सातारा : ‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ हा एका चिमुरडीने विचारलेला प्रश्न समोर आला आणि राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले व आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनाही थोडा विचार करावा लागला.  
सांसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साता-यात शरद पवार यांचा सर्वपक्षीय गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे औचित्य साधून भावी पत्रकारांच्या बालचमुने त्यांना विश्रामगृहात गाठले. मुलाखत घेण्यासाठी ही चिमुरडी थेट समोर उभी ठाकताच पवारांच्या चेह-यावर कौतुकाचे भाव उमटले. ‘तुम्ही राजकारणात एवढे मोठे होणार, हे तुम्हाला बालपणी वाटले होते काय?’ समोर आलेल्या या अनपेक्षित प्रश्नावर ते मिश्कील हसले. खरं तर त्यांनी न बोलता उत्तर दिलं होतं, पण या बालसुलभ पत्रकारांना ते कसं कळणार!
‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ एका चिमुरडीने मोठ्या धिटाईने विचारलेल्या या प्रश्नावर पवारांनी भुवया उंचावल्या. ‘आत्मविश्वास बाळगा, वक्तृत्व कलेचा अभ्यास करा,’ असं सांगत ‘हंऽऽ आता पुढचा प्रश्न?’ पुकारत हसत-हसत पवारांनी मुलाखत संपविली!
चिमुकल्यांचा प्रश्न...पवारांची बगल
‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ एका चिमुरडीने टाकलेल्या गुगली प्रश्नावर शरद पवार दिलखुलास हसले खरे, पण उत्तर न देता त्यांनी हा प्रश्न समोर बसलेल्या इतर लोकप्रतिनिधींकडे टोलविला! मग तिनंही हट्ट सोडला नाही.
कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचे अन् कोणता प्रश्न टाळायचा, ही पवारांची खासियत या मुलांना माहीत नव्हती. हसत-हसत पवारांनी मुलाखत कधी संपविली, हे मुलांना कळलंदेखील नाही!