Wings e-material of the wings! | शब्दांना पंख ई-साहित्याचे!

- श्रीपाल सबनीस

परंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फेसबुक पोस्ट, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप पर्यायाने ई-साहित्याचे नवे दालन अधिक व्यापक स्वरूपात खुले झालेले पाहायला मिळेल. विशेष उल्लेखनीय म्हणजे, परंपरागत चालत आलेल्या साहित्य प्रकारांइतकीच ताकद शब्दांना लाभलेल्या या नव्या ई-साहित्याच्याही पंखात आहे.

...हे शहाणपणाचे लक्षण नाही
साहित्य आणि संमेलने यांचे अतूट, जिव्हाळ्याचे नाते आहे. साहित्य संमेलने ही सर्वार्थाने संस्कृतीचे उत्सव सोहळे आहेत, असे सोहळे झालेच पाहिजेत. लाखो लोक तेथे जमतात. ते वेडे नसतात. ते एकत्र येतात, ते केवळ साहित्य, संस्कृतीची देवाण-घेवाण करण्याच्या शुद्ध हेतूतून! त्यामुळे त्यांना वेडे म्हणणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.

सोशल मीडियावर अभिव्यक्त होणारे मराठी साहित्य हा नवीन वर्षाचा नवा ट्रेंड होऊ पाहत आहे. हा ट्रेंड योग्य की अयोग्य, यावर चर्वितचर्वण करण्यापेक्षा तो अटळ, अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. खंत एवढीच आहे की, तरुणाई ज्या पद्धतीने, ज्या शैलीमध्ये अभिव्यक्त होत आहे, ती शैली मात्र तितकीशी योग्य नाही. त्यात अनेक दोष आहेत. माणसातील झाकलेले पशुत्व आणि लपलेली विकृृती ही तरुणाईच्या आविष्कारातून सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. अर्थात, सर्वच तरुणाईचे साहित्य हे अशा प्रकारचे विकृतीकडे झुकणारे आहे, असे म्हणता येणार नाही. विधायक प्रवृत्तीचे भाष्य, काव्य, विचार, संवाद, विकृतीवरील हल्लाबोल, टीका-टिप्पणीदेखील ई-साहित्याच्या माध्यमातून वाचायला मिळत आहे. फक्त या माध्यमाचा वापर सक्षमपणे होणे गरजेचे आहे.
म्हणूनच सोशल मीडियाच्या नव्या माध्यमात संस्कृती शुद्धीकरणाची नवी चळवळ सुरू व्हायला हवी. ही चळवळ जास्तीत जास्त सत्यनिष्ठ असावी, मानवतावादाशी सुसंवाद साधणारी असावी. यासाठी तरुणाईची मने अधिक संस्कारक्षम करण्याची गरज आहे. कारण तरुण हे समाज माध्यमातील, समाज परिवर्तनातील, सशक्त समाज उभारणीतील महत्त्वाचा घटक आहेत. म्हणूनच आता ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनी समाज जागरणाचा, समाज शुद्धीकरणाचा ध्येयवाद निष्ठेने जोपासत, तरुणाईला योग्य दिशा दाखवायला हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. कारण आज तरुणाईतील निखळ संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. प्रत्यक्षात संवादातूनच सुसंवाद घडतो. अनेकदा हाच संवाद विसंवादही घडवून आणतो, पण घाबरण्याची गरज नाही. कारण विसंवादाच्या पूर्वी आणि नंतर संवादच असतो. म्हणूनच संवाद हा समाजाचा, संस्कृतीचा गाभा असला पाहिजे, याची जाणीव तरुणाईला करून द्यायलाच हवी.
ई-साहित्यात रमणाºया नवोदित साहित्यिकांना, तरुणाईला एवढेच सांगावेसे वाटते की, कुठल्याही परिस्थितीत सौहार्द, सहिष्णुता ही जपायलाच हवी. त्यासाठी लिखाणाची शैली चिंतनात्मक, मनोरंजनात्मक, प्रसंगी उपरोधिक असली तरी चालेल, परंतु ती हिंसक नसावी. तर माणूसपण जागवणारी, त्यांचे प्रबोधन करणारी, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हवी. कारण समाजातील सर्व पातळीवरील अंधार दूर करणे हेच साहित्यिकाचे आद्यकर्तव्य आहे. आजवरच्या साहित्यिकांनी आपापल्या परीने ते पार पाडले आहे. आता त्याची धुरा तरुणाईच्या रूपातील नवोदित साहित्यिकांवर आहे. त्यामुळेच आगामी कालखंडात निसर्गाचा आविष्कार, प्रेम, करुणा, वात्सल्य शब्दांच्या धाग्यात नजाकतीने गुंफताना क्रौर्य, द्वेष, सामाजिक विकृती, अन्याय, अत्याचाराविरुद्धची लढाईही प्रभावी लेखणीच्या माध्यमातूनच लढावी लागणार आहे. आजची तरुणाई, नवोदित साहित्यिक याचे भान ठेवून, सोशल मीडियाच्या अमर्याद आकाशात ई-साहित्याच्या पंखावर सजग, सशक्त शब्दांची उत्तुंग झेप निश्चितच घेतील, ही अपेक्षा आणि याच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)