बदलाचे भान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:00 AM2019-04-21T06:00:00+5:302019-04-21T06:00:05+5:30

राजकीय सभा, त्यातली भाषणे आणि नेत्यांची चमकोगिरी तरुणांना भुरळ घालू शकत नाही. राजकारणाबद्दल तरुणांची मते ठाम नाहीत, त्यांचे राजकीय सामाजीकरणही होत नाही, पण भुलथापांना बळी न जाता, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा दृकश्राव्य माध्यमांवर तरुणांचा विश्वास असल्यामुळे राजकारणही तसे बदलत जाईल.

Changing scenario of politics | बदलाचे भान..

बदलाचे भान..

Next
ठळक मुद्देनवी पिढी माहितीसाठी दृश्य, श्राव्य गोष्टींचा आधार घेते, हे बदलाचं लक्षण आहे.

-विश्राम ढोले

तरुण मुलांत विशेषत: नवमतदारांमध्ये राजकीय विचारसरणीविषयीची प्रगल्भता एकूण कमी झालेली दिसते. याचं कारण म्हणजे विविध राजकीय पक्ष, त्यांचं धोरण, इतिहास याविषयीची माहिती त्यांना कमी आहे. महाविद्यालयीन निवडणुका होत नाही, राजकारणाशी त्यांची ओळख नाही त्या अर्थानं त्याचं राजकीय सामाजिकरण फार होत नाही. तरुण मुलांना आकर्षित करतील अशा राजकीय चळवळीही आता उरलेल्या नाहीत.
त्याउलट समाजमाध्यमांत तरुण मुलं राजकीय चर्चा जोरदार करतात. राजकीय मिम्सची देवाणघेवाण होते; मात्र ते मिम्स केवळ विनोद म्हणून फिरविले जातात. त्यातून त्यांचे मनोरंजन होते. राजकीय टिप्पणी म्हणून हे तरुण त्याकडे पाहतात का याविषयी शंका आहे. कारण त्यातून त्यांचे ‘राजकीय भान’ किंवा समज निर्माण होत नाही.
या तरुण मुलांच्या समजून घेण्याच्या केंद्रस्थानी किंवा त्यांच्या इंटरनेट वापराच्या केंद्रस्थानी पारंपरिक विषय राहिलेले नाहीत. त्यांना जगात काय चाललेलं आहे याची माहिती असते. ते अनेक गोष्टींची जागतिक माहिती ठेवतात; मात्र ते विषय त्यांच्या आवडीचे, त्यांनी निवडलेले असतात. राजकारण-समाजकारण-जात-धर्म या चौकटींपेक्षा या तरुण मुलांचं जग वेगळं आहे.
या परिस्थितीचा आणि राजकारणाचा संबंध काय?
एकतर भाषणांना, त्यातल्या मुद्द्यांना ही पिढी भूलत नाही; मात्र एखादं चमकदार वाक्य, कुणीतरी दृश्यात्मक चांगल्या पद्धतीनं काही सांगितलं, दाखवलं तर ते चटकन भुलू शकतात. कारण त्यांची मतं ठाम नाही. राजकीय पक्षांना, उमेदवारांना कोणत्या निकषांवर जोखावं, समजून घ्यावं असे त्यांचे निकषच विकसित झालेले नाही. त्यांचं वयच कमी असल्यानं तसं न होणं साहजिक आहे; मात्र त्यामुळे अनुभव, वैयक्तिक अनुभव, चमकदार माहिती, त्यातून आलेलं भान यावर ते मतं ठरवितात. त्यामुळे हे सारं ‘चमको’पणाकडे जाणारं आहे; मात्र आपल्याकडे व्यवस्थाच तशी होत चाललेली आहे. नवी पिढी माहितीसाठी दृश्य, श्राव्य गोष्टींचा आधार घेते, हे बदलाचं लक्षण आहे.
त्यामुळे राजकारणही आता दृश्यकेंद्री, श्राव्यकेंद्री, प्रतिमाकेंद्री होत जाईल. दृश्यकेंद्री माहिती व्यापक होत जाईल. त्याचं एक उदाहरण म्हणजे सध्या गाजत असलेल्या राज ठाकरेंच्या सभा. राजकीय पक्षांनाही आता नव्या साधनांचा आधार घेणं क्रमप्राप्त होत आहे.
(लेखक समाज-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

vishramdhole@gmail.com

Web Title: Changing scenario of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.