Wani Wakoli area: The center of the Koda rigging occurred on the Brahmani route | वणी वेकोलि क्षेत्र : ब्राह्मणी मार्ग झाला कोळसा हेराफेरीचे केंद्र

वणी (यवतमाळ) -  खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविला जातो. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात. त्यानंतर तेथून तो माती, दगड मिश्रित कोळसा रेल्वेसायडिंगवर पोहचविला जातो. त्यामुळे ब्राह्मणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाल्याचे पंचक्रोशीतील गावकरी सांगतात.
वणी बायपासवरील ब्राह्मणी मार्गाच्या पुढे वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी आहेत. या मार्गाने दररोज मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. याच मार्गावर किमान चार ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. निळापूर-ब्राह्मणी या गावांच्या पुढे कोलारपिपरी, पिंपळगाव, जुनाड, निलजई, नायगाव, उकणी आदी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वाहतुकीदरम्यान, कोळशाची हेराफेरी करणे सोईचे जावे, यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला ट्रकमधील कोळसा डम्प करून नंतर त्यात हेराफेरी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. असे असले तरी वेकोलि प्रशासन अथवा पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या हेराफेरीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
कोळशात माती व दगड मिश्रण करणारे मजूरही गुंड प्रवृत्तीचे असून यासाठी त्यांना मोठी रक्कम अदा केली जाते. या मजुरांजवळदेखील घातक शस्त्रे असतात, असे सांगितले जाते. कोळशात माती व दगड मिसळविल्यानंतर कोळशाने भरलेला ट्रक वणी रेल्वे सायडिंगवर आणला जातो, त्यावेळी अनेकदा या कोळशाचे मोजमापही केले जात नसल्याची माहिती आहे. यासाठी संबंधित ‘काटाबाबू’ला देखील मोठी बिदागी दिली जात असल्याची चर्चा आहे. एकूणच हा तस्करीचा व्यवसाय सर्व पातळ्यांवर ‘मॅनेज’ असल्याने कोणत्याही कारवाया होताना दिसत नाही.

मिश्रणासाठी कोळसा खाणीतीलच दगड-माती

कोळशात केलेली हेराफेरी उघड होऊ नये, यासाठी खाणीतूनच दगड आणि माती आणली जाते. या दगड आणि मातीचा रंगही काळाच असतो. त्यात काही प्रमाणात कोळशाची बारीक चुरीदेखील असते.
त्यामुळे तो कोळसा आहे की दगड आहे, हे सहज लक्षात येत नाही. कोळशात त्याचे मिश्रण केल्यानंतर तर लक्षात येत नाही. त्यामुळे कोळसा तस्कर हा फंडा वापरत आहेत.

‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणेची पाळत : गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’मध्ये वणी वेकोलि क्षेत्रात सुरू असलेल्या कोळसा चोरीबद्दल वृत्तमालिका प्रकाशित केली जात आहे. त्यामुळे कोळसा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलीस यंत्रणाही या तस्करांवर पाळत ठेऊन आहे.


Web Title:  Wani Wakoli area: The center of the Koda rigging occurred on the Brahmani route
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.