ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 8 - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन अगोदरच अंकुरले असताना काढणीतही पावसाची बाधा कायम आहे. ५0 टक्क्यांवर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. सवडजवळ पुलावरून पाणी वाहात असल्याने हिंगोली-सेनगाव वाहतूक ठप्प झाली होती. तर बांगरनगरमध्ये पाणी घुसले आहे.  
जणू ढगफुटीप्रमाणे बरसलेल्या पावसाने हिंगोली शहर जलमय झाले होते. सखल भागात सगळीकडे पाणी साचले. बांगरनगर, जीनमातानगर भागात पाणी घुसले होते. कंबरेएवढ्या पाण्यात वाहनांचे टपच दिसत होते. तर एक-दोन वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अंबिका टॉकीज, सिद्धार्थनगर, मंगळवारा-मालवाडी भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही पावसाने दाणादाण उडाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते.
जिल्ह्यात मागच्या वादळी पावसात सोयाबीनसह झेंडू फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते. झेंडू उत्पादकांच्या तर तोंडचा घास हिरावला गेला. दसºयाला या फुलांच्या विक्रीतून परतावा मिळण्याची असलेली संधी हुकली. उडदाचेही ढीग भिजलेले असल्याने अनेक ठिकाणी हा उडीद पांढराफटक पडला. तर काही ठिकाणी तो जास्त काळ पावसात राहिल्याने त्याचा वास सुटला होता. सोयाबीनही अंकुरले होते. मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी सोयाबीन काढण्यात दंग होते. दुपारनंतर पुन्हा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा हे काम ठप्प झाले. 
शेतकºयांच्या पिकाची पसरण शेतात तशीच आहे. पावसाने भिजलेली ही पसरण आता वाळल्याशिवाय ढीग करण्यास उचलणे शक्य नाही. तर दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने यंदा काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन लागणारच नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा, मोप, भिंगी, कुरुंदा आदी भागात पावसाने चांगलेच झोडपले.
तीन तास मुसळधार
हिंगोलीत सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे जसे नुकसान झाले. तशीच गत ऐतिहासिक दसरा महोत्सवातील प्रदर्शनीची झाली. ऐन सुटीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे व्यवसाय ठप्प झाला. प्रदर्शनीत रोज २५ ते ४0 हजारांच्या आसपास नागरिक भेट देत असतात.