अजब स्वप्नांची गजब दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 06:15 PM2018-10-13T18:15:39+5:302018-10-14T09:06:00+5:30

ललित : स्वप्नामुळे मानसिक रुग्णांवर उपचार करणेही शक्य होत आहे. कारण स्वप्न सांगण्यास व्यक्तीला संकोच कधीच वाटत नाही; पण आपल्या मनातील इच्छा सांगण्यास ती संकोच करत असते. 

Awesome world of unique dreams | अजब स्वप्नांची गजब दुनिया

अजब स्वप्नांची गजब दुनिया

googlenewsNext

- सुषमा सांगळे - वनवे

स्वप्नांबाबत प्रत्येक व्यक्तीच्या मनात गूढ असावे, असे मला वाटते आणि प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहते हेही तितकेच खरे आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्वप्ने पडतात. ती का पडतात? स्वप्न पडणे चांगले की वाईट? असे प्रश्न प्रत्येक व्यक्तींना पडतही असावेत. स्वप्नांचे प्रकार आहेत. दिवास्वप्ने आणि रात्री झोपेत पडणारी स्वप्ने. दिवास्वप्न म्हणजे जागेपणी पाहिलेले स्वप्न. काही माणसे जागेपणी कसल्यातरी विचारात हरवून जातात. त्यांना स्वत:ची जाणीव असते; परंतु मन एका वेगळ्याच तंद्रीत असते. झोपेत पडणारी स्वप्ने आणि जागेपणी पाहिलेली स्वप्ने हे कल्पनाविलासाचेच दोन प्रकार असले तरी त्यात बराच फरक आहे.

झोपेतील स्वप्ने आपल्या इच्छेप्रमाणे बघता येतीलच असे नव्हे; पण दिवास्वप्न आपल्या इच्छा-आकांक्षांप्रमाणे पाहू शकतो. म्हणूनच दिवास्वप्नांना जागेपणीचे मनोराज्य असे म्हटले जाते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनसंघर्षातून व्यक्तीची काही काळ सुटका होण्यासाठी दिवास्वप्ने उपयुक्त ठरतात. त्यामुळे क्षणिक तरी मनाला आनंद वाटतो; पण याचा अतिरेक होता कामा नये. शेखचिल्लीची या संदर्भात असलेली गोष्ट सर्वांना सुपरिचित आहेच.

भूतलावरील सर्वच प्राण्यांना निसर्गाने झोपेची देणगी दिली आहे. झोपेचा आणि स्वप्नांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. झोपेमुळेच मनुष्य स्वप्नांच्या अजब दुनियेत प्रवेश करू शकतो. म्हणूनच झोपेला स्वप्नांची जननी म्हणतात. प्रत्येक माणसाच्या हलक्या झोपेपासून गाढ झोपेपर्यंत आणि तिथून परत हलक्या झोपेपर्यंत अशी झोपेची आवर्तने सुरू असतात.

ही अवस्था साधारण दहा ते पंधरा मिनिटांची असते; परंतु झोपेत आपणाला तो कालावधी खूप मोठा आहे असे वाटते. झोपेत आपण खूप धावतो आणि तरीही रस्ता संपत नाही असे वाटते, ते यामुळेच. स्वप्नांचे व झोपेचे असे चक्र रात्रभर चालूच असते; पण सर्वच स्वप्ने व्यक्तीच्या लक्षात राहतातच असे नव्हे. ‘माणसाच्या अंतर्बाह्य मनात जागेपणी जे विचार असतात त्यांचे झोपेत वेषांतर होऊन प्रतीकात्मक स्वरूपात होणारे दर्शन म्हणजे स्वप्न होय़’ स्वप्नांची दुनिया रहस्यमय असली तरी माणसाच्या उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी स्वप्ने उपयुक्त असतात.

मनावरच्या ताणतणावाचा, दबल्या गेलेल्या अतृप्त इच्छा-वासनांचा निचरा करणे, मानसिक समतोल राखून भावना व प्रेरणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वप्ने उपयुक्त असतात. स्वप्नामुळे मानसिक रुग्णांवर उपचार करणेही शक्य होत आहे. कारण स्वप्न सांगण्यास व्यक्तीला संकोच कधीच वाटत नाही; पण आपल्या मनातील इच्छा सांगण्यास ती संकोच करत असते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांनी स्वप्नांबाबत अधिक विश्लेषण करून जगाला अनोखी देणगी दिली आहे. बऱ्याच व्यक्तींना झोपेत चालणे व बोलण्याचीही सवय असते. असे होणे म्हणजे झोपेत बाह्यमनाचे नियंत्रण नष्ट झालेले असते. 

स्वप्ने ही भीतीदायक, आनंददायी, विचित्र, कशीही पडत असतात. व्यक्तिपरत्वे त्या स्वप्नांचा अर्थही वेगवेगळा असतो. कारण प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली व कल्पनाविस्तार यावर ती आधारित असतात. त्यामुळे आपण स्वप्ने व त्यांचे अर्थ याबाबतच्या अंधश्रद्धा दूर करून निकोप जीवशैलीसाठी त्याचा शास्त्रीय विचार करणे योग्य ठरते. म्हणूनच इथे मला म्हणावेसे वाटते. ध्येय अशी ठेवा, जी स्वप्नात येतील आणि स्वप्ने अशी पाहा जी सत्यात उतरतील...!

Web Title: Awesome world of unique dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.