धनगरांना आरक्षण कधी देणार, आधी ते सांगा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:07 AM2018-07-19T04:07:01+5:302018-07-19T04:07:27+5:30

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले होते

Will you ever give reservation to Dhangars, tell them first? | धनगरांना आरक्षण कधी देणार, आधी ते सांगा?

धनगरांना आरक्षण कधी देणार, आधी ते सांगा?

नागपूर : आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविरोधात बोलले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण मिळणार की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. आम्हाला ९७ च्या चर्चेत तसे अपेक्षित आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत मांडली.
आमदार रामराव वडकुते यांनी नियम ९७ अन्वये धनगर आरक्षणावर उपस्थित अल्पकालीन चर्चेत मुंडे म्हणाले, निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता ‘ क्या हुआ तेरा वादा’ असे धनगर समाज सरकारला विचारत आहे. त्यामुळे आरक्षण देणार की नाही. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस ही स्वायत्त संस्था आहे.या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल, अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. भाजपाचे सर्वोच्च नेतेच आरक्षणाच्या विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार, असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.
रामराव वडकुते म्हणाले, आमच्या हक्काचे आणि घटनेने दिलेले आरक्षण आम्हाला द्या, एवढीच आमची मागणी आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी वडकुते यांनी या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते ते येणार आहेत की नाही हे कळवावे तरच मी बोलतो असे स्पष्ट केले. यावर धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाच्या भावना इथे मांडल्या जाणार असून वडकुते यांची चर्चा घ्यावी, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना बोलवावे, असे सांगितले. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री उत्तर देण्यासाठी येणार आहेत असे सांगितल्याने चर्चा सुरू झाली. विनायक मेटे म्हणाले, सरकारने सत्तेवर येताना धनगर समाजाला आरक्षण देतो आश्वासन दिले होते. सरकारला सत्तेवर आणण्यात या समाजाची मोठी भूमिका आहे. नीलम गोºहे यांनी धनगर आरक्षणाला शिवसेनेचा तत्त्वत: पाठिंबा असल्याचे सांगितले. प्रवीण दरेकर म्हणाले, सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. मुख्यमंत्रीही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदस्य हरिभाऊ राठोड म्हणाले, जोपर्यत विष्णू सवरा मंत्री आहेत तोपर्यत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याने त्यांचे आदिवासी खाते काढण्यात यावे. चर्चेला उत्तर देण्यासाठी विष्णू सवरा उभे होताच विरोधकांनी विरोध दर्शविला. सदस्य हेमंत टकले, रामराव वडकुते यांनी यावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी केली. विरोधकांनीही सवरा यांच्या उत्तराला विरोध दर्शवित गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

Web Title: Will you ever give reservation to Dhangars, tell them first?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.