विखेंनी आमदारकी सोडली; लवकरच भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:38 AM2019-06-05T02:38:22+5:302019-06-05T02:38:45+5:30

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले

Vikhanee quit MLA; Soon join BJP, discuss with Congress MLAs | विखेंनी आमदारकी सोडली; लवकरच भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांशी चर्चा

विखेंनी आमदारकी सोडली; लवकरच भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांशी चर्चा

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : काँग्रेसमधील पाच आमदारांशी खलबतं केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला. विखेंचा भाजप प्रवेश ही केवळ आता औपचारिकता उरली आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले. शिर्डी आणि नगरमध्ये त्यांनी भाजप उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी विखेंनी राजीनामा देण्यापूर्वी राहुल बोंद्रे (चिखली), गोपाळ अग्रवाल (गोंदिया), सुनील केदार (सावनेर), जयकुमार गोरे (माण) आणि भारत भालके (पंढरपूर) या काँग्रेस आमदारांशी चर्चा केली. सोबत सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार होते. विखेंसोबत हे आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त पसरताच आ. बोंद्रे यांनी खुलासा करत आपण भाजपमध्ये जाणार नाही, पण विखे यांनी राजीनामा देऊ नये, असे समजावण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होता, असे सांगितले. तर मला पक्षाने बडतर्फ केले आहे, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे आ. सत्तार यांनी सांगितले.

भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी १३५ जागा आणि १८ जागा मित्रपक्षांना, असा युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. सहा अपक्ष आणि रासपचे एक असे सात जण भाजपसोबत आहेत. असे १२९ आमदार सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून येणाऱ्यांसाठी भाजपकडे फक्त ६ जागा शिल्लक आहेत. काँग्रेसमधून जे येतील त्या ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्यापैकी जे दोन नंबरवर होते त्यांचे काय करायचे? समजा त्यांनी बंडखोरी केली अथवा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून लढले तर पक्षासाठी ती वेगळीच डोकेदुखी ठरू शकते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

२०१४ मध्ये काय घडले होते?
सुनील केदार यांनी शिवसेना उमेदवाराचा ९,१७५ मतांनी पराभव केला होता. ते भाजपमध्ये गेल्यास सेनेला ही जागा सोडावी लागेल. राहुल बोंद्रे यांनी १४,०६१ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता, तर गोपाळ अग्रवाल यांनी भाजप उमेदवाराचा १०,७५८ मतांनी पराभव केला होता.

जागा वाटपात या जागा भाजपकडे आहेत, पण स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून यांना भाजपमध्ये घ्यावे लागेल. भारत भालके यांनी प्रशांत परिचारक यांचा ८,९१३ मतांनी पराभव केला होता, पण आता परिचारक भाजप पुरस्कृत आमदार झाल्याने भालके यांना भाजपमध्ये जाणे फायद्याचे ठरू शकते.

जयकुमार गोरे यांनी त्यांचे भाऊ शेखर गोरे यांचा २३,३५१ मतांनी पराभव केला होता, यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.

आपण भाजपमध्ये प्रवेश करू. मला मंत्रिपद द्यायचे की कसे, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत होती, दिल्लीतल्या नेत्यांविषयी तक्रार नाही, पण राज्यातील नेतृत्वाने आपल्याला साथ दिली नाही. उलट आपली कोंडी करण्याचाच प्रयत्न केला. - राधाकृष्ण विखे पाटील

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आ. अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शविला आहे. त्यांनी मंगळवारी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तार यांच्या विरोधात रणनीती आखली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी सांगितले.

Web Title: Vikhanee quit MLA; Soon join BJP, discuss with Congress MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.