''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

By यदू जोशी | Published: October 27, 2018 03:48 AM2018-10-27T03:48:26+5:302018-10-27T03:49:09+5:30

‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

"We have two brothers, we Quarrel but stay with them" by devendra fadanvis | ''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

Next

मुंबई : ‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची मजबुरी नाही. आम्हाला आमच्या विचारांच्या मतांचे विभाजन नको आहे एवढेच, असेही ते म्हणाले.
भाजपा-शिवसेना युती सरकारला येत्या ३१ आॅक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी निवडक पत्रकारांशी शुक्रवारी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आणि आम्ही वेगळे लढलो, तर नुकसान दोघांचेही होईल. अयोध्येवरून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. भाजपाही हिंदुत्ववादी पक्ष
आहे. अशा वेळी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत थोडेच जाणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. ते करतील असेही वाटत नाही, केलीच तर चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.
सरकारमध्ये राहून शिवसेना सरकारला विरोध करणे अशा दुहेरी भूमिकेने राजकीय नुकसानच होते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजपावर हल्ले करतात. त्यावरून आपल्याला ते जवळचे वाटतात की विरोधी पक्षनेते विखे पाटील? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मला उद्धवच जवळचे वाटतात. विखे हे आम्हाला सत्तेतून घालवण्यासाठी बोलतात, तर उद्धव सुधारणेसाठी बोलतात.
लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली. भविष्यात आपण केंद्रात जाणार का? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुठेही आनंदी आहे, पण मी सध्या राज्यातच राहणार. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे मी माझ्या पक्षातील नेत्यांकडे पाहून वा त्यांना उद्देशून बोललो नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना उद्देशून बोललो होतो, असेही ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे, असेही ते एका उत्तरात म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कात
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगले इलेक्टिव्ह मेरिट असलेले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी ते भाजपात आलेले दिसतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
>विस्तार अधिवेशनापूर्वी करणार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १९ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुणाला काढायचे वा कुणाला घ्यायचे यावरून विस्तार रखडलेला नाही. काही जणांना काढले जाईल, त्याबाबत फारसा वाद नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: "We have two brothers, we Quarrel but stay with them" by devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.