ऑनलाइन लोकमत

तेल्हारा, दि. 22 - आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पत्नीला पतीने मज्जाव करताच पारा चढलेल्या पत्नीने कपडे धुण्याच्या मोगरीने पतीची धुलाई केली तर यात पती जखमी होऊन त्याचा हात मोडल्याची घटना शहरातील उच्चशिक्षित वस्तीत घडली आहे. या भांडखोर पत्नीचा बंदोबस्त करण्याची मागणी शासकीय नोकरीत असणाऱ्या पतीने २० जुलै रोजी तेल्हारा पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.
तेल्हारा येथील ३५ वर्षीय इसम वीज वितरण कंपनीत तेल्हारा येथेच नोकरीला आहे. त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी व मुलासह आईसुद्धा राहते. ३० जून रोजी सायंकाळी ७ वाजता पती घरी आले असता त्यांची पत्नी त्यांच्या आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होती. तिने स्वत:च्या सासुला घराबाहेर काढून घर आतून बंद करून घेतले होते. पतीने तिला घर उघडण्यासाठी आवाज देताच पारा चढलेली पत्नी आतुन भाजी कापण्याची सुरी घेऊन पतीच्या अंगावर धावून आली. सूरा बाजुला फेकत तीने कपडे धुण्याच्या मोगरी हातात घेतली व पतीची चांगलीच धुलाई केली. यात पतीचा हात फ्रॅक्चर झाला. या विषयीची तक्रार पतीने तेल्हारा पोलिसात २० जुलै रोजी दिली आहे. पत्नीवर गुन्हे दाखल करून तिच्यापासून आपली सुटका करा. तिच्यापासून आपल्या व कुटूंबीयाच्या जीवित्वास धोका असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. सदर प्रकरणाची चौकशी ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ गणपत गवळी व नागोराव भांगे करीत असून सदर प्रकरण महिला विशेष सुरक्षा आकोटकडे पाठविण्यात आले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.