cocooned in their own sails: the sad state of contemporary Marathi intellectuals and authors | सत्तेला आणि व्यवस्थेला भितो , त्यापेक्षाही आम्ही एकमेकांना भितो !
सत्तेला आणि व्यवस्थेला भितो , त्यापेक्षाही आम्ही एकमेकांना भितो !

ठळक मुद्देमराठी साहित्यिकांच्या हतबलतेवर क्ष-किरण

जयंत पवार

साहित्य संमेलनात वा्मयीन राजकारण नको, अशी पहिली प्रतिक्रिया संमेलनाध्यक्षपदी निवड होताच देणार्‍या लेखिका डॉ़ अरुणा ढेरे यांना इथे राजकारणाशिवाय काहीच नसतं, हे एव्हाना कळून आलेलं असेल. हे राजकारणही वा्मयबाह्य. वा्मयीन नव्हेच. खरं तर संमेलनात वा्मयीन राजकारण असावं की नसावं, हाच एक व्यापक चर्चेचा विषय आहे; पण राजकारण या शब्दाविषयीच तिटकारा असणार्‍या आपल्या मध्यमवर्गीय जीवनदृष्टीच्या परिघात अशी चर्चा संभवत नाही. आपला अवघा वा्मयीन व्यवहार (जो आपण मुख्य धारेतला मानतो) हाच मुळी मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेत गुरफटलेला आह़े त्याची धुरा कायम अभिजन मध्यमवर्गीय साहित्यिक आणि साहित्य-कार्यकत्र्याच्या हातात राहिली आह़े या परिघाच्या बाहेरचा जो कोणी लेखक या धारेत सामावला जातो तो या व्यवस्थेत शोषला जातो ही व्यवस्थाच आत्मसंतुष्टांची असल्यामुळे निषेधाची पत्रकबाजी, संमेलन उधळण्याच्या गप्पा यांपलीकडे आपली बंडखोरी जात नाही़ बहिष्कार हे आपलं टोकाचं अस्ऱ ते वापरायलाच हवं; पण आपली अपेक्षा नेहमी पाहुण्याच्या काठीनं साप मारावा अशी असत़े तो साप आपल्या पायाला वेटोळं घालून बसलेला असला तरी त्यावर प्रहार दुसर्‍याने केला पाहिज़े
नयनतारा सहगल यांनी देशातल्या वर्तमानाची परखड शब्दांत नोंद घेतली याचा काहींना आनंद होतो, काहींना राग येतो़ ज्यांना राग येतो ते नयनतारा सहगल यांचे विचार संमेलनाच्या मंचावरून व्यक्त होणार नाहीत याची तजवीज करतात़ ज्यांना आनंद झालेला असतो ते या कृतीने बिथरतात़ त्यांना सात्त्विक संताप येतो आणि ते निषेधाचे झेंडे घेऊन उभे राहतात़ ज्यांना मुळात राग आलेला असतो, त्यांच्याविषयी मला काहीच म्हणायचं नाही़ कारण त्यांचा अजेंडा साफ असतो़ घातलेला मांडव मोडू नये, निषेधाचे काळे ढग जमू नयेत आणि झाकपाकाची इस्रीदार घडी मोडू नये म्हणून ते कामाला लागलेले असतात़ त्यांना तसे आदेश आलेले असतात़ ते तसे निषेधाला धूप घालत नाही़ मात्र, बहिष्काराला घाबरतात. त्यांचं ठीक आह़े माझा आक्षेप आहे तो, ज्यांना आधी आनंद झालेला असतो आणि नंतर सात्त्विक संताप आलेला असतो त्यांच्या बद्दल आह़े कारण त्यांच्याच मेंदूत उलथापालथ झालेली असत़े तेच अस्वस्थ असतात़ पण त्यांची ही अस्वस्थता कोमट असत़े म्हटली तर गरम असते; पण तिच्यात पुरेशी उष्णता नसत़े ती कधीही थंड होऊ शकत़े उत्कलन बिंदूर्पयत जाऊन वातावरण तापवण्याची, त्यात बदल घडवण्याची पुरेशी क्षमता तिच्यात नसत़े कारण मूळ मुद्दय़ापासूनच ते दूर गेलेले असतात़ नयनतारा सहगलना संमेलनात येऊ दिलं नाही, बोलू दिलं गेलं नाही याचा धिक्कार होतो़ पण गोष्ट तिथेच थांबत़े सहगल बाई जे बोलणार होत्या त्यातल्या मुद्दय़ांची तपशिलात व्यापक पातळीवर चर्चा घडवून आणण्यार्पयत ते जातच नाहीत़
एखाद्याचा आवाज दडपला जात असेल तर या दडपशाहीचा निषेध करणं ही बाब दिलासादायक खरीच; पण त्यातून पूर्ण दिलासा मिळत नाही़ तो तेव्हाच मिळेल, जेव्हा दडपला गेलेला आवाज जे बोलू पाहात होता त्याच्या गाभ्यार्पयत पोहचता येईल आणि त्यातला आशय समाज वास्तवात आकार घेत असताना आपण काय करत होतो, हा प्रश्न पडेल़ या समाजवास्तवाला तातडीच्या प्रतिक्रिया देणार्‍या शब्दबंबाळ कविता सोडून द्या, या अस्वस्थ वर्तमानात जगणार्‍या व्यक्ती आणि समष्टी अशा दोन्ही पातळ्यांवर विदीर्णता आणि घुमसट अनुभवणार्‍या सजर्नशील मनाचं काही नॅरेटिव्ह तयार होतंय का?
साहित्य संमेलन हा मराठी साहित्यिकांचा प्रांत विशेष चर्चेत असतो तो त्याच्या अध्यक्षीय निवडीमुळे. हा अध्यक्ष काय बोलणार, याची कोण उत्सुकता संमेलनाच्या आधीपासून लागून राहिलेली असत़े बहुतेक वेळा तो शहामृगी पवित्राच घेतो; पण जेव्हा कधी तो व्यवस्थेला, सत्तेला बोल सुनावतो तेव्हा आपल्याला क्रांतिसदृश्य घटना घडल्याचा आनंद होतो़ जणू तो बोलला आणि आपल्या साचलेल्या मनाला मोक्ष मिळाला, मग आम्ही पुन्हा आत्मानंदात डुंबायला मोकऴे कराडच्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवतांनी केलेलं भाषण, जयप्रकाश नारायणांना अकस्मात वाहिलेली श्रद्धांजली हा बंडखोरीचा परम आविष्कार असल्यागत ही घटना (आणि एवढीच) संमेलनाच्या इतिहासात पुनर्‍पुन्हा सांगितली जात़े दुर्गाबाई आपल्या स्वभावाला धरूनच ती कृती करत्या झाल्या़ त्यांचं उदाहरण वारंवार देण्यातून एवढंच ठसवलं जातं की व्यवस्थेविरुद्ध, सत्तेविरुद्ध वागणं हे स्वाभाविक असत नाही. उलट त्यांना न दुखवणं हेच नैसर्गिक आह़े
पु़ ल़ देशपांडे यांना युती सरकारच्या काळात महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कार समारंभात त्यांचं जे मनोगत सादर झालं, त्यात त्यांनी एक दोन वाक्यात सरकारवर टीका केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘झक मारली आणि यांना पुरस्कार दिला’ तेव्हा राज्यात एकच गदारोळ माजला़ असाच सात्त्विक संताप़ पण तेव्हाही अनेक मान्यवर लेखकांची प्रतिक्रिया अशी होती की, पुलंनी औचित्यभंग केला़ त्यांचं चुकलंच़ त्यांनी तो पुरस्कार घेता नये होता इतकं वाटत होतं तर. विजय तेंडुलकरांनी नरेंद्र मोदींच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यावर तर त्यांच्या बाजूने बोलणारे साहित्यिक हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नव्हत़े सारे त्यांच्या विरोधात गेले होते आणि म्हणत होते,  ‘हे योग्य नाही. तेंडुलकर हिंसेचा पुरस्कार करतायत़’ तेंडुलकर ज्या गुजरात संहाराच्या अनुषंगाने बोलले ह्या घटनेतली भीषण हिंसा कुणाला खुपली नाही़ त्याविषयी न बोलता सारे लेखकाच्या विधानातून ध्वनीत होणार्‍या हिंसेने समाजावर काय परिणाम होईल, या जाणिवेने भयभीत झाले होत़े ही दोन उदाहरणं मराठी सारस्वतांच्या विचारांची दिशा कळायला पुरेशी आहेत़
बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना बैल म्हणाले, हे त्यांचं विधान द्रष्टेपणाचं ठरावं अशीच एकूण परिस्थिती राहिली़ त्याला छेद देणारे अनेक साहित्यिक होते; पण त्यांची परंपरा निर्माण झाली नाही़ आपल्याकडे न्या़ रानडे, लोकहितवादी, आगरकर असे सुधारक आणि महात्मा ज्योतिराव फुले, डॉ़ आंबेडकर असे जातिवंद बंडखोर लिहिते असूनही त्यांची परंपरा साहित्य जगतात निर्माण झाली नाही़ मर्ढेकरांवर खटले झाले; पण त्यांच्या बंडखोर शैलीची आकंठ स्तुती करणार्‍यांनी त्यांची हिंमत घेतली नाही.
भाऊ पाध्येंना एकाने मुलाखतीत विचारलं, ‘शासनाने तुमची दखल घेतली नाही़ तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही काय?’ त्यावर भाऊ म्हणाले, ‘वेडा आहेस काय? वाईट कशाला वाटेल?’- व्यवस्थेत आपल्यावर अन्यायच होणार हे खुलेपणाने मान्य करणारा असा बंडखोर लेखक आपल्यात आता होऊन गेला; पण अभिजात साहित्याने त्याला दाराबाहेर उभं केलं़
- ही गेल्या शे-दीडशे वर्षातली उदाहरणं़ ज्ञानेश्वर-तुकाराम तर दूरच राहिल़े उत्तरेत हिंदी साहित्यिकांनी गजानन माधव मुक्तिबोधांची परंपरा मानली आणि त्यातूनच व्यवस्थेला आवाज देणारे साहित्यिक निर्माण झाल़े आपण सत्तेशी कायम सलगी करून राहिलेल्या साहित्यिकांची अभिजनी परंपरा मानल्यामुळेच असे कमअस्सल झालो काय? भाषेचा डौल, शब्दांचे फुलोरे आम्हाला त्यातल्या आशयापेक्षा नेहमीच मोठे वाटल़े अर्थापेक्षा शब्दांच्या किमयेत रमलो़ एकूण काय आम्ही गाभ्यापेक्षा बाजूलाच अधिक सरकलो. 
श्याम मनोहरांच्या अंधारातल्या मठ्ठ काळ्या बैलाप्रमाणे आमची स्थिती होती़ गेल्या काही काळात मात्र यात बदल झाला, तो समाजमाध्यमांमुळे ! फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या चौकोनांत, ब्लॉग्जच्या वतरुळात आम्ही मोकळे होऊ लागलो. आपण व्यक्त होतोय, मनातलं बोलतोय, एका निर्णयप्रक्रियेत सहभागी होतोय याचं समाधान मिळवू लागलो़ पण एका मर्यादेनंतर आमच्या लक्षात आलं की, आम्ही आमची अभिव्यक्ती मुक्तपणे करू शकतो याची पुरेशी खात्री न देणारं हेही एक आभासी वास्तव आह़े ज्यात आम्ही आमचे समाज कळप बनवून आमच्या भिंती उभ्या केल्या आहेत़ या भिंतीवर आम्ही लाथा झाडू किंवा मुके घेऊ, पलीकडे कोण उभं आहे त्यावर ते ठरेल ! आमच्या प्रतिमा आम्ही निर्माण करू, स्वतर्‍ची यशोगाथा मिरवू, एकमेकांना दाद देऊ़ कोणी भले आम्हाला कुबडे नार्सिसस म्हणोत, आम्ही मात्र आम्हाला सुंदरच दिसू. एकमेकांना सुंदर म्हणू़ ही कंपूशाही आह़े पण मानवी इतिहास तर कंपूशाहीचा आणि कळपबाजांचाच नाही काय? आक्षेप कंपूशाहीवर नाहीच़ कंपू असतातच आणि लोक त्यातच जगत असतात़ पण आम्ही हे कंपू जपण्यात एकमेकांचे दोष पाहायचेच विसरून गेलो आहोत. एकमेकांशी मुक्त बोलणं करायचं विसरून परस्परांना सावरू लागलो आहोत. आपल्याच कंपूच्या भिंती मोठय़ा करून आत सुरक्षितता शोधू लागलो आहोत. दुसर्‍या कंपूपासून रक्षण आणि प्रतिहल्ला यांची ही सोय आहे. ही व्यवस्था तुटली तर एकटे पडू अशी भीती वाटते. पण लेखक मूलतर्‍ एकटाच असतो ना ! आम्ही मात्र ते विसरूनच गेलो आहोत.
समाजमाध्यमांच्या बाहेरचे व्यक्त होण्याचे चव्हाटे जवळपास बंद झाले आहेत. लेखकांची मंडळं नाहीत, व्याख्यानमाला रोडावल्या आहेत, इराण्याच्या हॉटेलातले अड्डे इराण्यांसोबत अस्त पावले आहेत. प्रत्यक्ष संवाद थांबले आहेत आणि वादही जवळपास थंडावले आहेत. आमच्यातला कोणी चुकीचा वागला की आम्ही त्याला बोलून दुखावत नाही, स्वतर्‍ची चूक कळली तर ती कबूल करत नाही, सुधारण्याची संधी देत नाही. साहित्यिक वाद हे हट्टी आग्रहात रूपांतरित होत असल्यामुळे आम्ही ते टाळतोच. त्यातून संबंध बिघडण्याची भीती. त्यामुळे शक्यतो आम्ही एकमेकांना सावरूनच घेतो. एकमेकांना न दुखावण्याचं आभासी सुख देत राहातो. एकमेकांना विरोध करून, सकारण भांडूनही आपण एक असू शकतो, ही जाणीव लोप पावली आहे. 
खरी मेख इथेच आहे. आम्ही सत्तेला आणि व्यवस्थेला भीतो, त्यापेक्षाही आम्ही एकमेकांना भीतो. असे भित्रे स्वातंत्र्य उपभोगत असल्यामुळेच आमची रोगप्रतिकारक  शक्ती संपत चालली आहे. म्हणूनच वर्तमानाचं कुरूप काढायला आम्हाला नयनतारा सहगल लागतात. त्या बोलल्या की आम्हाला पाहुण्याच्या काठीने साप मारल्याचं विचित्र समाधान लाभतं. आम्ही टाळ्या पिटतो.
आम्ही एकमेकांना भिण्याचं थांबवलं पाहिजे. एकमेकांत स्पष्ट बोललं पाहिजे. मग समाज आहेच, आणि सरकारही.

मग कशाला हवीत खरकटी अनुदानावर चालणारी संमेलनं? आम्ही आमची व्यवस्था निर्माण करू. मुक्त व्यवस्था. 

( ख्यातनाम लेखक आणि नाटककार)
pawarjayant6001@gmail.com


Web Title: cocooned in their own sails: the sad state of contemporary Marathi intellectuals and authors
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.