भिलार : पुस्तकांचं गाव

By Admin | Published: April 29, 2017 09:11 PM2017-04-29T21:11:01+5:302017-04-29T21:11:01+5:30

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर सजलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’तून...

Bhilar: Books village | भिलार : पुस्तकांचं गाव

भिलार : पुस्तकांचं गाव

googlenewsNext
>- सचिन जवळकोटे
 
 
महाबळेश्वरजवळच्या डोंगरकुशीत  स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या या गावात नुकतीच तब्बल पंधरा हजार पुस्तकं वस्तीला आली आहेत. भिंती चित्रांनी सजल्या आहेत,आणि घरीदारी वाचक-पर्यटकांसाठी स्वागताची तोरणं लावली जात आहेत. येत्या गुरुवारपासून हे गाव ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून एक नवा प्रवास सुरू करणार आहे. त्या गावातून केलेली ही भटकंती!
 
लालचुटूक स्ट्रॉबेरी म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतं महाबळेश्वर अन् पाचगणी. या दोन ‘हिल सिटी’च्या आजूबाजूला वसलीत अनेक छोटी-छोटी गावं. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगाच्या कुशीत पहुडलेली कौलारू बांधणीची गावं. यातलंच एक म्हणजे भिलार. पाचगणीवरनं महाबळेश्वरला जाताना मध्येच या गावचा फाटा लागतो. म्हटलं तर हे गाव रोज विश्वाशी संपर्क ठेवून असणारं.. म्हटलं तर जगापासून फटकून राहणारं. 
फाट्यावरनं डाव्या बाजूला आत वळलं की सुरू होते टुमदार बंगल्यांची रांग. घाटाखालच्या पठारावर कधीच बघायला न मिळालेल्या दुर्र्मीळ फुलांची बागच! चढ-उतारावरचा वळणा-वळणाचा रस्ता पार करत आत शिरलं की मूळ भिलार गाव दिसतं. कोकणी संस्कृतीशी साधर्म्य दर्शविणारी बुटकी घरं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याच कामात दंग असणारी कष्टाळू माणसं. प्रत्येकाच्या हाताला एकच वास.. गोड स्ट्रॉबेरीचा. प्रत्येकाच्या बोटाला एकच रंग.. लाल स्ट्रॉबेरीचा. ‘स्ट्रॉबेरी महोत्सवा’मुळं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय एकच.. स्ट्रॉबेरी पिकवणं. वाहनानं देशभरात, तर विमानानं जगभरात पाठवणं. 
तर असं हे गाव गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणानं नटू लागलंय. नव्या-कोऱ्या पुस्तकांच्या वासानं हरखून गेलंय... आजपावेतो ‘स्ट्रॉबेरीचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारं भिलार आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणार आहे. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेनं यासाठी पुढाकार घेतलाय. 
भिलार गावची लोकसंख्या तीन-साडेतीन हजारांची. पाच-साडेपाचशे उंबऱ्यांच्या या गावात पहिल्या टप्प्यात खूप विचार करून पंचवीस ठिकाणं निवडली गेली. इथं वेगवेगळ्या ग्रंथ-पुस्तकांनी सुसज्ज असं वाचनालय तयार झालं. सात घरं, सहा लॉज, सहा घरांसह लॉज, तीन मंदिरं, दोन शाळा अन् एक खासगी कार्यालय या प्रकल्पात सामील झाली. 
मराठी भाषा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय माळवणकर सांगत होते, ‘हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या टीमनं इथं मुक्कामच ठोकलाय. सुरुवातीच्या काळात हिलरेंज हायस्कूलमध्ये आम्ही गावच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मग गावकऱ्यांशीही संवाद साधला. हा प्रकल्प गावाला एवढा आवडला की त्यांनी त्यांची गावठाण भागातली तब्बल साडेतीन एकरची जागाही देऊन टाकली. मात्र, केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यावर आम्ही भर दिला. घर तिथं वाचनालय निर्माण केलं. निवडलेल्या ठिकाणी स्वतंत्र बुकशेल्फचीही सोय केली. आता पंचवीसच्या पंचवीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं रचली असून, प्रत्येक पर्यटकाला ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणं वाचन करता येईल.’ जवळपास शंभर प्रकाशकांची पंधरा हजार मराठी पुस्तकं या गावासाठी विकत घेण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या बॉक्समध्ये आजपावेतो स्ट्रॉबेरी भरली जायची, त्यात सध्या नव्या कोऱ्या पुस्तकांचे गठ्ठे दिसू लागले आहेत. पुस्तकांचं वाटप नियोजनपूर्वक करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाही कामाला लागली. पुस्तकं देतानाही त्या ठिकाणाची गरज ओळखून वर्गवारी करण्यात आली. हिलरेंज शाळेत बालसाहित्य, तर हनुमान मंदिरात नियतकालिकं ठेवण्यात आली. एका खासगी कार्यालयात वर्तमानपत्रं अन् साप्ताहिकं, तर एका रिसॉर्टमध्ये निसर्ग, पर्यटन अन् पर्यावरण साहित्य दिलं गेलं. प्रत्येकाला सरासरी सातशे ते आठशे पुस्तकं दिली गेली. वाचनाचा कंटाळा येणाऱ्या पर्यटकांसाठीही ‘पेन-ड्राइव्ह’मध्ये पन्नास ते शंभर बोलकी पुस्तकं ‘डाउनलोड’ केली गेली. पुस्तक वाटपासाठी पुढाकार घेणाऱ्या वाईच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर आपल्या मदतनीसांसह गावतल्या लगबगीत सहभागी आहेत.
या गावात ‘स्ट्रॉबेरी महोत्सव’ सुरू करणारे बाळासाहेब भिलारे यांनी या अनोख्या प्रकल्पाचं महत्त्व बरोबर ओळखलं आहे. ‘सरस्वती’च्या रूपानं ‘लक्ष्मी’ही गावात येऊ शकते, हे अचूकपणे लक्षात घेतलं आहे. म्हणूनच हा प्रकल्प यशस्वी करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. 
ते सांगत होते, ‘वाचनसंस्कृतीशी निगडित पर्यटक हा शक्यतो उच्च मध्यमवर्गीय असू शकतो. त्यामुळं पुस्तकं वाचनाच्या निमित्तानं अशी चांगली मंडळी आमच्या गावाला लाभली तर उलट गावच्या पर्यटन विकासाला चालनाच मिळेल. 
‘एमटीडीसी’च्या न्याहरी अन् निवास योजनेचा अधिकाधिक ग्रामस्थांना फायदा घेता येईल. म्हणूनच आम्ही सारेजण ठामपणे या प्रकल्पात सहभागी झालो आहोत. गेली अनेक वर्षे आम्ही इथंं स्ट्रॉबेरी महोत्सव भरवतोय. त्याच धर्तीवर एखादा साहित्य महोत्सवही इथं होऊ शकतो.’
गावात फेरफटका मारत असताना ४ मे रोजी होणाऱ्या शुभारंभ सोहळ्याची लगबग जाणवत होती. ‘पुस्तकांचं गाव’ या प्रकल्पाचं उद्घाटन करायला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह दिग्गज साहित्यिकही येणार आहेत. सदानंद मोरे, अरुणा ढेरे, नंदेश उमप, सौमित्र यांच्यासह अभिनेत्री स्पृहा जोशीसारखे कलाकारही आवर्जून उपस्थिती दर्शविणार आहेत. विशेष म्हणजे, प्रकाशक रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशन संस्थेच्या एका पुस्तकाचं प्रकाशनही इथंच मोठ्या थाटात केलं जाणार आहे. 
हे सारं ऐकताना-पाहताना-अनुभवताना मराठी मनाचा स्वाभिमान कुठंतरी सुखावला जात होता. मात्र, आतमध्ये कुठंतरी अनाहुत भीतीही अस्वस्थ करून सोडत होती. कारण महाबळेश्वर-पाचगणी टापूत ‘विकेण्ड एन्जॉय’ करायला येणारी पर्यटक मंडळी बहुतांश करून हिंदी अन् गुजराथी भाषिक. ‘खाओ, पिओ और मजा करो’ मानसिकतेतल्या या पर्यटकांना मराठी साहित्याशी काय देणं-घेणं असणार? - असा प्रश्नही आतून कुठंतरी टोचत होता. बोचत होता. एवढ्यात गावच्या रस्त्यावर एक कार कच्कन येऊन थांबली. आतून टी-शर्ट, बर्म्युडा अन् जीन्स पॅण्टधारी फॅमिली खाली उतरली. डोळ्यावरचा काळा गॉगल काढत त्यातल्या कर्त्या पुरुषानं विचारलं, ‘पुस्तकांचं गाव हेच ना? कोण-कोणती पुस्तकं वाचायला मिळतील होऽऽ आम्हाला?’ 
‘पुणे पासिंग’ कारमधली ही पर्यटक मंडळी केवळ ऐकीव माहितीवर गाव हुडकत इथपर्यंत आली होती. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच या गावाची महती त्यांच्या कानावर पोहोचली होती. ‘हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लालचुटूक स्ट्रॉबेरी खाताना छान-छान गोष्टी वाचायला मिळणार!’ या कल्पनेनं त्यांची चिमुरडी पोरंही भलतीच हरखली होती. हे पाहिल्यानंतर मात्र मनावरचंं मळभ दूर झालं. 
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ‘भिलार वॉटर फॉल’च्या साक्षीनं मराठी साहित्याचा धबधबा अखंड कोसळत राहणार, याची खात्री पटली. खऱ्या अर्थानं, ‘स्ट्रॉबेरीचं गाव’ आता ‘पुस्तकांचं गाव’ बनू घातलं आहे... तृप्त मनानं तिथून निघालो.
 
चौथी पास.. तरी पुस्तकांची आस! 
ज्यांचा कधी आयुष्यात साहित्याशी दुरन्वयेही संबंध आला नाही अशी स्थानिक मंडळीही ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्पात मोठ्या हौसेनं उतरली. चौथी पास अनिल भिलारेचा व्यवसाय शेतीचा. मात्र, आपल्या घरात पर्यटकांसाठी वाचनालय होणार म्हटल्यावर त्यानं कौतुकानं जुन्या घराचं बांधकाम व्यवस्थित करून घेतलं. 
गावात शेतकऱ्यांसाठी खतं अन् बी-बियाणं विकणारे शशिकांत भिलारे यांनीही खास पर्यटकांसाठी दुकानाच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसवून घेतले. छानपैकी ‘छत्री’ही बनवून घेतली. एका शेल्फमध्ये विषारी कीटकनाशकं ठेवली, तर दुसरीकडं प्रेमावरच्या कादंबऱ्याही रचून काउंटरवर ठेवल्या.
सरपंच वंदना प्रवीण भिलारे यांनी तर स्वखर्चानं घराच्या आतला जिना बंद करून बाहेरून नवीन बांधला, जेणेकरून पर्यटकांना पुस्तकं वाचण्यासाठी आत अंधारात यायला नको म्हणे.. 
आता बोला...
गावच्या पारावर  साहित्याचा किलबिलाट..
‘पुस्तकांचं गाव’ सतत किलबिलत राहावं, यासाठी वर्षभर इथं अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
१) गावच्या पारावर कथाकथन अन् कविता वाचन. 
२) लेखक-प्रकाशक पर्यटकांच्या भेटीला.
३) वाचन-संपादन-मुद्रितशोेधन कार्यशाळा. 
४) नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे.
५) अंधांसाठी बोलक्या पुस्तकांची उपलब्धता.
(लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत. Sachin.javalkote@lokamt.com )

Web Title: Bhilar: Books village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.