सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:00 AM2018-08-19T03:00:00+5:302018-08-19T03:00:00+5:30

सावरकर हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते होते; पण राज्य मात्र सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांप्रति असेल, याविषयी त्यांच्या मनात संदेह नव्हता. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये अंतर आहे. ते जाणून घेतले पाहिजे. हिंदुत्वाची पाठराखण म्हणजे अन्यांप्रति भेदभाव नव्हे. हिंदुत्व ही संकल्पना इतकी सीमित नाही. - नसावी.

Atal Bihari Vajpayee on veer savarkar | सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?

सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?

googlenewsNext

स्वातंत्र्यवीर सावरकर ही केवळ व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता. नुस्ती ठिणगी नव्हती, साक्षात प्रज्वलित अग्नी होता. त्यांच्या विचाराला आणि व्यक्तित्वाला सीमांचे कुंपण नव्हते. मन-वचन आणि कर्माची अशी तादात्म्य एकरूपता मी सावरकरांखेरीज अन्य कुणाच्या जीवनप्रवासात पाहिलेली नाही. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व, वक्तृत्व आणि कवित्व हे सारेच एक विलक्षण असे संमोहित करणारे रसायन होते. 

सावरकर म्हणजे तेज. त्याग, तप, तत्त्व, तर्क, तारुण्य, तलवार! सावरकर म्हणजे तिलमिलाहट, सावरकर म्हणजे तितिक्षा.. आणि सावरकर म्हणजे तिखापन. तिखट होते सावरकर. आणि तरी त्यांच्या या क्रांतीने धगधगत्या आयुष्यात कवितेचे चांदणेही बहरलेले होते. 

 खरे तर क्रांती आणि कविता या दोन गोष्टी एकत्र नांदणे किती मुश्कील! कवितेशी भ्रांती जोडली जाऊ शकते एकवेळ; पण क्रांतीचा बंध कवितेशी जोडणे फार अवघड. कवितेला उंच उडण्याची आस असते, त्यासाठी कल्पनांचे पंख ल्यावे लागतात, सृजनाचा संसार उभा करावा लागतो. ही उंच भरारी घेताना वास्तवाशी नाते तुटले, जमिनीपासून पाय वर उचलले गेले, तर कवीला ते माफ असते.

पण क्रांतिकारकाला हे असे अधांतरी तरंगणे माफ नाही. क्रांती असते जमिनीशी जोडलेली. वास्तवाच्या खाईत खोल रुजून वर आलेली. तिचे यथार्थ भान असलेला सावरकरांमधला कवी जमिनीत पाय रोवून अवकाशात उंच भरारी घेणे जाणत होता. त्यांच्यापाशी उंचीही होती आणि खोलीही! आगीवरून चालत असताना सावरकरांची कविता मात्र चंद्राशी गोष्टी करण्याइतकी नाजूक अलवार होऊ शकत असे.

सावरकरांच्या कवितेतला उद्वेग, आवेग, संवेग हिंदीमध्ये भाषांतरित करण्याचा यत्न मी एकदा करून पाहिला होता. मला मराठी थोडे समजते; पण आमचे मराठी खासे ग्वाल्हेरचे. ‘वरचा मजला खाली (म्हणजे रिकामा) आहे’ असले. आता पुणेकर म्हणतील, मजला वरचा असेल तर तो खाली कसा असेल? पण आमच्या मराठीत असतो!!
तर ते असो.

पण सावरकरांच्या कवितेने मला नेहमीच मोहात पाडले आहे. कल्पनेच्या आकाशात विहरत असताना क्रांतीची धगधगती ज्वाळा हाती धरून ठेवणे या कवितेला कसे साधले असेल, हे मला अजून उलगडलेले नाही. 
याचे एक कारण असे की सावरकरांचे विचार आणि जीवन समग्र होते. त्यांच्या ठायीच्या प्रखर राष्ट्रवादाला आधुनिक सुधारणावादाचे मोठे लोभस असे कोंदण होते. पारतंत्र्याबरोबरच स्वजनांच्या विकृतीशी लढणारा तो एक निर्भय योद्धा होता. गांधीजींनी हरिजनोद्धाराची चळवळ हाती घेण्याच्याही आधी सावरकरांच्या कवितेने सर्वांसाठी देवाच्या देवळाची दारे खुली करण्याची हाक घातली होती.

आपल्याच बांधवांना विविध कारणांनी ‘वेगळे’ ठरवून त्यांना अनेक गोष्टींचा मज्जाव करणार्‍या भिंती घालण्याच्या वृत्तीने हिंदू समाजाचे मोठे नुकसान करून ठेवले आहे. वर्णव्यवस्थेचा उपयोग कोण्या एका कालखंडात झालाही असेल कदाचित; पण काळाची चाके फिरली, तरीही आपण त्यातच अडकून पडलो आणि ब्राrाण लढणार नाहीत.. शस्त्रे हाती घेतील ते फक्त क्षत्रियच असली आत्मघाती कुंपणे कायम ठेवली.

भारतावर चाल करून आलेल्या प्रत्येक आक्रमकाने या दुहीचा फायदा उठवल्याचे दिसते. आपण परकीय आक्रमकांच्या हाती कधीही हार पत्करली नाही. उलट आपापसातल्या भिंती तशाच जपण्याच्या नादान हट्टापायी स्वत: लढून कमावलेल्या गोष्टी या आक्रमकांच्या पायी घालून गुढगे टेकत आलो.

प्लासीची लढाई आठवा. जितके लोक मैदानात उतरून लढत होते, त्याहून दुप्पट लोक काठावर उभे राहून लढाईचा तमाशा पाहात होते, असे इतिहास सांगतो. का? कारण काहींना रणभूमीवर उतरायची परवानगीच नव्हती आणि उरलेल्यांना लढणार्‍यांचा पराभवच हवा होता.

भारतावर चाल करून आलेल्या, ही भूमी लुटून नेलेल्या आक्रमकांशी आपण कधीही एक अखंड देश म्हणून संपूर्ण सार्मथ्याने लढलोच नाही.

मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात विदेशमंत्री असताना अफगाणिस्तानला जाणे झाले. सगळी सरकारी कामे आटोपल्यावर मी यजमानांना म्हटले, मला गझनीला जाण्याची इच्छा आहे.
त्यांनी विचारले, ‘गझनीला जाऊन तुम्ही काय करणार? तिथे पाहण्यासारखे काही नाही. प्रवास-निवासाच्या सोयी नाहीत. लहानसे गाव तर आहे ते!’

त्यांना काय ठाऊक की अटलबिहारी नावाच्या मुलाने शाळेत असताना हिंदुस्थान लुटून नेणा-या गझनीच्या महमदाचा धडा वाचलेला आहे आणि तेव्हापासून गझनी हा त्याच्या काळजात सलणारा एक काटा होऊन बसला आहे!!
मग गप्पांच्या ओघात कळले, की अफगाणिस्तानच्या इतिहासात या गझनीला फार महत्त्व नाही. गझनी नावाच्या एका छोट्या प्रांतात अनेक टोळ्या होत्या, त्यातल्या एका टोळीचा हा डाकू आपल्या सहकार्‍यांना घेऊन सोनेकी चिङिया लुटायला गेला आणि लूट घेऊन परत आला.

कल्पना करा, आजही ज्या गझनीला अफगाणिस्तानच्या नकाशावर स्थान नाही, तिथला एक डाकू हजारो वर्षांपूर्वी निघतो आणि हिंदुस्थानात लूट घडवतो..?

हे घडले, कारण राजा लढेल आणि तोच मरेल असे इथल्या व्यवस्थेने ठरवून ठेवले होते. इथल्या सामान्यांच्या हाती ना आपण कधी विश्वास दिला, ना शस्त्रे दिली, ना अध्ययनाचे अधिकार!

आपल्याकडे धर्मांतरण म्हणजे जणू राष्ट्रांतरण असे आपण मानले आणि परस्परांमधल्या दुराव्याच्या रेघा अधिक ठळक करत राहिलो.

सावरकर हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते होते; पण राज्य मात्र सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांप्रति असेल; याविषयी त्यांच्या मनात संदेह नव्हता. कोणाच्याच मनात तसा संदेह नसावा. असेल, तर तो पुसावा. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये अंतर आहे. ते जाणून घेतले पाहिजे.

हिंदुत्वाची पाठराखण म्हणजे अन्यांप्रति भेदभाव नव्हे. हिंदुत्व ही संकल्पना इतकी सीमित नाही.
नसावी.

Web Title: Atal Bihari Vajpayee on veer savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.