पंढरपूर (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार हे वेगळा निर्णय घेणार नाहीत. ते या परिस्थितीत, या वयात जर दुसरीकडे गेले तर त्यांनी आतापर्यंत जपलेली विश्वासार्हता निघून जाईल़ त्यामुळे ते दुस-या पक्षाला पाठिंबा देणार नाहीत, असे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने गेली निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यामुळे राज्यातील सत्ता गेली़ आता युती सरकारच्या विरोधात समविचारी सर्व पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री चांगले धोरण आखतात; मात्र त्यांच्याबरोबर काम करणारे अन्य मंत्री अनुभवी नाहीत़ त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित नाही़ त्यामुळे त्यांच्या योजना मार्गी लागत नाहीत़ माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याबाबत बोलताना कदम म्हणाले, आयुष्यात मंत्री एकदा झाल्यावर पुन्हा मंत्री पद कशाला पाहिजे. त्या काळात आपण जे काम करतो, त्याच्यावर तुमची किंमत ठरत असते. आपण त्या कालावधीमध्ये चांगले काम केले नाही तर परत कोणीच विचारत नाही़ शिवाय नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याने त्याचा काँग्रेसला काही फरक पडला नाही.

ग्राहकांच्या नावे लूट
८० टक्के साखर ही उद्योगांना तर २० टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते; मात्र ग्राहकांच्या नावावर शेतकºयांची लुबाडणूक होते. एफआरपीप्रमाणे उसाला भाव द्यावा, असा कायदा आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न चिघळत बसण्यापेक्षा चर्चेने विषय सोडविण्याची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले़