पेटलेल्या पाण्यासोबत 85 किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:06 AM2018-11-11T06:06:06+5:302018-11-11T06:10:02+5:30

नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा तसेच नाशिकच्या गोदापात्रातून जायकवाडीसाठी पाणी धावत निघाले, तसे तहानलेल्या काठांनी आम्हीही निघालो. धावत्या पाण्यासोबत धावत राहिलो. वाटेत माणसे भेटली, आणि त्यांच्या कहाण्या ! - त्याचा हा वृत्तांत !

85 kilometers of journey with burning water | पेटलेल्या पाण्यासोबत 85 किलोमीटरचा प्रवास

पेटलेल्या पाण्यासोबत 85 किलोमीटरचा प्रवास

Next
ठळक मुद्दे‘आमचे पाणी’ म्हणण्याऐवजी ‘आमची नदी’ कोण म्हणणार? शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचे भोवरे मुळा, प्रवराच्या पाण्यावर गरगरत राहतात़...

साहेबराव नरसाळे

अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातील गोदावरी या मराठवाड्याच्या जलसंवादिनी़ पण याच नद्यांमुळे वरचे आणि खालचे असे प्रादेशिक वाद उभे राहिले़ खालचे लोक आमचं हक्काचं पाणी पळवतात, अशी वरच्या लोकांची आदळआपट, तर आमचा ‘न्यायिक’ वाटा वरचे लोक नाकारतात, असा खालच्या लोकांचा थयथयाट ! या साऱ्यात पुढारपण अंगी मुरलेले अग्रभागी राहतात़ माध्यमात चमकतात़ पण यात नदीकुसातले नेमके कोठे असतात? त्यांना काय वाटतं? या दोघांच्या भांडणात ते एकदमच रूक्ष झालेत; की आहे त्यांच्यामध्येही काही ओलावा शिल्लक? याचा शोध घेत मी मुळा धरणाच्या पाण्यातून निघालो जायकवाडीच्या दिशेने़
नगर जिल्ह्यातील मुळा धरण ते जायकवाडी धरण यातील अंतर ८५ किलोमीटरचं. याच जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण ते जायकवाडी यातील अंतर १७२ किलोमीटरचं. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात ही धरणे येतात. मुळा, भंडारदरा व नगर जिल्ह्याचे जीवनमान अवलंबून तर जायकवाडीवर मराठवाड्याचं. नगर जिल्ह्यातील ही धरणं भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जायकवाडीला जातं. असेच नाशिक जिल्ह्यातील धरणांबाबत आहे. त्यांचंही पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीत जाते. मराठवाड्याला पाणी कमी पडते तेव्हा या धरणांतून पाणी सोडण्याची मागणी होते. यावरून नगर-नाशिक व मराठवाडा यात तंटे सुरू आहेत. म्हणून या नद्यांतील पाणी व त्यांच्या प्रवाहाला प्रचंड महत्त्व आले आहे. एक धरण ते दुसरं धरण यातील पाण्याचा प्रवास सरळसोपा राहिलेला नाही. नदीला जेवढे खाचखळगे आहेत तेवढेच या पाण्यालाही !
नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस़ वार गुरुवाऱ मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार होते़ मी सकाळीच मुळा धरणावर पोहोचलो. एरव्ही हे पाणी सुटले काय किंवा मध्येच कोणी अडवले काय, याचं कोणालाही देणं-घेणं नसायचं, पण आता मुळाच्या पाण्याचा पहिला लोंढा कॅमेऱ्यात साठवण्यासाठी माध्यमांच्या फौजेनं आख्खं नदीपात्र व्यापलं होतं. धरणाच्या मोºयांच्या दिशेनं कॅमेरे रोखले होते़ पोलीस-अधिकाऱ्यांची फौज उभी. चिरशांती लाभावी तसं स्थितप्रज्ञ भासणाऱ्या मुळा धरणाचे पाणी भोंगा वाजताच चित्कार करीत त्वेषाने नदीपात्रात झेपावले़ नदीपात्रातून पाणी वाहताना ठिकठिकाणी कॅमेरे, ड्रोन या पाण्याची हालचाल टिपत होते़ जागोजाग या पाण्यावर ‘वॉच’ ठेवण्यात येत होता़ नदीपात्रातील पाण्याला पोलिसांची कवचकुंडले लाभली होती़ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा जागता पहारा होता़ अशा कडेकोट संरक्षणात मुळाची ‘डोली’ जायकवाडीच्या दिशेने निघाली होती़ सोबत मी होतोच़
दुपारी दोनचा प्रहऱ मुळा धरणातून निघालेले पाणी नगर-मनमाड रोडवरील राहुरी खुर्दचा पूल ओलांडून देसवंडीच्या दिशेने निघाले होते़ राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठ़ या विद्यापीठाने देशाला अनेक नवे वाण दिले़ कृषी क्रांती घडविली आणि आता धवलक्रांतीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे़ हे सारे शक्य झाले मुळाच्या पाण्यामुळेच ! पण यावर्षी पाऊस घटल्यामुळे विद्यापीठातील अनेक मळे करपले आहेत, अशी कुजबुज मुळाथडी कानी पडली़ एव्हाना पाण्याने देसवंडी मागे सोडली असेल, अशी शंका मनाला चाटून गेली़ लागोलाग मी देसवंडीचा रस्ता धरला़ मोटारसायकलवरून मुळा नदीचा काठ तुडवीत देसवंडीत पोहोचलो़ तर शंका खरी ठरली़ पाणी बरेच लांबवर पोहोचले होते़ नदीकाठी शेतात एक आजोबा दिसले़ त्यांच्याकडे पाण्याची विचारपूस करायला लागलो तर म्हणाले, ‘या या इकडे़ आत या़’. ते मला थेट शेतातच घेऊन गेले़ नदीकाठची शेती़ पण भेगाळली होती़ मला पाटबंधारे विभागाचे अधिकारी समजून ते जळू लागलेली पिके दाखवू लागले़
- पंधरा दिवस उलटून गेले होते पिकाला पाणी दिलेले़ घासाने माना टाकल्या होत्या़ नदीला पाणी आले; विठुराया पावला, म्हणाले़
साठीत झुकलेले आजोबा राजकारण, पाण्याचा वाद अशा विविध विषयांना शिवत नदी संस्कृतीवर भरभरून बोलले़ आजोबांचे बोलणे तोडत त्यांना नाव विचारले तर म्हणाले, ‘तुम्हाला परिस्थिती समजावी म्हणून दाखवले हे़ नाव कशाला घेता?’ मी पत्रकार असल्याचे सांगितले तर नाव सांगायला एकदम नकार दिला़ म्हणाले, ‘उद्या माझ्या घरावर दगडं पडले तर तुम्ही काय करणार?’
या आजोबांकडून या नदीची दुसरी एक दुखरी कहाणी समजली. मुळा नदीवर राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूरजवळ मुळा धरण साकारले. तशी ही नदी अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर उगम पावते. तेथून पाणी मुळा धरणात येते. नंतर जायकवाडीत. पुढे मुळा धरण झाले़ या धरणाला डावा-उजवा असे दोन कालवे आले़ त्यानंतर या कालव्यांतून आवर्तने सुटायला लागली. आजही सुटतात. पण नदीला पाणी सोडले जात नाही. म्हणजे नदी उपाशी आणि कालवे भरलेले, असे चित्र असते. परिणामी नदीला पावसाळा सोडला तर पाणीच नसते. नदीकाठी भेटलेले आजोबांचे तेच दु:ख होते. पण नगर-मराठवाडा या भांडणात त्यांची ही सल बाजूलाच राहिली आहे. जायकवाडीसाठी नदीतून पाणी सोडले होते. त्यामुळे आजोबा आनंदी होते.
आजोबांचा निरोप घेऊन मी कोंढवड, तांदूळवाडी, आरडगावमार्गे केंदळ बुद्रुकला (ता़राहुरी) पोहोचलो़ केंदळच्या अगोदर उघड्याबोडख्या रापलेल्या कोरड्याठाक मुळा नदीने स्वागत केले़ नदीकाठी पुलावरच माणसांचा एक जथ्था उभा होता़ ते पाण्याची वाट पाहत थांबले होते़
‘किती सरकारे आली अन् गेली; पण आमचा प्रश्न घेऊन कोणी नेता भांडला नाही़ आमचा प्रश्न कोणी समजूनच घेत नाही़ अन्यथा मुळा धरणावर, नदीपात्रात पोलीस, अधिकाऱ्यांच्या तैनातीची गरजच काय होती? वर्ष लोटलं नदीला पाणी नाही गेलं. नदीची कोरडी कूस पीक कसं उजवणार?’ असं कितीतरी वेळ ते बोलत होते.
सायंकाळचे ५ वाजत आले होते, तरी पाणी पुढे आलं नव्हतं. नदी एकदम कोरडी़ त्यात आरडगावपासून वरच्या भागात ठिकठिकाणी वाळू उपसल्यामुळे मोठमोठे खड्डे झालेले़ हे खड्डे भरून पाणी पुढे ढकलायला वेळ लागत होता़ तर त्याउलट परिस्थिती केंदळ गावच्या हद्दीतील़ केंदळ हद्दीत वाळू उपशाला बंदी़ त्यामुळे नदीपात्रात चकचकत्या वाळूचे थर साचलेले़ या वालुकामय नदीपात्रात मोटारसायकल ढकलून पाणी कोठपर्यंत आले आहे, हे शोधत काही उत्साही तरुण सुमारे एक किलोमीटर अंतर कापून गेले होते़ त्यांच्यामागोमाग मीही उतरलो नदीपात्रात़ वाळूत पाय खचत होते़ गाडीचा टायर रुतत होता़ कशीबशी पाण्यापर्यंत गाडी घेऊन गेलो़ नदीपात्रात असलेल्या विहिरींना वळसा घालून तर कधी गरगर भोवरा करीत पाणी पुढे जात होते़ केंदळ हद्दीत तुंबलेल्या वाळूतून एक किलोमीटरचे अंतर पार करायला पाण्याला एक
तास लागला़ केंदळ पुलापर्यंत पाणी आले तेव्हा शेतकºयांनी बंधाºयांच्या पाणी आरक्षणासाठी आंदोलन केले़ पाणी सर्रकन पुलाखालून वाहून गेले़ हे ओंजळीतून निसटते पाणी पाहण्याखेरीज कोणाकडेच पर्याय नव्हता़
केंदळमधून पाण्यासोबत मीही पुढे निघालो़ मानोरी-वळण पिंपरी बंधाºयावर पोहोचलो़ रात्रीचे ७ वाजले होते़ पण पाणी बंधाºयात पोहोचले नव्हते़ तेथे पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पोलीस आणि काही ग्रामस्थ पाण्याची वाट होते़ हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून मिळावा, अशी या परिसरातील शेतकºयांची मागणी़ तेथून मी पानेगाव-मांजरी बंधाºयावर पोहोचलो़ या परिसरातही वाळू उपशाला बंदी़ त्यामुळे येथील बंधाºयात सुमारे ३० फुटापर्यंत वाळू साठली आहे़ पानेगाव येथे मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप भेटले़ ते म्हणाले, पूर्वी मुळा नदी बारामाही वाहायची़ येथील लोकं होडीने प्रवास करायचे़ पण आता दिवस फिरले आहेत़ आता मुळा नदी बारा बारा महिने वाहत नाही़ कारण पाऊस आखडला आहे़ त्याशिवाय ‘मुळा’च्या कॅनॉलला पाणी सोडले जाते. पण, नदीत सोडत नाहीत. परिणामी कॅनॉल जगले व नदीकाठ मरत आहे.’
पुढे अंमळनेर-वांजूळपोई ओलांडून मी नेवाशात पोहोचलो़ रात्रीचा मुक्काम नेवासात केला़ रात्री पानेगाव, मांजरी, अंमळनेर, वांजूळपोई गावांना ओलावून पाणी पाचेगावात पोहोचलं होतं. मी सकाळी पाचेगाव बंधाºयावर पोहोचलो़ बंधाºयावरून पाण्याने वेढलेले संगमेश्वराचे मंदिर लक्ष वेधून घेते़ हे मंदिर राहुरी तालुक्यातील तिळापूर हद्दीत आहे़ हीच राहुरी आणि नेवासा तालुक्याची सीमारेषा़ या मंदिराजवळ मुळा आणि प्रवरा नदीचा संगम होतो़ पुढे ही नदी प्रवरा नावाने वाहते़ मुळा-प्रवरा संगमापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पाचेगावचा (ता़ नेवासा) बंधारा हात फैलावत प्रवरेला कवेत घेतो़ प्रवरा नदीवर पुढे पुनतगाव व नेवासा येथील मध्यमेश्वर हे बंधारे आहेत़
मध्यमेश्वर बंधाऱ्यावर अहमदनगर आणि औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे अधिकारी भेटले़ दोघांच्या सांगण्या-वागण्यात ‘वरचे आणि खालचे’ अशी दोन टोकं ठळ्ळकपणे जाणवली़ तेथून मी बहिरवाडी (ता़ नेवासा) येथे पोहोचलो़ बहिरवाडीपर्यंत जायकवाडी धरणाच्या पाण्याचा फुगवटा होता़ तेथील भैरवनाथाच्या पायरीवर जायकवाडीच्या फुगवट्यात प्रवरा विलीन झाली़ पुढे कायगाव टोका (जि़ औरंगाबाद) येथे प्रवरा गोदावरीला मिळाली अन् प्रवराचाही प्रवास संपला. पुढे वाहत राहते ती गोदावरी़
पाणीटंचाई जाणवू लागली की खालच्या आणि वरच्या अशा सर्वांनाच मुळा, प्रवरा नद्या आठवतात़ पण बेसुमार वाळू उपसा, अतिक्रमणांमुळे नद्यांचा मृत्यू पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ कोणताच नेता नद्या जिवंत राहाव्यात म्हणून भांडत नाही़ कोणताच अधिकारी पाणी नसताना नद्यांचे काय हाल आहेत, हे तपासत नाही़ कोणी नद्या उकरल्या, कोणी चारी खोदल्या, कोणी वाळू उपसली.. अशा प्रश्नांशी सोयरसुतक न ठेवणारे पाण्यावर हक्क सांगतात़ असाच हक्क नद्यांवर गाजवण्यासाठी कोण पुढे येणार? ‘आमचे पाणी’ म्हणण्याऐवजी ‘आमची नदी’ कोण म्हणणार? शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचे भोवरे मुळा, प्रवराच्या पाण्यावर गरगरत राहतात़...

पाण्यासाठी नेत्यांचे उंबरे का झिजवायचे?
मुळा, प्रवरा आणि गोदापात्रातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि अहमदनगर - नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटला़‘वरचे आणि खालचे’ असा प्रादेशिक वाद पुन्हा पाण्याच्या आडून उफाळला़ एकमेकांच्या विरोधात निषेध मोर्चे काढून झाले़ काही नेत्यांच्या गाड्या अडवल्या तर काही नेत्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले़ हे इथेच थांबले नव्हते तर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा तर नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे आणि गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या शेतकºयांनी जल्लोष केला़ ‘वरचे आणि खालचे’ या वादात भरडतात नदीकाठचे, अशा शेतकऱ्यांचा खळखळ आवाज नदीकाठी येऊ लागला़
नेवासा (जि़ अहमदनगर) तालुक्यातील निंभारी गावातील पाराजी शिरसाठ सांगतात, नदीला पाणी सोडण्यासाठी नेत्यांचे उंबरे का झिजवायचे? तुम्ही फक्त पाणी मागणीचा अर्ज भरा़ तुमचे पाणी राखीव होते़ पण त्यासाठी लागणारा किरकोळ खर्चाचा भारही काहींना सोसवत नाही़ प्रवरा नदीवरील ६० हजार हेक्टरपैकी केवळ १० ते १२ हजार हेक्टरसाठीच पाणी मागणी अर्ज येतात़ त्यामुळे इतरांना पाणी लागत नाही, असे गृहीत धरून पाण्याचे नियोजन होते़ अधिकाऱ्यांना कालव्यांची दुरुस्ती करावी लागते़ बंधाऱ्यांची दुरुस्ती असते़ त्यासाठी खर्च लागतोच़ हा खर्च पाणी मागणीपोटी आलेल्या शुल्कातून केला जातो़ हे शुल्कच जर भरायचे नसेल तर तुम्ही पाण्यावर हक्क कोणत्या अधिकाराने सांगता? शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी म्हणून कोणत्या नेत्याने शेताचे बांध झिजवलेत? आणि हेच नेते पाण्यासाठी आंदोलनं करतात़
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत़)
manthan@lokmat.com

Web Title: 85 kilometers of journey with burning water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.