On the wage day, sir! | रोजंदारीवर या, साहेब बना !
रोजंदारीवर या, साहेब बना !

यदु जोशी, मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात रोजंदारीवर लागलेल्यांना बढत्या देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असताना हे प्रकार बिनबोभाटपणे घडत राहिले. जवळपास तीन वर्षे सेवा कालावधीत लिपिक ते साहाय्यक महाव्यवस्थापक अशी बढती देण्याचे उजेडात आले आहे़
वैशाली विशाल मुडळे १३ जुलै २०१० रोजी लिपिक म्हणून रोजंदारीवर लागल्या. आता त्या साहाय्यक महाव्यवस्थापक आहेत. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांना ही बढती मिळाली. त्यांचा सेवा कालावधी केवळ दोन वर्षे १० महिने झालेला होता. सुजाता पांडुरंग सणस साहाय्यक लेखाधिकारी पदावर, मात्र रोजंदारीवर महामंडळात रुजू झाल्या आणि त्यांना या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आली. कार्यालयीन साहाय्यक सुषमा रामकृष्ण कसबे यांना १ वर्षे पाच महिन्यांत रोजंदारीवरून कायम करण्यात आले. अपूर्वा बावणे, मीनाक्षी अरुण टुंबरे, दर्शन रमेश जोशी यांच्याबाबत असेच घडले.
११ महिने ते २ वर्षांच्या कालावधीत त्यांना कायम करण्यात आले. याच कर्मचाऱ्यांवर एवढी कृपादृष्टी का दाखविण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. जिल्हा व्यवस्थापकांचा कार्यकारी भार लिपिकांना देण्याचे प्रकारही महामंडळात घडले. बढत्यांव्यतिरिक्त भरतीमध्येही प्रचंड घोळ करण्यात आले. सरकारी नोकरी कोणताही अर्ज, मुलाखत, परीक्षा न देता मिळविता येते यावर महाराष्ट्रात तरी कोणाचा विश्वास बसणार नाही़ पण महामंडळात दोन-अडीच वर्षांत तब्बल ७१ कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने भरती करण्यात आली. त्यातील ५५ जणांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्यात आले. महामंडळ हे स्वायत्त आहे आणि सरकारचे नियम त्याला लागू होत नाहीत, अशी उद्दाम भूमिका घेण्यात आली.

‘जम्पिंग प्रमोशन’ची महामंडळाची कबुली
या महामंडळात मनमानी बढती देण्यात आल्याची बाब महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी मान्य केली आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रात महाव्यवस्थापकांनी म्हटले आहे की, २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात असे प्रकार घडले. नियुक्ती वा बढतीमध्ये कोणत्याही विहित प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. नियम धाब्यावर बसविण्यात आले.

‘लोकमत’च्या मालिकेचे राज्यभर पडसाद
च्‘लोकमत’ने या महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळ्यांची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता घोटाळ्यात अडकलेल्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते मधुकर कांबळे म्हणाले की, इतके ढळढळीत पुरावे असताना भ्रष्टाचाऱ्यांना तातडीने गजाआड केले पाहिजे.
च्क्रांतिसूर्य लहूजी साळवे विचार मंचचे अध्यक्ष दीपक सोनोने यांनी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्या अटकेची मागणी पत्रकाद्वारे केली आहे. लालसेना या संघटनेचे अध्यक्ष गणपत भिसे हे रमेश कदम आणि इतरांच्या अटकेच्या मागणीसाठी ७ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत.

मनमानी कर्जवाटपाचा पर्दाफाश
‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात मनमानी कर्जवाटपाचा पर्दाफाश केला होता. आज त्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मातंग आणि तत्सम जातीच्या महिला भाग्यवानच म्हटल्या पाहिजेत. महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली या ठिकाणी १ हजार ३१३ महिलांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे ६ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज दिले. तसेच ७०५ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी आठ जणांना ८७ लाख ४२ हजार ८९१ रुपये कर्ज देण्यात आले. असे मोहोळ तालुक्यात १० कोटी ९८ लाख १७ हजार ८९१ रुपये वाटण्यात आले.


Web Title: On the wage day, sir!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.