विजयी होऊ शकणाऱ्यांना उमेदवारी देण्यात काय चूक? - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 07:02 AM2019-03-17T07:02:03+5:302019-03-17T11:34:46+5:30

भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 What is wrong with giving tickets to those who win? - Jayant Patil | विजयी होऊ शकणाऱ्यांना उमेदवारी देण्यात काय चूक? - जयंत पाटील

विजयी होऊ शकणाऱ्यांना उमेदवारी देण्यात काय चूक? - जयंत पाटील

Next

- अतुल कुलकर्णी  

मुंबई  - भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. घराणेशाहीविषयीची त्यांची मते मात्र अस्पष्ट दिसली.
तुमच्या पक्षात तरी शरद पवार ते पार्थ पवार, असे घराणे आहे. अनेक नेत्यांच्या मुलांसाठी पक्षाने कार्यकर्त्यांना दूर सारले.
शरद पवार यांनी आर.आर. पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला नेता केल्याचे राज्याने पाहिले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना त्यांनी नेता बनवले. राहिला प्रश्न घराणेशाहीचा वा नेत्यांच्या मुलांचा. ज्या नेत्यांच्या मुलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे, तेथील लोकांनी जर त्याचे नेतृत्व मान्य केले आहे आणि ज्याच्यामध्ये इलेक्टीव्ह मेरिट आहे, अशा तरुणांना आम्ही उमेदवारी देण्यात चूक काहीच नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.

पण हाच न्याय तुम्ही सुजय विखे यांना दिला नाही. त्यांना उमेदवारी का नाकारली ?
नगर जिल्हा राष्टÑवादीची ताकद असलेला आहे. ६ पैकी ५ जागा आम्ही तेथे लढत आलोय. आमचाच पक्ष भाजपाचा पराभव करू शकतो हे आम्हाला माहिती असल्यामुळेच आम्ही ती जागा स्वत: लढवण्याचा निर्णय घेतला. लागणारा निकालच तुम्हाला याचे उत्तर देईल आणि सुजयला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, आम्ही ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला, एवढाच त्याचा अर्थ आहे.

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक असे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन नेतृत्व कसे उभे राहणार?
प्रत्येकाने कोठे काम करावे हा निर्णय स्वत: घ्यायचा असतो. गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांचे नाव सुचवले, तर दिलीप वळसे पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा तरुण चेहरा पक्षात आणला. त्यामुळे नव्यांना संधी दिलीच. भुजबळ यांची व्यक्तिगत कारणांमुळे दिल्लीत जाण्याची इच्छा नाही.

भाजपा सोशल मीडियामध्ये आघाडीवर आहे. मग तुमचा पक्ष मागे का?
भाजपाकडे सोशल मिडीया चालवणारे पगारी नोकर आहेत. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षाच्या विरोधात लिहीणाऱ्यांना ट्रोल करत असतात. मोठी संख्या त्यांनी पगारावर पोसली आहे, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, साधनसंपत्ती आहे. आमची तशी परिस्थिती नाही. पण एवढे करूनही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व भाजपाची खिल्ली सध्या उडवली जात आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेसाठी तुम्ही एक जागा सोडणार होतात. त्याचे काय झाले?
राज ठाकरे यांचे सहकार्य घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यांची भाषणे टोकदार असतात. राज यांचे आताचे भाषण मुख्यमंत्र्यांना एवढे झोंबले की, त्यांनी भाजपा शिवसेनेच्या संयुक्त सभेत अशा भाषणांनी विचलीत होऊ नका, असे सांगितले. राज ठाकरे स्वतंत्र विचारांचे आहेत आणि ते आघाडीत नसले तरी भाजपाला विरोध करणाºयाचे आमच्याकडे कायम स्वागतच आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोठे बिनसले? त्याचा काय परिणाम होईल?
दोन्ही काँग्रेसने त्यांच्यासोबत तीन चार बैठका घेतल्या. त्यांना चार जागा देण्यास तयारी दर्शवली. मात्र त्यांनी नांदेड, बारामतीच्या जागाही मागितल्या, तेव्हा लक्षात आले की ते कोणाचे तरी हस्तक म्हणून काम करत आहेत व त्यांना धर्मनिरपेक्ष विचारांना एकत्र आणण्याची इच्छा नाही. राज्यघटना बदलण्याची भूमिका संघाचे लोक घेत आहेत. अशा विचारांच्या लोकांचे राज्य घालवण्यासाठी त्यांनी अजूनही आमच्यासोबत यावे. अन्यथा त्यांच्यामुळे भाजपाला मदत होत आहे हा आक्षेप खरा ठरेल.

पक्ष मजबूत करण्यासाठी आयाराम गयारामांवर अवलंबून न राहता, प्रमुख कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, असे सांगत काहीही करून निवडणूक जिंकणे हे एवढेच ध्येय असता कामा नये, असेही ते म्हणाले. मात्र पक्षातील घराणेशाहीबद्दल ते म्हणाले की, निवडणूक जिंकू शकणाºयांना उमेदवारी देण्यात काहीच चूक नाही.

Web Title:  What is wrong with giving tickets to those who win? - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.