शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही? राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 06:46 PM2018-06-07T18:46:48+5:302018-06-07T18:46:48+5:30

भाजपने मागील चार वर्ष देशाची सतत दिशाभूलच केली आहे. शिवसेनेनेही त्यावर वारंवार अत्यंत कठोर भाषेत टीका केली. भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता.

Why did Shiv Sena not give the Spicy Vada Paav to Amit Shah ? Radhakrishna Vikhe-Patil's question | शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही? राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही? राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

Next

मुंबई - भाजपने मागील चार वर्ष देशाची सतत दिशाभूलच केली आहे. शिवसेनेनेही त्यावर वारंवार अत्यंत कठोर भाषेत टीका केली. भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांनी ढोकळा, खांडवी अन् गाठिया हाती घेऊन भाजप नेत्यांच्या स्वागताला उभे रहावे, हा महाराष्ट्राचा मोठा अवमान असून, तो शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी व्हावा, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. या अवमानानंतर शिवसेनेला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर केली.  

केंद्र व राज्य सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपलाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधून त्यांचे समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडे राहिलेली नाही. परिणामतः त्यांच्यावर ‘सेलिब्रेटीं’कडे जाऊन ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवण्याची वेळ ओढवली, असे टीकास्र  राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपने समर्थन मागण्यासाठी ‘सेलिब्रिटीं’ऐवजी सर्वसामान्य जनतेकडे जायला हवे होते.
 

गेल्या 1 जूनपासून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. भाजपला समर्थन मागायचेच होते तर संपकर्त्या शेतकऱ्यांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने होरपळून निघालेल्या ग्राहकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. एसटीच्या 18 टक्के भाडेवाढीचा फटका बसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोकरीसाठी दाहीदिशा फिरणाऱ्या तरूणांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोटबंदी, जीएसटीने व्यवसाय ठप्प झालेल्या व्यापारी अन् उद्योजकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पण भाजपकडे तेवढी हिंमत राहिलेली नसून, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून अन् त्यांचे समर्थन मागून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 


मागील चार वर्ष विरोधी पक्षांनी संपूर्ण देशात भाजप व शिवसेना सरकारविरूद्ध रान पेटवले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धडकी भरली असून, चार वर्ष एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर एकत्र येण्यासाठी केविलवाणी धडपड करतात, हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षांबद्दल धास्ती असल्यामुळेच अमित शहांच्या दौऱ्यात काँग्रेसने आंदोलन करू नये म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. पण खरे तर राज्य सरकारने निरूपम यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंना नजरकैदेत ठेवायला हवे होते. कारण संजय निरूपम यांनी फार तर अमित शहांसमोर निदर्शने केली असती. शिवसेनेसारखे 4 वर्ष सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसल्यानंतरही वेळोवेळी पाठीत खंजीर खुपसला नसता. भाजपला पाठीमागून वार करण्याचा खरा धोका शिवसेनेकडून असल्याने सरकारने निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना नजरकैद करायला हवे होते. पण त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीवर नजराणा पेश करायला गेले, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. 

Web Title: Why did Shiv Sena not give the Spicy Vada Paav to Amit Shah ? Radhakrishna Vikhe-Patil's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.