जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 05:08 PM2019-07-14T17:08:14+5:302019-07-14T17:09:36+5:30

आषाढी यात्रा ; सीसीटीव्हीमध्ये पाहून धरिला पंढरीचा चोर...

Warkaris fraud using the old receipt book | जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देसंबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईपंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला निर्णय

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जुने पावती पुस्तक वापरून एका कर्मचाऱ्याने भाविकांची अन् समितीची फसवणूक केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.


  आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत लाखो भाविक येतात. विठ्ठलावरील श्रद्धेपोटी भाविक देणगी स्वरूपात व अन्य स्वरूपात विठ्ठलाला दान करतात. यामुळे देणगी स्वीकारण्यासाठी  मंदिर व दर्शन मंडप परिसरात केंद्रे उभारली आहेत. देणगी स्वीकारण्याचे काम मंदिर समिती स्वयंसेवक व हंगामी कर्मचाऱ्यांकडून घेते. देणगी स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे पावती पुस्तकेही दिली आहेत.


  आषाढी यात्रेतील अष्टमी दिवशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या पुलावर काही भाविकांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याकडे देणगी दिली. सिद्धेश्वर घायाळ यांनी संबंधित भाविकांना पावत्याही दिल्या; परंतु ते भाविक पुढे गेल्यावर त्यांना दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे देणगीची पावती वेगळ्या स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आले. पावत्यांमध्ये विसंगती पाहून संबंधित भाविकांना देणगी स्विकारण्यात काहीतरी घोळ असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात धाव घेतली.


  ही माहिती पोलीस नाईक वामनराव यलमार यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक राजेश देवरे व पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना सांगितली. सर्वांच्या सूचनेनुसार मंदिर समितीतील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून भाविकांनी संशय व्यक्त केलेला कर्मचारी सिद्धेश्वरला शोधून काढले. मंदिर समितीने अनेक वर्षापूर्वी बरखास्त केलेले पावती पुस्तक सिद्धेश्वरकडे आढळून आले. यामुळे तत्काळ सिद्धेश्वरवर निलंबनाची कारवाई  केली गेली.

Web Title: Warkaris fraud using the old receipt book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.