडलबर्ग येथे वास्तव्याला आहेत.)

संबंधित

पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला 
एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु 
पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं!
पक्षांसारखं आकाशात उडण्याची इच्छा आहे ? इथे घेऊ शकता स्काय डाइविंगचा थरारक अनुभव! 
मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाच्या आठवणींनी आजही मिळतो आनंद

मंथन कडून आणखी

नरभक्षक वाघ आणि त्यानं केलेला अपघाती हल्ला यात फरक असतो!
मी टू
यवतमाळ जिल्ह्यातला वाघिणीचा थरार
पुणेरी कट्टा - जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!
-रंगमंच- नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग

आणखी वाचा